मना अखंड भजरे भजरे । तूं अंतरीं सद्गुरुराया ॥धृ०॥
काया वाचा आणि मन । करी सद्गुरुला अर्पण ।
होवुनी अनन्य शरण । करी नित्य नामस्मरण । मना अखंड०॥१॥
जरी करणें तुजला हीत । तरी गुरुपदीं होई रत ।
गुरुवाक्यावरती चित्त । ठेवुनी हो स्वरुपीं रत । मना अखंड० ॥२॥
गुरुपरतें नाही ध्यान । गुरुपरतें नाही ज्ञान ।
सद्गुरुवाक्य प्रमाण । करी कर्म न गुरु सेवेविण । मना अखंड० ॥३॥
सद्गुरु भजनी जो रमला । तो मायेपासुनी सुटला ।
भवसागर त्याचा आटला । वारी म्हणे संशय फिटला ।मना अखंड० ॥४॥