दीक्षा नृपासि देउनि, विधिलागि जपोनि, धीर विप्र कृती
करिती सत्रारंभ व्यासादि तपोनिधी रविप्रकृती. ॥१॥
गुरुशापविधिकृततदनुमोदनसन्मंत्रमुनिबळें कुंडीं,
जैसे पतंग दीपीं, पडति अमित सर्प वन्हिच्या तुंडीं. ॥२॥
नानावर्ण, महाबळ, वृद्ध, शिशु, व्याळ म्हणति ‘ हा ! ’ रडती;
पडतां कृशानुवदनीं, दीन महाकाय फार आरडती. ॥३॥
उद्गाता कौत्सुमनी, पिंगल अध्वर्यु, त्या मखीं होता.
शार्ङ्गरवऋषि ब्रह्मा, च्यवनात्मज चंडभार्गवहि होता. ॥४॥
मौद्गल्य, देवशर्मा, कोहल, उद्दालक, प्रमिति, वत्स्य,
कुंडजठर, कालघट, श्रुतश्रवा वेदवारिनिधिमत्स्य, ॥५॥
इत्यादि मुनि सदस्य; व्यासहि; ती अद्भुतप्रताप - सभा.
लोपे वैश्वानरभा; अधिक दिसे त्या मखांत तापसभा ॥६॥
शक्रासि शरण गेला तक्षक, जाणोनि त्यामखारंभा.
दे अभय हरिहि; शरणागतचि सखा शर्मद, न सखा रंभा. ॥७॥
बहु भुजग भस्म होतां, उरतां परिवार केवळ स्वल्प,
वासुकिहि, विकळ होउनि, ‘ सर्वांचा पातला ’ म्हणे ‘ कल्प. ’ ॥८॥
भगिनीस म्हणे, ‘ वत्से ! वाटे उसळोनि मींहि त्या कुंडीं
सत्वर पडेन, सर्पग्रासकरीं मंत्रदीप्तशिखितुंडीं. ॥९॥
दिग्भ्रम झाला; गेलें धैर्य - बळ; भ्रमतसें महातापें;
मन न वळे मज, जैसा गज अंकुश न वसतां महातापें. ॥१०॥
आम्हां रक्षील तुझा आत्मज, कथिलें भविष्य हें विधिनें;
म्हणुनि जरत्कारुकरीं पूर्वीं म्यां तुज समर्पिलें विधिनें. ॥११॥
तें आजि सत्य व्हावें; वत्से ! वत्सासि सांग, ‘ माहेर
व्यसनीं न बुडो, काढीं पुत्रातें प्लव करुनि बाहेर. ’ ॥१२॥
आस्तीकासि त्सी तूं बहुमान्या, जानकी जसी कपिला.
कीं देवहूति माता जैसी त्या सर्वमुनिवरा कपिला. ” ॥१३॥
स्वस्थ हृदय वासुकिचें करुनि, जरत्कारु वृत्त सत्वर तें
पुत्रासि कथी; तेव्हां अभय दिलें त्यासि त्याहि सत्वरतें. ॥१४॥
आस्तीक म्हणे, ‘ मामा ! तुमचे असु या भयें न कांपावे.
स्वकृतसुकृत रक्षोद्यत असतें; तें संकटीं न कां पावे ? ॥१५॥
जे मेले ते मेले; उरले रक्षील; आळस त्रात्या
हारेसि नसे; वारीलचि सर्वात्मा विश्वपाळ सत्रा त्या. ’ ॥१६॥
देउनि अभय असें, तो रक्षाया वासुकिप्रभृति भोगी,
वामन जसा बळिकडे, गेला जनमेजयाकडे योगी. ॥१७॥
व्हावा प्रवेश म्हणउनि, मखऋत्विङ्नृपसदस्ययश वर्णी
साधु, जरत्कारुमुनीश्वरबाळ, व्याळपाळ, मुनि, वर्णी. ॥१८॥
‘ सोम, वरुण, प्रजापति, सुरपति, यम, रतिदेव, शशबिंदु,
नृग, गय, अजमीढ, धनद, दशरथकुळदुग्धसिंधुचा इंद्रु; ॥१९॥
नृपति युधिष्ठिर, भगवान् व्यास, असे सुविधिदेशसमयज्ञ
जे जे त्यांहीं केले मख, हाही होय त्यांचिसम यज्ञ. ॥२०॥
या सत्रींचे विप्र श्रुतिशास्त्रयशस्तपोनिधि, ज्ञानी.
हे साक्षात् वेदपुरुष, गावे, ध्यावे, सदा विधिज्ञानीं. ॥२१॥
भगवान् पुत्रच्छात्रांसह वेदव्यास देव आपण, ज्या
सान्निध्य देतसे, निजभाग्यें बहुमान्य भूप हा पणज्या. ॥२२॥
जे विधिनें तुज भजले, तरलेचि भवांत वीतिहोत्रा ! ते.
त्वां अभय ज्यासि न दिलें, रक्षाया त्यासि भीति हो ! त्राते. ॥२३॥
राया ! अपूर्व दिधला त्वां हा या हव्यवाहना भाग.
तूं तैसाचि, जसे ते खट्वांग, दिलीप, भीष्म, नाभाग. ॥२४॥
भीष्म व्रतें; दिवाकर तेजें; प्रभुतेकरूनि तूं शक्र;
द्युतिनें नारायण तूं; यद्यपि नाहीं तुझ्या करी चक्र. ॥२५॥
गुणरत्नाकर कृष्णापरि; धर्मविनिश्चयज्ञ तूं धर्म;
आश्रय वसुश्रियांचा, तूं यज्ञनिधान, भूमिचें शर्म. ॥२६॥
तूं अस्त्रशस्त्रशास्त्रज्ञाता दाशरथि राम बाहुबळें;
और्व, त्रित, तेजें तूं, भगीरथ, पहावया अशक्य खळें. ॥२७॥
वीर्य सदा गुप्त तुझें जैसें वाल्मीकिचें; जितक्रोध
जोडा तूंचि वसिष्ठा; न दुजा; केला उदंड म्यां शोध. ॥२८॥
अस्मन्मनःप्रिया ! तुज या सर्वांसह सदा असो स्वस्ति.
त्वद्यश करो, तुझा अरिभटकटकांसह, दिगंतरीं वस्ती. ॥२९॥
या ऐशा सत्राचा कर्ता तूं मात्र भारता ! राया !
तूं व्यसनीं सेतु जना, वाहूनि जनाधिभार, ताराया. ’ ॥३०॥
ऐसें करितां स्तवन, प्रज्ञातेजोनिधिप्रति द्वारीं
रोध करावा कवणें ? झाला बहुमान्य वेदविद्वारीं. ॥३१॥
वय अल्प, अनल्प तपोविद्यातेज, प्रगल्भता शब्दीं;
पाहोनि, सर्व सादर झाले मुनि ते, जसे शिखी अब्दीं. ॥३२॥
भूप म्हणे, ‘ बाळ दिसे, परि मतिनें वृद्धसा, न बाळकसा;
वय अल्प, परि अनल्प ज्ञान, म्हणावा असाहि बाळ कसा ? ॥३३॥
वर द्यावासा वाटे; भलत्यासि सुपात्र हें नव्हे लभ्य.
सांगोत श्रीव्यासप्रभृति, करुनि ऐकमत्य, मज सभ्य. ’ ॥३४॥
सर्व सदस्य म्हणति, ‘ बहु उत्तम सत्कारयोग्य हें पात्र;
द्यावे वर; थांबावें परि ये तक्षकभुजंग तों मात्र. ’ ॥३५॥
आस्तीकचातकावरि तोनृप जीवनद ओळला होता;
तों तेंचि वदे; जाणुनि मखविघ्न, मनांत पोळला होता. ॥३६॥
‘ तक्षक येऊं द्यावा ’ ऐसें म्हणतांचि, राय होत्यातें
प्रार्थुनि म्हणे, ‘ शिखिमुखीं होमा; अवकाश काय हो ! त्यातें ? ’ ॥३७॥
ऋत्विज म्हणति, ‘ नृपा ! सुरपति आहे सिद्ध शत्रुच्या अवनीं;
शस्त्राधिदेवता हें सांगति, ‘ हरिच्याचि तो असे भवनीं. ” ॥३८॥
तो लोहिताक्ष सूतहि बोले, ‘ मुनि बोलिले यथार्थ, नृपा !
कथितों पुराणमत मीं; कोण न शरणागतीं करील कृपा ? ’ ॥३९॥
इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला, म्हणोनि, करें
कर चोळी; अधरातें चावे जनमेजय प्रभू निकरें. ॥४०॥
नृपतिप्रियार्थ होता मंत्रबळें तक्षकासि आकर्षी;
गडबडले बहु तेव्हां वासव, सुर, साध्य, सिद्ध, नाकर्षी. ॥४१॥
शक्र, बसोनि विमानीं, लपवुनि अहि उत्तरीयवस्त्रांत,
सत्रासि जाय, होवुनि विवश, बळ अनंत विप्रशस्त्रांत. ॥४२॥
सर्पमखायतनोपरि गगनीं आला भयार्त मघवा हो !
अतुळा ऋषिकीर्तिसुधातटिनी; तीमाजि सर्व अघ वाहो. ॥४३॥
तों नृप होत्यासि म्हणे, ‘ आझुनि हरि जरि अरीस सोडीना,
निजभक्तसंततीचें करुनि हित, प्रेमयशहि जोडीना, ॥४४॥
तरि काय पाहतां ? हो ! दोघांसहि पावकांत होमा जी !
तुमच्या पदप्रसादें वांच्छा सफळा जगांत हो माजी. ’ ॥४५॥
ऐसी यजमानाची आज्ञा होतांचि, विप्रवर होता
ज्ञाला सिद्ध, तयीं त्या यज्ञाच्या उपरि वज्रधर होता. ॥४६॥
भ्याला नाहीं जो प्रभु, करितां वृत्रासवेंहि भीमरणा,
पविधर, कवि, धरभेत्ता, तोही सुरराज, फार भी मरणा. ॥४७॥
त्यजिला सुरपतिनें तो शरणागत तक्षक स्वपदरींचा;
पावेलचि भंगातें प्रभुहि, जरि धरील पक्ष सदरींचा. ॥४८॥
हरि भवनासचि गेला, सोडुनि शरणागत स्वहस्तींचा.
