मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय पस्तिसावा

आदिपर्व - अध्याय पस्तिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


गेले धन्य कराया पांडूचे नंदन द्रुपदराज्या,
तो गुरु हि जाय समुचित पसराया नंदनद्रु पदरा ज्या. ॥१॥
राजसुतांसि रहाया त्या द्रुपदपुरीं कुलाल दे शाला.
कालगति पहा बुध हो !, बा ! एखादे भुलाल देशाला. ॥२॥
मिरवायासि न उरला स्वमहत्वाचा कुला लव सतींत,
रत्नगृहोचित पृथ्वी - पति - स्तु वसले कुलाल - वसतींत. ॥३॥
सेवुनि भिक्षान्न सुखें, रत होते देव - विप्र - भजनांत,
कोण्हीं हि न ओळखिले, कीं ते दाटूनि विप्रभ जनांत. ॥४॥
बहु विप्र, बहु क्षिति - पति, बहु मागध, सूत, बंदिजन आले.
कृष्णा - स्वयंवरोत्सव - दर्शन - भाग्येच्छु देव ही झाले. ॥५॥
वरबुद्धि अर्जुनीं च स्थिर होती सर्वदा, परि पुरा जे
आले, ते आदरिले द्रुपदें, पहिले जर्‍हि स्व - रिपु राजे. ॥६॥
झालें जतु - गृह - दाह - श्रवण, परि मना न साच वाटे ते.
वांच्छित - सिद्ध्यर्थ धरी तो राजा युक्तिच्या च वाटेतें. ॥७॥
करवी लक्ष्य व्योमीं पार्थास चि शक्य भेद त्याचा कीं,
चळचक्र तळीं भेदनसाधन, तें सूक्ष्म रंध्र त्या चाकीं. ॥८॥
शर पांच मात्र, धनु ही त्र्यंबककोदंडमित्र कठिनपणें.
करवुनि ऐसें भिववी बहुतांच्या ही मनांसि कठिनपणें. ॥९॥
घोषविलें कीं, ‘ चढवुनि धनुला पांचा शरांत लक्षातें
भेदील जो कृती, त्या माझी कन्या वरील दक्षांतें. ’ ॥१०॥
सर्व मिळाले रंगीं विप्र - नृपांहीं सु - मंच शोभविले.
रंगीं ते लोक तसे कमळवनीं जेंवि भृग लोभविले. ॥११॥
बसले होते पांडव विप्रांच्या शिवमया समाज्यांत.
कोण न होतील तदाश्रित, शांति दया सुधासमा ज्यांत ? ॥१२॥
रंगीं धृष्टद्युम्नें धरुनि करीं आणिली स्वसा रमणी
जाणों भुजगें प्रेक्षक - जन - नयन - मनोहर स्वसार मणी. ॥१३॥
तद्रूपें मोहे सुरजन हि, धरिल धैर्य तो कसा रंग ?
मूर्तिमती गीति गमे ती, भुलले ते हि लोकसारंग. ॥१४॥
वरिलें उमापण तिचें पाववुनि स्व - च्छवि प्रकाशाला.
तसि नसती तरि मिळते बहु सुज्ञ स्वच्छ विप्र काशाला ? ॥१५॥
कर वळविला अजें जें विष्णुधृतस्त्रीस्वरूप कित्ता तें,
चित्र तसें चि उतरिलें चतुरें, वाते कवींद्र - चित्तातें. ॥१६॥
रंगीं धृष्टद्युम्न स्वभुज उभारुनि म्हणे, ‘ अहो ! परिसा,
भेदील लक्ष तो या मद्भगिनीला वरूनि हो हरिसा. ’ ॥१७॥
कृष्णेसि म्हणे, ‘ वत्से ! दे माळा लक्षभेद करित्याते,
कुल, शील रूप, सद्गुण असतील स्वानुरूप जरि त्यातें. ॥१८॥
हा दुर्योधन नृप, हे व्यासवरें बंधु जन्मले शत, गे !
हा कर्ण, ज्यापुढें परचापश्रुतिकुशळता न लेश तगे. ॥१९॥
हा शल्य मद्रपति, हा चेदिप, शिशुपाळ, हा जरासंध,
गंधद्विपगंध तसा दुःसह यांचा हि शत्रुला गंध. ॥२०॥
हे राम कृष्ण यदुपति, हे दोघे साधु उद्धवाक्रूर,
गमले रिपु गोपस्त्रीहृदया, जे परमशुद्ध वाक्क्रूर. ’ ॥२१॥
ऐसें समागतांचें कळवी कुळशीळकर्मजन्म तिला.
कीं, लक्ष्यभेदकर ही अकुळज कोण्ही रुची न सन्मतिला. ॥२२॥
दुर्योधनादिकांची कन्यारत्नीं च वेधली दृष्टी;
वृष्टि जसि चातकांला, त्यांला तसि ती विरंचिची सृष्टि. ॥२३॥
कृष्णेकडे जनाची तसि दृष्टि, श्रीकडे जसी सृष्टी.
भक्ताकडे चि हरिची दृष्टि, जसी वासुराकडे गृष्टी. ॥२४॥
बळदेवासि म्हणे प्रभु, ‘ आर्या ! त्या ब्राह्मणांत तो धर्म,
तो भी, तो धनंजय, ते यम, म्यां वळखिले, नव्हे नर्म. ॥२५॥
ब्राह्मणवेष असों द्या, तेज पहा, चातका सदा दाते
घनसे निवविति, मज वश झाले चि; न घातकास दादा ! ते. ’ ॥२६॥
‘ नवल इटांत मिळाल्या कनकाच्या इष्टका, मला भाचे
गुरुचे बहु, यांहुनि शतहर्ष उणे इष्टकामलाभाचे. ’ ॥२७॥
ऐसें बलभद्र म्हणे, वर्णी त्या विश्वसाक्षिदृष्टीतें,
सृष्टीतें जी रचि तो, यश न जिचें ये सुधाब्दवृष्टीतें. ॥२८॥
देशींदेशींचेव नृप झटले, परि परशरामसा चाप
न वळे, लवे भुजबळें, तत्ताडित बहुत पावले ताप. ॥२९॥
चोळुनि कर, करकर रद खाउनि, दष्टोष्ठ मोघचापल ते
हतदर्प भूप म्हणती, ‘ हंत ! हताः स्म त्वयाद्य चापलते ! ’ ॥३०॥
तेव्हां स्वात्युत्साहें हृष्टमना तात उष्ण - कर करुनीं
रविसमवर्णें कर्णें चाप चढविलें क्षणांत करकरुनीं. ॥३१॥
स्वमनीं पांडव म्हणती, ‘ हा ! हा ! या दुष्कुळ - प्रसूतानें
नेलें चि लक्ष्य भेदुनि सह कन्यारत्न यश हि सूतानें. ’ ॥३२॥
जों कर्ण म्हणे, ‘ न शिवों देईन इला दुज्या नवरया मीं. ’
तों चि म्हणे ती कृष्णा, ‘ सूतमहं जातुचिन्न वरयामि. ’ ॥३३॥
कर्ण विगुणधनु टाकुनि, पाहुनि रविला, चुरूनि हातातें,
चित्तीं म्हणे, ‘ कशाला केला निर्माण पुत्र हा तातें ? ॥३४॥
वैतरणी सुतरा, र्‍ही बुडवी, निंदोत पाप सुतरेतें.
