शौनक मुनिवर्य म्हणे, ‘ सौते ! भृगुवंश आमुच्या कर्णीं
यावा; त्यातेंचि सुखें आधीं तूं साधुसत्तमा ! वर्णीं. ’ ॥१॥
सौति म्हणे, ‘ ब्रह्माचा पुत्र भृगु; तदीय पुत्र तो च्यवन;
त्याचा प्रमति; तयाचा रुरु; तत्सुत शुनक, सु - मतिचें भवन; ॥२॥
तो तव पूर्वपितामह; शौनक तुज म्हणति यामुळें. आतां
च्यवत्वहेतु कथितों. सुख होतें साधुवंशयश गातां. ॥३॥
भृगुची वधू पुलोमा, ती होती प्रथमगर्भिणी धामीं;
गेला असतां तीर्थस्नानाला एकदा तिचा स्वामी, ॥४॥
दुष्ट पुलोमा राक्षस त्या भृगुच्या आश्रमांत, रामाच्या
रावणसा, सिरला हो ! आज्ञेला शिरिं धरूनि कामाच्या. ॥५॥
‘ घे राक्षसा ! दिली तुज, ’ वदला होता पिता असें, रडतां,
तें दुःख मनीं वाहे, योग पुढें भृगुसवें तिचा घडतां. ॥६॥
अग्निगृहीं अग्नीतें पाहुनि, राक्षस म्हणे, ‘ अगा आर्या !
वद साचें; हे माझी, किंवा भृगुचीच, होय हे भार्या ? ॥७॥
तातें इच्या प्रथम मज मग भृगुला हे समर्पिली, दहना !
देवमुखा ! तुज पुसतों; कीं हे धर्मगति महागहना. ’ ॥८॥
अग्नि म्हणे, ‘ प्रथम तुला शब्देंचि दिली तुवां मनीं धरिली;
भृगुनें मग विधिपूर्वक, मजला साक्षी करूनि हे वरिली. ’ ॥९॥
‘ प्रथम स्वस्त्री ’ ऐसें, येतां वाक्यांत वह्निच्या, तुष्ट
होउनि, सूकररूपें भृगुच्या पत्नीसि तो हरी दुष्ट. ॥१०॥
रडतां दुःखें, कोपें गर्भ सतीचा पथीं गळाला हो !
तो राक्षस तत्तेजें, क्षय दहनें शलभसा, जळाला हो !. ॥११॥
जननी - कुक्षींतूनि क्रोधें च्यवला, म्हणोनि तो च्यवन.
विधि सांत्वितां, सवत्सा धेनु तसेसे, पावली सती भवन. ॥१२॥
जे अश्रुबिंदु मार्गामाजि गळाले, तिहीं महासरिता
झाली; तीतें म्हणती बिंदुसरा; निववि ती अघज्वरिता. ॥१३॥
भृगु येतां स्त्रीस ह्मणे, ‘ कथिसी न अनर्थहेतुला कां ? गे ! ’
ती कर जोडुनि राक्षसपावकसंवाद जाहला सांगे. ॥१४॥
तें कळतां, मुनिवर भृगु, त्या देवाच्या शिरीं अघ स्थापी;
‘ हो सर्वभक्ष ’ ऐसें कोपें सर्वामरानना शापी. ॥१५॥
छळविधिहि सत्य म्हणतां देवमुखालाहि बाधला शाप.
विधिसि असत्य म्हणे जो राक्षस, झालाचि भस्म तो पाप. ॥१६॥
अग्नि म्हणे, ‘ ब्राह्मण मज मान्य, भृगो ! तूं दिलाहि जरि शाप,
सुज्ञें ताप सहावा; द्यावा तापप्रदासिहि न ताप. ’ ॥१७॥
रुसला भगवान् पावक, झाला गुप्त, त्यजूनि लोकांतें.
सोसील सत्यवादी दूषण जगदेकपूज्य तो कां तें ? ॥१८॥
झाला जेव्हां हुतभुक् गुप्त भृगुकृतावमानजें कोपें;
लोकत्रयहि व्याकुळ होय स्वाहास्वधाक्रियालोपें. ॥१९॥
ऋषिदेवांहीं कथिला विधिला निजताप, अग्निचा शाप;
तेव्हां तो समजावी त्या दहना, जेंवि बाळका बाप. ॥२०॥
‘ एकाच्या कोपें कां बहुतांचा घात करिसि ? शापातें
देता भृगु; परि वागुच्चारीं जें बळ, तुझेंचि बापा ! तें. ॥२१॥
क्रव्यादा मूर्ति तुझी; अपानसंबंधिनीहि ज्या ज्वाळा
त्या सर्व भक्षितील, स्वाहाप्राणप्रिया ! स्वधापाळा ! ॥२२॥
स्वांशें अमेध्यभक्षण करितां, तुज लेशही नसो दोष;
हो प्रगट जगांत पुन्हां; कांहीं चित्तीं धरूं नको रोष. ’ ॥२३॥
ऐसें सांत्वन करितां वह्नि पुन्हां प्रगटला असा चंड,
भृगुनें केला सत्याभासाला सत्य मानितां दंड. ॥२४॥
च्यवनोत्पत्तिकथा हे. शुनकाच्याही तुम्हांसि मीं गुरुची
कथितों कथा पवित्रा, प्रमतिघृताचीतनूद्भवा रुरुची. ॥२५॥
विश्वावसुच्या वीर्यें, प्रसवोनि सुतेसि, मेनका देवी
श्रीस्थूळकेशमुनिच्या आश्रमनिकटीं, नदीतटीं, ठेवी. ॥२६॥
स्थूलकच, वनीं पाहुनि तें कन्यारत्न, आश्रमीं आणी.
तैसेंचि तो दयालु ब्राह्मण निजलोचनद्वयीं पाणीं. ॥२७॥
ती पोषिली मुनीनें; प्रमद्वरा नाम ठेविलें विधिनें;
वाढविली, मूर्तिमती आत्मतपःसिद्धिसी, दयानिधिनें. ॥२८॥
जेव्हां विलोकिली ती गंधर्ववराप्सरोद्भवा सुरुची,
झाली सर्वस्मरशरलक्ष्य मनोवृत्ति तत्क्षणीं रुरुची. ॥२९॥
तें निजसुतमित्रमुखें कळतां, स्थूळालकाप्रति प्रमती
मागे प्रमद्वरेला. तोही ‘ देतों ’ म्हणे उदारमती. ॥३०॥
निश्चय विवाहतिथिचा केला; त्यावरि तिला डसे व्याळ;
तें कळतां, तच्छोकें रुरु एकांतीं रडे, पिटी भाळ. ॥३१॥
शब्देंचि कल्पिली स्त्री मरतां, रुरु पावला महाकष्ट;
तात्पर्य या कथेचें हें कीं, दुःखद परिग्रह स्पष्ट. ॥३२॥
‘ तप, दान गुरूपासन, जरि मज घडलें असेल, तरि तेणें
वांचो; हातीं येऊ, जें हरिलें काळतस्करें लेणें. ॥३३॥
जरि मीं असेंन जन्मप्रभृति शुचि, उठो मनःप्रिया तरि, ती.
हा ! आधिसर्पदष्टा विकळा मन्मतिहि विकळ मज करिती. ’ ॥३४॥
ऐसे करी विलाप स्त्रीशोकें प्रमतिपुत्र जो, त्यासि
दे देवदूत दर्शन; रवि जेंवि तमीं, विमूढ होत्यासि. ॥३५॥
दूत म्हणे, ‘ जो प्राणी, सरतां आयुष्य, पावला अंत,
तो न पुन्हां उठला; हें वदति रुरो ! तत्व जाणते संत. ॥३६॥
पुण्यें देसी; परि तीं, क्षणभरिहि न उठवितील मेलीला.
