विदुर म्हणे, ‘ राज्याची ! कौरव उदयासि पावले जाणा, ’
धृतराष्ट्र म्हणे, ‘ कृष्णेसह मन्नमना सुयोधना आणा. ’ ॥१॥
क्षत्ता म्हणे, ‘ नृपाळा ! नमना आतां चि आणितों, पण ती
पांडवभार्या कृष्णा आहे निजपितृपुरीं, असें म्हणती. ’ ॥२॥
अंध म्हणे, ‘ गा ! विदुरा ! झालें हें वृत्त अमृत कानांतें.
जें द्रुपदासीं घडलें तें न यशस्कर गमेल कां नांतें ? ॥३॥
यांच्या त्यांच्या ठाईं समता ममता न तातता दुसरी,
तत्सुख मत्सुख, हे तनु होत चि होती तदाधिनें उसरी. ’ ॥४॥
विदुर म्हणे, ‘ गा ! बापा ! बुद्धि असावी असी च आर्या;
या लोकीं परलोकीं संपत्तीहूनि हे चि कार्याची. ॥५॥
नसतां विदुर, सुयोधन धृतराष्ट्राला म्हणे, ‘ अहो ! तात !
मज बहु दुःखद तुमचे आतांचे मंत्रवर्ण होतात. ॥६॥
करिसि सपत्नगुणस्तुति; मानिसि रिपुवृद्धिला स्ववृद्धि नृपा !
व्यर्थ अपत्यें कां हीं ? कांहीं यांवरि कसी नसे चि कृपा ? ’ ॥७॥
प्रज्ञाचक्षु म्हणे, ‘ मज पडतो संकोच फार विदुराचा,
सर्व हि हेतु सुखाचा स्वापत्यांच्या तसा न विधुराचा. ॥८॥
पांडवगुणवर्णन तें विदुरमनोधारणार्थ हें साचें;
वरि सरस, आंत नीरस मद्भाषण मित्र होय फेंसाचें. ॥९॥
इनकांत काय येतो मंदाक्षाच्या त्यजूनि काच मना ?
मन हित तूं चि, न धर्म, प्राणांच्या तो करील आचमना. ॥१०॥
दुष्कर हि करीन, वदा धरिला स्वमनांत निजहितोपाय;
छेदावा गतिहेतु हि जो विषरुग्दुष्ट निज हि तो पाय. ’ ॥११॥
स्वमत सुयोधन सांगे, ‘ भेदावा द्रुपद भूरिधनदानें;
येणें कोण चळेना ? काय महातरु चळेल न नदानें ? ॥१२॥
कीं जें अन्योन्य असे पावेल प्रेम अंत, राया ! तें.
जेणें योजावें त्या पांचांत ख्यादिअंतरायातें. ॥१३॥
कीं भीम मारवावा देववुनि क्ष्वेड हें चि भद्र हित,
मरतील चि, वांचोनि हि काय ? शव चि ते समस्त तद्रहित. ’ ॥१४॥
ऐशा सांगे तो खळ मूर्ख पित्याजवळि नैककूपाया,
सुविचारहंस भेटति कैसे कुविचारभेककूपा या ? ॥१५॥
कर्ण म्हणे, ‘ राया ! हें व्यर्थ, जसें बुद्धिहीन मृगपोर
योजावें पढवुनि वधयुक्ति विदारावयासि मृगपोर. ॥१६॥
तों वणवा विझवावा, जों भेटि तया दिली नसे वातें;
यदुबळ न भेटतां अरि मारा, जें अन्य मत न सेवा तें. ॥१७॥
ऐसें स्वमत तुम्हांला कथितों मीं आप्त म्हणुनि मायेनें.
मज आजि आजिनें फळसिद्धि दिसे जसि, तसी न मायेनें. ’ ॥१८॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ कर्णा ! कथितो शक्रासि जीव जेंवि हित,
कीं यदुवरासि उद्धव, सांगसि मज तूं तसें चि जें विहित. ’ ॥१९॥
मग भीष्म - द्रोण - विदुर संमत घ्याया समीप आणविले.
त्यांला वृद्ध - सुयोधन - कर्णानीं निजविचार जाणविले. ॥२०॥
गांगेय म्हणे, ‘ वत्सा ! गांधारीनंदना ! स्वभावांसीं
न बरा विरोध दुष्टांसीं हि; करिल कोण सुस्वभावांसीं ? ॥२१॥
मज ते तुम्हीं सम, जसा धृतराष्ट्र, तसा चि पांडुराजा गा !
कुरुवंश हा जयास्तव सुयशा डिंडीरपांडुरा जागा. ॥२२॥
तुमचें तसें चि त्यांचें राज्य; तयां भाग द्या सम; न्यूनें
अंशें, अनिष्ट, धरितां धन्व करीं अर्जुनें समन्यूनें. ॥२३॥
वैरें भस्म करावें न कुरुकुळा, जेंवि कानना दावें;
यश सुख पुण्य मिळे, मग बंधूनीं नीट कां न नांदावें ? ॥२४॥
सामजळें प्रक्षाळा, व्याकुळ करितें महापयश मातें
तप्त हि सन्मन धरितें पुनरपि वरितें महापय शमातें. ॥२५॥
साधील हरि - मुखीं ही कोण्ही घालूनि हात कवळा हो !
दुर्मिळ पांडुसुतामिष, न तुम्हीं व्हा आत्मघातक, वळा हो ! ’ ॥२६॥
द्रोण म्हणे, ‘ धृतराष्ट्रा ! पुसतां, जें युक्त तें चि सांगावें;
सुजनीं, सुजनें त्यागुनि हरिगीत, ग्राम्यगीत कां गावें ? ॥२७॥
तिकडे सामपटु पुरुष शीघ्र तुम्हांकडुन आत्मसम जावा,
द्या अर्धराज्य त्यांला, आणा, चित्तीं शिरोनि समजावा. ॥२८॥
धाडा उत्तम वस्त्रें रत्नालंकार हार अथवा जी
हे संपत्ति समर्पा, प्रेषा पत्ति, द्विपेंद्र, रथ, बाजी. ’ ॥२९॥
कर्ण म्हणे, “ मेळउनि प्रभुपासूनि प्रभूत धन मान,
बहु अंतरंग होउनि करिति स्वार्थार्जनीं न अनमान. ॥३०॥
प्रभुचें न कथिति, आपण यद्यपि नयधर्मपटु, तथापि हित;
अद्भुत हितशत्रुत्व न उमजे सद्रीतिसत्कथापिहित. ॥३१॥
शठमित्रमंत्रपान प्राज्ञमतें परम विषम रायाला;
हें घडतां नलगे चि प्राशावें इतर विष मरायाला. ॥३२॥
शिष्ट म्हणति, ‘ दिष्ट खरें सुखदुःखद विष्टपीं, ’ दुजें इष्ट,
किंवा अनिष्ट करितें मित्र नसें, अन्य कल्पन क्लिष्ट. ॥३३॥
लोकांत सावधपणें शब्दें हित अहित ओळखा, वागा,
दुर्योधना ! सख्या बहु बोलुनि म्यां काय बोळ खावा गा ? ” ॥३४॥
द्रोण म्हणे, ‘ आम्हीं हितशत्रु, न तूं, सुप्तसर्प तुडवाया
सांगसि जो दाटूनि व्यसनविषमहार्णवांत बुडवाया. ॥३५॥
रे कर्ण ! दीर्घदर्शी जो तो चि मनुष्य, अन्यथ नरसा
दिसला तर्हि पशु, ज्या दे, मातेचें त्या न अन्य थान रसा. ॥३६॥
सेवि तया वृद्धाचें मंत्रित हित, हित तसें न तरुणाचें;
विष म्हणसि कसें त्याला, अमृताधिक उक्त जें सकरुणाचें ? ॥३७॥
झाला असतां प्राप्त क्षयनामा काळवल्लभ व्याधी,
क्षीणायुला चि वाटे वैद्याची स्वाहिता चि भव्या धी. ’ ॥३८॥
विदुर ह्मणे, ‘ दादाजी ! करिताहे ज्यासि आ पतित ऊनीं,
पाजिलिया हि धरावें तिळभरि हि न तें चि आप तितवूनीं. ॥३९॥
तैसें चि हें; गुरूक्ता तापत्रयतप्त सुज्ञ आ पसरी,
जड चि न घे, ज्याची करि अमृत न सुरसिंधुचें हि आप सरी. ॥४०॥
भीष्मोक्तासि न देसी मन, देउनि काय त्याविना कर्ण ?
गुरुसूक्तासि हि तुमचा हितकरवर सूक्त भाविना कर्ण. ॥४१॥
काय न हितवाग्गुरु हे ? हितवाग्गुरुहूनि काय गा ! बाळ ?
टाकूनि सार सुज्ञा ! गोळा करितोसि काय गाबाळ ? ॥४२॥
दुर्योधनकर्णशकुनिमंत्र महाघातकर अगा ! राया !
बाळोक्ता वश होउनि लाविशि शोकाग्नि कां अगारा या ? ॥४३॥
पूर्वजसंपादित जें करितो ज्ञाता भला जतन यश तें;
तुझिया तों लोभहतज्ञातें त्यजिली च लाज तनयशतें. ॥४४॥
पांच न ते, पांचशतें, पांडुतनय वीरधीरहीरमणी;
हे काच साच, नाचति, परि राज्यश्री न मंदधीरमणी. ॥४५॥
धर्मीं युधिष्ठिर निरत, युधिष्ठिरीं सबळ वृष्णिवर शौरी,
त्या शौरिचा चि ठायीं विजयश्री, जेंवि शंकरीं गौरी. ॥४६॥
यदुसिंह सहाय जयां, त्यांला वधितील बाळ हे ? राया !
न समर्थ वक्रनेत्रें पाडूकुमारांसि काल हेराया. ॥४७॥
तैं या कुळाहिताच्या त्वां केलें दृढ न मानस त्यागा;
अद्यापि तरी राया ! ती माझी उक्ति मान सत्या गा ! ’ ॥४८॥
धृतराष्ट म्हणे, ‘ विदुरा ! सर्वज्ञा ! भरतकुळहिता ! भ्रात्या !
युष्मद्वचना भजतों मीं, जेंवि भजे शिखी हिताभ्रा त्या. ॥४९॥
ज्यास्तव मज लावितसे आचार्य द्रोण बोल तात हि तें
कर्म कशास ? अगा ! जे हित, वचनें ते चि बोलतात हितें. ॥५०॥
माझे चि पुत्र पांडव, त्यांचें, यांचें हि होय सम राज्य,
वैराग्नि पेटवाया दाटुनि सिंचील कोण समराज्य ? ॥५१॥
जा, पांडव घेउनि ये, जें लागेल प्रभूत वसु, ने तें.
पाहोत तूर्ण विदुरा ! भीष्मद्रोणप्रभू तव सुनेतें. ॥५२॥
मान्य बृहस्पतिला तूं वक्त्यांचा साधुराय, काव्या ही;
आम्हांवरि प्रसन्नस्वांत करीं बंधुनायका ! व्याही. ’ ॥५३॥
राजाज्ञेनें भेटे विदुर द्रुपदा नृपा सदिष्टातें.
मग पांडवबलभद्रप्रभुसहिता सांवळ्या सदिष्टातें. ॥५४॥
वस्त्राळंकारांहीं द्रुपदप्रमुखांसि कवि अळंकारी,
विदुरप्रियार्थ सर्वांसह घे तो भोजकुळकळंकारी. ॥५५॥
विदुर म्हणे द्रुपदातें, ‘ तुज म्हणतो या मुखें असें व्याही;
नातें तुझें मधुर हें न रसा मधुरत्व देवसेव्या ही. ॥५६॥
नंदननाम सुतें ऋत केलें त्वां हें करूनि नव नातें;
श्रवणें जसी सुखदता या आजि, सुरांचिया हि न वनातें. ॥५७॥
सीतेस्तव अर्कातें, कृष्णेस्तव कीं स्ववंश सोमातें
बहु मान्य आजि, राया ! यावरि सुतविरह हा नसो मातें. ॥५८॥
या मागें न तसें, मज आजि जसें दुःख एक गा ! राया !
कृष्णाविलोकनसुखा पात्र न गारा नसोनि गारा या. ॥५९॥
ज्यांहीं साकेतींचें श्रुत केलें कुतुक, नरवरा ! ते तें
या गजपुरीं स्मरोत प्रेक्षुनि सस्त्रीक नर वरातेतें. ’ ॥६०॥
द्रुपद म्हणे, ‘ विदुरा ! म्यां काय वदावें ? तुला सकळ कळतें;
प्रेक्षकमन बहु चरणें चुरितां वंद्या फुलास कळकळतें. ॥६१॥
वर्तेन तसें चि, जसें विहित तुम्हीं परम आप्त सांगाल,
अमृत भर्वितां सकृपें फुगवील स्वहितकाम कां गाल ? ’ ॥६२॥
धर्म म्हणे, ‘ ताता ! तूं द्रुपदनृपति, रामकृष्ण परमहित
सांगाल तसें चि करूं, आम्हां न तुम्हांपरीस पर महित. ॥६३॥
कृष्ण म्हणे ‘ धर्मा ! जा कीं आला न्यावया स्वयें चुलता,
धृतराष्ट्र वांचला त्वत्कुशळें, नाहीं तरी उरीं उलता. ॥६४॥
कोणें हि पाविजेल स्वप्नीं हि विनाश न विदुराधीनें.
व्याकुळ होऊं देइल न तुम्हां हा साधु कवि दुराधीनें. ’ ॥६५॥
प्रणतां देतें ज्याच्या पदपद्माचें सदा रज गतीतें,
त्या प्रभुमतें परततां< बहु सुखविति ते सदार जगतीतें. ॥६६॥
कृष्णाग्रजावरज बळकृष्णाश्रित करुनि कीर्तिला जतन
कृष्णात्मज - कुलनंदन कृष्णापति वीर पावले वतन. ॥६७॥
धृतराष्ट्रनृप - प्रहित - द्रोण - कृप - विकर्ण - चित्रसेनांहीं,
नगरांत आणिले ते पांडव वेष्टूनि चित्र सेनांहीं. ॥६८॥
पौर म्हणति, जसि द्यावी येउनि गहना प्रभा वसंतानें,
तसि पांडुच्या दिली या नगरा अतुळप्रभाव संतानें. ’ ॥६९॥
म्हणति स्त्रिया, ‘ पुरश्री जाउनि समजाउनि, स्वयें भार्या
होउनि, घेउनि आली, वाटे द्रुपदात्मजा न हे आर्या. ॥७०॥
पांडव नव्हेत, हे घन, यांची हे सहचरी सुतनु शंपा.
या स्वविरहदवहतपुरविपिनीं केली उदंड अनुकंपा. ॥७१॥
सितकाक मानसश्रीकर नोहे करुनियां अध मराळा,
शालि कनकपात्रोचित न धरुनि हि सुवृत्तता, अधम राळा. ॥७२॥
प्रभु रामकृष्ण हे तों चिंतामणिचे श्रिता जना वाडे,
आपत्सरिदुत्तारक धर्माचे आप्तराज नावडे. ’ ॥७३॥
ऐसें श्रवण करीत प्रियजनहृन्नीरजांसि फुलवीत,
उलवीत असदुरांतें, कुरुराज्यश्रीमनासि भुलवीत, ॥७४॥
जाउनि पांडव भीष्मप्रमुखगुरुजनाचिया पदीं नमनें
करुनि, निजप्रासादामाजि सुखें राहिले अदीनमनें. ॥७५॥
कांही काळ कुरुपुरीं होते, सामें तयासि मग राजा
अंध म्हणे, ‘ राज्यार्ध स्वीकारा, या त्यजूनि नगरा, जा. ॥७६॥
राज्य करा, नगर रचा, वसवा वासार्ह खांडवप्रस्थ.
चांदाची वृद्धि असो, नांदा सानंद सानुग स्वस्थ. ॥७७॥
भ्रात्यांत पुन्हां विग्रह न प्रकटावा, न पूर्व तापावे;
कुलजविरोधें संतत ताप गुरुमनीं अपूर्वता पावे. ’ ॥७८॥
वंदुनि पित्यासि साच्युत पांडव हि चतुर्मुखांडवप्रस्था
स्वयशासि घालवाया बाहिर, गेले स्वखांडवप्रस्था. ॥७९॥
तेथें त्रिभुवनशिल्पी प्रभु आपण कथुनि युक्तिला, पुर तें
जें रचवी धर्माचें, निरुपम झालें नसेल कां पुरतें ? ॥८०॥
प्रभु पुर असें रची कीं, हरिसा सानंद धर्मसुत राहो,
सर्व जनास हि दुस्त सुरभोगेच्छापगा हि सुतरा हो. ॥८१॥
जें प्रभुदर्शन दुर्लभ कामित नाकीं हि तें हि तें पुरवी,
मग कोणतीं न संश्रितलोकांचीं कामितें हितें पुर वी ? ॥८२॥
तें न पुर, प्रभुनें रसपूर्ण स्वजनासि वाढिलें पात्र.
चोळिति निजागुणें कर बहु मलिनप्रकृति मक्षिका मात्र. ॥८३॥
स्थापुनि सन्मणिकनकप्रासादीं पांडवांसि राम - हरी
गेले द्वारवतीतें गात्यांचा श्रम यदीय नाम हरी. ॥८४॥