गौरीची गाणी - गौरीची कहानी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गौरीची कहानी
गऊर खेलायला गेली
गऊर खेलून घरी आली
हाका मारीते सासर्याला
हाका मारीते सासूला
उघडा दाराची कुलूपा
मला घरात येऊ द्या
गऊर घरात शिरली
सासूनं धरली सासर्यानं मारली
नंदेनं धरली दिरानं मारली
भावल्यानं धरली नवर्यानं मारली
ओढून टाकली अंगणामधी
गऊर वनवासाला गेली
अंगावर घंगाल्याच्या पुरू
गेली पाटलाच्या वलेला
हाका मारी, पातलीनबाई
पाणी पाजा गवरायला
पाटलीन घराबाहेर आली
छी छी करीत घरात गेली
गेली वारल्याच्या वलेला
गेली कोल्याच्या वलेला
पाणी पाजाअ गवरायला
वारलीन घराबहेर आली
कोलीन घराबहेर आली
पाणी वाढलं गवरायला
गऊर पुढे निघून गेली गेली महाराचे वलेला
हाका मारी, महारीनबाई
पाणी पाजा गवरायला
महारीन घराबाहेर आली
धरला गवरायचे हाताला
नेवून पाटावर बसवलं
गवरायच्या आंघोल्या केल्या
गवरायच्या भोजन वाढली
गवराय भोजनी बैसली
भोजन आटोपून शांत झाली
गवरायची माथी उकलली
निघून गेली वनामधी
गौरीची कथाव्यथा
गौर खेळायला गेली
गौर खेळून घरी आली
हाका मारते सासर्याला
हाका मारते सासूला
उघडा दाराची कुलूपे
मला घरात येऊ द्या
गौर घरात शिरली
सासू धरली सासर्याने मारली
नणंदेने धरली धाकट्या दिराने मारली
मोठ्यादिराने धरली नवर्याने मारली
ओढून फ़ेकले अंगणामध्ये
गौर वनवासाला गेली
अंगावर पुवाचे फ़ोड आले
तशीच गेली पाटलाच्या दारी
हाका मारते, पाटलीणबाई
पाणी पाजा गौराईला
पाटलीण घराबाहेर आली
छी छी करीत घरात गेली
गौर गेली वारल्याच्या दारी
गौर गेली कोळ्याच्या दारी
पाणी पाजा गौराईला
वारलीण घराबहेर आली
कोळीन घराबाहेर आली
पाणी वाढले गौराईला
गौर पुढे निघून गेली
गेली महाराच्या दारी
हाका मारते, महारीणबाई
पाणी पाजा गौराईला
महारीण घराबाहेर आली
गौराईचा हात धरला
घरात नेऊन पाटावर बसवले
गौराईला आंघोळ घातली
गौराईला जेवायला वाढले
गौराई जेवायला बसली
जेवण आटोपून शांत झाली
गौराईने केस मोकळे सोडले
निघून गेली रानामध्ये
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP