शेख महंमद चरित्र - भाग २०
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
कालनिदर्शक असें आणखी एक पद या बाडांत उपलब्ध झाले आहे. तें शेख महंमदाचा गुरुप्रसाद झालेल्या मुधा पांगुळ नांवाच्या शिष्याचें आहे. त्याचे आणखीहि एकदोन धांवे आहेत. परंतु त्यांतील जरूर तेवढाच भाग नमूद करतो. ‘‘धर्म जागो महंमदाचा । त्याच्या दाना अगणित रुचा ॥ ध्रु.॥
इच्छा झाली पांगुळाला । सद्गुरु तुझा धांवा केला ॥ दान दे बा निज नामाचें । म्हणुनि उपवास म्यां केला ॥ रुई नांदे सरवरतटीं । दाता उचितासी आला ॥ दिपवाळीं शुद्ध पाडवा (१७ आक्टोबर १६७७) । दान दिलें पांगुळाला ॥१॥’’.
दुसरा उल्ल्ेखः कालयुक्त संवत्सरी । दाता वाहिरे नगरीं॥ वैशाख वदिं सप्तमीसी । दान दिधलें गुरुवारी (३ मे १६७८) ॥ पदीं बैसवुनी पांगळाला । शेला घालुनि अंगावरी ॥ भाव देखोनि गोपाळाचा । हात जोडुन शरण करी ॥२॥
.....भाव भक्ति करून कांहीं । सेवादान घडलें नाही ॥......कोण्या पुण्यें दया केली । दाता सद्गुरूनें पाही ॥....... शेख महंमद नाम ज्याचें । मुधा पांगुळ त्याचे पाई ॥५॥’’. उपरिनिर्दिष्ट वर्णनावरून मुधा पांगुळाला हा शेख महंमदांचा गुरुप्रसाद शेख महंमद कबरस्थ झाल्यानंतर बर्याच वर्षांनी झाला असावा असें दिसते. हें त्यानेंच केलेल्या प्रासादप्राप्तीपूर्वीच्या एका धांव्यावरून अधिक स्पष्ट होते. मुधा पांगुळ लिहितोः ‘‘......शिष्य म्हणवुं तरी शिष्यत्व नाहीं केलें । बारा वर्षे जग म्यां भोंदिलें । आतां माझे कर्म उदेलें । कृपा करावी जी सद्गुरु ॥५॥
सेवक म्हणवूं तरी सेवा नाहीं घडली । दास म्हणवूं तरी दास्यत्व नाहीं केले । ऐसी तस्कर विद्या म्यां केली । आतां मज दंडिले पाहिजे ॥६॥
....दाता शेख महंमद महाराज । मुधा पांगुळ निज गुज । आतां कृपा करावी सहज । मज दान द्यावें ॥४१॥’’.
यावरून शेख महंमदाचा कबरस्थ होण्याचा काल इ. स. १६७८ पूर्वीं बाराचौदा वर्षें तरी मागें म्हणजे निदान इ. स. १६६३ पूर्वी न्यावा लागेल. असो.
टीपः
शेख महंमदबाबा मठ संग्रह, बाडांक ९, क्र. ३५ व पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. २४७, संदर्भांक ८९.
शेख महंमदबाबा मठ संग्रह, बाडांक ५, क्र. ६, संदर्भांक ११०.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP