कद्रूचा ज्येष्ठ तनय शेष; दुजा वासुकी महाभाग;
ऐरावत, कर्कोटक, तक्षक, कालीय, बहु असे नाग. ॥१॥
सर्वगुरूंत्तम माता, परि तीची रीति ती नव्हे नीट,
ह्मणवुनि शेष तप करी, दुःसंगतिचा धरूनियां वीट. ॥२॥
अत्युग्र गंधमादनगोकर्णादिस्थळीं सदा तपतां,
भेटे त्यासि पितामह, यमनियमांतें सुयुक्तिनें जपतां. ॥३॥
‘ वत्सा ! कां उग्रतपें तापुनि, लोकांसि तापविसि ? बोल.
मद्दृष्टिवरतरिगता शेषा ! न मनोरथाब्धि तुज खोल. ’ ॥४॥
शेष म्हणे, ‘ द्वेष करिति गरुडाचा, न धरिती भया, भ्राते;
दुर्मति परस्परहि, अरिसम भांडति. सर्वदा दयाभ्रा ! ते. ॥५॥
जन्मांतरींहि त्यांचा संग नसावा म्हणोनि देहातें
त्यागाया तप करितों, वरदा ! वरदान हेंचि दे हातें. ’ ॥६॥
द्रुहिण म्हणे, ‘ मीं जाणें कद्रूचें, आणि त्यांहि सापांचें,
विनतागरुडद्वेषप्रभृति विचेष्टित अशेष, पापांचें. ॥७॥
वर माग, शोक न करीं, म्यां तत्परिहार योजिला आहे,
सन्मतिला वर देता, माझें मागेंपुढें न मन पाहे. ॥८॥
मज नयनिष्ठ, शुचि, तुझें नवनीताहूनि हृदय मउ ठावें.
या त्वन्मतिमधुपानें, धर्मसरोज त्यजूनि, न उठावें. ’ ॥९॥
‘ हाचि वर मला द्यावा ’ शेष म्हणे. विधि करी दया फार.
मग त्याला प्रभु सांगे निजमाथां घ्यावया धराभार. ॥१०॥
धरिली पृथिवी माथां, त्या पाताळीं शिरोनियां विवरें.
सख्यें आनंदविलें, विधिच्या आज्ञेकरूनि, त्या वि - वरें. ॥११॥
वासुकिहि करी चिंता; न सुचे कांहींच शापपरिहार;
झाला म्लान; फिरविला पुष्पांचा जेंवि वन्हिवरि हार. ॥१२॥
वासुकिला कोन्ही अहि म्हणती, ‘ आम्हीं विचार हा केला;
जनमेजयराज्याच्या घ्यावें, होवूनि विप्र, भाकेला. ॥१३॥
गोवुनि त्यासि ह्मणावें, भरतकुळश्रीसुरत्रहारा ! हो
सत्यप्रतिज्ञ, राया ! अहिसत्रारंभ उग्र हा राहो. ’ ॥१४॥
अन्य अहि ह्मणति, ‘ होऊं तन्मंत्री, दाखवूनि नयनपटुता.
पुसतां विचार, आणूं तच्चित्तीं सर्पसत्रफळकटुता. ’ ॥१५॥
इतर ह्मणति, ‘ सत्रज्ञ ब्राह्मण, नृपहित, असेल जो शिष्ट,
तो चावुनि मारावा भलत्या भुजगें, विचार हा इष्ट. ॥१६॥
असतील तज्ज्ञ बहु, तरि मारूं सर्वांसही, करूं दंश. ’
साधु ह्मणति, ‘ शिव ! शिव ! या मंत्रें वांचेल हा कसा वंश ? ’ ॥१७॥
एक ह्मणति, ‘ घन होऊं, विझवूं अनलाशि, सत्रविघ्न करूं. ’
एक ह्मणति, ‘ स्रुगादिक पात्रें, असतां असावधान, हरूं. ’ ॥१८॥
किति ह्मणतो, ‘ मळमूत्रें दूषावें सर्व अन्न; तो यज्ञ
मग कैसा चालेल ? ’ स्वमत असें बोलती किती अज्ञ. ॥१९॥
‘ ऋत्विज होउनि सत्रीं रायाला दक्षिणार्थ अडवावें;
प्रारंभींच करावा प्रत्यूह, बहु च्छळूणि, रडवावें; ॥२०॥
अथवा उदकीं क्रीडा करितां, राजा धरूनि आणावा,
बद्ध करावा, हाचि स्वश्रेयस्कर उपाय जाणावा. ’ ॥२१॥
कोणी पंडितमानी अहि ह्मणति, ‘ तुम्हांसि लागलें खूळ;
चावूं नृपासि; खाणूं स्वानर्थांचें अशेष तें मूळ. ’ ॥२२॥
वासुकि ह्मणे, ‘ अभुज हो ! तुमचा मजला विचार हा न रुचे.
क्षुधितें कसें गिळावे कवळ गरळदूषितांतरा चरुचे ? ॥२३॥
गुरुलाचि शरण जावें; वाटे आम्हांसि तोचि रक्षील;
वारील शापताप प्रभु जरि करुणेकरूनि लक्षील. ’ ॥२४॥
एलापत्र म्हणे, “ मीं वदतों, परिसा त्यजूनि संताप;
होतों तेव्हां अंकीं मातेच्या जेधवां दिला शा. ॥२५॥
सुर हळहळले, वदले, ‘ तीक्ष्णा न स्त्रीपरीस तरवारी. ’
मग ते विधिसि विनविती तो त्यांचा खेद शीग्रतर वारी. ॥२६॥
जवळचि तेव्हां होतों, म्हणउनि, म्यां ऐकिलें तदुक्त असें,
‘ मज शाप मानला हो ! जरि नसता मान्य, वारितों न कसें ? ॥२७॥
तीक्ष्णजगदहितपन्नगवृद्धि नसावी, असें मनीं होतें.
मद्वांछित स्नुषेच्या तेजें सिद्धीस पावलें हो ! तें. ॥२८॥
जे पापाचार, खळ, व्याळ, जगत्काळ, तेचि मरतील.
दुस्तरशापव्यसनीं, जे धार्मिक, सदय, तेचि तरतील. ॥२९॥
आस्तीकनामक द्विज, पुत्र जरत्कारुचा तयां कवच.
होयील, स्वस्थ असा; हें माझें देव हो ! मृषा न वच. ’ ॥३०॥
देवानीं, श्रवण करुनि विधिची अभयप्रदा असी उक्ती,
आस्तीकमौक्तिकाची पुसिली त्या ज्ञानसागरा शुक्ती. ॥३१॥
‘ अभिधान समान जिचें वरिल जरत्कारु तीस, तसि कन्या
कद्रूची, वासुकिची अनुजा आहे, जगीं नसे अन्या. ’ ॥३२॥
ऐसें आइकिलें म्यां. स्वजरत्कारु स्वसा तया ऋषितें
द्यावी जीवनकामें. यत्न करावाचि सर्वथा तृषितें. ” ॥३३॥
एळापत्रोक्तें ते झाले सानंद सर्वही भोगी.
अमृतमथनींच ऐसा मंट्र करी वासुकी महायोगी. ॥३४॥
शापार्तें वासुकिनें, मग डोळे करुनि अश्रुनिं ओले,
विधि सुरमुखें विनवितां, जें एळापत्र, तेंचि तो बोले. ॥३५॥
अमृतमथन झाल्यावरि, वासुकिनें सावधानधी भोगी
आज्ञापिले, ‘ कथावा होतांचि विवाहकाम तो योगी. ’ ॥३६॥
दिव्यतपस्यासंगें भुलला होता महर्षि; तो कां जी !
स्त्रीला स्मरेल ? रसिक, त्यजुनि सुधा, कोण सेवितो कांजी ? ॥३७॥
ऐसें असतां, त्याचा त्या व्यसनीं काळ लोटला प्राज्य;
जोंपर्यंत परीक्षिन्नृपति करायसि लागला राज्य. ॥३८॥
त्या अभिमन्युकुमारें हर्षविली, रक्षुनि प्रजा, अवनी;
एका दिवसीं केला मृगयाक्रीडेस्तव प्रवेश वनीं. ॥३९॥
तेथें एक शरक्षत हरिण पळाला, म्हणोनि, त्यामागें
लागे तो नृप; ऐसें झालें नव्हतें कधीं च त्यामागें. ॥४०॥
पुनरपि विंधावा मृग, म्हणउनि, तो धरुनि सज्य धनु, सरला
विशिखा योजुनियां मख - हरिणातें हर, तसाचि अनुसरला. ॥४१॥
झाला अदृश्य मृग तो स्वर्गतिचा हेतु होय त्या रूपें.
केला, भरीं भरोनि, श्रम भोगुनि, शोध काननीं भूपें. ॥४२॥
देउनि वियोग निधिनें लुब्ध, नृप भ्रमविला तसा एणें.
मग विपिनीं मौनव्रत, फेनप मुनि एक देखिला तेणें. ॥४३॥
नाम शमीक तयाचें, जो सत्वचि शुद्धमानसां गमला;
त्यासि म्हणे, ‘ क्षतमृग, जरि तुज आढळला असेल, सांग मला. ॥४४॥
मुनि न वदे; नृप कोपे; मग कार्मुककोटिनें मृता अहिला
घाली त्याच्या कंठीं, घडला पूज्यापराध तो पहिला. ॥४५॥
भाविप्रबळभ्रम तो, सर्वहि बालिश असो, असो सुकवी,
होणार, सत्पथींही, दिवसींही, डोळसासिही, चुकवी. ॥४६॥
नृपति निजपुरा गेला. न क्षोभे मुनि, न तो मनांत रुसे.
साधु, कृतोपद्रवही, प्रतिकूळ न होति ते जना, तरुसे. ॥४७॥
त्या साधुशमीकाचा सुत, नाम तया महर्षिचें शृंगी;
सेवी दृष्टि जयाची ब्रह्मपदाब्जा सदा जसी भृंगी. ॥४८॥
तो स्वाश्रमासि, विधिला वंदुनि येतां, तयाप्रति सखा तें
गुरुलंघना सांगे कृश. असमंजस कर्म सन्मतिस खातें. ॥४९॥
वृत्त अशेष कृशमुखें कळतां श्रृंगी तदा असें शापी,
‘ तक्षकदंशें सप्तम दिवसीं तत्काळ तो मरो पापी. ’ ॥५०॥
मग आश्रमासि येउनि, श्रृंगी जों तातमूर्तिला पाहे,
मृतसर्प कंठदेसीं तोंवरि तैसाचि अर्पिला आहे. ॥५१॥
काढुनि सर्प, पित्याला सांगे, ‘ ज्या दुर्जनें असें पाप
केलें, म्यां त्यासि दिला, तक्षकदंशें मरो असा शाप. ’ ॥५२॥
पुत्रासि शमीक म्हणे, ‘ सुतपस्या व्यर्थ गेलि; हें काय
केलें ? न पावलें क्षय कंठगतप्रेतलेलिहें काय. ॥५३॥
पूज्य दशश्रोत्रियसा, अध्ययनतपक्रतुक्रियाहेतु,
राजा, गुरु प्रजांचा, चोरादिव्यसनसागरीं सेतु. ॥५४॥
या क्रोधदस्युतिलकें कोण तपोधन जगीं नसे लुटिला ?
बापा ! विवक्षणा ! तूं कैसा विश्वासलासि या कुटिला ? ’ ॥५५॥
बहु हळहळोनि मुनिनें गौरमुख च्छात्र शीघ्र पाठविला;
शाप नृपासि कळविला. तेणें स्वकृतापराध आठविला. ॥५६॥
गुरुलंघनपरितप्तें भूपें तो गौरवदन बोळविला.
आधीं मस्तक त्याच्या असकृच्छुचिपदारजांत लोळविला. ॥५७॥
मंत्रिमतें तोषविले विषनाशोपायदक्ष कनकांहीं.
ते म्हणति, ‘ स्वस्थ असा; आम्हांहुनि शक्त तक्षक न कांहीं. ’ ॥५८॥
शीघ्र करविला एकस्तंभप्रासाद; त्यांत नृप राहे;
जेथें प्रवेश त्याच्या आज्ञेवांचूनि वातहि न लाहे. ॥५९॥
तेथेंचि राजकार्यें करितां, सा दिवस लोटले नीट.
आप्तोक्त करी, परि नृप भ्याला नाहींच तो महाधीट. ॥६०॥
सप्तम दिवसीं काश्यपमुनि, कोणीएक, मृत्यु वाराया
धावोनि येत होता, द्विजतनु तक्षकहि त्यासि माराया. ॥६१॥
दोघांसि गांठि पडतां, तक्षक त्यातें पुसे, ‘ अगा आर्या !
सांग, त्वरा करुनि, तूं कोठें जातोसि ? कोणत्या कार्या ? ’ ॥६२॥
काश्यप म्हणे, ‘ परिक्षिन्नृतीतें आजि विप्रशापानें.
तक्षक डसणार, तया जातों रक्षावया प्रतापानें. ’ ॥६३॥
त्यासि म्हणे, ‘ जो तक्षक डसणार तयासि, तो महाविष मीं;
साधो ! जा मागें, तूं काम पडसी संकटीं अशा विषमीं ? ॥६४॥
विप्र म्हणे, ‘ मद्विद्याबळ मज ठावें; तुझेंहि हरिन गर;
पतिकुशळमुदित गजपुर करिन, जसें नागमुक्त हरिनगर. ’ ॥६५॥
नाग म्हणे, ‘ जरि मद्विषहत नृप उठवावयासि तूं शक्त,
म्यां चाविला तरु करुनि जीवंत, स्वबळ दाखवीं व्यक्त. ’ ॥६६॥
विप्र म्हणे; ‘ हूं. ’ तों तो स्वविषाचा दाखवी विभव, डास
घेउनि, तक्षक भस्मचि करि एका घनघटानिभ वडास. ॥६७॥
तो मुनि हांसोनि म्हणे, ‘ हा अद्भुत गा ! अहे ! तुझा डास;
क्षणहि न भरतां, झाला ऐसा भस्मत्वहेतु झाडास. ॥६८॥
आतां माझें विद्याबळ, लोकीं अतुळ, निर्विवाद, पहा.
होता तसाचि करितों, जरि झाला भस्मराशि पादप हा. ’ ॥६९॥
ऐसें वदोनि, मुनिनें, तें सर्व करूनि भस्म एकवट,
केला जीवंत, करुनि त्यावरि विद्यासुधाभिषेक, वट. ॥७०॥
आला क्षणांत अंकुर, नव पत्र, स्कंध, पल्लवहि दाट;
झाला वृक्ष यथास्थित मुनितेजेंकरुनि; तोहि अहि भाट. ॥७१॥
तक्षक म्हणे, ‘ मुने ! तूं धन्य, ब्रह्माचि भाससी, बापा !
हरिसील गरळ माझें, इतरांचेंही, समस्त, निष्पापा !. ॥७२॥
जरि अससील धनार्थी, तरि मजपासूनि अर्थ बरवे घे;
नृप तों गतायु; कुशळ न खंडितमूळाफळद्रुवर वेघे. ॥७३॥
दुर्वारविप्रशापें निःशेष प्राशिलें नृदेवायु;
तेथें करसिल काय ? न वृद्धि निरंधनशिखीसि दे वायु; ॥७४॥
अयश न जोडावें त्वां; क्षीणायु क्षितिप निश्चयें मरतो;
येथूनचि पुष्कळ धन घेउनि, अमलिनयशा भवान् परतो. ’ ॥७५॥
ध्यानें जाणोनि म्हणे मुनि, ‘ तोचि तपस्विशेखर खरा हो. ’
धन घेऊनि परतला; परि चित्तीं लागला खरखरा हो !. ॥७६॥
मग तक्षक नृपतीचें जाणुनि बहु सावधानपण, सद्मीं
नागांतें मुनिवेषें प्रेषी; ते शिरति, अळि जसे पद्मीं. ॥७७॥
भेटति कपटमुनि, कुशळ पुसति सबहुमान, साधुता राया
दावुनि, फळजळ अर्पिति, वदति प्रिय, मानसा धुताराया. ॥७८॥
पूजुनि, बोळउनि तयां, मग, तो नृप, विप्रदत्त तीर्थजळें
घेउनि माथां, ससचिव, सेवूं वैसे ऋषिप्रसादफळें. ॥७९॥
शिरला होता तक्षक योगबळें ज्यांत, तेंचि भूप फळ
घेता झाला; वाटे मोटें सर्वां बळांत भाविबळ. ॥८०॥
त्यांत नृपासि कृमि दिसे, ज्याहुनि वर्णें लहान सेंदूर;
ज्याचें नेत्रयुग म्हणे, ‘ तिमिरा ! उपमा लहा, नसें, दूर. ’ ॥८१॥
त्या ह्रस्वकाणुकृमिला राजा सचिवांसि दाखवी; हांसे.
भ्रमला सुविचक्षण परि; पडले कंठांत मृत्युचे फांसे. ॥८२॥
सचिवांसि म्हणे, ‘ सप्तम दिन सरलें; मरण युक्तिनें टळलें;
कृमि कंठीं डसवावा; श्रृंगिवचनही न पाहिजे मळलें. ’ ॥८३॥
सचिव म्हणति, ‘ बहु उत्तम; न करावा शब्द साधुचा लटिका;
टळलाचि समय; जाया अस्ताप्रति भानुला नको घटिका. ’ ॥८४॥
काळप्रेरित, सचिवानुमतें, नृप आपुल्या करें कृमिला
डसवी कंठीं; हांसे; तों तेणें कंठदेश आक्रमिला. ॥८५॥
भीषणभोगें वेष्ठुनि, फूत्कारें कांपवूनि साग - रसा,
नागें, कंठीं चावुनि, नृप केला घटजपीतसागरसा. ॥८६॥
दवळवळित नगखगसे, तग सेवक काढिती न तैं पळ ते.
जळते प्रासादासह नृपतिसवें, जरि न तत्क्षणीं पळते. ॥८७॥
मोटा नाद करुनि, मग गगनपथें तो उडोनियां जाय.
राय प्रासादासह, होय भसित; सर्व पुर म्हणे, ‘ हाय ! ’ ॥८८॥
परलोकहित नृपाचें करुनि, गुरु पुरोहितप्रधानजन
करिति जनमेजयाचें, अभिषेकुनि सविधि पितृपदीं, भजन. ॥८९॥
बाळपणींच सुमति तो जनमेजय रंजवि प्रजा; माता -
तात तसा पाळी, ज्या गुरुधनसत्कार्य, विप्र, जामाता. ॥९०॥
काशिप सुवर्णवर्मा राजा, जनमेजया नृपा धन्या,
संबंध योग्य जाणुनि, देता झाला वपुष्टमा कन्या. ॥९१॥
त्या काळींच, ब्राह्मणवर्य जरत्कारु, सोडुनी पहिला
आश्रम, दुसरा सेवी, धन्य करी स्वांगनाग्रजा अहिला. ॥९२॥
वासुकिनें रम्य गृहीं, करउनि साहित्य सर्व, वसवीला.
मुक्त्यर्थ उमाशंकर जाणों देवालयांत बसवीला. ॥९३॥
स्त्रीस मुनि म्हणे, ‘ अप्रिय करितांचि त्यजिन तत्क्षणीं तुजला.
विप्रिय सोसी विषयी; हा विषयाकारणें नसे सुजला. ’ ॥९४॥
त्या शब्दें कंपिततनु झाली, झंझानिलें जसी कदली.
