मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय पंचविसावा

आदिपर्व - अध्याय पंचविसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


दिव्यास्त्रमानुषास्त्रें पार्थां शिष्यांसि पढवितां यश तें
ऐकुनि, राजसुतांचीं त्या गुरुचे वरिति भव्य पाय, शतें. ॥१॥
गुरुच्या प्रसादपदवीप्रति शिक्षोत्कर्ष साधुनीं चढतां,
दुर्योधनसख कर्ण स्पर्धा पार्थांसवें करी पढतां. ॥२॥
श्रीगुरु एका समयीं सूक्ष्ममुख कमंडलु स्वशिष्यकरीं
उदक भरुनि आणाया दे; पुत्रासहि म्हणे ‘ तसेंचि करीं. ’ ॥३॥
जळ आणाया गुरुनें पुत्राच्याही करीं दिला, पर तो
विस्तीर्णमुख कमंडलु होता, कीं शीघ्र एक हा परतो. ॥४॥
उपदेशावें कांहीं पुत्रासि रहस्य, न कळतां अन्यां,
केली युक्ति असी कीं, द्यावें भक्ता विचक्षणा धन्या. ॥५॥
ऐसें गभीरतर, जें स्वगुरुमनोगत अगम्य तर्कशतें,
जाणे अर्जुनमन; कीं, लवहि न गुरुचरणविरहकर्कश तें. ॥६॥
तत्काळ वारुणास्त्रें भरुनि स्वकमंडलूंत तो पाणी,
गुरुला गुरुपुत्रासह जोडी तद्दास्यकृतिकृती पाणी. ॥७॥
याहि शहाणपणें तो अर्जुन गुरुच्या मनांत शिरला, हो !
ऐशा गुरुप्रियांचें पदरज एकहि कुळांत शिर लाहो. ॥८॥
कथिली रहस्यविद्या दोघांसहि; अधिक काय संतानें ?
संतानें पुरवावी संश्रितवांछा तसीच संतानें. ॥९॥
त्या अर्जुनीं कराया, उपदेश करूनि सूपकारातें
सांगे एका समयीं गुरु, पाचारूनि सूपकारातें. ॥१०॥
“ जाईल जरि कदाचिद्दीपक भीमानुजाशनावसरीं,
तरि मागतां म्हणावे, ‘ अन्न न वाढीन या तमप्रसरीं. ॥११॥
ग्रास मुखीं न पडेल, श्रमसील, तमांत जेविसील कसा ? ’
‘ कोणीं कथिलें ’ म्हणतां, वद कीं, ‘ आहेचि लौकिकार्थ असा. ’ ” ॥१२॥
झालें तसेंचि दैवें; दीप कदाचित् प्रभंजनें गेला.
अशन करीतचि होता अर्जुन, तों तर्क तन्मनें केला. ॥१३॥
‘ अत्यभ्यासें जातो, तिळहि न चळतां, मुखींच पाणि तमीं.
होईन शब्दवेधी तिमिरांतहि, हें मनांत आणित मीं. ’ ॥१४॥
तेव्हांपासुनियां तो स्वापसुखाची करूनि कुत्सा, हें
ऐसें मनीं धरुनि, शरसंधान करी तमांत उत्साहें. ॥१५॥
बाणगुणझणत्कारश्रवण करुनि, शयन सोडुनि, द्रोण
चित्तीं म्हणे, ‘ अहो ! शरसंधान तमांत करितसे कोण ? ’ ॥१६॥
पाहे तों, तो अर्जुन आहे एकाग्र बाणसंधानीं;
आलिंगिला भुजानीं, प्रोष्यागत पुत्र जेंवि अंधानीं. ॥१७॥
आचार्य म्हणे, ‘ वत्सा ! स्वयश यमाचाहि नायको दंड,
लोकीं असें करीन, त्वद्धनुला अन्य काय कोदंड ? ॥१८॥
तुजसम दुजा धनुर्धर लोकीं कोठेंहि आढळेनाचि.
करिन असें मीं, मद्वरशब्द ध्रुव होय, हा ढळेनाचि. ’ ॥१९॥
गुरुच्या, सद्वर देतां, आवरिति न हात पादुका, नातें
तैसेंचि तें, समर्पी शिष्यासि महातपा दुकानातें. ॥२०॥
झाला तो गुरुसमचि, प्रथम गुणें जरिहि होय बिंदु, पण
दुग्धाब्धिपरिष्वंगीं त्याचें राहेल तोयबिंदुपण ? ॥२१॥
कोणीएक निषाद क्षितिपति होता सुवर्णधनु नामें.
तत्पुत्र एकलव्य द्रोणाप्रति ये धनुर्निगमकामें. ॥२२॥
सर्वत्र समें सदयें गुरुनें त्या मात्र एकलव्याला
केलें नाहीं, जैसें विधिनें श्रुतिपात्र एकल व्याला. ॥२३॥
गुरुनें आश्रय न दिला, परि तो नैषादि न विटला चित्तीं.
जों जों दुर्लभ तों तों, सस्पृह वितेच्छु होतसे वित्तीं. ॥२४॥
जाउनि वनांत, मृन्मय गुरु करुनि, धरूनि भावसारा धी,
ताराधीशचकोरन्यायें तो साधु त्यासि आराधी. ॥२५॥
पुरवी इष्ट सकळही, न गुरुध्यानप्रभाव नाचारी.
इच्छाफळें, न तैसी कल्पलता, जेंवि भावना चारी. ॥२६॥
जें तो मृन्मय गुरु दे, सत्यहि गुरु दे न अर्जुना फळ तें.
सद्भावचि सद्गुरु पटु धन्य कराया जना, असें कळतें. ॥२७॥
होवुनि सुविद्य कुरुकुळनंदन गेले करावया मृगया.
गुर्वाज्ञा कीं, ‘ सत्वर माघारें बहु न मारितां मृग, या. ’ ॥२८॥
मृगया करितां शिरला शशमृगहननार्थ काननीं कुतरा.
नैषादिप्रति पाहुनि भुंके, जाणों म्हणे ‘ धनू उतरा. ’ ॥२९॥
श्वा बहु भुंके पसरुनि तुंडा मांसास्थिवल्लभा, त्यांत
तों सप्त एकलव्य स्वशर भरी, जेंवि भल्ल भात्यांत. ॥३०॥
पाहुनि पांडव म्हणती, ‘ ज्याचे श्वमुखांत सप्त शर भारी,
आहे कृती असाही, तरि मग कां हो ! नसेल शरभारी ? ॥३१॥
क्षत तिळहि न होतां शर भरिले श्वमुखांत जेंवि भात्यांत,
ऐसा लाघवशिक्षानिधि जो भुज, अतुळ वीर्यभा त्यांत. ’ ॥३२॥
विस्मित होवुनि पांडव शोधुनि भेटॊनि त्या निषादास,
पुसती वृत्त, श्रवणें पावाया दुःसहा विषादास. ॥३३॥
तो निजवृत्त कथी, तों अर्जुनमुख उतरलें विषादानें;
मोहचि पावों पाहे त्या अपकर्षें जसें विषाऽदानें. ॥३४॥
येउनि पुरासि अर्जुन, एकांतीं स्वगुरुला म्हणे, “ गुरुजी !
स्मरती स्ववरोक्ति तुम्हां मत्पंचप्राणपन्नगा ! गुरु जी ? ॥३५॥
‘ होसील तूंचि माझ्या शिष्यांत विशिष्टतर असामान्य;
दुसरा कोण्हीहि जगीं छात्र न होईल तुजअसा मान्य. ’ ॥३६॥
ऐसा वर देउनि, कां मदधिक लोकाधिक स्वशिष्य दुजा
केला निषादपतिसुत ? सत्य असावा जगांत बोल तुजा. ॥३७॥
कौतुक विलोकिलें तें तैसें आम्हीं वनांत हो तात !
