मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय अठ्ठाविसावा

आदिपर्व - अध्याय अठ्ठाविसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


सद्गुणसिंधु युधिष्ठिर धृतराष्ट्रें यौवराज्यभाक् केला;
वरिला श्रीनें देउनि घेउनिहि गळां पडोनि भाकेला. ॥१॥
जे पांडुला न वठले ते केले करद जिष्णुनें स्वारी.
भीमानेंही केली तसि जसि विजयार्थ विष्णुनें स्वारी. ॥२॥
म्हणती गजपुरवासी ‘ यांच्या लुटिला धनेश कटकांहीं.
आलें नव्हतेचि असे मागें भरिले धनें शकट कांहीं. ’ ॥३॥
वृद्धीस पांडुसंतति बहु पावे, जेवि वन्हिची कणिका.
स्वसुतहितोपाय पुसे अंघ नृपति नयविशारदा कणिका. ॥४॥
धृतराष्ट्रासि रुचेसी सांगे अत्युग्र नीति तो कणिक.
वणिक ग्राहकहस्तीं देतो विषसर्पिशर्कराकणिक. ॥५॥
‘ राज्यार्थ शत्रुवध हा पुरुषार्थ ’ असेंचि बोलिला कणिक.
तत्कथित जंबुककथा मात्र कथिन कौतुकें न मीं अणिक. ॥६॥
“ कोठें व्याघ्र, वृक, नकुळ, जंबुक, मूषक सखे वनीं होते;
बहु जपलेम परि एका मृगकुळपतिला न पावले हो ! ते. ॥७॥
जपति जसे पाडाया व्यसनीं सुजनासि सर्वकाळ विट,
तेहि तसेचि; परि करी विफळचि तद्यत्न सर्व काळविट. ॥८॥
चिंता करितां जंबुक त्यांस म्हणे, ‘ आचराल जरि सारे,
सांगेन सुयुक्ति, तुम्हीं स्वेष्टफलप्रद मदुक्ति परिसा रे ! ॥९॥
या आखुनें करावा क्षतखुर जेव्हां असेल तो सुप्त,
व्याघ्रें मग मारावा मृगवर, परि मंत्र हा करा गुप्त. ’ ॥१०॥
करितां तसेंचि, कोल्हा त्यांसि म्हणे, ‘ स्नान करुनि या खाया,
तोंवरि सावध बसतों येथें मीं या मृगासि राखाया. ’ ॥११॥
तो स्वार्थपंडित असें सांगे तें, जेंवि अंबु कमळांला,
त्यांच्या मनां रुचे, दे न दिसों कपटींद्र जंबुक मळाला. ॥१२॥
न्हाउनि येउनि, पाहुनि दीन, पुसे व्याघ्र, ‘ वद, नवा घाला
पडलासा कां दिससी ? ’ सांगे तो म्लानवदन वाघाला. ॥१३॥
फेरु म्हणे, ‘ परिसावें वदला जें किमपि आखु खोटा तें, ’
‘ धिग् व्याघ्रातें ! माझ्या सामर्थ्यें भरिल आजि पोटातें. ’ ॥१४॥
व्याघ्र म्हणे, ‘ हें नलगे, घालिन मृग - यूथपीं नवा घाला,
देईल या भुजांचें बळ फळ याहूनि पीन वाघाला. ’ ॥१५॥
गेला तो तेजस्वी अभिमानी व्याघ्र भक्ष्य सोडूनि,
तों आला आखु, तया फेरु म्हणे साधुभाव जोडूनीं, ॥१६॥
“ वदला, व्याघ्रामिष विष; तुज खाऊं दे, ’ असेंचि मुंगस; ‘ खा ’
ऐसें कसें म्हणों मीं ? लघु परि तूं मेरुहूनि तुंग सखा. ” ॥१७॥
हें ऐकतांचि वंचकवचन, शरण जाय तो बिळाला हो !
चित्तीं म्हणे, ‘ न मेलों, हाचि महालाभ मज मिळाला हो ! ’ ॥१८॥
वृकही आला त्याला फेरु म्हणे, ‘ मज मृगासि रक्षाया
ठेउनि गेला व्याघ्र; स्त्रीसह येणार सर्व भक्षाया. ॥१९॥
वांच, मरसि कां लोभें ? मांसाशा शीघ्र सांड, गा ! जा गा ! ’
हें ऐकतांचि निसटे, झाला तत्काळ लांडगा जावा. ॥२०॥
मग मुंगसासहि म्हणे, ‘ आखु, वृक, व्याघ्ररायही, नकुळा !
म्यां जिंकोनि पळविले, तेथें तुज लाभ काय हीनकुळा ? ॥२१॥
युद्धीं न भंगितां मज कोण मृगाला शिवे कवळ खाया ?
मीं श्वापदवर आहें, परि तुज नाहीं विवेक वळखाया. ’ ॥२२॥
नकुळ म्हणे, ‘ आखु, वृक, व्याघ्रहि जिंकोनि पळविले जेणें
तेणेंसीं न झगडणें, येणेंचि भलें, न या मृतें एणें. ’ ॥२३॥
ऐसे मंत्रबळें वृकनकुळव्याघ्राखु मोहुनीं चवघे,
जंबुक निर्भयचित्तें मृगमांसाची वनीं सुखें चव घे. ॥२४॥
ऐसेंचि कृतप्रज्ञें साधावें आत्मकार्य नैपुण्यें.
अघशमनार्थ करावीं, होईल स्वार्थसिद्धि तैं, पुण्यें. ” ॥२५॥
विस्तरभयास्तव कणिकनीत्यंतर्गत कथाचि असि कांहीं
लिहिली; ईच्या श्रवणी आदर करिजेल साधुरसिकांहीं. ॥२६॥
पांडुसुतोच्छेदेच्छा येतां बुद्धींत, नीति कणिकाची
भेटे, व्यभिचारेच्छा धरितां जसि कामिनीस गणिका चि. ॥२७॥
परि जाणे द्रोणविदुरभीष्मकृपव्याळसन्निधानातें,
बहु भी अंध खणाया त्या पांडुकुमारसन्निधानातें. ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP