मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय चोविसावा

आदिपर्व - अध्याय चोविसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


मग भेटोनि द्रुपदा, द्रोण म्हणे, ‘ मीं तुझा सखा पहिला. ’
दे क्षोभ शब्द तो त्या, दंड जसा स्पर्शला खळा अहिला. ॥१॥
पार्षत म्हणे ‘ दरिद्रा ! तूं राज्याचा सखा कसा ? मुग्धा !
मित्र सधन सधनाचें, साजे गोदुग्ध मित्र गोदुग्धा. ॥२॥
न करुनि विचार वदतां पडतें शोकांत मानस; ख्यातें,
विद्वत्त्वें, सधनत्त्वें तुल्यें लोकांत मान सख्यातें. ॥३॥
झालें जीर्ण विरस जें कोण तया मंदनायका ! पुसतो ?
गतरंगसुगंध, जुना, पावे संमान काय, कापुस तो ? ॥४॥
श्रोत्रियसख अश्रोत्रिय, शूरसख क्लीब सुकविसख अकवी,
आम्हां असें नसे श्रुत; हंससख न मानसस्थही बक - वि. ’ ॥५॥
बहु बडबडे असें, दे मद्य तसें, त्यासि भाग्य मत्तत्व.
मुनि मनिं म्हणे, ‘ न करितां परिभव, न कळेल यासि मत्तत्व. ’ ॥६॥
मुनि त्या अपमानातें घोटी, जेंवि त्रिलोचन गरातें.
किमपि विरुद्ध न वदतां, गेला तो हस्तिसाह्वनगरातें. ॥७॥
राहे गुप्त कृपगृहीं द्रोण, तदात्मज सुशीळराशि कवी.
पार्थांसि कृपानंतर अस्त्रें, कोण्हासि न कळतां सिकवी. ॥८॥
ते कुरुकुमार करितां नगरीबाहेरि जाउनि क्रीडा.
निरुदककूपपतितनिजवीटोत्धृत्यपटु पावले व्रीडा. ॥९॥
ते, वृद्ध, कृश, श्याम द्रोणब्राह्मण अदूर पाहोनि
निजवीटोद्धारार्थ प्रार्थिति, भवते उभेचि राहोनि. ॥१०॥
द्रोण म्हणे त्यांसि, ‘ तुम्हीं भरतकुळज कीं, कृतास्त्र कीं, तरि ती
वीटा न निघे, धिग् ! धिग् ! गुण तेचि स्वेष्टसिद्धि जे करिती. ॥११॥
वीटा तसी स्वमुद्रा टाकुनि मीं काढितों इषीकांहीं.
साहित्य परि करावें प्रेमें मद्भोजनाविषीं कांहीं. ’ ॥१२॥
धर्म, ‘ म्हणे अस्मद्गुरु कृप, तदनुमतें तुम्हांसि ही भिक्षा
शाश्वत मिळेल; दावा, वीटा काढूनि अद्भुता शिक्षा. ’ ॥१३॥
हास्य करूनि द्रोणें त्या कुरुकुळजांसि द्यावया तुष्टी
कूपांत इषीकांची अभिमंत्रण करुनि सोडीली मुष्टी. ॥१४॥
एकीचें मुख शिरलें वीटेमध्यें, तिला दुजी जडली,
तिसरी तीस, चतुर्थी तिजला, ऐसी परंपरा घडली. ॥१५॥
बाहेरि काढिली ती वीटा तत्काळ, जेंवि पात्र गळें.
स्वरभंग त्यांत वरिला त्या पार्थाम्च्या मुहूर्तमात्र गळें. ॥१६॥
अभिमंत्रित शर सोडुनि मुद्राछिद्रांतरीं तया सिरवी,
वरि अंगुलीयकातें वोढी किरणें जसें पयासि रवी. ॥१७॥
त्या मंत्रचमत्कारें प्रमुदित होउनि, कुमार ते प्रणती
करुनि प्रेमें, ‘ सांगा, निज नाम, ग्राम, कुळ ’ असें म्हणती. ॥१८॥
द्रोण म्हणे, ‘ सांगा हें भीष्माला ज्ञानभगनदीपाला.
जाणेल तोचि लोकीं; विदित नसे काय गगनदीपाला ? ’ ॥१९॥
बाळमुखें तें कळतां, भीष्म म्हणे ‘ परशुराम कीं द्रोण
आला असेल भाग्यें, लोकीं तिसरा असा कृती कोण ? ’ ॥२०॥
श्रीगुरुसम गुरुबंधु प्रेमें भेटोनि निवविला भीष्में.
जैसा मयूर मेघें, जो तापविला सुदुःसहग्रीष्में. ॥२१॥
आणूनि राजसदनीं, पूजुनि होवूनि सानुराग मनीं,
भीष्में तयासि पुसिलें कीं, ‘ सांगा हेतु कोण आगमनीं ? ’ ॥२२॥
द्रोण म्हणे, “ परिसावें त्वां, सांगावें तुलाचि सभ्यास.
