आदिपर्व - अध्याय बाविसावा
मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.
गौतमपुत्र शरद्वान् चापश्रुतिनिष्ठ जो स्वभावानें,
पूर्वीं वज्री भ्याला त्याच्या दारुणतपः प्रभावानें. ॥१॥
पाठविली सुरकन्या जानपदी स्वस्तडागनक्रानें,
त्याच्या उग्र तपाला विघ्न करावा म्हणूनि शक्रानें. ॥२॥
तो बाणधनुष्पाणी मुनि जानपदी - कटाक्षरपातें,
वातें तरुसा कांपे; धैर्य मनें, चाप सोडिलें हातें. ॥३॥
प्रथम सशर चाप गळे, त्यावरि तद्वीर्यही गळे क्षिप्र.
होतां विघ्न, स्वाश्रम सोडुनियां जाय तो महाविप्र. ॥४॥
मुनिवीर्य शरस्तंबीं पडतां होय द्विधा सुता - स्तु तें.
गर्भाशयीं न वसतां दिव्याकृतिलाभ सत्कृतें सुरतें. ॥५॥
मृगयागत शंतनुच्या तें मिथुन चमूचरें अरण्यांत
अवलोकिलें मुनीच्या स्थानांत, ख्यात जें शरण्यांत. ॥६॥
दर्भासन - कृष्णाजिन - वल्कल - शर - चाप - साहचर्यानें,
तें मुन्यपत्ययुग हें निश्चित केलें सुबुद्धिवर्यानें. ॥७॥
भेटविलें शंतनुला, तेणें मुनिवीर्यजात जाणोनि
परिपाळिलें ‘ कृप ’ ‘ कृपी ’ नामें ठेउनि गृहासि आणोनि. ॥८॥
येउनि निजाश्रमातें तोहि शरद्वान् महामुनि ज्ञानी,
जाणे शंतनुसदनीं स्वापत्यांच्या स्थितिप्रति ध्यानीं. ॥९॥
भेटोनि कृपसुताला तो स्वधनुर्वेददाय दे तात.
पुत्रांसि जोडिलें धन, जेंवि सुखें बाप माय देतात. ॥१०॥
गुरुच्या अनुग्रहें कृप अभ्यासें फार न पडतां खेदीं,
परमाचार्यत्वातें पावे तो स्वच्छधी धनुर्वेदीं. ॥११॥
भीष्में कौरव पांडव शिष्यत्वें त्यासि अर्पिले विधिनें.
ते बाळ धनुर्वेदीं सर्व पढविले कृपें कृपानिधिनें. ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 14, 2016
TOP