शेख महंमदांच्या गुरुपरंपरेबद्दल कोणीच उल्लेख केलेला नसल्यानें त्यांनीच दिलेल्या माहितीवर अवलंबून राहावें लागते. परंतु हा पुरावा अव्वल दर्जाचा असल्यानें त्याबद्दल शंका घेण्याचें अगर चर्चा करण्याचें कारणच उरत नाही. ‘योगसंग्रामा’च्या पंधराव्या अध्यायांत शेख महंमद लिहितातः ‘‘ॐ नमोजी सद्गुरु चांग बोधले ।.....सत् चांद बोधल्याचें कुळी शेख । महंमदानीं चर्चिला विवेक । ते विवंचनेला सत प्रश्र्निक । आशिर्वाद देती ॥४॥’’.
त्यानंतर आपल्या गुरूच्या योगसामर्थ्याची हकीकत देऊन त्यांची महती सांगतांना ते लिहितात की, ‘‘पातशहानें (दौलताबादच्या) मना केली बगणी (वागणी ?) । चांग बोधले अजमतेचे धणी । त्यांनी त्याची मना केली हागणी । हें विश्र्व साक्ष असे ॥५॥
नृपति लागले बोधल्याचे चरणीं । मग त्याणीं मोकळी केली हागणी । मग आनंद झाला त्रिभुवनी । दरशनें पुजिली ॥६॥
हें सांगावया काय कारण । म्हणती शेख महंमदालागुन । कोठील पुसा कोणाचा कोण । यालागीं प्रगटिलें ॥७॥’’.
योगमार्गी हिंदु लोक गुरूच्या नांवाचा उल्लेख होतो होईतो टाळतात. परंतु एखादेवेळी नाइलाज म्हणून ओघांत तो येऊन जातो. तशी विचारपद्धति मुसलमान साधूंत नसते. आपला गुरु तोच जनार्दनपंताचा गुरु हेंहि शेख महंमदबाबाने याच अध्यायाच्या सुरुवातीसच सांगितले आहे. तो उल्लेख असाः ‘‘श्रीसद्गुरु चांग बोधले । त्यांनी जानोपंतां अंगिकारिलें । जानोबानें एका उपदेशिलें । दास्यत्वगुणें ॥१॥’’.
हाच मजकूर शेख महंमदानें आपल्या एका अभंगांत स्वतंत्रपणें दिला आहे. तो देतांना आणखी तत्संबंधीय दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. तो अभंगः
‘‘धन्य चांद बोधले । त्यांनीं जानोपंता लोधले । त्यांच्या शेशें धाले । एको जर्नादन ॥१॥ केली भागवत टीका । उद्धार विश्र्वलोका । तेच दिसे सायेका । स्वामीपाशीं ॥२॥
त्रिपदा पिळिली । कुतरी पान्हायेली । उच्छिष्ट कृपा लाधली । जानोबासी ॥३॥
स्वामी अगाध तुमचा महिमा । न कळे मेघःशामा । लघिमी केलीं क्षमा । जयेरामासी ॥४॥
दासीपुत्र विदुर । तैसा मी तुमचा किंकर । सरता जालों साचार । शेख महंमदीं ॥५॥’’. ‘त्रिपदा पिळिली’ या प्रसंगावरून महिपतीनें एकनाथचरित्रांत बराच असत्य पाल्हाळ केला आहे. कुतरीच्या दुधांत ‘वाळके भाकरीचे तुकडे’, सोन्याचें ताट, षड्रस पक्वान्नें वगैरेंची भर घालून प्रसाद सजविला. बोधले मलंग वेशांत, म्हणून एकनाथाकडून प्रसादाचा अव्हेर करविला. सारांश, या प्रसंगांत काल्पनिक मजकूर घालून एक मूळ कथा विकृत करून त्यांतील खरे रहस्य साफ नाहींसे केले आहे. दुसरा प्रसंग जयरामस्वामीस उद्देशून आहे. त्यांत ‘लघिमी केली क्षमा जयरामासी’ असें म्हटलें आहे. त्यांत कारणबोध नसल्यानें प्रसंगाचें स्वरूप लक्षांत येत नाही. ही ‘क्षमा’ चांद बोधलेंनी प्रत्यक्ष केली कीं अप्रत्यक्षपणें केली याचाहि नीटसा बोध होत नाही. जयरामस्वामीचे गुरु पैठणकडचे होते. त्यामुळें जयरामस्वामींचा व चांद बोधल्यांचा पूर्वी केव्हां तरी संबंध आला असावा असें उल्लेखावरून वाटते. परंतु चांद बोधल्यांचा काल व जयरामस्वामींचा काल याचा विचार करितां दोघांच्या प्रत्यक्ष भेटीचा संभव कमी वाटतो. कदाचित् शेख महंमद व जयरामस्वामी यांच्या लघिमासिद्धीप्रदर्शनाच्या झटापटींत चांद बोथल्यांनीं आपल्या शिष्यास साक्षात्कारानें रोखलें असावें व त्यायोगें शेख महंमदाकडून होणारा दुराग्रही अत्याचार घडला नसावा. या प्रसंगानें रामीरामदासांच्या आरतींतील ‘‘कल्पांतीचें संचित सांचलें माझें । तेणें गुणें दर्शन लघिमी केलेसें बीजें॥ क्षेमेविण आलिंगनसुख पाहे सहजे । ज्ञेप्ती अपरोक्ष पिता किंकर तुज साजे॥’’ या उक्तीची आठवण होते. आतापर्यंत जयरामस्वामींचें चरित्रांत उपलब्ध झालेले दोनच प्रसंगांचा संबंध या प्रसंगाशीं जोडतां येईल. जयरामस्वामी शेख महंमदाची परीक्षा घेण्यास आले असतां त्यांना व्याघ्रस्वरूपांत प्रथम भेट देणें व नंतर ‘‘एकांताचे ठायी नवलाव ते केले । जानवे दाविलें चिरुनी खांदा ॥९०॥
मुळीचें ब्राह्मण आलों याचि ठाया । दाखविलें तया यज्ञोपवित ॥९१॥
सदाशिव लिंग अक्षई मस्तकी । देखिलें कवतुक जयरामानें ॥९२॥’’.
या दोन गोष्टींचा संबंध चांद बोधल्यांनीं लघिमीं क्षमा केली या माहितीशी कितपत लावता येईल तें समजत नाही. आणखी एक महत्त्वाचा उल्लेख शेख महंमदांनी केला आहे; तो म्हणजे ‘किंकर । सरता जालों साचार॥’ हा होय. यावरून चांद बोधल्यांचा शेख महंमदास उपदेश बोधल्यांच्या अगदीं उत्तरायुष्यांत झाला व बहुधा ज्यावेळी त्यांनी समाधि घेतली त्यावेळी शेख महंमद त्यांचा सर्वांत लहान शिष्य असावा. तसेच वर दिलेल्या पातशाहाच्या गोष्टीवरून चांद बोधल्यांची समाधि जनार्दनपंतांनीं अगदीं किल्ल्याचे द्वारासमोर प्रमुख जागीं कबरीवजा कां बांधली याचा सहज उलगडा होतो. पातशहाच्या मर्जीखेरीज हिंदु संतास अशा महत्त्वाच्या जागेंत समाधीस स्थान मिळणें अशक्य होते. मालोजी राजे यांनीं शेख महंमदास गुरु मानण्यांत त्यांच्या गुरूच्या म्हणजे चांद बोधल्यांच्या महिम्याचाहि बराच भाग असला पाहिजे.
शेख महंमदांनीं ‘योगसंग्रामा’च्या प्रथमोध्यायाचे सुरवातीस श्रीगुरूस नमन करतांना म्हटलें आहे की, ‘‘आतां माझें नमन जी सद्गुरु । करावा पतिताचा अंगिकारु । तुम्ही महा वरिष्ठ दिगंबरु । दीन तारक दुजे ॥२७॥’’.
एका आरतींतहि ‘‘जय जय सद्गुरु दिगंबरा । कृपाधरा चुकवी माझा फेरा’’॥ असें संबोधले आहे. आणखीहि दोन तीन असेच उल्लेख आहेत. जनार्दनपंतहि आपल्या गुरूला दत्तदिगंबर म्हणत असें एकनाथांचें लिहिण्यावरून दिसते. चांद बोधल्याचें दत्तदिगंबर हें पारमार्थिक नांव होते की काय ते न कळें.
जनार्दनपंतांनी चंद्रभट नांवाच्या ब्राह्मणाकडे जाऊन त्याच्या मुखें चतुःश्र्लोकी भागवतावरील विवरण ऐकिलें. तेंच एकनाथास लिहून काढण्यास सांगितले. या चतुःश्र्लोकी भागवतावरील टीका संपूर्ण करितांना हा चंद्रभट कोठें राहात होता याचा वृत्तांत दिला आहे. एकनाथ लिहितातः ‘‘गोदावरी उत्तर तिरीं । चौ योजनीं चंद्रगिरी । श्रीजनार्दन तेथवरी । दैवयोगें फेरी स्वभावें गेली ॥११८॥
तो अति दीर्घ चंद्रगिरी । तळीं चंद्रावती नगरी । स्वयें चंद्रनाम द्विजवरी । वस्ती त्याचे घरीं सहज घडली ॥११९॥
तेणें चतुःश्र्लोकीं भागवत । वाखाणिलें यथार्थ युक्त । तेणें जनार्दन अतयद्भुत । जाला उत्पुलित स्वानंदें पै ॥१२०॥’’.
यावरून रामदासी वाङ्मयात वर्णिलेला कर्हाड नजिकचा चंद्रगिरी हा खास नाही. अठराव्या शतकांतील गांवकीच्या कागदपत्रांत चांदगिर हें लहानसें गांव सोनगिरी, चांदगिरी व जाणोरीच्या डोंगरांमध्ये दारणा नदीवर आहे. उत्तरेस दारणाकांठ जाणोरीची शिव लागते. दक्षिणेस ब्राह्मणवाडेची शिव, वगैरे. सारांश, एकनाथांचें लिहिण्याप्रमाणें हा चंद्रगिरी नाशिकत्र्यंबकेश्वराजवळ आहे आणि चंद्रगिरी व चंद्रनगर हीं दोन्ही येथें आहेत. हा चंद्रगिर गांव नाशिकपासून पूर्वेस फार तर पांच सात मैलांवर असेल. धारणा पुढें निफाडचे दक्षिणेस गोदावरीस मिळते.
टीपः
अहमदनगरचा जमाव, रुमाल नं. १, पुडकें नं. २, शेज नं. ३३६.
‘‘६ श्रीशेख महंमदबाबा उछाहास फाल्गुन मास’’
सालाबाद खर्च, रुमाल नं. ८१८ श्रीगोंदें, अहमदनगर जमाव, पेशवे दप्तर. दरवर्षी दोन्ही उछाहाच्या नोंदी येतात. परंतु त्यांत ‘‘उछाह भाद्रपद मास’’ व ‘‘उछाह फाल्गुन मास’’ इतकेंच असते. कोणाचा ते लिहित नाहीत. एकदोन ठिकाणी ‘‘उछाह फाल्गुन मास सेख महंमद’’ असे उल्लेख आहेत.
गांवझाडे, वगैरे, मौजे चांदगिर, प्रा. नासीक, अहमदनगर जमाव, रुमाल नं. १६७७, पेशवे दप्तर.