मना तुला कशास पाहिजे उठाठेवरे ॥धृ०॥
विषयवासना सोडुनी सारी । करी निरंतर देवदेवरे । मना तुला० ॥१॥
बडबड सोडी विषय सुखाची । घे श्रीहरीचें नांव रे । मना तुला० ॥२॥
सोडुनी जाणें लागे घरदार । देश तुझा आणि गांवरे । मना तुला० ॥३॥
यास्तव येवुनी या नरदेहीं घेई परमार्थाची धांवरे । मना तुला० ॥४॥
सद्गुरुला शरण जावुनी । जाणुनी घे स्वसुखाचा ठाव रे । मना तुला० ॥५॥
भक्ति नाही भावही नाही । उगाच देवा म्हणे पाव पावरे । मना तुला० ॥६॥
वारी म्हणे मुक्त होण्याला । पाहिजे श्रद्धा भावरे । मना तुला० ॥७॥