गोविंद गोविंद नाम मना तूं घेई अखंड ।
सर्व पातकें नष्ट होवुनी चुकेल यमदंड ॥धृ०॥
राम कृष्ण हरी गोविंद हा लागुं दे छंद ।
जन्म मरण संसृतीचा तुटेल तो बंध ।गोविंद गोविंद० ॥१॥
गोविंद गोविंद भोजन समयीं वदे जो ग्रासोग्रासीं ।
भोजन समयीं नाम घेई तो जेवुनी उपवासी ।गोविंद गोविंद० ॥२॥
येतां जातां उठतां बसतां गोविंद उच्चारी ।
त्रैतापाची होळी करुनी गोविंद प्रगटें अंतरीं ।गोविंद गोविंद० ॥३॥
गोविंदाची गोडी रसने चाखी एक वेळ ।
गोडी लागतां तृप्ती होवुनी जाईल तळमळ ।गोविंद गोविंद० ॥४॥
गोविंद नाम गोद फार हें करी सुखरुप ।
वारी म्हणे नामीं चित्त जडतां होय तद्रूप । गोविंद गोविंद० ॥५॥