मनारे तुजला काय कमी । बघ अंतरयामीं ॥धृ.॥
नऊ दरवाजे सुंदर बंगला । त्याचा तूं स्वामी ॥
मनारे॥तुजला काय कमी० ॥१॥
पांच घोडे तुला बसाया । चैन करीसी निशिदिनीं ॥
मनारे ॥ तुजला काय कमी० ॥२॥
पांच नोकर आणुनी देती । विषय तुला निजधामीं ॥
मनारे ॥ तुजला काय कमी० ॥३॥
ज्ञानेंद्रिय हें मित्र तुझेरे । तत्पर अति तव कामी० ॥
मनारे ॥ तुजला काय कमी० ॥४॥
अहंकार हा सदा खडारे । मी मी मी मी म्हणुनी ॥
मनारे ॥ तुजला ० ॥५॥
सुबुद्धी स्त्री ही सुख तुज देई । रमवुनी स्वग्रामीं ॥
मनारे ॥ तुजला ० ॥६॥
ऐसी वेळां साधुनी घेई । रामकृष्ण हरी म्हणुनी ॥
मनारे ॥ तुजला ० ॥७॥
वारी म्हणे बा सावध होई । करुं नको आपुली हानी ॥
मनारे ॥ तुजला ० ॥८॥