पदलीना ती साध्वी, मान्य करुनि, ‘ बहु बरें ’ असें वदली. ॥९५॥
भयचकितता मृगाची, शुनकाची जागरूकता सिकली,
ती इंगितज्ञताही काकाची; म्हणुनि सेवनीं टीकली. ॥९६॥
पत्नी अंतर्वत्नी होतांचि, म्हणे मनांत तो ‘ जावें;
हा स्नेहपाश कैसा तोडावा ? यासि काय योजावें ? ’ ॥९७॥
एका समयीं, स्त्रीच्या अंकीं ठेऊनि शिर, निजे श्रमला.
साध्वीस तोचि अवयव सर्वावयवांत धन्यसा गमला. ॥९८॥
संध्यासमयावधि पति निजला, न उठे, म्हणोनि, ती व्याली,
निद्राभंग कराया, न करायाही, सती मनीं भ्याली. ॥९९॥
‘ निद्राभंग बरा, परि न बरा आवश्यकक्रियालोप; ’
करुनि विचार असा, जों उठवी, तों विप्र तो करी को. ॥१००॥
‘ कां गे ! भुजंगमे ! त्वां मजला निद्राभरांत जागविलें ?
काय करसील ? अंकीं शिर ठेउनि, तुज उदंड भागविलें. ॥१०१॥
जातों; न साहवे मज ऐसा अवमान, पळहि, हा कांहीं.
गृहसुख पुरे; कळविलें; शूळचि उठले शिरांत हाकाहीं. ॥१०२॥
‘ अस्तासि चालिला रवि, संध्याविधि अंतरेल, ’ या भावें,
म्हणसी जागविलें, तरि माझें सामर्थ्य तुज नसे ठावें. ॥१०३॥
मीं निजलों असतां, बळ कैंचें अस्तासि जावया रविला ?
म्यां काय द्यूतांत ख्यात स्वतपःप्रताप हारविला ? ’ ॥१०४॥
दाटूनि दोष ठेवी, तो काय किती प्रकार बोलावा ?
स्नेहाचा, निजचित्तीं लेशहि येऊं न देचि, ओलावा. ॥१०५॥
जातां स्त्रीस म्हणे, ‘ मीं होतों सुखरूप, या तुझ्या भवनीं;
गेल्यावरि वासुकिला सांगावें, योग्य हा जन स्व - वनीं. ’ ॥१०६॥
नमुनि जरत्कारु म्हणे, ‘ नसतां अपराध, टाकितां दासी;
द्विजराज तुम्हीं या अपवादांकें द्याल हर्ष चांदासी. ॥१०७॥
वासुकिनें, ज्या अर्थें, या देहें पूजिले भवच्चरण;
अजि वरद ! अहो वत्सळ ! आहे कीं तें नसे तुम्हां स्मरण ? ’ ॥१०८॥
विप्र म्हणे, ‘ त्वद्गर्भीं आहे गुणमणिकरंड, कवि, शिष्ट. ’
शापव्याकुळमातुळकुळविपदर्णवतरंडक, विशिष्ट. ’ ॥१०९॥
वासुकि पुसे, ‘ अहा ! तो कां हो ! गेला मुनि ? स्वसे ! नमनीं
चुकलोंचि काय आम्हीं ? क्षणभरिहि स्वस्थ निःस्वसे न मनीं. ॥११०॥
मुनिच्या अभयोक्तीनें झाला सानंदचित्त वासुकि; ती
स्वस्थ करी विश्वातें; तेथें कद्रूतनूद्भवासु किती ? ॥१११॥
चिंतामणि पेटिला, कीं जेंवि निधानकुंभ सुक्षितिला,
कें अमृतरस कुपीला, बहु गौरव दे तिचाचि कुक्षि तिला. ॥११२॥
स्वहितेच्छु भुजग जपती फार जरत्कारिला, जसे, चुकवी
जो बोध मरण, त्याच्या माते विद्येसि सर्वदा सुकवी. ॥११३॥
उत्तम समयीं झाला पुत्र तिला; प्रकटतां रवि प्राची
जसि शोभे, तसि तेणें ती भार्या फार फार विप्राची. ॥११४॥
आस्तीक नाम त्याचें ठेउनि, मानूनि लाभ लाभाचा,
वासुकिनें स्वप्राणांहूनि सदा रक्षिला भला भाचा. ॥११५॥