मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय तेरावा

आदिपर्व - अध्याय तेरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


इक्ष्वाकुवंशज महाभिष राजा सांगराजसूयशतें,
हयमेधसहस्रेंही जोडी, दुर्लभ सुरांहि जें, यश तें. ॥१॥
तो नृप झाला स्वर्गीं बहुमान्य सुरांसि, सुकृत साधूनीं,
ब्रह्मसभेंत बसविला होता तत्रत्य सर्व साधूनीं. ॥२॥
विधिदर्शनार्थ गेली ब्रह्मसभेप्रति सरिद्वरा गंगा,
तों तदुरोंचळ उडउनि, मारुत उघडें करी तिच्या अंगा. ॥३॥
सर्व अधोमुख झाले, पाहे नृप तो तसाचि गंगेतें,
जाणे द्रुहिण, महाभिषमन तद्रूपीं क्षणार्ध रंगे, तें. ॥४॥
ब्रह्मा म्हणे, ‘ नृपा ! नरलोकीं जा, घे सुजन्म, थापटुनीं
भुज जिंकिलें न कोण्हीं ज्ञानासिविनाचि मन्मथा पटुनीं. ॥५॥
जाणोनि अहित केवळ, ज्या संत्यजिलेंचि विषयमद्य जनीं,
ते साधु सत्यलोकीं राया ! होताति योग्य मद्यजनीं. ॥६॥
भोगुनि विषय, विटोनि, स्वर्गतिला पावसील विषयमते !
राया ! कळो तुज अमृत अनुग्र, कीं विषय उग्र विष, यम ते. ’ ॥७॥
स्वमनीं म्हणे महाभिष, ‘ आत्मा शुद्ध प्रतीषभूपाचा,
व्हावें तत्सुत, आश्रय योग्य पयोराशिचा न कूपाचा. ’ ॥८॥
परते तेथुनि गंगा, त्याचि नृपातें मनांत रेखूनीं;
मार्गीं पुसे वसूंतें तद्वृत्त तयां सखेद देखूनी. ॥९॥
वसु म्हणति, ‘ वसिष्ठानें नमन न केलें म्हणोनियां, शाप
‘ व्हा योनिसंभव ’ असा दिधला; अत्यंत पावलों ताप. ॥१०॥
तूं देवि ! मानुषी हो, आम्हां त्वत्कुक्षिमाजि जन्म हित,
अन्योदरवास नसो, भगवति ! भवदुदरवास सन्महित. ’ ॥११॥
गंगा पुसे तयाला, ‘ तुमचा होयील कोण हो ! कर्ता ? ’
वसु सांगति, ‘ प्रतीपक्षितिपतिसुत शांतनु क्षमाभर्ता. ’ ॥१२॥
गंगा म्हणे, ‘ करीन प्रिय तुमचें, त्याहि नृपतिचें इष्ट. ’
धर्मयशस्कर जें जें कर्म स्वीकारितीच तेम शिष्ट. ॥१३॥
वसु म्हणती, ‘ जो होइल, तो तो सुत निज जळांत बुडवावा,
त्वां क्षिप्र विप्रसत्तमदत्तास्मच्छापताप उडवावा. ’ ॥१४॥
स्वःसिंधु म्हणे, ‘ वसु हो ! ऐसेंचि असो; परंतु मत्संगा
पावुनि, नृप न निवाला, या पात्र न अपयशासि हो गंगा. ’ ॥१५॥
वसु म्हणति, ‘ सर्व देवूं स्वाष्टमतेजोंश एक सुत राया,
होईल सेतु केवळ नष्टात्मजशोकसिंधु उतराया. ’ ॥१६॥
ऐसा निश्चय केला गंगाद्वारीं मग प्रतीपातें
पाहे गंगा देवी मूर्तिमती पूरुवंशदीपातें. ॥१७॥
नृप जप करीत होता, तों त्याच्या ती हळूचि, निष्पंकीं,
अतिरुचिरांगी गंगा वसली जावूनि दक्षिणीं अंकीं. ॥१८॥
तीतें ‘ कल्याणि ! तुझें प्रिय काय करूं ? ’ असें पुसे राजा,
गंगा म्हणे, ‘ करावा स्वीकार; त्याग न करिजे माजा. ’ ॥१९॥
भूप म्हणे, ‘ हें न घडे; असवर्णा तूं शुभांगि ! परदारा.
मज ठावें, नरकाच्या जातोचि परांगनेच्छु नर दारा. ’ ॥२०॥
गंगा म्हणे, ‘ अनिंद्या, दिय्वा मीं; मत्प्रसंग न विटाळी.
भज मज; येतां असुलभ वस्तु करा, त्यासि कोण कवि टाळी ? ’ ॥२१॥
नृपति म्हणे, ‘ तरि म्हणतों, स्वकरा हा दिव्यलाभ, यावा मीं,
अंकीं जरि कल्याणि ! प्रथमचि तूं बैसतीस या वामीं. ॥२२॥
अंक स्नुषासुतांला दक्षिण योग्य; स्त्रियांसि वाम हित.
सोसून विलंबातें, हो सूनचि; पथ नव्हे नवा महित. ’ ॥२३॥
गंगा म्हणे, ‘ बहु बरें; तुमचा आत्मा कुमार जो भावी,
त्याच्या तरि वामांकीं हे सून यथाभिलाष शोभावी. ॥२४॥
पावेल पति सुगतिला, वर्तेन असेंचि साधु बहुधा मीं;
परि साधु, असाधु, किमपि न म्हणावें; हित करीन बहु धामीं. ॥२५॥
म्हणतां ‘ अवश्य ’ झाली गुप्त सती क्षिप्र ती; परायास
प्राप्त्यर्थ न करितांचि स्वमुखें प्रार्थी प्रतीपरायास. ॥२६॥
पुत्रार्थ यज्ञ केले; आर्जविले अमर, विप्र; ती परते;
त्यापासूनि तपीं, स्त्रीसह, कुळसारसरवि प्रतीप रते. ॥२७॥
पोटासि महाभिष नृप आला, झाला कुमार बहु रुचिर;
बहु वृद्धपणीम फळला विधि, करितां परम उग्र तप सुचिर. ॥२८॥
कुळ शांत जाहलें, तें जन्मुनि विस्तारिलें, म्हणोनि सुता
‘ शांतनु ’ ऐसें ठेवी नृप नाव, यशें दुधाचिया हि उता. ॥२९॥
धन्य प्रतीप राजा; भासे जोडाचि शांतनु रवीतें;
होतें शोकतम मनीं, कीं, झाला वंश शांत, नुरवी तें. ॥३०॥
सुत यौवनस्थ होतां, पूर्वकथा त्यासि भूप तो कानीं
सांगोनि, म्हणे, ‘ तैसी स्वप्नींहि न पाहिलीस लोकानीं. ॥३१॥
भेटेल तुला तनया ! धन्य कराया स्वयेंचि ती महिला;
मजपासीं वर वरिला आहेचि; भजें तिला; दुज्या महिला. ॥३२॥
जें तीं करील, तें त्वां सर्व सहावेंचि; रुक्ष न वदावें;
प्रेम तुटतांचि जाइल, तेंचि करीं तीस नित्य नव दावें. ॥३३॥
हा बाल्हीक अनुज, हें राज्य तुझें घे करीं; करीं अवन;
भवन हित नव्हे आम्हां; हित कुरुकुळजांसि या वयांत वन. ’ ॥३४॥
समजावुनि शांतनुला जाय, जसा ज्येष्ठपुत्र देवापी;
किति राज्य ? दे तपस्या सुख, अमृताचीहि तें न दे वापी. ॥३५॥
बहु महिमा शांतनुचा; स्पर्शे ज्या ज्यासि तो सकारुण्य,
त्या त्या जीर्णांसि पुन्हां तत्काळ प्राप्त होय तारुण्य. ॥३६॥
तो मृगयाशीळ नृपति एकाकी सुरसरित्तटीं धन्वी
होता, तों एकांतीं तेणें दूरूनि देखिली तन्वी. ॥३७॥
सेविति आमरण सदा यतिपति, जे परम शांत, नुसतीतें
निरुपम तनु प्रकटितां कां हो ! न भुलेल शांतनु सतीतें ? ॥३८॥
नृपति म्हणे, ‘ तूं कोण त्रिभुवनसौंदर्यमूर्ति ? रुचिरतमीं
रूपी लुब्ध, चकोरचि झालों त्वन्मुखसुधांशुरुचिरत मीं. ॥३९॥
वद सुदति ! या वनीं कां ? मीं तों भूप प्रतीपसुत धन्वी