दवकळवळितनिजकलभत्राणीं दुर्बळचि पतिहि हस्तींचा. ॥४९॥
ओढूनि आणिला हो ! तो तक्षक मंत्रशक्तिनें जवळ;
आपण ‘ घे ’ म्हणतांचि, ज्वलनें घ्यावाचि आननीं कवळ. ॥५०॥
ऐसें करूनि ऋत्विज म्हणति, ‘ नृपा ! जें त्वदिष्ट सत्कार्य,
तें हें झालेंचि बरें; सत्कारीं शिशुमुनींद्र सत्कार्य. ॥५१॥
बहुधा अहि कंपितहरिहस्तापासूनि पावला पतन;
हे नाद तक्षकाचे; भवदहिता करिल कोण गा जतन ? ’ ॥५२॥
मुदितमना नृपति म्हणे, ‘ बाळमुने ! वर तुला महाकविला
देतों; माग; न आम्हीं कोणीहि कधीं सकाम हाकविला. ’ ॥५३॥
आस्तीक म्हणे, ‘ देवा ! तुमचा महिमा बहूत्तम खरा हो.
जरि वर देतां, द्या हा, न बरा अत्यंत उग्र मख, राहो. ’ ॥५४॥
नृपति म्हणे, ‘ मणि, कांचन धेनु, गज, ग्राम घे; न मख राहो;
देवी सरस्वतीच्या, मजवरि तूं सुप्रसन्न, मखरा ! हो. ’ ॥५५॥
विप्र म्हणे, ‘ मणि, कांचन, धेनु नको, हय नको, नको हस्ती;
ग्राम नको, धाम नको, मख राहो. मातृकुळ असो स्वस्ति. ’ ॥५६॥
ऋत्विक्, सदस्य म्हणती, ‘ राया ! स्तुतिचा मनोज्ञ नवरा हो;
दे वर मुनिला; त्वद्यश साधुवदान्यांत नित्य नव राहो ! ’ ॥५७॥
नृप लोभवीत होता जोंवरि मुनिला अनेकवरदानें,
सांवरिला होता अहि मुनितेजानें प्रपन्नकरदानें. ॥५८॥
मग त्या आस्तीकाला भूप म्हणे. ‘ जरि नको दुजें वस्तु;
‘ त्वत्सत्रमेव विरमतु ’ म्हणसि, तरि तुझेंचि इष्ट तें अस्तु. ’ ॥५९॥
विप्राचें प्रिय करितां, सर्वहि ऋत्विक्, सदस्य, वरदा त्या
म्हणति, ‘ भला ब्रह्मण्या ! सर्वां दात्यांत तूंचि वर दात्या ! ’ ॥६०॥
केलें सत्र समाप्त, क्षितिपतिनें विप्र तर्पिले वित्तें;
गौरविला आस्तीक प्रेमें, मानूनि आत्मभू चित्तें. ॥६१॥
जेणें ‘ विप्रनिमित्तें विघ्नित होईल मख ’ असें भावी
कथिलें होतें, नृ त्या सूतींहि महागुणज्ञता दावी. ॥६२॥
‘ व्हावें सदस्य माझ्या हयमेधीं त्वां महामनुज्ञात्या ! ’
ऐसें आस्तीका नृप विनवुनि, दे जावया अनुज्ञा त्या. ॥६३॥
दुष्कर कर्म करुनि तो मुनि, जावुनि शीघ्र मातुळावासा,
दे हर्ष, घनें दिधल्या दवार्तहर्षासवें तुळावासा. ॥६४॥
जीवनदानें झाला सर्वांसह सुप्रसन्न नागवर
वासुकि, त्या भगिनीच्या पुत्रासि म्हणे, ‘ यथेष्ट माग वर. ’ ॥६५॥
आस्तीक म्हणे, ‘ माझ्या आख्यानीं अर्पितील जे श्रवण,
त्यांसि न लेशहि द्यावें भय, व्हावें सर्वथा तुम्हीं प्रवण. ’ ॥६६॥
पन्नग म्हणति, ‘दिला वर बापा ! त्वच्चरितनामगात्याचा
घात करील अही जो, मूर्धा शतधा उलेल गा ! त्याचा. ’ ॥६७॥
ऐसा आस्तीक मुनि व्याळांचा शाप, मृत्यु, वारूनि.
तप करुनि, वंश ठेउनि, गेला मोक्षासि, भक्त तारूनि. ॥६८॥
सौति म्हणे, ‘ हे शौनकमुनिवर्या ! सुमतिकीर्तिसदनानें
रुरुला असी प्रमतिनें पूर्वी कथिली कथा स्ववदनानें. ’ ॥६९॥