मना राम हें नाम तूं नित्य घेई । याविणें सार तें अन्य नाही ॥धृ०॥
राम कृष्ण मनीं । ध्यावुनी निशिदिनीं ।
स्वानंद भोगुनी । रत सदा हो ।
त्यागुनी विषय ते । सत्य जें घ्याय तें ।
होय तुज सौख्यातें । नित्य पाही । मना राम० ॥१॥
राम सुख धाम तो । शांती तुज देई तो ।
नित्य तूं गाई तो । प्रेमभावें । नेवुनी निजपदीं ।
देई तुज सुखनिधी । म्हणुनी तूं जा आधीं ।
शरण पायीं । मना राम० ॥२॥
राम मातापिता । राम तुज तत्वता ।
वारुनी भवभय व्यथा । मुक्ति देई ।
राम तो सद्गुरु । राम कल्पतरु ।
वारी म्हणे पाय धरुं । घट्ट हृदयीं । मना राम० ॥३॥