‘सिजर्यांतील’ (गुरुपरंपरेतील) जरूर तो भाग वर दिलाच आहे. त्यांत शेख महंमदाचा शिष्य दावलजी म्हणून दिला आहे. त्याने केलेल्या आरतीवरून सिजर्यांतील ही परंपरा बरोबर लावता येते. या आरतींतील शेवटची दोन कडवी उद्धृत करतो. ‘‘....पांचा तत्त्वांची करूनी आरती । ज्ञानदीप लावुनी घेतली हाती । भावें वोवाळिलें आम्ही श्रीपरती । शेख महंमद गुरु माझा ते सती ॥५॥
त्याचे कृपेनें केली आरती । दावलजी म्हणे मी बहु मुढमती । घेऊन बैसले मजला पंगती । सद्गुरुप्रसादें अविनाश आरती ॥६॥
जय जय आरती आरक्तरूपा । त्रिभुवनतारका तूं मायबापा ॥ध्रु.॥’’.
दावलजीचा शिष्य हाकमी यानेंहि एक आरती केली आहे, तिचें शेवटचें कडवें असेः ‘‘तूर्येचा जो अंतःकरणीं हो महंमदानंद । हाकीम महंमद आरती ऐसी भाविका छंद ॥३॥’’.
या हाकीमाचा शिष्य बालाबावा. यानेंहि बरीच कविता केली आहे. परंतु त्यांतील उतारे देण्याचें कारण नाही. कारण त्याच्या नांवाचे वगैरे उल्लेख करणारे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध झाले असून त्यांची चर्चा पुढें येणारच आहे. बालाबावा हा शेख महंमदाचा पणतु असें त्यावरून सिद्ध आहे. परंतु दावलजी हा शेख महंमदाचा मुलगा व हाकीम नातु होता की ते शिष्य व प्रशिष्य होते हे सांगणें पुराव्याचें आभावी शक्य नाही. असो.
१०. शेख महंमद मठांतील बाडांमधील इतर माहितीः नवीन मिळालेल्या संग्रहांत ‘योगसंग्राम’, ‘निष्कलंकप्रबोध’ व ‘पवनविजय’ असे तीन ग्रंथ व सुमारे तीनशेपर्यंत अभंग शेख महंमदाचे आहेत. थोडक्यात अभंगांची विषयवारी सांगावयाची तर
(१) सद्गुरुकृपा किंवा महिमा - ३०;
(२) भक्तिबोध, भावभक्ति, भक्ताभक्त, नाममहिमा, विरक्ति, विवेक, स्वानुभव, आत्मस्थिति, अंतरशुद्धि, ब्रह्मानंद, द्वैताद्वैत किंवा अविद्या-सुविद्या, पंचतत्त्वें, साधुसंत, आत्मज्ञानी, योगी, वैराटिका, कूट - ७५;
(३) आचारबोध, नरदेह, जन्ममरण, यतिश्रेष्ठत्व, यवनविटाळ, सोंवळे-वोंवळें, तीर्थें, दुर्जन, पाखंडी, स्त्रैण, कर्माकर्म, संचित, आचारशुद्धि-७१;
(४) रूपकें वगैरे, लळीत, गणेश, राम, पंढरी, विठ्ठल, चांग बोधले, जयराम, वासुदेव, जोगी, पांगुळ, शूर, फत्तेहनामा, वनजारा, सौरी, मुंढा, कैकाये, जखडी, महात्मा, तेली, नापीक, हाटकरी, कवी, तरु, हिंदोळा, राधा, नवविधाभक्ति, आशीर्वाद, श्राप, कलियुग, दोहरे, आरत्या - ५२;
(५) प्रकरणें-मदालसा, गायका-२;
(६) हिंदुस्थानी कबीत - ३५. याशिवाय महंमदाच्या शिष्यानुयायांचीहि कविता व इतर प्रकरणें बरींच आहेत. त्यांतील चरित्रपर महत्त्वाच्या अभंगांचें उल्लेख वर आलेच आहेत. या अभंगांचे शेवटी जुन्या वह्यात ‘सय्यद महंमद’ व इतरांत ‘शेख महंमद’ असे उल्लेख येतात. स्तुतिपर लिहिण्यांत मुख्य मुख्य नांवे सांगावयाची तर --- रामदास, मुधा, अकबरशा, बालाशा, शाहूसेन, बुर्हानशा, मोजमशा, दयाळदास, रघुनाथ योगी, हाकीम, दालजी, निर्मलशा, मुधया, इत्यादि---यांतील महत्त्वाचे उतारे नंतर येतीलच. परंतु हा संग्रह म्हणजे केवळ शेख महंमदविषयक नसून त्यांतील अर्घ्यापेक्षां अधिक भाग तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, केशव, मुकुंदराज, जयरामसुत, कबीर, सुरदास, मानपुरी, नामा, जनी वगैरे अनेक संतकवींच्या कवितेनें व्यापला आहे. त्याशिवाय हरिहरमाला व मुकुंदाचे ‘पवनविजय’, एकनाथांची ‘आनंद लहरी’, ‘मूळस्तंभ’ वगैरे किती तरी इतर प्रकरणें आलीं आहेत. अर्थात् या पांचसहा वह्या सारा ग्रंथसंग्रह असें मानण्याचें कारण नाही. याशिवाय शेख महंमदाची वा शेख महंमदपर पुष्कळ कविता उपलब्ध होण्याचा संभव आहे.
दक्षिणेत गोदेला किंवा गोदावरी नदीला काशी-गंगेइतकें महत्त्व प्राप्त झालें होतें हें शेख महंमदाच्या लिहण्यावरून स्पष्ट होते. या विषयावरील उल्लेख मागे आलेच आहेत. आणखी थोडेसे पुढें देतोः काय करील काशी गोदावरी ॥३॥
विधि प्रयाग वाया गेले । जैसे काग बग गोदीं नाहाले ॥४॥
शेख महंमद हृदयीं चांग । गोदावाराणसी अष्टांग ॥५॥’’.
आणखी एका अभंगांत ते लिहितात कीं, ‘‘ऐसा आचार नोव्हे बरा । आधीं हृदय निर्मळ करा ॥१॥
कागा गोदेची आंघोळी । बाहेर आल्या विष्ठा रंवदळीं ॥२॥’’.