श्रीमत्सद्गुरु - नारद - वाल्मीकि - व्यास - शुक - कवीश मनीं
आणुनि नमितों भावें, जे मोहतमाचिया रवी शमनीं. ॥१॥
श्रीश - श्रीकंठ - चरण नमितों, जे सर्व - सेवक - स्वरग.
भलतेहि वर्ण होति श्रुतिमत यन्निष्ठ जेंवि सुस्वरग. ॥२॥
नमिला गजमुख, ज्याचे सेवुनि मृदु मधुर बोल कानाहीं,
चुंबुनि, शंभु म्हणे, ‘ बा ! तुजसम आम्नाय बोलका नाहीं. ’ ॥३॥
नमितों सरस्वतीतें, जी कवि - कीरांसि पढवुनीं वदवी;
जीचा प्रसाद देतो वाचस्पतिची जडासही पदवी. ॥४॥
गुरु - भागवत - वरेंद्र - प्रेरित कविमुदिर भारताब्धिरसा
प्राशिति, तृप्त कराया स्वरसें सद्रसिकमंडली - सु-रसा. ॥५॥
नमिला वैशंपायन, सुखवी जनमेजया श्रवणसक्ता.
तैसाचि लोमहर्षणनंदनौग्रश्रवाहि जयवक्ता. ॥६॥
म्यां शौनकादि साधु श्रोते नमिले, जयांसि कानांहीं
दोंहीं पूर्ति नसे; जे म्हणति, ‘ अहा ! हे उदंड कां नाहीं ? ’ ॥७॥
हरि ज्यांचा कैवारी, त्या पांडुसुतांसि वंदितों भावें.
वाटे, चरित्र त्यांचें कांहीं आपण तरावया गावें. ॥८॥
व्यासकृत महाभारत लक्ष ग्रंथ प्रसिद्ध हा भारी,
आर्यावृत्तें रचितों, स्वल्पांतचि आणितों कथा सारी. ॥९॥
श्रीरामनाममंत्र, श्रितचिंतामणि, करील हें पूर्ण;
चूर्ण प्रत्यूहांचें; रसिकांचें चित्तही सुखी तूर्ण. ॥१०॥
नैमिषवनांत, शौनककुळपतिच्या द्वादशाब्दिकीं संत्रीं
गेला सौति, अळि जसा कमळीं सद्गंधसद्रसामत्रीं. ॥११॥
नमुनि मुनींतें, अंजलि जोडुनि, विनयें तपःसमृद्दि पुसे.
ते ऋषि त्यासि सुखविती, प्रणतासि मधुस्मराद्यसद्रिपुसे. ॥१२॥
‘ कमळदलाक्षा सौते ! साधो ! कोठूनि पातलासि ? कसें ?
कोठें क्रमिलें बा त्वां ? ’ पुसिलें एकें द्विजें तयासि असे. ॥१३॥
सांगे स्ववृत्त विनयें त्यांतें, अंजलि करूनियां, तो तों;
‘ अहिसत्रीं जनमेजयराजर्षीच्या समीप मीं होतों. ॥१४॥
वैशंपायनवदनें, व्यासरचितभारतेतिहासाचें
घडलें श्रवण, नृलोकीं प्याला पीयूष दास हा साचें. ॥१५॥
मग मीं तीर्थें, क्षेत्रें, पुण्यारण्यें विलोकिता झालों;
कुरुपांडवरणमखमहि पाहोनि, तुम्हां पहावया आलों. ॥१६॥
आज्ञा द्याल तरि सुखें सांगेन, रुचेल जें तुम्हां स्वामी !
गंगातर्पण गांगें, हें इच्छितसें तसें अहो बा ! मीं. ’ ॥१७॥
ऋषि म्हणति, ‘ महाभारतपीयूष तुवां यथेष्ट पाजावें;
चंद्र चकोरांत जस,अ तैसें आम्हां द्विजांत साजावें. ’ ॥१८॥
विश्वगुरुप्रति वंदुनि तो सौति सुखें करी तदारंभा;
त्या रसिकांत मुनीची मनोरमाकृति गमे तदा रंभा. ॥१९॥
इतिहास साठ लक्ष व्यासें स्वमनींच योजिला पहिला;
मग विधिनें वर दिधला; गणनाथें भक्तवत्सळें लिहिला. ॥२०॥
त्यांतूनि तीस लक्ष त्रिदशांला, पंधराचि पितरांला,
गंधर्वांला चौदा, एक सुमनुजां दिला, न इतरांला. ॥२१॥
सांगे मुनीश्वरांला एकशतसहस्र संहिता सौती.
श्रुति - गंगा - सुरभींच्या त्या त्या सुगुणेंकरूनि ज्या सौती. ॥२२॥