भ्रमतों असाचि मृगयाशीळ वनीं; सांग कोण तूं ? तन्वि ! ॥४०॥
वर मागतों तुला, तव शृंगारामृतरसांत मज्जाया;
दे दान हें उदारे ! हो, होवुनि सुप्रसन्न, मज्जाया. ’ ॥४१॥
गंगा स्मित करुनि म्हणे, ‘ राया ! होईन मीं तुझी भार्या;
परि विप्रय न करावें, दूषुनि माझ्या शुभाशुभा कार्या. ॥४२॥
विप्रिय करितांचि नृपा ! जाईन, असें रुचेल तरि, हें मीं
स्त्रीरत्न योग्य अंकीं बसवावें, जेंवि रत्नवर हेमीं. ’ ॥४३॥
तें मान्य करी राजा; तेव्हां दे त्यास दान वपु राणी;
त्या त्यांत रस, जसा मन रसिका दे त्या सदा नव पुराणीं. ॥४४॥
झाले सुत आठ तिला; त्यांत उपजतांचि बुडविले सात;
त्यागभयें नृप साहे, जर्‍हि संततिचा करी असा घात. ॥४५॥
सुत आठवाहि होता, नृप पावे पुत्रशोककष्ट महा;
‘ न करीं कुळघात ’ म्हणे ‘ एक तरि असो कुमार अष्टम हा. ॥४६॥
त्वां न सुत, पति बुडविला, झालों सुतशोकपावकीं तप्त;
यासहि बुडविसि काय ? क्रूरे ! ते बुडविले जसे सप्त. ’ ॥४७॥
देवी म्हणे, ‘ नृपा ! तुज पुत्र प्रिय; मीं नव्हें प्रिया, युक्त;
हा सुत घे; जात्यें; त्वां विप्रिय केलें; न रक्षिलें उक्त. ॥४८॥
विप्रिय करूनि माझें, त्वां मत्सहवाससमय संपविला. ’
ऐसें वदोनि गंगादेवीनें तो नृपाळ कंपविला. ॥४९॥
मग कथिलें, ‘ मीं गंगा; सुत हे वसु; आपवें दिला शाप.
केले विमुक्त, नाहीं केलें, त्वत्सुत वधूनि, म्यां पाप. ’ ॥५०॥
वसुशापाचें कारण पुसतां, गंगा म्हणे, ‘ असें झालें,
एका वसुच्या चित्तीं स्वस्त्रीचें दुष्ट बोलणें आलें. ॥५१॥
हरिली वसिष्ठमुनिची धेनु श्रीनंदिनी स्वबळदर्पें,
मग शापिलें; डसावें पुच्छ तुडवितां पदें जसें सर्पें. ॥५२॥
‘ जन्मा मनुष्यलोकीं ’ ऐसा सर्वांसि शाप त्यांत नृपा !
‘ सत्वर सुटाल जन्मुनि, ’ असि केली, कवळितांचि पाय, कृपा. ॥५३॥
जेणें केलें मुनिचें धेनुहरण, तो द्युसंज्ञ हा; याला
ऋषिचा वरप्रसाद, प्रणति करुनि विनवितां, असा झाला. ॥५४॥
राहेल हा द्युनासा नरलोकीं बहुत काळ; परि हार
होईल सज्जनांचा; प्रणतार्तीचा करील परिहार. ॥५५॥
शास्त्रनिपुण, धर्मात्मा, पितृभक्त, ब्रह्मचर्यपर, महित
होइल लोकीं, जोडुनि कीर्ति; कुळाचें करील परम हित. ॥५६॥
नेत्यें शिशुला; मग हा येईल; त्यजिल न वसु धामातें;
बहु भुलविला पति, म्हणुनि हे देवूं शाप न वसुधा मातें. ’ ॥५७॥
दयिता गेल्यावरि, तो हास्तिनपुरनाथ शांतनु प्राज्य
क्रतु - दान - धर्म साधी; श्रीरामासारिखें करी राज्य. ॥५८॥
वेदानें कथिलीं तीं करि कर्में, ब्राह्मणांसि दे दानें.
वर्षें छत्तीस नृपति कंठी गंगावियोगखेदानें. ॥५९॥
गंगातटासि मृगयाव्यासंगें जाय एकदा भूप.
तों स्तब्ध, अल्पहि दिसे तोय; म्हणे, ‘ कां इचें असें रूप ? ’ ॥६०॥
भूप म्हणे, ‘ जाणवला प्रियविरहक्लेषहेतु दुष्करसा.
गंगाहि मद्वियोगें झाली मत्तुल्य काय शुष्करसा ? ’ ॥६१॥
करुनि विचार पाहतां सर्वत्र, कुमार पटु धनुष्पाणी
दिसला; यत्कृतमार्गणसेतुस्तव तें तसें दिसे पाणी. ॥६२॥
झाला अदृश्य सत्वर दिव्याकृति जेधवां कुमारमणी,
सुत आठवुनि नृपें ती विनविलि, जसि शंकरें उमा रमणी. ॥६३॥
दुर्लभ दर्शन, तनयहि द्याया, ती आपणासि तरुनि, करें
सुत धरुनि ये, जिचें यश गावें संतानकादितरुनिकरें. ॥६४॥
आली निववायाला सहसा देवी जसी नवसुधा हो !
दर्शन होतांचि, दिसों सहसा दे, वीजसी न वसुधा हो ! ॥६५॥
गंगा म्हणे, ‘ अहो जी ! तुमचा हा पुत्र आठवा, याला
न्या स्वगृहीं, मज समयीं, यातें पाहूनि आठवायाला. ॥६६॥
हा शिष्य वसिष्ठासीं, भृगुरामासींहि सम, न वेदांत,
शास्त्रांत उणा, आधीं या आले वेद, मग नवे दांत. ॥६७॥
गुरुशुक्रनीतिशास्त्रीं पटु, भेटपति शक्रसम, रवि खरा या
लाजेल कीं कुशळ हा, बहु शरकर, करुनि समर विखराया. ॥६८॥
म्यां ‘ देवव्रत ’ ऐसें याचें अन्वर्थ ठेविलें नाम.
ने पुत्ररत्न, शोभो येणें कुळदीपकें तुझें धाम. ’ ॥६९॥
देवुनि सुतरत्न करीं, घेउनि पतिचित्तवित्त ती गेली.
नेत्रोदकें तिघांच्या गंगा गंगातटीं नवी केली. ॥७०॥
पुत्रासि पुरीं नेवुनि, शांतनु दे यौवराज्यपद त्यातें.
सामात्य पौर झाले वश त्या प्रियपथ्यसत्यवदत्यातें. ॥७१॥
सत्पुत्रें सर्व भर स्वशिरीं घेतां, प्रतीपसुत हर्षें
नेता झाला घटिका च्यार तसीं च्यार त्याउपरि वर्षें. ॥७२॥
यमुनातीरवनीं तो गेला होता सुभूषित, सुवासा;
तेथें नृपासि मारुत भेटे न्हावूनि, आणुनि सुवासा. ॥७३॥
सत्यवतीनिकट नृपा नेलें गंधें तदंगसंभूतें,
जैसें तपोयशें मन वेधूनि उमासमीप शंभूतें. ॥७४॥
चेतोहरगंधाढ्या ती म्हणतों दिव्य पद्मकळिका मीं;
घेउनि सुवास धांवत गेला जो रसिक तोहि अळि कामीं. ॥७५॥
यमुनातीरीं कन्या सत्यवती सुतनु देखिली भूपें.
गमली ती भूमिगता साक्षाद्देवीच अद्भुतें रूपें. ॥७६॥
पुसतां सांगे कन्यारत्न न वदवे त्रपाभरें तरि तें;
‘ धर्मार्थ वाहत्यें पितृवचनें, मीं दाशपतिसुता तरितें. ’ ॥७७॥
चित्तीं म्हणे नृप, ‘ अहा ! चवरीची झाडणीच कीं केली !
मोळिविक्यानें काष्ठें फोडाया असिलता वना नेली ! ’ ॥७८॥
भरली मनांत नवरी, मागाया दाशपतिकडे गेला,
मग त्यास स्वमनींचा अर्थ श्रुत आपुल्या मुखें केला. ॥७९॥
दाशपति म्हणे, ‘ आहें जातीनें मीं, नव्हें नवा, हीन.
द्यायाचीच सुता, वररत्नपदीं तीस कां न वाहीन ? ॥८०॥
परि आहे मचित्तीं, तो राया ! एक काम पुरवा हो !
सद्वरलाभसुखामृतपूरीं माझें प्रकाम पुर वाहो. ’ ॥८१॥
‘ वद काम, देय देवूं, ’ भूप म्हणे; दाशपति वदे वाचा,
‘ तुजमागें नृप हो, जो होईल इला कुमार देवाचा. ’ ॥८२॥
स्मरहत जरि नृप निर्मळ जें मेळविलें मळों न दे यश तें;
गेला पुरासि; कीं तो न सुता देइल वळोन देयशतें. ॥८३॥
भूप म्हणे, ‘ हा करितो युग, न धरुनि भीड, काम यामातें.
सुखवील तीच मात्रा, नाशुनि हृत्पीडकामया, मातें. ’ ॥८४॥
गांगेय पित्यासि पुसे, ‘ दिसतां कृश, हरिण; काय हो तात !
कारण ? चिंतारोगें जन ऐसे क्षीणकाय होतात. ॥८५॥
चिंता काय तया तुज, धरुनि शिरीं सर्व भूप पादरज्या,
भावें उपासिती, सुर शक्रासि तसे, सदैव सादर ज्या. ॥८६॥
व्याधि कळों द्या; त्याची क्षिप्र करीन प्रतिक्रिया देवा !
अस्वस्थ सर्व झाले, तुमची, स्वर्वल्लि, ज्यां जनां, सेवा. ’ ॥८७॥
राय म्हणे, काय वदों ? वत्सा ! देवव्रता ! तुज पहातों
तेव्हांचि पावतों तट; चिंतापूरीं सदैव हि वहातों ॥८८॥
एक अपत्य जया, तो अनपत्यचि; त्यांत नित्य तूं शस्त्री;
लोकहि अनित्य वाटे, करिजे रक्षावया स्ववंश स्त्री. ॥८९॥
जें पूर्वजीं मिळविलें, करिशिल वाढवुनि तूं जतन यश तें.
तूं स्वसमचि बा ! घ्यावें कुशळें एका हि तूज तनयशतें. ॥९०॥
काळप्रवाह दारुः; नेणों होईल चळन सेतूतें;
हें दुःखाचें कारण गांगेया ! पाठिबळ नसे तूतें. ’ ॥९१॥
पितृवचन श्रवण करुनि, देवव्रत पितृसखा अमात्यातें
गुरुचिंताहेतु पुसे; तो सांगे सर्व सत्तमा त्या तें. ॥९२॥
वृद्धामात्यें कथितां, तातप्रिय दाशपतिकडे तूर्ण
सार्य नदीसुत गेला, कार्य पित्याचें करावया पूर्ण. ॥९३॥
लंघी, जेंवि गयेच्या, बुध, तो गुरुचित्तरंजनाश, पथा.
दाशवरोक्त शिरीं घे; करि तत्संदेहभंजना शपथा. ॥९४॥
पुनरपि दाशपति म्हणे, ‘ त्वदपत्याचें परंतु भय वाटे;
कीं राज्यलोभ दारुण; या ग्रीष्मीं स्नेहनीतिनद आटे. ’ ॥९५॥
गांगेय म्हणे, ‘ त्यजिला स्त्रीसंग; ’ सशंक दाशवर ज्यांत;
‘ अनृत वदेन तरि गळो हें, न रणमखीं कदा, शव रज्यांत. ’ ॥९६॥
करितां असी प्रतिज्ञा, दशपति म्हणे, ‘ दिली सुता साधो !
या धर्में त्वच्चिंतित सर्वहि पितृभक्तसंस्तुता ! साधो. ’ ॥९७॥
त्या समयीं ऋषिसुरगण करुनि कुसुमवृष्टि म्हणति, ‘ हा भीष्म;
हा विषयवासनासरिदंतकतेजाचि केवळ ग्रीष्म. ’ ॥९८॥
तो सत्यवतीस म्हणे, ‘ चाल; असो तातचित्त महि, माते !
वर्णिति पहा नभीं ऋषिदेव तुझा अतुळभाग्यमहिमा ते. ’ ॥९९॥
दिधली सुदुर्लभा त्या सत्पुत्रें त्या पित्यासि सत्यवती.
‘ स्वच्छंदमृत्यु हो ’ असि आशी तातेंहि त्यासि सत्यवती. ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP