द्रोण म्हणे शिष्यांसि, ‘ द्रविण किती वाहती असु ज्ञानी.
गुरु पूजूनि सुखविला सुज्ञानीं, दुखविला असुज्ञानीं. ॥१॥
द्या दक्षिणा असी कीं, द्रुपदाचा सर्व गर्व खाणावा,
युद्धीं भग्न करावा, मग बांधुनि मत्समीप आणावा. ’ ॥२॥
तें मान्य करुनि सर्वहि शिष्य रथीं प्रथम बसउनीं गुरुला,
चढले स्वरथीं स्वर्गीं तर्पाया सद्यशोमृतें कुरुला. ॥३॥
सानुज सुयोधन पुढें धावे, त्या पांडवांसि सोडूनीं,
व्हायास कर्ण आपण धन्य द्रोणार्थ कीर्ति जोडुनीं. ॥४॥
शिरले द्रुपदपुरींतहि, गमले जयमूळ काळ तो साचें;
जिष्णुमतें गुरु राहे अंतर सोडूनि अर्धकोसाचें. ॥५॥
जिष्णु म्हणे, ‘ पावति गति इतर पशु न, त्या पिनाकिच्या पशुची.
गुरुजी ! पात्र शुचि यशा या शिष्याचाचि एक चाप शुची. ॥६॥
द्रुपद बळी, हे दुर्बळ, नाहीं येणार यांसि यश कांहीं.
श्येन कसा जिंकावा ? पक्षित्वमदेंकरूनि मशकाहीं. ॥७॥
होतील भग्न कौरव, मग आम्हीं दाखवूं निजबळाला.
आधीं प्रबळपरकरें दुष्टांचा पाहिजे मद गळाला. ’ ॥८॥
हा मंत्र मना आला; मग पांचां पांडवांसह द्रोण
मागें राहे. शिशुचें म्हणुनि न घे सूक्त जाणता कोण ? ॥९॥
निजदेहपरिष्वंगीं मानावे अमृतगोळसे तातें,
म्हणुनि द्रुपदपुरातें पीडिति ते, जेंवि टॊळ सेतातें. ॥१०॥
परि अरि सकळ पळविले द्रुपदें समरांगणांत भेटोनिं,
जेंवि वृकव्याघ्रादि श्वापद दहनें वनांत पेटोनीं. ॥११॥
अरिबळभयार्त निर्भय केलें तें आपुलें पुर द्रुपदें.
अभय दिलें भीतांतें द्रोणें दासांचिया सुरद्रुपदें. ॥१२॥
धर्मासि गुरुसमीप स्थापुनि घेवूनियां तदाज्ञा, ते
गेले द्रुपदनृपावरि त्याच्या उतरावया मदा ज्ञाते. ॥१३॥
रथचक्ररक्षणीम यम योजुनि तत्काल वैरितापार्थ,
झाला द्रुपदमदातें स्वशरशिखिमुखांत वैरिता पार्थ. ॥१४॥
भीम गदेतें घेउनि धांवे हो ! एकशृंगपर्वतसा;
गजमद जसा हरिपुढें, त्याहिपुढें शत्रुसैन्यगर्व तसा. ॥१५॥
भीमगदेतें अरिबळ, जैसें मंडुककटक उरगीतें,
भी मग दे तें पाठि; व्योम भरिति तैं प्रसन्न सुर गीतें. ॥१६॥
पांचाळबळासि न भी शिरतां तो, जेंवि सागरा मकर.
वाटे द्विजापराधें आलासे धरुनि राग रामकर. ॥१७॥
वेदांतीसा अर्जुन, रिपुभट गौतमनयज्ञसे, नाशा
तद्बळ पावे, पूर्णा होय जयाची न यज्ञसेनाशा. ॥१८॥
श्रीगुरुवराच्युतोत्धृतफाल्गुनगोवर्धनीं द्रुपदशक्र
वृष्टि करी, परि झालें कौरवगोपाळरोमहि न वक्र. ॥१९॥
खंडुनि शस्त्रास्त्रांतें लीळेनें अर्जुनें अ - हीन - कुळें
क्षीणमद द्रुपद धराधव धरिला, हो ! जसा अही नकुळें. ॥२०॥
अर्जुनगरुडें गुरुवरकार्मुकपक्षोत्थशस्त्रवातबळें,
उडवुनि बळाब्धि धरिला भग्नमद दुर्पददंदशूक पळें. ॥२१॥
गिरिवरि हरिसा चढला क्षिप्र रथीं पांडपुत्र करवाळी,
द्रुपदासि धरी, जैसा दशवदना तन्मदांतकर वाळी. ॥२२॥
मग तो भीमासि म्हणे अर्जुन देवुनि दुरूनि हाकेला,
‘ न वधावें कटक वृथा, परतावें, भूप भग्न हा केला. ’ ॥२३॥
हें राजरत्न दुर्लभ, परि न करुनि फारसा उपाय, नतें
पार्थें आणुनि गुरुच्या चरणयुगीं अर्पिलें उपायन तें. ॥२४॥
द्रोण म्हणे द्रुपदातें, “ तूं माझा, मीं तुझा, सखा पहिला.
आतां तरी म्हणों कीं, आक्रमिलें एतदर्थ या महिला. ॥२५॥
द्रुपदा ! तुज अभय दिलें यावरि पावो तुझी न तनु कंपा.
आम्हीं ब्राह्मण ते, ज्यां न विसंबे क्षांति, शांति, अनुकंपा. ॥२६॥
गुरुकुळवासीं होतें, परि सख्य क्षीण जाहलें मग तें;
म्हणुनि अ - सुख अनुभविलें बहु म्यां भवदीयदर्शनोपगतें. ॥२७॥
‘ भूप सखा भूपाचा, कवि कविचा, धनिक तोचि धनिकाचा, ’
ऐसें वदलासि, तुझ्या गमला हा द्रोण विप्र मनि काचा; ॥२८॥
उत्तरपांचाळपती मीं निजतेजें, न तोंड वासूनीं;
दक्षिणपांचाळपती तूंही, होसील आजपासूनीं. ॥२९॥
पांचाळराज तूंही, मींही सख्यासि योग्य समशील
आहें कीं नाहीं, गा ! वद, वदतां मज उदार गमसील. ॥३०॥
सख्याचा लोभी मीं परि राजपआण्विणें घडेना तें,
म्हणउनि राजा झालों, कीं न उपायांतरें घडे नातें. ” ॥३१॥
द्रुपद म्हणे, ‘ ब्रह्मर्षे ! तुमच्या जोडा नसेचि अनुभवा.
अ - तनु मदपराध तदपि पूर्वस्नेह स्मरोनि तनु भावा. ’ ॥३२॥
देवुनि राज्यार्ध नृप द्रोणें सत्कार करुनि बोळविला.
अहि सोडिला जसा पय पाजुनि, मनि, मणि हरूनि, पोळविला. ॥३३॥
राज्यार्ध, समग्र यश द्रोणें हरिलें म्हणोनि तो मानी
पावे ताप; असा जो, लेशहि न निवेल लक्षसोमानीं. ॥३४॥
आपण घट, परि पुत्राकरवीं द्रोणाब्धि आटवायाला
शोधी वरदा ऋषिला स्वयश, जगीं अतुळ वाटवायाला. ॥३५॥