केला कां बुडवाया दुस्तर - लज्जा - नदींत सुत रेतें ? ’ ॥३५॥
शिशुपाळ यत्न करि, परि बोले स्व - मनांत चापदैवत, ‘ मीं
न कठिन, तुला बुडवितें आठवुनि तुझें चि पाप दैव तमीं. ’ ॥३६॥
मागधजरासुत म्हणे, ‘ कृष्णा होईल आजि मज्जाया. ’
त्यासि म्हणे चापलता, ‘ लज्जापंकीं तुम्हीं हि मज्जा, या. ’ ॥३७॥
शल्य हि पडला, झडला मद; न प्रकटूनि शक्तिला जे तें
कौतुक पाहत होते, सांपडले ते च कवि न लाजेतें. ॥३८॥
पाहति उगे चि दूरुनि न शिवों दे चाप त्या अ - हीन - कुळां
लेखी तृणतुच्छ जसा अबळां बाळां बळी, अही नकुळां. ॥३९॥
जाणों तत्तेज म्हणे त्यांला, ‘ वश चित्तवृत्ति काम अजी
ती न भली, सावध व्हा; कां करितां निपट मृत्तिका माजी ? ’ ॥४०॥
‘ न बुडो क्षत्रयश ’ म्हणुनि उठवी उत्साहदायि मन पार्था;
धर्म हि म्हणे, ‘ असो गुरुलब्धा शिक्षा सदैव अनपार्था. ’ ॥४१॥
जैं धनुकडे निघे द्विजवृंदांतुनि विप्र एकला जाया,
साधूंसि तो चि सिकवी साधूत्साहातिरेक लाजाया. ॥४२॥
कोण्ही म्हणति, ‘ निवारा, आम्हां क्षत्रियकृतोपहासाचें
पात्रत्व नवें द्याया सुचपळ बटु जोडितो पहा ! साचें. ’ ॥४३॥
किति म्हणती, “ जावूं द्या, होउं न देईल कर्म कुत्सा हें;
पूर्वीं श्रीराम जसा, उठलासे हा तसा चि उत्साहें. ॥४४॥
प्याला अगस्त्यनामा ब्राह्मण निःशेश नदनदीपातें,
विस्मरलां रामातें कां त्या भृगुवंश - सदन - दीपातें ? ॥४५॥
ब्रह्मतपःकेलिगृह ब्राह्मण न करील काय हो ! बोला ?
‘ विजयोस्तु ’ म्हणा, चढला विप्राशीनें न कोण तो मोला ? ” ॥४६॥
पावे तत्काळ महावृद्धिप्रति पार्थ तोक, विप्राशी
त्या माता कामदुघा, कारुण्य स्तन्य, तो कवि प्राशी. ॥४७॥
नमिला आधीं पार्थें विश्वप्रियसुहृदकृत्रिम पिनाकी;
ह्मणती यद्यश सेवुनि, ‘ अमृतीं गोडी नसे किमपि ’ नाकी. ॥४८॥
मग हृदयीं आठविला कुशलकर कुशेशयाक्ष कंसारी,
यत्स्मरणें शुचिमतियतिपतिगतिला योग्य होय संसारी. ॥४९॥
करुनि प्रदक्षिणा, धनु उचलूनि, ख्याति तो करी मोटी,
चापाच्या चि न केवळ नरवीरांच्या हि वांकवी कोटी. ॥५०॥
यंत्रच्छिद्रद्वारें पांच हि शर एकदा चि सोडूनीं
पाडी पळांत पृथिवीवरि पुरुषप्रवर लक्ष्य तोडूनीं. ॥५१॥
प्रीति मुनिगणाच्या, र्‍ही राज्यांच्या, कीर्ति सोमवंशाच्या
घाली कंठीं माळा, कृष्णा त्या श्रीमरुत्वदंशाच्या. ॥५२॥
आशीर्वादांच्या द्विज, पुष्पांच्या करिति सुर हि वृष्टींतें;
द्रुपदपुरी जनकपुरीसम सुखदा होय साधुदृष्टींतें. ॥५३॥
ब्राह्मण नाचति रंगीं, आनंदें उडविति स्वचैलातें;
तें तोय होय हो ! यश खळनृपजन चित्ततप्ततैलातें. ॥५४॥
सत्कांतलाभचिंता उत्साहें उचलितां चि धनु सरली.
सद्गुणरक्त कृष्णा कृष्णाजिनधारका हि अनुसरली. ॥५५॥
कोपोनि कर्णशल्यप्रमुख नृपति ह्मणति, ‘ हा द्रुपद खोटा,
आह्मां मानधनांचा केला अपमान, घात हा मोटा. ॥५६॥
मुख्य स्वयंवरीं अधिकार क्षत्रिय, न विप्र, हें कळतें;
भलतें चि बळें करितो, श्रुतियश ऐशा खळामुळें मळतें. ॥५७॥
विप्र नव्हे वध्य, वधा द्रुपदा, न करो दुजा अशा अनया.
चढवा गुण, घ्या शर, हूं, धर्मार्थ मुहूर्त दृढ करा मन, या. ॥५८॥
आह्मां नृपांत भलत्या एका स्वमतें वरील नवरी ती.
विप्र स्वयंवरवधूवर, हे स्थिति नाशहेतु, नव रीति. ॥५९॥
नवरी न वरील परा जरि, तरि दीप्तानळांत होमा ती
वारुन तें; जें अनया कारण, त्याची पळांत हो माती. ’ ॥६०॥
युद्धोद्यतनृपचक्रत्रस्तमति द्रुपद काळजी वाहे;
विप्रांसि ह्मणे, ‘ माझ्या झाले चि नृपाळ काळ जीवा हे. ’ ॥६१॥
कमळवनावरि गजसे द्रुपदावरि धावले बळी पर ते;
त्यांवरि सज्य करुनि धनु धन्वीश्वर जिष्णु सिंहसा परते. ॥६२॥
सरळ सबळ जवळ द्रुम समयीं मिळतां कशास कोदंड ?
वाटे, भीम परतला काल, कवळिला न वृक्ष तो दंड. ॥६३॥
शरणागताभिमानीं समरोद्यत सर्व विप्र पाहोनीं
अर्जुन बोले, डोले सुरगुरु रोमांचभार वाहोनीं. ॥६४॥
‘ षडरिघ्न तुह्मीं गुरु हो ! षडरिजितमदासि काय हरिना मीं ?
अरि हरिनें नुचलावें अघदलनीं बळ उदंड हरिनामीं. ॥६५॥
युष्मदभयवर आह्मांकरवीं करवील दुष्ट - मद - नाशा.
साधुपुढें अहिताशा, शंभुपुढें जेंवि दुष्ट मदनाशा. ’ ॥६६॥
भीमार्जुन शत्रूंवरि फिरतां दावी मुकुंद रामातें;
ज्या पाहे त्यासि ह्मणे बळ, ‘ तूं बहु सुखद सुंदरा ! मातें. ’ ॥६७॥
कर्णासीं भीमानुज, शल्यासीं भीमसेन युद्ध करी.
तत्तेजस्तब्ध इतर नृप झाले, जेंवि पंकरुद्ध करी. ॥६८॥
रणविस्तर काशाला ? हेमाक्ष - रणीं महाकिरी टिकला,
कीं अर्जुन कर्ण - रणीं; अरिस हि बहु तोषवी किरीटिकला. ॥६९॥
कर्ण ह्मणे, ‘ विप्रवरा ! आनंद दिला तुवां भला आजि;
ऐसी नए चि पूर्वीं आढळली कामुका मला आजि. ॥७०॥
तूं चापवेद, कीं वा भार्गव, कीं शक्र, कीं स्वयें विष्णु ?
कीं मजसीं झगडेसा होता सुत एक पांडुचा जिष्णु ? ॥७१॥
या पांचांमध्यें तूं कोण ? वद स्पष्ट, जाणत्या कळतें.
वरि गारसा हिरा परि, त्या कवचें तेज काय हो ! मळतें ? ’ ॥७२॥
पार्थ ह्मणे, ‘ मीं कार्मुकवेद नव्हें, राम ही नव्हे, आहें
विप्र गुरुप्रिय, अस्त्रीं, शस्त्रीं पटु चित्र ह्मणसि कां गा ! हें ? ॥७३॥
गुरुचा प्रसाद ज्यावरि काळास हि तो कदापि आटेना;
वाटे नारायणस,आ अजितपरा तत्सुकीर्ति बाटेना. ’ ॥७४॥
या विप्रवेषवासवि - मुखवर्णानीं भरूनियां कर्ण
परते, पुरतें जाणे, ‘ जय्य नव्हे ब्राह्मतेज ’ हें कर्ण. ॥७५॥
त्या भीमानें हि सुचिर रुचिर समर अमरतोषाकर केला;
यत्कीर्तिनें विरेसा दिला जडात्मत्वदोष करकेला. ॥७६॥
भीमें शल्य क्षितिवरि कंदुकसा भुजरणांत आपटुनीं,
हांसविले मुनि, न तसे शिशु हि कधीं हास्यरसकथापटुनीं. ॥७७॥
शल्यपराभव पाहुनि कर्णादिक सर्व शंकले, वर तें
दाविति, परि धैर्युडे आधीं, मग मद्रपति - कलेवर तें. ॥७८॥
नृप ह्मणती, ‘ हे ब्राह्मण आह्मांला भीड फार वेदाची.
मानधनांसि न साहे वार्ता अपमानजन्यखेदाची. ॥७९॥
कोठील ब्राह्मण हे तेजस्वी भीमजिष्णुसे धीट ?
शोधूं, बरें करूं, करणें तें न विचारितां नव्हे नीट. ’ ॥८०॥
ऐसें वदोनि गेले नृप निजशिबिरासि कीर्ति हारवुनीं,
झाले म्लानश्री ते द्विजतेजें, जेंवि पुष्पहार वुनीं. ॥८१॥
साग्रज जिष्णु हि बहु त्या द्रुपदसुरद्रुप्रसूनमाळेला,
सांभाळुनि स्ववस्त्रच्छायेंत क्षिप्र जाय शाळेला. ॥८२॥
वदले, ‘ भिक्षा घेउनि आलों, ये जननि ! घे ’ असें कवि ते,
तच्चिंतातिमिरहृदयपद्मांचे प्रेक्षणीय जे सविते. ॥८३॥
शाळेंत पृथा बोले, ‘ भिक्षा माझ्यासमीप ती ठेवा,
हो तृप्तिदा शुधासी, सर्व भ्राते मिळा, सुखें सेवा. ’ ॥८४॥
नमितां द्रुपदसुतेतें पाहुनि कुंती ह्मणे, ‘ अहा देवा !
वदल्यें कसें असें, कीं, सर्व भ्राते मिळा, सुखें सेवा. ’ ॥८५॥
भलतें चि वदे सासू, सासूया जाहली न परि सून;
कुंती अधर्मभीता मुदिता ही होय वृत्त परिसून. ॥८६॥
गौरवुनि धरूनि करीं नेउनि धर्माकडे सुने, त्या तें
सांगोनि, पुसे अमृताधर्महर सुयुक्ति त्या सुनेत्यातें. ॥८७॥
मातेला समजाउनि धर्म म्हणे, ‘ अर्जुना ! इचा विधिनें
पाणि स्वीकारावा आतां त्वां शक्तिकीर्तिच्या निधिनें. ’ ॥८८॥
जिष्णु म्हणे, ‘ गुरुलंघन अज्ञ जन करो, करी न परि वेत्ता,
मीम तों न आपणाला जाणत जाणत करीन परिवेत्ता. ॥८९॥
त्वां, भीमें, म्यां, नकुळें, सहदेवें कार्य पाणिपीडन, तें
व्हावें क्रमें चि, धर्म्यव्यवहारीं धरु नये चि भीड नतें. ’ ॥९०॥
धर्म विचार करी तो, अनुज्यांच्या आपुल्या हि नयना तें
रुचलें स्त्रीरत्न, मनें एक चि धरिलें, त्यजूनि नय नातें. ॥९१॥
जनकें हि चुंबिली, जी चुंबावी नंदनें हि नलिनी, ती,
धरिली त्या कृष्णारतमतिनीं अति नीचसी च अळिनीती. ॥९२॥
गज गंगेंत निवाया म्हणति, न चिंतूनि शुद्धि, ‘ मज्जन हो; ’
तैसे चि पांडुसुत त्या लावन्यनदींत, बुद्धिमज्जन हो ! ॥९३॥
धर्म म्हणे, ‘ ज्या ध्याना अनुसरले हे स्वबंधु चवघे, तें
धरिलें माझ्या हि मनें कोणास हि न पुसतां चि चव घेतें. ॥९४॥
झालें वश निजतनया मन, या अनया न यत्न; होगलितें
जैं भेदें कटक, किजे तैं रायें युद्ध काय हो ! गलितें ? ॥९५॥
व्यासोक्ति पृथोक्ति जसी अस्मद्वृत्ति हि पहा तसी च वरें.
प्रभुच्या कोण न सन्मत देतो दासांसि कीर्तिचीं चवरें ? ॥९६॥
ज्याची हे स्त्री होइल होतिल रिपु त्या स्वबंधुचे अन्य;
जो वासिता - सहचर द्विप, होती तदरि मदकरी वन्य. ’ ॥९७॥
धर्म भ्रात्यांसि म्हणे, ‘ पांचाची हे सती असो भार्या;
श्रुतिची मातेची सम आज्ञा आम्हां नव्हे चि परिहार्या. ’ ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP