पांडव जेथें होते तेथें वासार्थ एक विप्र हित
शुचि तेजस्वी आला, किरण जसा नीरजीं रविप्रहित. ॥१॥
तो सांगे, ‘ द्रुपदमखप्रभवा कृष्णा अयोनिजा कन्या,
तीचा स्वयंवरोत्सव, न कळे कवणा वरील ती धन्या. ’ ॥२॥
पांडुसुत तिची पुसती जैसे अनभिज्ञजन कथा नमुनी.
होय श्रोतृश्रोत्रक्षुधितार्भकतृप्तिजनक थान मुनी. ॥३॥
कथिली द्रोणद्रुपदद्वेषकथा परिभवान्त आधींची,
जी त्या पांचाळाच्या झाली उत्पत्तिभूमि आधींची. ॥४॥
मग विप्रें ऐकविली पुढिल कथा ती असी, “ स्वअहितातें
मारीसा सुत व्हाया, शोधी मुनितें तपस्विमहितातें. ॥५॥
उपयाजाख्यमुनीतें सेवी बहु, काम तो पुसे आर्य;
द्रुपद तयाला सांगे जें होतें योजिलें मनीं कार्य. ॥६॥
‘ अर्बुद गायी देइन तुज, दे द्रोणांतहेतु - सुत मातें.
नाशीं मद्व्यसनातें, जैसा नाशी विभावसु तमातें. ’ ॥७॥
मान्य न करी महात्मा; परि नृप, ‘ जोडीन हात दास्यातें, ’
विधुतें चकोरसा तो म्हणे, ‘ वरामृत वहा ’ तदास्यातें. ॥८॥
उपयाज म्हणे, ‘ प्रार्थीं मद्भ्राता ज्येष्ठ याजनामा, जी
इच्छा ती सांग तया, तो परम समर्थ याजनामाजी. ॥९॥
कार्य करील तुझें, जा; आहे ज्ञाता, परंतु लोभी तो.
‘ हूं ’ न म्हणेल इतर जन, पापापासूनि फार जो भीतो. ॥१०॥
म्हणसील कसा लोभी तरि आचरणावरूनि वळखावें;
भक्षी विजनीं हा जें स्थळशुचिता न कळतां न फळ खावें. ’ ॥११॥
उपयाजमतें प्रार्थी पुत्रार्थी भूप हा तया, ज्याला
धनलोभांक असे, परि जोडी द्विजराज हात याजाला. ॥१२॥
याज द्रुपदमनोरथ परिपूर्ण करावया, नय - ज्ञात्या
अनुजा घेउनि, करी जो देता पुत्रदान यज्ञा त्या. ॥१३॥
हवनांतीं याज म्हणे, ‘ ये राज्ञि ! क्षिप्र घे वरा हवितें,
होइल मिथुन तुज असें कीं, जें शतपुत्रिमद न राहवितें. ’ ॥१४॥
राज्ञी म्हणे, ‘ मुने ! मीं पुण्य - हवि - प्राशना नसें उचिता;
तांतड कां ? बा ! थांबा, मलिना आहें, घडो मला शुचिता. ’ ॥१५॥
याज म्हणे, ‘ देवि ! रहा किम्वा जा; न प्रयोग राहेल.
घनबिंदु चातकीच्या काय विलंबें विलंब साहेल ? ’ ॥१६॥
देवीच्या आत्मरजोदोषें जेव्हां स्वभाव राहविला,
याज शिखिमुखीं होमी संततिपूयूषसागरा हविला. ॥१७॥
कवच - किरीट - शर - धनुश्चर्मासि - धरा विभावसु कुमारा
प्रसवे वेदी ’ हि महाकन्यारत्ना स्वभावसुकुमारा. ॥१८॥
कन्यारत्न जसें क्षिति जनकाला व्हावया सुख निवेदी,
तैसें चि द्रुपदाला भाग्यें होवूनियां सु - खनि वेदी. ॥१९॥
होय नभोवाणी कीं, ‘ हे सर्वस्त्रीश्वरी, सुसत्कार्या
अवतरली देवांच्या सिद्धिप्रति न्यावयासि सत्कार्या. ॥२०॥
भय जानकीनिमित्तें झालें रात्रिंचरां जसें हो ! तें,
एतन्निमित्त साध्वस सनुपजनां कौरवां तसें होतें. ’ ॥२१॥
ऐसें श्रवण करुनि नरराज हि याज हि सहाप्तजन नाचे.
गाणार सुरहि झाले दिव्यकुमारीकुमारजननाचे. ॥२२॥
राज्ञी म्हणे, ‘ मुने ! हे कन्या, हा सुत हि कल्पनग मोहो.
माता जाणोत मला, हविराहुति माय, यांसि न गमो हो. ’ ॥२३॥
‘ धृष्टद्युम्न ’ असें त्या पुत्राचें नाम अर्थ साधूनीं,
‘ कृष्णा ’ हें कन्येचें केलें अभिधान सर्व साधूनीं. ॥२४॥
याजाच्या मंत्रबळें त्यांला वाटे खरी च जनना ती,
मोहप्रदा जर्हि तर्ह्री त्या मुनिची गाति साधुजन नीती. ॥२५॥
द्रोण तयास हि पढवी, जर्हि झाला स्वनिधना असें कळलें;
कीं, भावि, यश न मळलें यत्नशतें ही कधीं नसे टळलें. ॥२६॥
जें न मिळालें अन्या तिळमात्र हि वेचितां हि कायशतें,
भृत्यजिता अजिता कीं लाभे त्या सुज्ञनायका यश तें. ” ॥२७॥