द्रुपदासि मजहि करवी चापीं गुरु अग्निवेश अभ्यास. ॥२३॥
गुरुबंधु सखे आम्ही होतों गुर्वाश्रमांत, वीरमणे !
तेव्हां मजला ऐसें पांचाळ द्रुपद गौरवूनि म्हणे; ॥२४॥
‘ जेव्हां काय मज सख्या ! द्रोणा ! देईल राज्यपद तात,
तेव्हां तद्भोक्ता तूं, आण तुझी; कुळज सत्य वदतात. ’ ॥२५॥
गेला पढोनि, झाला नृप तो, झालों गृहस्थ मीं, राया !
फळली सुतरत्नफळें त्यावरि माझी कृपी सती जाया. ॥२६॥
धनिकापत्यकृतपयप्राशन पाहोनि, पुत्र पय मागे.
पिष्टोदक ठकवितां, तें माझ्या शल्य काळिजा लागे. ॥२७॥
पिष्टोदकपान - मुदित सुत धनिकसुतांत चपळपद नाचे.
मोहिति मज क्षणक्षण त्यांच्या उपहासशब्द वदनाचे. ॥२८॥
बहु धन असो नसो, परि एक असावेंचि गृहिगृहीं दुभतें.
घ्यावें सुतार्थ शुद्धापासुनि गोदान, सन्मतें शुभ तें. ॥२९॥
फिरलों बहु कीं, संतति पटु तसि गोदानदी न ताराया,
परि, विधि मज दे, मिळवूं जातां गोदान, दीनता, राया ! ॥३०॥
स्मरलें स्वसखद्रुपदस्नेहवचन मज म्हणोनि मग, ‘ राहो
यत्नांतर ’ करुनि असा निश्चय, गेलों तदीयनगरा हो ! ॥३१॥
भेटोनि तया वदलों, ‘ पूर्वींचा मीं सखा ’ असें नातें.
जें तद्दत्तोत्तर तुज सांगाया योग्यसें असेना तें. ॥३२॥
परि न कथितां भल्याला हृत्ताप उणा न होय, शांतनवा !
तें ऐकुनि साहेसा कोण दुजा सज्जन प्रशांत नवा ? ॥३३॥
धिक्कारिति अज्ञ जसे मागतया भीक सर्वदा भणगा,
मज धिक्कारी; हृदयीं झालें ते शब्द सर्व दाभण, गा ! ॥३४॥
वदला असें असें कीं, ‘ मीं सख्यानर्ह मंद, ’ राहो तें.
स्मरतां बहु दुःख मनीं, भीष्मा ! खळजळधिमंदरा ! होतें. ॥३५॥
‘ देईन अन्न एका दिवसाचें मात्र, पाहिजे तरि घे, ’
हें सेवटीं वदे, तों कोपागारीं मदीय चेत रिघे. ॥३६॥
द्रुपदकृतघ्नत्वाची येतांचि प्रत्ययासि पुष्कलता,
त्यजिली सभा तयाची म्यां, मधुपें जेंवि घर्मशुष्क लता. ॥३७॥
आलों त्वन्नगरा मीं जोडाया अर्थ, शिष्य, यश कांहीं.
कर्ण विटविले माझे द्रुपदाच्या विरसवचनमशकांहीं. ” ॥३८॥
नायक वीरांचा श्रीद्रोण द्रुपदोक्त सर्व आयकवी.
‘ हाय ! ’ कवी तोहि म्हणे, ज्याच्या मातेसि शंभुसायक वी. ॥३९॥
भीष्म म्हणे, ‘ राज्य तुझे, ज्यांच्या प्राप्त्यर्थ देव नवसावे,
ते कुरुभाग्यें आले; हे पाय क्षणहि दूर न वसावे. ॥४०॥
सिद्धचि झालें सर्वहि कर्तव्य, असें तुम्हीं मनीं आणा.
बाणासन विज्य करा, कौरव दासानुदाससें जाणा. ’ ॥४१॥
प्रार्थुनि भीष्में द्रोण प्रासादीं स्थापिला महेश्वरसा,
केला मान असा कीं, मानी तो सत्य, होय हे स्वरसा. ॥४२॥
स्वपदीं कुमार सर्वहि शिष्यत्वें वाहतांचि शांतनवें,
सिकवी धनुःश्रुतिहृदय, व्हाया यश, करुनि शत्रु शांत, नवें. ॥४३॥
शिष्यांसि द्रोण म्हणे, ‘ येतां तुमच्या कृतास्त्रता आंगा,
मच्चिंतित कार्य तुम्हीं सिद्धिप्रति पाववाल कीं ? सांगा. ’ ॥४४॥
त्यांत म्हणे अर्जुन, ‘ मीं युष्मच्चिंतितसमस्तकार्यकर;
दुःसाध्य काय ? असतां या माथां विजयदायकार्यकर. ’ ॥४५॥
प्रेमें रडे पडे गुरु पार्थगळां त्या तशा उदार पणें.
आर्य प्रसन्न होती नुसत्याहि नितोक्तिच्या उदारपणें. ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP