अरे मना, व्यर्थ कल्पना, करिसी वल्गना , विषयीं रंगून, विषयीं रंगून ।
ह्या मायायोगें, विषयीं जाशी मोहून ॥धृ०॥
ही माया, तुजसी राहाया, स्थूल करी काया, पंचवीस तत्त्वांची, पंचवीस तत्त्वांची ।
तुज न कळे म्हणुनी, गोडी वाटली त्याची ।
हें घर, करीसी सुंदर, अस्थी मांस रुधीर, पंचभूताचें, पंचभूताचें ।
त्यामाजीं मिळविले धर्म तीन गुणांचे ॥चाल॥
ते गुण भिन्न भिन्न असती । त्यामुळे भ्रांती चित्ताला होय ती ॥गुण कार्य, जाणुनी धैर्य, चित्त करी स्थैर्य, तरीच मोह सुटे, तरीच मोह सुटे ।
ना तरी सुखदुःखाचे लागती चपेटे । अरे मना, व्यर्थ कल्पना, करिसी वल्गना,
विषयीं रंगून, विषयीं रंगून० ॥१॥
सूक्ष्म, दुसरा उत्तम, तैजस नाम, असें रे त्याचें ।
त्यामाजीं प्राबल्य असें मना बुद्धीचें ।
तो जीव, करी प्रभाव, प्रकाशी सर्व, विशेष चैतन्यें,
विशेष चैतन्यें । सतरा हीं तत्त्वें प्रकशलीसे त्याने ॥चाल॥
ज्ञानेंद्रियें प्रकाशित होतीं त्याच्यानी । कर्मेंही होतीं त्याच्या सत्तेनी ॥चा०पू०॥
ते प्राण, धावती जाण, तेणे क्रियामाण, होती देहाचें, होती देहाचें ।
हें जाणुनी साक्षी होवुनी राही तूं त्याचे । अरे मना, व्यर्थ कल्पना,
करिसी वल्गना, विषयीं रंगून० ॥२॥
ही माया, ईशाची जाया, ब्रम्हादी पायाअ, होती तीचे बाळ,
होती तीचे बाळ । ह्या चौशून्यांमध्ये मांडीयेला तीने खेळ ।
ही नटी, खेळे एकटी, ढोलकें पीटी, जीवा भुलवाया, जीवा भुलवाया ।
हीने ब्रम्हादिकांसी लाविलें जन्म घ्याया ॥चाल॥
पाजुनी अविद्या दूध निजवितें । कोषांचें पांघरुण घालीते ॥चा०पू०॥
अपार, शक्ति हीची फार, करवी संसार, वासना धरुनी, वासना धरुनी ।
मग फिरवी त्याला चौर्यांशीच्या योनी ।
अरे मना, व्यर्थ कल्पना, करिसी वल्गना, विषयीं रंगून, विषयीं रंगून०॥३॥
ह्यांतुन, सुटाया जाण, करी हरी स्मरण, सांगतें तुजला, सांगतें तुजला ।
जा शरण सद्गुरुपायीं मुक्त होण्याला । तो बोध, परीसुनी शोध,
स्वरुप तें शुद्ध, जाणुनी घेई, जाणुनी घेई । मग अखंड तेथे बुडी देवुनी राही ॥चाल॥
अभ्यास ऐसा नित्य तूं करी । मग मुक्ति तुजला येवुनी ती वरी ॥चा०पू०॥
मग तुला, जगीं सौख्याला खोट न त्याला, भोगी स्वानंद, भोगी स्वानंद ।
म्हणे वारी मना बा नाही तुला मग बंध । अरे मना, व्यर्थ कल्पना,
करिसी वल्गना, विषयीं रंगून, विषयीं रंगून० ॥४॥