शुष्यध्रदमीन तसे, विकळ मनोरथ मनांत होतात. ” ॥३८॥
राहे उगाचि, संकटहर युक्ति बरी मनांत पाहूनीं,
जाय वनांतें गुरु, जो श्रिततापापह अनातपाहूनीं. ॥३९॥
सार्जुन भारद्वाज प्रेक्षाया त्या पदानता पावे,
पाहुनि म्हणे, छळें हे ऐसे नैष्ठिक कदा न तापावे. ॥४०॥
गुरुचरणव्रतनिष्ठा शरमोक्षाभ्यास सारखा यामीं,
ऐसा फार बरा हा; आलों व्हायासि पारखा या मीं. ’ ॥४१॥
ऐसें मनांत बोलत जाय गुरु; तया निषादतनयानें
वंदुनि पूजुनि केलें सर्वस्व निवेदनादि विनयानें. ॥४२॥
द्रोण म्हणे, ‘ तूं माझा जरि शिष्य, दिजे मदीय वेतन, हो !
केवळ विफळचि दावुनि न म्रत्व ऋजुत्व मत्र वेत न हो ’ ॥४३॥
नैषादि म्हणे, ‘ स्वामी ! जें मज सांगाल तें निवेदीन.
प्रकटीकृतगुर्वर्थें शिष्य, जसा बहुदह्नें निवे दीन. ’ ॥४४॥
द्रोण म्हणे, ‘ साधुजनीं कांहीं वेचूनि आंग ठावा हो.
हा दक्षिण पाणि तुझा मच्चरणीं आजि आंगठा वाहो. ’ ॥४५॥
दारुणतर वचन असें परिसे, परि सेक नवसुधेचाचि
भावी, तद्यश सन्मतिचाहि हरी तप, न वसुधेचाचि. ॥४६॥
जों गुरु म्हणे, ‘ मदिष्ट प्रतिपादूनि, स्ववाक्य साच करीं, ’
तोंचि छेदुनि घे तो स्वांगुष्ठ व्याळदष्टसाच करीं. ॥४७॥
साहे छळ आनंदें, वाहे अंगुष्ठ, वरि न तो पाहे,
राहे उगाचि; जाणों, देउनि अत्यल्प लाजला आहे ! ॥४८॥
केली सत्कीर्ति दुणी, झाली संधानशीघ्रताचि उणी.
तो काय घात ? म्हणती कीर्तिविघातासि आत्मघात गुणी. ॥४९॥
शिष्यांतरींहि होतें प्रेम, तदपि फाल्गुनींच एकीं तें.
कवि म्हणति चातकातें घनभक्त जसें, तसें न केकीतें. ॥५०॥
सर्वरहस्यज्ञाता गुरुपुत्र, रथप्रवीण धर्म सदा;
असिधरगुरु यम, म्हणती भीम सुयोधन, ‘ धरील कोण गदा ? ’ ॥५१॥
सर्वत्र जिष्णु गुरुसा, त्या गुरुशिष्यांत एक मात्र उणें;
वृद्धत्व, क्षत्रत्व त्यजुनि पहातां, समान सर्वगुणें. ॥५२॥
हरुनि सकळ तम, जोडा होउनि सर्वार्थभासक रवीला,
गुरुनें एक तरुशिरीं शिष्यपरीक्षार्थ भास करवीला. ॥५३॥
तेव्हां एक उतरला अर्जुन भेदुनि शिरींच भास कसा.
सर्वांत मुख्य पार्थ, ग्रहनक्षत्रांत विश्वभासकसा. ॥५४॥
 द्रोणाच्या जंघेला ग्रासी गंगेंत एकदा याद.
तैं रक्षी जिष्णु; म्हणे गुरु, ‘ माझा हाहि एक दायाद. ’ ॥५५॥
होतें ब्रह्मशिरोस्त्रद्रविण द्रोणें जपोनि सांचविलें,
तें जिष्णुला दिलें कीं, तेणें प्राणात्ययांत वांचविलें. ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP