शेख महंमद चरित्र - भाग २२
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांचें ‘हिंदोळा’ म्हणून एक लहानसे प्रकरण आहे. त्यांत सद्गुरु उपदेश देऊन अंगिकारतो त्या वेळच्या त्या शिष्याच्या मनःस्थितीचे वर्णन आहे. त्या प्रकरणांतील मुख्य भाग असाः ‘‘....सद्गुरूचेनि संगें ॥२१॥
हेत चित्त मन बुद्धि । विरोनि लागली समाधि । तेथें लोपली उपाधि । द्वैतपणाची ॥२२॥ आणीक एक देखिला विचार । निशिदिनीं नाहीं अंधःकार । सुन नांदवितसे सासर । महासत्ताबळें ॥२३॥
ये स्वप्न स्वप्नामाझारीं । वैराग्य बोधें केली हेरी । तेथें मी पुरुष ना नारी । अव्यक्त असे ॥२४॥
हेत चित्त मन बुद्धि । विरोनि लागली सहज समाधि । तेथें लोपली उपाधि । त्रिगुणांची ॥२५॥
ऐसें स्वप्न पाहावें सद्खेळें । तरीच मनुष्य जन्म सुफळ । नाहीं तरी धिक् जिणें देहें ढाळ । विषयांची ॥२६॥
पहाणेपण गिळुनियां तमासे । पहा देखियले कैसे । शेख महंमद विश्र्वासे । सद्गुरुसी ॥२७॥’’.
शेख महंमदांच्या स्थितिपर वगैरे अभंगांतून दोनतीन महत्त्वाचे अभंग पुढें देतो. पहिला अभंग असाः ‘‘धन्य तो परमात्मा । परात्पर सीमा । चतुर खाणी उत्तमा । लक्ष चौर्यांशी॥धृ.॥
चराचर नांदती॥ नामघोष करिती । चौदा भुवनें उत्पत्ती । दहा खंड क्षेत्र ॥१॥ जन्मभूमिका धारूर । वाहेरे रुई नगर । कडेवळीत भिंगार । जुनेर देश । ॥२॥
दौलताबाद बेदर । तेलंगण इंदूर (इंदूर-बोधन) । बीड भागानगर । कर्णाटक ॥३॥
उत्तरेसी दक्षिण । पूर्वं पश्र्चिम ईशान्य । आग्नेय नैॠत्य वायव्य जाण । अष्ट दिशा ॥४॥
वडाळी सुरवडी । देऊळगांव श्रीगोंदाप्रोढी । कोरेगांव रासीनप्रोढी । अनंतगांव ॥५॥
निशीं दिनीं दोनी । कथा करिती ज्ञानी । सद्गुरु निर्गुण ध्यानी । शेख महंमद ॥६॥’’. यानंतर दुसरा अभंग जयरामस्वामीबद्दलचा आहे. ‘‘जयरामशेख महंमद पीर । जयरामाचे नमस्कार । आठव माझा विसर । पडो न द्यावा ॥१॥
स्वामी तुमच्या नेमी दीन । होईन सनातन । माझा हेत संपूर्ण । तुमच्या पाई ॥२॥ मेला मेला म्हणती । तरी तुमचेच चरणीं पुरती । हेचि माझी भक्ति । अनिवार ॥३॥ स्वामी मागें मी पुढें । हें कांहीं ना पडक सांकडें । पाई ठेविलें रोकडे । शेख महंमदी ॥४॥’’.
शेवटी आरतीसंग्रहांतील रामीरामदासांची आरती देऊन या अप्रसिद्ध बाडांतील साहित्याची चर्चा आवरतो. ‘‘आरती रामदासस ॥जयजय॥ महंमद शेखा । तुज ब्रह्मादिक वर्णिती नकळे गुज विवेका ॥ध्रु.॥
अभिन्नत्व आर्त अनिवार पाही । आठव न विसर मज हृदयई ध्यायीं॥ दृश्येविण दर्शन दिधलें सम ठायीं । म्हणऊनि वियोगें सोऽहं तत्त्व लाहीं ॥१॥
कल्पांतीचें संचित सांचलें माझें । तेणें गुणें दर्शन लधिमी केलेस बीजें॥ क्षेमेविण आलिंगन सुख पाहे सहजें । ज्ञेप्ती अपरोक्ष पिता किंकर तुज साजे ॥२॥
देह जरी वोवाळूं उसनें पांचाचें । जिव शिव वोवाळूं तर देणें हें तुमचें ॥ भाव भक्ति नेणें पोसणें संतांचें । रामीरामदास चरणरज संतांचे (पाठ-महंमदाचें) ॥३॥’’.
टीपः
पोतदार-संग्रह बाडांक १, क्र. २६३, संदर्भांक २६७.
शेख महंमदबाबा मठ संग्रह, बाडांक १, क्र. ४९, संदर्भाक १०१.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ५६, संदर्भांक १७७.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ३, संदर्भांक १३०.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP