केला होता शूरें प्रथमापत्यप्रदानपण सत्य;
हृष्ट कराया स्वजनकभगिनीसुत कुंतिभोज अनपत्य. ॥१॥
वसुदेवाच्या जनकें पहिली कन्या दिली सख्यास पृथा;
कीं साधुनें प्रतिज्ञा जाऊं देऊं नये कदापि वृथा. ॥२॥
ती कुंती पितृसदनीं कासारीं पद्मिनी तसी वाढे.
तों दुर्वासा तेथें ये, ज्याचे जाच कटु जसे काढे. ॥३॥
त्या मुनितें, तो, सेवा करुनि करि बहु प्रसन्न देवी; ‘ द्या
वर मज ’ असें न मागे, परि तो तीस स्वयेंचि दे विद्या. ॥४॥
मुनि कुंतीस म्हणे, या मंत्रें ज्या ज्या सुरा बहासील,
त्या त्या सुरप्रसादें वत्से ! तूं पुत्रसुख पहासील. ’ ॥५॥
सर्वभविष्यज्ञ मुनिप्रवर, असी करुनियां दया, गेला.
मग कौतुकें पृथेनें सूर्यागमनार्थ मंत्रजप केला. ॥६॥
एकांतीं गंगेच्या तीरीं जपतांचि दिव्य मंत्रास,
दिसला दिनकर, येतां, होय चमत्कार, हर्ष, संत्रास. ॥७॥
येउनि निकट रवि म्हणे, ‘ सुंदरि ! पाचारिलेंस कां मातें ?
काय करूं इष्ट तुझें ? तूं कोणा इच्छितीस कामातें ? ’ ॥८॥
कुंती म्हणे, ‘ प्रभो ! मज सेवापरितुष्टविप्रवर विद्या
देता झाला; कुतुकें मीं वदल्यें, जरि असेल बरवि, द्या. ॥९॥
विद्याबळ जाणाया, पाचारुनि पाहिलें तुम्हां देवा !
चुकल्यें, क्षमा करा; हें विद्येचें कृत्य; किति इचा केवा ? ’ ॥१०॥
भानु म्हणे, ‘ वरदाता दुर्वासा गुरु तुझा मला कळला.
फळला तो कल्पद्रुम; तद्वर न कधींहि अपयशें मळला. ॥११॥
भीरु ! भय त्यजुनि, मिठी घालीं माझ्या गळ्यांत बाहूनीं.
दर्शन अमोघ माझें; तुज उचित न हा नकार, बाहूनीं. ॥१२॥
बंधुजनापासुनि तूं मुग्धे ! चित्तीं भिवूं नको; मळता
जन तरि बहुकर होतों ? कां जाणसि आमुची न कोमळता ? ’ ॥१३॥
सत्य, प्रिय, हित बोलुनि, योजुनि अंकीं निवास, रमणीतें
घेउनि, देवुनि अधरामृत, भोगी रत्न वासरमणी तें. ॥१४॥
झाला सहजकवचमणिकुंडलधर तत्क्षणीं रुचिर बाळ;
तीहि कुमारी झाली; आली जाणों प्रसूतिची आळ. ॥१५॥
रवि गेल्यावरि, तो सुत गंगेच्या घातला तिनें पदरीं;
केलें कठिन मन. असो पुत्रफळ; त्यागमति नव्हे बदरीं. ॥१६॥
तें पुत्ररत्न दिधलें गंगेनें अधिरथासि, तद्भार्या
राधा त्यातें पोषी; त्यास्तव ‘ राधेय ’ म्हणति त्या आर्या. ॥१७॥
त्यांहीं ‘ वसुषेण ’ असें पुत्राचें नाम ठेविलें विधिनें.
झाला शूर उदार, स्तविलें ज्याच्या यशा सुधानिधिनें. ॥१८॥
कुंतीनें पांडुनृपति नृपवृंदांत स्वयंवरीं वरिला,
जैसी वरिती झाली देवसमूहीं मुलोमजा हरिला. ॥१९॥
दुसरा विवाह व्हावा पुत्राचा हें मनांत आणूनीं,
मद्रपतिकडे गेला आपण गांगेय योग्य जाणूनीं. ॥२०॥
यच्चरितें सुजनाच्या हृदयीं अमृतेंचि, शत्रुच्या शल्यें;
सद्विज, सामात्य, सबळ, तो भरतश्रेष्ठ पूजिला शल्यें. ॥२१॥
भीष्म म्हणे, ‘ राया ! वच सत्पर्षींचें जसें करि हिमाद्री,
करिं तूंहि या ऋषींचें; आहे जरि एक, दे तरिहि माद्री. ’ ॥२२॥
शल्य म्हणे, ‘ कुरुनाथा ! अढळ कुळाचार, जेंवि हेमाद्री.
ठावा असेल तुजला द्यावी म्यां शुल्कदासि हे माद्री. ’ ॥२३॥
भीष्म म्हणे, ‘ कुलधर्मत्याग नव्हे उचित, मान्य मज आहे;
सत्कुळजाचेंचि सदा स्वकुळाचाराकडेचि मन वाहे. ’ ॥२४॥
ऐसें मान्य करुनि, दे कन्याशुल्कार्थ भूषणें, वस्त्रें,
रत्नें, कनकें, वाजी, हस्ती, रथ आणि चांगलीं शस्त्रें. ॥२५॥
शल्य मग नदीजाचा अनुजेनें अंक शोभवुनि उजवा,
प्रार्थुनि म्हणे, ‘ पुरा न्या; प्रेमरसें ईस लोभवुनि उजवा. ’ ॥२६॥
त्या लावण्यखनीला आला घेउनि भीष्म मग लग्न
झालें, पांडुसुहृन्मन हर्षीं, दुःखॆं अमित्रमन, मग्न. ॥२७॥
कुंतीसीं माद्रीसीं करुनि सुखविहार एकमासभरी,
भीष्मादिगुरुमतें तो पांडु प्रस्थान भूजयार्थ करी. ॥२८॥
पवनातें, तेजातें प्राशुनि निःशेष न करि अहि, तरणी;
न तसा पांडु महाबळ; याच्या उरला न एक अहित रणीं. ॥२९॥
अरिनाग, पांडुहरिच्या, केले शतचूर्ण, सायकरदानीं.
त्यजुनि दुरभिमान, स्वप्रियहित वरिलें न काय करदानीं ? ॥३०॥
अहित अहि, तयां झाला विवर, विवर सांपडों दिलें न रणीं.
महित महितळीं झाले नमुनि न मुनिसुत हठी द्विषन्मरणीं. ॥३१॥
करद पर दमुनि केले; धनदमन दरिद्र आपणा मानी
ऐसी वित्तें घेउनि, अक्षत आला पुरासि तो मानी. ॥३२॥
बहु मानिला नदीजें पांडु, जसा शंकरें स्वसेनानी.
तैं वेष्टुनि केलें गजपुर लंकाद्वीपतुल्य सेनानीं. ॥३३॥
शोभे स्थळस्थळीं तें राशीकृतरत्नकनक नगर; मला
वाटे, गमलें लोकां कीं, येथें रत्नकनकनग रमला. ॥३४॥
भीष्मादिकांसि तें धन दिधलें वांटूनि; जेंवि धनदानें,
केलीं आश्रित - याचक - हृदयें संतुष्ट भूरिधनदानें. ॥३५॥
एकछत्रा, कंटकरहिता, स्ववशा, करूनियां अवनी,
भवनीं रमोनि, पांडु क्रीडे तुहिनाद्रिदक्षपार्श्ववनीं. ॥३६॥
घेउनि गेला संगें कुंतीतें आणि त्याहि माद्रीतें.
गंगागौरीगुरुसा आश्रय करि पांडु त्या हिमाद्रीतें. ॥३७॥
धाडो धृतराष्ट्र सदा साहित्य वनांत आदरें पुरतें.
अनुकूळदारसंगें कां हो ! न गमेल पांडुला पुर तें ? ॥३८॥
पांडु वनीं असतां, सुरसिंधुज, विदुरार्थ आनवुनि बरवी
देवकमहीपतीची पीरसवी कन्यका, तिला वरवी. ॥३९॥