जाय भरद्वाज मुनी गंगाद्वारीं करावया स्नान,
होय घृताची - दर्शन तेथें, तों तेंचि लागलें ध्यान. ॥१॥
सौंदर्यगुणोत्कर्षें फारचि शोभे, जसी रति, घृताची.
तद्रूपें हृदयाची होय जसी, पावकें गति घृताची. ॥२॥
पावे कामविकारें तत्काळ अमोघ रेत जें पतन.
द्रोणकलशमखपात्रीं मुनिनें तें तेज ठेविलें जतन. ॥३॥
स्वात्युदकें शुक्तिपुटीं होताहे जन्म जेंवि मोत्याचें,
मुनिवीर्यें मखपात्रीं मुनिजन्म, ‘ द्रोण ’ नाम हो त्याचें. ॥४॥
पढला सांग श्रुति तो निजपितृशिष्याग्निवेशमुनिजवळी.
अग्न्यस्त्रासि सिके, जें रिपुसि, कळिसि रामनामसें, कवळी. ॥५॥
मित्र भरद्वाजाचें पृषत नृप जसें, तदात्मज द्रुपद
द्रोणाचें, अध्ययनीं गुरुचें आराधितां सुरद्रुपद. ॥६॥
जाय भरद्वाजमुनि स्वर्गातें, पृषतही; मग प्राज्य
उत्तरपांचाळांचें द्रुपद करी धर्मनीतिनें राज्य. ॥७॥
तप करितां पितरांची आज्ञा झाली म्हणोनि तो द्रोण
विधिनें वरी कृतीतें; न करील गुरूक्त जाणता कोण ? ॥८॥
प्रसवे कृपी सुतातें; शब्द करी उपजतां तयापरि तो
उच्चैःश्रवा सुरांचा हय हेषेतें जयापरी करितो. ॥९॥
‘ अश्वत्थामा ’ ऐसें नाम तया ठेविलें; असें झालें
त्यावरि, त्या द्रोणाच्या कर्णाप्रति परशुरामयश आलें, ॥१०॥
कीं, ‘ तो यथेष्ट देतो सद्विप्रांकारणें स्वधन कांहीं
दैन्य उरों देत नसे संप्रति, बहुमूल्य रत्नकनकांहीं. ॥११॥
दिव्यास्त्रांचा ज्ञाता मूर्तधनुर्वेद नीतिशास्त्रज्ञ,
जेणें अगणित केले स्वभुजबळें सांग रणमहायज्ञ. ’ ॥१२॥
ऐसें परिसुनि जाय, द्रोण महेंद्राचळीं तया भेटे.
ज्याचे विशिख क्षत्रीं, व्याघ्रीचे अविकुळीं जसे पेटे. ॥१३॥
सांगोनि नाम गोत्र, प्रांजळि, वंदूनि तत्पदें, राहे.
वाग्युद्धदानशूर प्रभु राम द्रोणमुनिकडे पाहे. ॥१४॥
सर्वस्वें प्रिय पोष्य ब्राह्मण ज्या अद्भुतप्रभा वपुसे.
‘ वद इच्छा काय ’ असें द्रोणाला तो महाप्रभाव पुसे. ॥१५॥
तो भारद्वाज म्हणे, ‘ इच्छितसें मीं अनंत धन, दात्या !
व्हावी तुझ्या प्रसादें तुज - मज पाहोनि लाज धनदा त्या. ’ ॥१६॥
राम म्हणे, ‘ विप्रजना दिधलें सर्वस्व, कश्यप अवनी.
अस्त्रें, शरीर आहे; अन्य किमपि राहिलें नसें भवनीं. ॥१७॥
यांत तुला सत्पात्रा ! द्यावें म्यां काय बोल आशु कसा. ’
‘ द्या दिव्यास्त्रेंचि ’ असें द्रोण - द्विज मंजु बोलिला शुकसा. ॥१८॥
अस्त्रें समग्र दिधलीं; सरहस्यव्रत दिला धनुर्वेद.
केला स्वरूपचि परि छात्रें भक्त्यर्थ उरविला भेद. ॥१९॥