क्षणभरी तरी मना । हरीरुप घ्याईरे ।
हरीरुप घ्यातां हृदयीं । हरीरुप होईरे ॥धृ०॥
हरी चित्तीं चिंततारे । चिंता सर्व हरी रे ।
देहबुद्धी जावुनीया । चिद्रुप होईरे । क्षणभरी० ॥१॥
आधी व्याधी हरीच होई । वारी त्रिविध ताप रे ।
आधी व्याधी दुःख दैन्य । हरीरुपीं नाहीरे । क्षणभरी० ॥२॥
हरीरुप हृदयीं ध्याता । हरी येई हातांरे ।
हरी हातां येतां नाही । त्रीजगतीं या भीतीरे । क्षणभरी० ॥३॥
वारी म्हणे सर्व हरुनी । हरीपदीं राहीरे ।
हरीपदीं अखंडची । स्वानंद तो होईरे । क्षणभरी० ॥४॥