सद्गुण युधिष्ठिराचे सर्वत्र सदैव सर्व पौर वदे,
कीं, ‘ हा आम्हांसि तसा पूर्वीं कोण्हीं न हर्श पौरव दे. ॥१॥
अरिगज विदारुनि रणीं बहु लाजविले द्विपारिज्या तातें,
अर्थिमनोरथ पुरवुनि केलें गतगर्व पारिजातातें. ॥२॥
भूरक्षणभर जेणें भीष्माच्या उतरिला शिरावरिला,
लंघुनि धृतराष्ट्रा जो राज्यश्रीनें स्वयें हिरा वरिला. ॥३॥
त्या पांडुचा युधिष्ठिर सुत कुरुपति; योग्य अर्क राज्यातें
ज्या, त्या न दुजा ग्रह; जें यश अमृतीं येन शर्कराज्या तें. ॥४॥
राज्याभिषेक आम्हीं यास करूं; सुख न या सुखापरतें
सुप्रभु ताट सुधेचें कुप्रभु वांतान्नपूर्ण खापर तें. ’ ॥५॥
पौरस्तुतधर्मगुणश्रवणें दुर्योधनादि खळ मळती.
सद्गीत हरिगुण जसे श्रवणीं सिरतां पिशाच तळमळती. ॥६॥
करिति कुमंत्र सुयोधनदुःशासनकर्णशकुनि हे चवघे,
साधुद्वेषें उग्र व्यसनांत बळें बुडावया अवघे. ॥७॥
दुर्योधन एकांतीं मग गांठी निजपित्यासि भोंडाया.
सुतरूपी दुर्विधि तो इच्छी व्य्सनाननांत कोंदाया. ॥८॥
ऐसें म्हणे पित्याला, “ परिसा विज्ञापना अहो ! तात !
जे लोकशब्द कर्णीं तप्तायःशंकुतुल्य होतात. ॥९॥
‘ धृतराष्ट अंध, राज्यानर्ह; अनघ पांडु आमुचा भर्ता.
तैसाचि युधिष्ठिरही; न पर, घनचि चातकव्यथाहर्ता. ’ ॥१०॥
लोकानुराग ऐसा, त्वांहि दिलें यौवराज्य अहितातें.
निजसुतशतहि बुडविले पोसूनि गृहांत पांच अहि तातें. ॥११॥
‘ कुरुपति ’ असें जनें तूं असतां राष्ट्रांत पांडवा गावें,
आम्हीं सेवकभावें धरुनि करीं चापकांड वागावें. ॥१२॥
परपिंडभक्षणास्तव निजराज्यपदच्युतिस्तव ज्ञाती,
लवतील न प्रजाही, नरकगति बरी, नव्हे अवज्ञा ती. ॥१३॥
दुर्गतिमहापिशाची निजसंतानासि झडपणि न करी,
ऐसा मंत्र जपाव,अ यूथ उपेक्षील धडपणीं न करी. ॥१४॥
‘ कैसें करूं ? ’ असा तूं आधि नरेंद्रा ! धरूं नको लेश.
क्षम अससी ताराया संततिस, क्षितिस जेंवि कोलेश. ॥१५॥
हें वारणावताप्रति दवडावे युक्तिनेंचि देवा ! तें
काम तुझें; नयनीं कण, कुशळ मुखाच्या, उरों न दे, वातें. ॥१६॥
युक्तिलहरीशतें त्वां उडवावीं तीं दयानदा ! यादें;
कां राज्य वृथा देसी ? कोण्हासहि यश दिलें न दायादें. ॥१७॥
आम्हीं स्वपदीं होवूं नीतिबळें बद्धमूळ, मग राया !
करितील काय पांडव ? आलेहि जर्ही फिरोनि नगरा या. ” ॥१८॥
प्रज्ञाचक्षु ह्मणे, ‘ मज हेंचि रुचे कर्म, परि महाखोटें.
भीष्मद्रोणविदुरकृपपौरांचें भय पुढें दिसे मोटें. ॥१९॥
नत लोटितां पदें अपकीर्ति जगीं सह्य न प्रभावज्ञा;
लोका हें न घडेहि, ग्रहवृंदा ग्रहपतिप्रभावज्ञा. ॥२०॥
हरितील अस्मदसुधन, धर्मप्रिय पौर एकसरतील,
पार्थाहितपुढें तुमचे निःशेषहि यत्नभेक सरतील. ’ ॥२१॥
दुर्योधन बोले, ‘ हें भय न धरीं, द्रुणि मजकडे आहे;
गुरुहि मिळेल मलाचि; प्रियपुत्रवियोग कोण हो ! साहे ? ॥२२॥
त्यजिजेल कृपाचार्यें निजसर्वस्वहि सुखें, परि न भाचा;
भीष्महि मध्यस्थ सदा, दंडक याचा जयापरि नभाचा. ॥२३॥
पांडवविवासनातें जर्हि असति समर्थ पौर वाराया.
मीं वश करीन दानें मानें सर्वांसि पौरवा ! राया ! ॥२४॥
आहेत कोश हातीं, लोकांचें रंजवीन मन दानें.
विश्ववशीकरणाचा घ्यावा नलगेचि मंत्र धनदानें. ॥२५॥
हे आह्मीं काय दिवे ? तेजस्वी काय हा रवि ? दुरापें
न दुजीं; परि या कायीं नेईल न कीर्ति हार विदुरापें. ’ ॥२६॥
ऐसें वदोनि, मोही त्यास प्रतिकूळ काल सुतरूपें.
हतभाग्य अशुभचिंतन कां न करी पारिजात - सु - तरूपें ? ॥२७॥
आप्तजनमुखें कळवी ‘ पशुपतिची वारणावतीं यात्रा,
कीं ती सेवावीच प्राज्ञें भवरोगहर महामात्रा. ’ ॥२८॥
विदुरास उमजलें कीं, बुडवाया कीर्ति सुतप दादानें
केला मंत्र, व्यसनीं पाडाया पांडुसुत पदादानें. ॥२९॥
धर्म ह्मणे, ‘ राजा काम जा ह्मणतो वारणावता ? रचितो
कांहीं घात सुयोधन मदांधदिग्वारणावतारचि तो ? ’ ॥३०॥
पांडवहि ह्मणति, ‘ पाहूं वाहूं वंदूनि शंकरा बेल.
राबति सुर भजनीं, मग कोण न होउनि विशंक राबेल ? ’ ॥३१॥
तें आप्तमुखें कळतां, धृतराष्ट्र ह्मणे तयांसि, ‘ बाळक हो !
जा वारणावता, जरि जाणार तुह्मीं गुरूक्तिपाळक हो ! ॥३२॥
पशुपतिचा यात्रोत्सव आतृप्ति पहा, रहा, वहा रत्नें
देवब्राह्मणचरणीं, धनवस्त्रान्नें जनासि द्या यत्नें. ॥३३॥
तेथें कांहीं काळ स्वर्गीं सुरसे सुखें वसा, मग या;
पितरांचा बहु सुख देत्ये केली आज्ञा जसी, तसी ग गया. ’ ॥३४॥
धर्म ह्मणे, ‘ बहु बरवें, ताता ! हा तारक त्वदुपदेश.
झाला गुरुवाक्यादृत पूरु महात्मा स्वयें यदुपदेश. ’ ॥३५॥
‘ पशुपतिपाद पहाया पाहूं तें वारणावत नरा ! जे
आपण होतात, करुनि संकटविनिवारणा वतन, राजे. ’ ॥३६॥
जाणार पांडुसुत तों खळ दुर्योधन पुरोचना यवना
आधींच पुढें धाडी, करवाया प्राणनाशका भवना. ॥३७॥
सानुज युधिष्ठिर निघे मग जाया वारणावता, राजा
आलिंगूनि ह्मणे त्या भूभारनिवारणावतारा ‘ जा. ’ ॥३८॥
भीष्मादिगुरुजनातें नमुनि ह्मणे, ‘ अढळ आप्तता रहो,
व्हा विरहाब्धींत मला सेतु तुह्मीं सर्व आप्त तारा हो ! ’ ॥३९॥
कुंती - सहित निघाले पांडव, तेव्हां तयांसि पाहोनि,
विप्रादि पुरस्थ ह्मणति, ‘ आह्मां सुख काय येथ राहोनि ? ॥४०॥
अंध परि धूर्त; लोकीं, नाहीं दुसरा असा धुतारा या.
आह्माम बुडवाया क्षम होय, नव्हे हा असाधु ताराया. ॥४१॥
आंतहि अंधचि; गारा वेंचुनि टाकील कां कवि हिर्यांतें ?
गंगा टाकुनि जाइल अज्ञचि, जळ ज्यांत टांक, विहिर्यांतें. ॥४२॥
देवा ! विश्वपते ! या पांडुनृपसुतांसि पाव; कपटानें
खळचि बुडावे, व्हावें भस्मचि, बांधोनि पावक पटानें. ॥४३॥
जरि केंडिला तर्हि हिरा, स्तविलाहि शिरीं चढे न शिरगोळा.
तो हारवील निजशिर, जो खळ करणार साधुशिर गोळा. ’ ॥४४॥
धर्म म्हणे, ‘ भवदाशीर्वाद खरे स्वर्द्रुचे सखे, दानें
देतील इच्छिलीं; कां करिजेल मनीं निवास खेदानें ? ’ ॥४५॥
म्लेंच्छांच्या भाषेनें विदुर महात्मा हितोपदेश तदा
धर्मासि करी, त्याच्या धृतिला मतिलाहि ओप दे शतदां. ॥४६॥
‘ कथिलें पुरोचनाला तुमचे अग्नींत काय होमाया;
सावध व्हा. साधूंची स्वार्थपरखळासि काय हो माया ? ॥४७॥
गृह करविलें असे तें दहनौषधमय, तयांत उतरा हो !
दावा विश्वास खळा, कोपविषाचा मनींच उत राहो. ॥४८॥
करिल सुरुंगपथ तुम्हां जाया माझा सखा सुखनक वनीं.
अवनीं तुमच्या मज जें रसिकाच्याहि रसिका सुख न कवनीं. ॥४९॥
तेथुनि रात्रौ ठकवुनि विश्वासें तो चला, भय वनातें
जातां त्यजा; गृहा द्या अग्नि, घडो तोच लाभ यवनातें. ’ ॥५०॥
मृतिहर मंत्र असा तो सन्मतिचा साधु सोयरा शिकवी,
परते, परि पांडुतनयविरहौर्वा होय तोयराशि कवी. ॥५१॥
कुंती पुत्रासि म्हणे, ‘ वदला तुजसीं रहस्य काय कवी ? ’
धर्म तिला संक्षेपें विदुरोक्तांतील सार आयकवी. ॥५२॥
मग वारणावतीं नृप घनसा, पुरजनहि होय चातकसा.
म्हणति भले, तरिच नसे येथ, न लाजेल पारिजात कस ? ॥५३॥
स्तविति नृप पौर, जसे चातक सेऊनि तोय वनदास
स्थापी लाक्षासदनीं, दावुनि बहु भाव, तो यवन दास. ॥५४॥
जातांचि धर्म त्या शतदुष्टांचें कृत्य, मतहि अंधाचें,
भीमादिकांसि कळवी करवुनियां ग्रहण भित्तिगंधाचें. ॥५५॥
‘ सांडुनि हे कण, घेसी पदरीं तनुजा तुषा अगा ! राया !
ते उचित प्रासादा, पांडुतनय जातुषा अगारा या ? ’ ॥५६॥
ऐसें पांडव म्हणती, धृतराष्ट्रा आठवूनि हळहळती.
चिंतामणि हारवि जो तत्सुहृदांची तसीच हळहळ ती. ॥५७॥
म्हणती, ‘ जाणविली या कर्में निज नरकनिष्ठता तातें;
साक्षात् ‘ धर्म ’ म्हणावें, न म्हणावें ‘ नर ’ कनिष्ठतातातें. ’ ॥५८॥
करुनि दृढ मंत्र मनही, होते विश्वस्तसेचि त्या भवनीं.
यवनीं दयाचि दाविति, पाहति मृगयामिषेंचि मार्ग वनीं. ॥५९॥
भेटे विश्वासनिधि स्नेहार्थी विदुरसचिव तो खनक.
धर्म म्हणे, ‘ संरक्षीं आम्हां तूं रक्षितो जसा जनक. ’ ॥६०॥
विवर जतुगृहांत करी कळवी, ‘ करितों पुरासि खंडकसें.
जाणेल विदुर मंत्रित तें तो सज्जनवधेच्छु मंद कसें ? ’ ॥६१॥
बिळमार्ग सिद्ध होतां धर्म म्हणे स्वानुज्यांसि, ‘ हा यवन,
सा जीव अन्य घालुनि करुनि स्वकरें प्रदीप्त हें भवन, ॥६२॥
रात्रौ पळों; न काहीं विप्राराधनमखा विलंब करा. ’
बकराजसा जपे. परि ठकिला खळ, काय हरिपुढें बकरा ? ॥६३॥
कुंतीचें व्रत कांहीं, व्हावी तत्सांगता असें छद्म
करुनि, ब्राह्मणभोजन केलें, जैं जाळणार तें सद्म. ॥६४॥
पौरवधू आणविल्या, न्हाणविल्या, गौरवूनि लेवविल्या;
देवविल्या सदलंकृति, सूर्यास्तावधि समस्त जेवविल्या. ॥६५॥
अन्नार्थी जे आले त्यांसि म्हणे धर्मराज, ‘ जेवा, या. ’
तों आली पंचसुता एक निषादी हि तेथ जेवाया. ॥६६॥
जेउनि यथेष्ट पुत्रांसह मद्यहि सेविलें निषादीनें.
काळे आदर दावुनि देतां प्यावें न कां विषा दीनें ? ॥६७॥
मद्यें भुले निषादी, पडले तत्सुतहि पासले शवसे.
कोणाच्याही हृदयीं देहस्मृतिचा न वास लेश वसे. ॥६८॥
ज्यासि पृथा भी, जैसी व्याघ्राच्या सावधान गाय वना,
त्या भवना जो राखे, ये नीज अघाचिया नगा यवना. ॥६९॥
‘ विश्वासघात यवना न घडो, हो सुख, न आपदा सांस. ’
ऐसें विचारितां, तें साधूंच्या काय पाप दासांस ? ॥७०॥
विवरीं शिरले, भवनद्वारीं लावूनि वीतिहोत्रा ते.
पळतां वनांत तिमिरीं, बहु भीतांचे हि भीति हो ! त्राते. ॥७१॥
वाहे पृथेसि पृष्ठीं, हस्तीं धरि भीम अग्रजा, अनुजा,
यमळांसि कडेवरि घे, तोचि गमे म्हणति ‘ अंजनाजनु ’ ज्या. ॥७२॥
तेज न साहति त्याचें गहनीं व्याघ्रादि काननौके तें.
दे लाज विमानातें, मग दे तो भीम कां न नौकेतें ? ॥७३॥
सत्संगें लाजेला, भीमबळें तेंवि तूर्ण अटवीला
तरले मुमुक्षुसे ते, तो खळ षड्वर्गसाचि फटवीला. ॥७४॥
विदुराप्तपुरुष भेटे, दावी सांगोनि नाम नावेला.
ते म्हणति, ‘ कळे बाला, देवांच्या जेविं कामना वेला. ’ ॥७५॥
विदुरप्रेषिततरिनें तरले गंगेसि ते सुखें क्षिप्र.
हरिदत्तविरक्तिबळें तरति महासिद्धिला जसे विप्र. ॥७६॥