पांडुसुतांचीं झालीं उपनयनें ते श्रुतिस्मृती पढले.
अल्पवयांतचि पांचहि बंधु महत्वीं हळूहळू चढले. ॥१॥
भीम बळी, त्यापासुनि होती धृतराष्ट्रपुत्र परिभूत.
मंत्रज्ञ सहज पाहे, पावति अत्यंत ताप परि भूत. ॥२॥
ज्या त्या क्रीडेंत मुलें भीमापासूनि पावती भंग.
सन्माणिक्यमणिपुढें गोमेदांचा फिका पडे रंग. ॥३॥
भीमाच्या साहजिकें तेजें ते भंग पावति क्षुद्र.
ऋक्षांत रवि, तसा तो त्यांत महात्मा, पशूंत कीं रुद्र. ॥४॥
चढति फळार्थ नगीं ज्या, तन्मूळीं भीम निजपदें ताडी;
लीळेनें तत्फळदळकुसुमांसह त्यांसि भूतळीं पाडी. ॥५॥
शशिरंकुपुढें कैसे होतील न भग्नगर्व काळविट ?
भीमबळोत्कर्षें ते खळ धरिति मनांत सर्वकाळ विट. ॥६॥
स्पर्धा करूनि साधूं जातां, भलतेंहि काज, वेगमती
न पुरे; तो भीम शशी भासे; ते सर्व काजवे गमती. ॥७॥
मारुतिसिंह वधावा कपटें, तद्बंधु हेहि अवि च्यारी
बांधावे, ऐसें हें योजी दुर्योधनाख्य अविचारी. ॥८॥
जळकेलीचें करवी साहित्य मग प्रमाणकोटींत.
वरि दावि प्रेम असें, कीं प्रेम न तत्प्रमाण कोटींत. ॥९॥
ने पांडवांसि तेथें, बहुत भला भासला, न वंचकसा.
कळलाचि न संसर्गायोग्यचि, तो मूर्तपापपंचकसा. ॥१०॥
गेले प्रमाणकोटिस्थानीं गंगातटीं वरोपवनीं.
तेथ पटगृहीं शोभा केली होती, जसी महाभवनीं. ॥११॥
धृतराष्ट्रपुत्र, पांडव त्या सदुपवनीं, जया जसें इष्ट,
गंगातटपटसदनीं, ते भक्षिति अन्न विविध जें मिष्ट. ॥१२॥
दुर्योधनें विषान्नें वाढविलीं, भीम जेविला भावें.
आदर तसा करी खळ, बहु दिवसां मित्र जेंवि लाभावें. ॥१३॥
‘ इष्टार्थाची निश्चित सिद्धि, ’ म्हणे तो मनांत खळ, ‘ केली. ’
मग ते सूर्यास्तावधि करिति श्रीजान्हवींत जळकेली. ॥१४॥
आले कुमार तीरीं, त्यांत बहु श्रांत भीम; गरळानें
तो व्यापिला, र्ह्द जसा तैलाच्या बिंदुनें सुतरळानें. ॥१५॥
जळकेलींत श्रमला, प्रथमहि सविषान्न जेविला तिपट,
निजला शीत पटगृहीं, तीरीं येतांचि मोहला निपट. ॥१६॥
दुर्योधनें विषाकुळ मारुति केला निबद्ध वल्लीनीं.
पंकजवद्दुर्जातें करिजेतो घात भृंगवल्लीनीं. ॥१७॥
दुर्योधनें बुडविला तो गंगेंत त्यजूनि अनुकंपा.
ऐसें अधं करितां, त्या पापाची पावली न तनु कंपा. ॥१८॥
पाषाणसा बुडाला, खळसंगें घात हा असा घडला.
नागकुमारांवरि तो जावुनि, नागालयांतरीं पडला. ॥१९॥
वरि पडतां डसले ते दैवें तो त्यासि होय हित दंश.
विष उतरलें अहिविषें; उरला नाहींच लेशहि तदंश. ॥२०॥
स्वज्ञानातें पुनरपि पावे तो, जेंवि अंध नेत्रातें;
दैवें तद्बळ त्याला झालें, तोडूनि बंधनें, त्रातें. ॥२१॥
बंधन तोडुनि भीमें डसलें होते तनूसि जे सर्प,
गरुडें जसे, तसे ते दूर उडविले, हरूनियां दर्प. ॥२२॥
नागकुमारमुखें श्रुत होतां आश्चर्यवृत्त तें, राजा
वासुकि पाहों आला, कुंतीचा आर्यकाख्य जो आजा. ॥२३॥
आर्यकनाग प्रेमें भेटे भीमासि, कीं कळे नातें.
आर्यांचें दूरत्वें, नसतां सहवासही, मळेना तें. ॥२४॥
वासुकि म्हणे, ‘ करावें याचें प्रिय काय, आर्यका ! सार.
श्रांताला निववावें, इच्छितसे हेंचि कार्य कासार. ’ ॥२५॥
आर्यक म्हणे, ‘ प्रभो ! प्रिय करिसी जरि सुप्रसन्न चित्तानें,
बहु लाभ काय याला, दिधल्या मणिकांचनादिवित्तानें ? ॥२६॥
आहे सहस्रगजबळ ज्या रसकुंडीं प्रतिष्ठित प्राज्ञा !
जितुका रुचेल तो रस तितुका सेवू, असी दिजे आज्ञा. ’ ॥२७॥
रससेवनार्थ आज्ञा वासुकिची होय, दाविलें कुंड.
सुपरिश्रांतें भीमें त्या रसकुंडासि लाविलें तुंड. ॥२८॥
केलीं एकोच्छ्वासें एक असीं रिक्त आठ रसकुंडें.
पात्रें स्वल्पजळाचीं जैसीं तृषितें गजें निहितशुंडें. ॥२९॥
अंश जगत्प्राणाचा म्हणवुनि रस तो महातपा प्याला.
सुकृत अमित नसतें, तरि लावूं देते न हात पाप्याला. ॥३०॥
एकांतीं सुखशयनीं पांडव निजला पिवूनियां सुरसा.
रूपें गुणें बळें तो सकळाम नागांसि भासला सुरसा. ॥३१॥
इकडे धर्म पृथेला जातांचि गृहीं पुसे, ‘ पुढें आला
भीम ? न येतां दिसला, केला बहु शोध, काय तो झाला ? ’ ॥३२॥
कुंती म्हणे, ‘ अहा ! हा ! दैवा ! हे रीति काय गा ! बरवी ? ’
ती प्रियपुत्रगति जसें तीस, पतिगतिहि तसें न, घाबरवी. ॥३३॥
कुंती विदुरासि म्हणे, ‘ भावोजी ! भीम भेटवा, धुंडा;
तद्रहिता हे संतति न हिता, जैसी विपुष्करा शुंडा. ॥३४॥
दुर्योधन साहेना यासि जसा शिशु कणासि नयनींच्या;
वाटे, वधिला तेणें; अन्यायचि आवडे, न नय, नीच्या. ॥३५॥
विदुर म्हणे ‘ यावरि हें येऊं देवूं नकोचि तोंडास;
रक्षीं शेष, न घे द्विषदहि मौनास्तीकभक्ति तों डास. ॥३६॥
‘ त्वत्सुत दीर्घायु ’ असें जें वाक्य महर्षिचें, न तें विसरें.
होय सदाशीर्वचनें, अमृताच्याही, भलें न तेंवि, सरें. ॥३७॥
येईल शीघ्र कीं तो साध्वाशीर्वादपात्र शिवशील.
निवशील सुतस्पर्शें, चिंतेला न गणरात्र शिवशील. ’ ॥३८॥
करुन समाधान असें गेला विदुर स्वमंदिरा; मग तो
आठ दिन निजोनि उठे; प्राणव्यसनींहि पुण्यवान् जगतो. ॥३९॥
आर्यकमतें अहींद्रें सुखवाया कुंतिकुळपताकेला.
त्या स्थानींच वृकोदर बहु सत्कारूनि पावता केला. ॥४०॥
भीमें माता भ्राते क्षिप्र निवविले, तसे न घनसारें.
तच्चित्तचातकासुख नाशी रसपानवृत्तघन सारें. ॥४१॥
धर्म म्हणे, ‘ दुर्योधनचित्तास प्रेम नित्य नव दावा.
भीष्माविदुरावांचुनि हा अर्थ तुम्हीं परासि न वदावा. ॥४२॥
विश्वास खळीं न बरा, सावध व्हा, भय घडे अनवधानें;
हा राज्यलुब्ध लेशहि लाजेल न गुरु - सुहृज्जन - वधानें. ॥४३॥
पांडव सावध झाले, ल्याले दुर्भेद्य विदुरमतकवचा;
साहित सुदुःसहा ही दुर्योधनकर्णशकुनि - हतकवचा. ॥४४॥