एकासमयीं क्षुधित, श्रांत, श्रीव्यास मंदिरा आला.
गांधारीनें सादर तोषविला, सुप्रसन्न तो झाला. ॥१॥
‘ वर माग ’ असें म्हणतां, मुनिच्या पायांसि ती सती लागे;
शतपुत्रवर हरा जो मागितला, तोचि त्यासही मागे. ॥२॥
मग गर्भवती झाली, होती तैसीच दोनि अब्ध सती;
कुंतीस पुत्र झाल, ऐसें परिसोनि, होय खिन्नमती. ॥३॥
दुःखें निजोदराला ती गांधारी स्वमुष्टिनीं ताडी.
गर्भासि बळात्कारें, भवितव्यबळेंहि, संकटें पाडी. ॥४॥
लोहाची कांडीसी पडली पेशीच एक मासाची;
चित्तीं म्हणे सुबळजा, ‘ हे त्यागावीच दुःखदा साची. ’ ॥५॥
तों तें जाणुनि, येउनि, मुनि साहसकारिणीस त्या वारी;
वरदा श्वशुरासि म्हणे, मग ती आणूनि लोचनीं वारी, ॥६॥
‘ दिधलें मज शतसुतवरदान तुम्हीं वरदराज ! मामाजी !
झाली पेशी; वर्षद्वय हे तनु पावली श्रमा माजी. ॥७॥
झाला सुत कुंतीला परिसुनि, मज दुःख वाटलें मोटें.
मग म्या उदर बडविलें; स्वामीपासीं वदों नये खोटें. ’ ॥८॥
व्यास म्हणे ‘ गे वत्से ! लोकीं सर्वज्ञतेसि मीं पात्र;
जाणें सर्वहि; तिळहि न जाणें लटिकें वदावया मात्र. ॥९॥
शत घृतकुंभांत रवे पेशीचे घाल कन्यके ! शीतें
उदकें सिंपावी तें; सद्यः शतधा करील पेशीतें. ’ ॥१०॥
केलें तसेंच; तेव्हां कन्येचा काम मानसीं आला;
श्रीमन्मुनिप्रसादें, भाग अधिक एक त्या शतीं झाला. ॥११॥
घृतकुंभरक्षणाचा विधि, अविधिहि, कथुनि, कृष्णमुनि गेला.
झाला प्रथम सुयोधन; तेणें खरशब्द उपजतां केला. ॥१२॥
गांधारीसुतकृत रव परिसुनि, गोमायु, गृध्र, खर, काक,
हाक स्वयेंहि देती; धृतराष्ट्राच्या मनीं शिरे धाक. ॥१३॥
भूदेव, भीष्म, विदुर स्वगृहीं आणवुनि, आंबिकेय वदे,
‘ व्यासेश्वरप्रसादें झाला सुत, परि मना न उत्सव दे. ॥१४॥
राजसुत युधिष्ठिर तों राजाचि; स्पष्ट तो कुळज्येष्ठ;
हाहि नृपचि त्यामागें; भवितव्य वदा बरें तुम्हीं श्रेष्ठ. ’ ॥१५॥
म्हणति भविष्यज्ञ द्विज, ‘ बुडवाया जाण हा निदान कुळा;
त्यागावाचि. न भुजगें पोसावें प्राणहानिदा नकुळा. ’ ॥१६॥
विदुर म्हणे, ‘ त्यागावी अहिदष्टा तत्क्षणींच आंगोळी.
मारक कळतां, घ्यावी उग्र विषाची बळेंचि कां गोळी ? ॥१७॥
एकोनशतसुतांसीं, एक कुपुत्र त्यजूनि, नांदावें.
व्याकुळ व्हाया, फुंकुनि भाजों द्यावें स्वगेह कां दावें ? ॥१८॥
झाला कुळकीर्तीच्या, आप्तजनांच्या, कुपुत्र हा, निधना.
त्यजिति यशोधन देहहि, यश रक्षिति, म्हणति, ‘ होवु हानि धना. ’ ॥१९॥
उग्रनिमित्तें सर्वहि भ्याले, एकचि न अंध तो भ्याला.
होय मरणहेतूल्कामुखभूतीं सुनिधिबुद्धि लोभ्याला. ॥२०॥
पितृसुरतृप्तिप्रद, जगदाल्हादक, तापहर, सुवृत्त, शुचि,
शशिचें मंडळ, कुळही; तेथ हरिण अंक, येथ हा पशुचि. ॥२१॥
ज्या दिवसीं दुर्योधन झाला, कुंतीस भीम त्या दिवसीं.
स्वगुणें एकें तप्तें, एकें केलीं सुहृन्मनें हिवसीं. ॥२२॥
धृतराष्ट्राला झाले शत सुत, कन्याहि एक वरदानें.
जैसें कथिलें होतें श्रीमद्व्यासें अभीष्टवरदानें. ॥२३॥
अंतर्वत्नी असतां, गांधारीनें स्वयेंचि सनयेला
दिधला सद्वैश्याच्या, निजपतिसेवाधिकार, तनयेला. ॥२४॥
वैश्या सेवादक्षा, प्रज्ञाचक्षुहि कृतज्ञ, भजलीला
दे पुत्रफळ; गमे सुरतरुची प्रभुचीहि, तुल्य मज लीला. ॥२५॥
नाम युयुत्सु तयाचें; एकाधिक शतकुमार यासकट.
सर्वंत साधु वैश्यानंदन, होईल तें पुढें प्रकट. ॥२६॥