सत्यवतीसुत पहिला चित्रांगद, जेंवि रात्रिकांत नवा,
सुखकर; दुसरा झाला, त्या नाम विचित्रवीर्य शांतनवा. ॥१॥
शंतनुनृप भीष्माच्या हातीं तें पुत्रयुग्म दे हातें
गेहातें देवांच्या जातां, काळाचिया स्वदेहातें. ॥२॥
भीष्में राजा केला चित्रांगद; तो अतीव अभिमानी.
काय कथा मनुजांची ? असुरांसि, दिवौकसांसिहि न मानी. ॥३॥
त्यातें, गंधर्वाधिप चित्रांगद कपटपाटवें भारी,
तीरीं सरस्वतीच्या, वर्षत्रय युद्ध करुनियां मारी. ॥४॥
शांतनवें मातृमतें विधिनें देवूनि पितृपद भ्रात्या
बाळा विचित्रवीर्या, दिधली नयशक्तिही अदभ्रा त्या. ॥५॥
होतां विवाहदीक्षायोग्य भ्राता, नदीज तो कानीं
काशिपुसतास्वयंवर परिसे, कथितां स्वदूत लोकानीं. ॥६॥
वाराणसीस जावुनि, काशिपतिसुता तिघीहि भीष्म हरी.
कन्यार्थि, युयुत्सु, समरनिपुण, नृपतिकुंजरांत होय हरी. ॥७॥
बहु भूप भग्न केले परि मागें शाल्व लागला एक.
जाणों महोरगावरि गेला धावोनि मातला भेक. ॥८॥
तो विरथ मात्र केला आवरिला घातकाम हात रणीं;
तेजचि खद्योताचें हरिल, करिल घात कां महातरणी ? ॥९॥
भगिनी सुतासुनाशा त्या नेल्या निजगृहासि शांतनवें.
त्याचें जन्मापासुनि सदय विमळ चित्त; न प्रशांत नवें. ॥१०॥
लग्नोपक्रमसमयीं ज्येष्ठा अंबा म्हणे, ‘ मला न वरा;
नवराजीवाक्षहि हा नलगे; मज शाल्य मानला नवरा. ॥११॥
माझा मज्जनकाचा, शाल्वाचाही विचार हा; निकर
क्षत मन्मनोरथांचा करितां, हें कर्म धर्महानिकर. ’ ॥१२॥
पाठविली माघारी अंबा; कथिलें तसेंचि साधूनीं;
बंधूसि अंबिकेसह दिधली अंबालिकाहि साधूनीं. ॥१३॥
नृप कामात्मा झाल;अ लावण्य, प्रेम अतुळ दोघींचें;
वाहे शृंगाररसीं तन्मानस, जेंवि पुष्प ओघींचें. ॥१४॥
स्त्रीविषय सातवर्षें रात्रिंदिव भोगितां न तो धाला.
झाला वश कामाच्या अहिता; न हिता स्वकीय बोधाला. ॥१५॥
देहज यक्ष्मा त्याला खाय, जसा आश्रयाश आहुतिला.
जी राजकांति होती, लेशहि नुरवीच रोगराहु तिला. ॥१६॥
न चुकेचि भावि; चुकतें तरि, मृत्यु न व्हावयास काम रण
करिताचि भीष्म; येतें मग त्या मध्यमवयास कां मरण ? ॥१७॥
सत्यवती साश्रु म्हणे, ‘ गेला टाकुनि सकाय गेहा हा;
लोकांत मंदभाग्या मींच; करूं यत्न काय ? गे ! हा ! हा ! ’ ॥१८॥
चिंताशोकव्याकुळ भीष्महि मुकला क्षण स्वभावाला;
करवूनि पारलौकिक, करि सद्गति समुचित स्वभावाला. ॥१९॥