गतबुद्बुदेच्छुशिशुची जसि, तसिच तुझी मला गमे लीला. ॥३७॥
तुज या दयिता - विरह - व्य्सनापासूनि व्हावया मुक्ती,
एक भविष्यज्ञानीं कथिली, ती सांगतों, तुला युक्ती. ॥३८॥
अर्ध स्वायुष्याचें जरि तूं देसील तीस, नवरी ती
वांचेल; रीति पहिली तीच पहासील तूं, न नव रीती. ’ ॥३९॥
विप्र म्हणे, ‘ आयु दिलें; येणें हस्तेंकरुनि, निजलीला
उठवावें, तैसें तूं उठवीं; प्रकटीं जनांत निज - लीला. ’ ॥४०॥
मग तो विश्वावसुसह दूत सुरांचा यमाकडे गेला;
स्वोक्ताचा निर्वाह, प्रार्थुनियां त्यासि, तन्मतें केला. ॥४१॥
धर्में दिव्यवरकरें जागविली ती प्रमद्वरा सुरुची;
जसि अधनाची श्रीनें, त्या स्त्रीनें दृष्टि निवविली रुरुची. ॥४२॥
तत्पाणिग्रहणोत्तर भार्गव घे अहिवधव्रत क्रोधी;
तो चंड दंडपाणि सर्प वधी; वारुळें, बिळें शोधी. ॥४३॥
तो एकदा, वनांत भ्रमतां, रुरु निर्विषाहिला पाहे;
दंड उगारूनि म्हणे, ‘ दुष्ट भला पुष्ट भेटला आहे. ’ ॥४४॥
डुंडुभ म्हणे, ‘ वधिसि अपराध न करितां किमर्थ ? सांग मला.
हा अनपराधभूतद्रोह अहित, तदपि विहित, कां गमला ? ’ ॥४५॥
रुरु त्यासि म्हणे, ‘ माझी वधिली होती प्रिया खळें नागें.
म्यां व्याळवधव्रत हें त्यापासुनि घेतलें असे रागें. ’ ॥४६॥
सर्प म्हणे, ‘ ते अन्य प्राणघ्न व्याळ, करिति जे दंश;
आकृति सम, परि त्यांच्या स्वगुणाचा डुंडुभीं नसे अंश. ॥४७॥
अपराधी दंडावा, किंवा भलताचि जो अनपराधी ?
धर्मज्ञा ! केंवि तुझी झाली हे पापसाधनपरा धी ? ’ ॥४८॥
हा ऋषि, ऐसें जाणुनि, हेतु पुसे सर्पयोनिचा अहिला.
त्यास्तव सांगे रुरुला डुंडुंभ वृत्तांत आपुला पहिला. ॥४९॥
‘ होतों ब्राह्मणसुत मीं, मन्नाम सहस्रपात्, सखा माजा,
त्याचें नाम खगम तो, मुनिवृंदीं उडुगणीं जसा राजा. ॥५०॥
बाळपणीं, तृणसर्पें भिववुनि, कोपोदयासि त्या खगमीं
करिता झालों, आलों तच्छापें या कुयोनिला मग मीं. ॥५१॥
खगमें कथिलें होतें, होइल भृगुच्या कुळांत, त्या रुरुचें
दर्शन हरील शापा, तापाला नाशितें जसें गुरुचें. ॥५२॥
तो तूं प्रमतिसुत मला मद्भाग्यें भेटलासि नवसानीं. ’
ऐसें वदतां झाला शापाच्या, दिव्यरूप, अवसानीं. ॥५३॥
प्राप्तस्वरूप तो मुनि मग त्या रुरुला म्हणे, ‘ अगा बापा !
हिंसा तुज योग्य नव्हे, जोडिसि दाटूनि कां महापापा ? ॥५४॥
ब्राह्मणधर्म अहिंसा, सत्योक्ति, तिजी क्षमा, मनीं आण.
क्षत्रियधर्म प्रकृतिप्रतिपालन, दंड, उग्रता, जाण. ॥५५॥
जनमेजय भूपाच्या अहिसत्रामाजि भगन्दर्पांतें
आस्तीक विप्र यत्नें संरक्षी तक्षकादिसर्पांतें. ॥५६॥
भार्गव रुरु त्यासि म्हणे, ‘ कथिला त्वां मज बरा नय मुने ! तें
वृत्त कथीं, न उपेक्षीं; गंगा मिळतां त्यजी न यमुनेतें. ’ ॥५७॥
‘ इतिहासज्ञ मुनि तुला कथितील ’ असें म्हणोनि तो विप्र
झाला गुप्त; चकोरा क्षुधिता सोडुनि जसा विधु क्षिप्र. ॥५८॥
हारपला चिंतामणि, मणि घ्यावा तोंचि काय तो हातें ?
बहु शोधेंहि न मिळतां, पावे रुरुविप्र शोकमोहातें. ॥५९॥
सावध होउनि गेला; प्रमतिप्रति वृत सांगता झाला;
मग रुरु तातामुखें तें आख्यान श्रवण करुनियां धाला. ॥६०॥