मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
चिमुकली शान्ता

माधव जूलियन - चिमुकली शान्ता

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति अञ्जनी]

सोड अकालिक लाज सोनुले, सोड अकालिक लाज ध्रु०

हृदयकवाडें झालीं ऊघडीं,
हाक मारिते प्रीति हरघडी,
खेळ हिशी चल झिम्मा - फुगडी;
खेळ - वय तुझें, खुल्या अङगणीं नाच, खिदळ तू आज १

केस मोकळे - छे, घन काळे
बालरवीवर टाकिति जाळे,
मागे सारित ते लडिवाळे,
ऊजळ दश दिशा द्दष्टि फेकुनी बेडर कुर्रेबाज. २
 नेत्र न, शाळिग्राम साजिरे
हिमस्नात किति निर्मळ गहिरे !
कटाक्ष नच, हे तर शुचिरुचिरे,
दवबिन्दुच, मोदाश्रु ऊषेचे रम्य तरल अव्याज. ३

रानझरा लहरी झुळझुळतो,
विजनाशी तो कलरव जुळतो,
बोल तसा तव या हदिं खुलतो,
चोरूं नको, गा ! तुझा कोवळा लाडिक हा आवाज ४

असती बहुविध पक्षी रानीं,
गाती, ऊडती नभोवितानीं,
त्या सर्वांची परि तू राणी !
प्रसाद तव हा सहज विहङगम भावांचा अधिराज. ५

स्वाभाव लहरी तव आनन्दी
जणू वसन्तक्ष्वास सुगन्धी,
करी बागडुनि मजला बन्दी;
दावी साधा रुचिरचिरसुखी प्रेमळतेचा साज. ६

शुद्बोधक ही प्रभातलाली
विहरे तुझिया फुगीर गालीं,
गुलाब जणु हा बघुनि अकालीं,
पाण्डुर होऊ यमुनाकाठीं शिल्पगुच्छ तो ताज. ७

घेरी जंव मज ढगाळ रजनी
तंव तू हो मम अढळ चान्दणी,
स्मित शुद्धारक तुझिया वदनीं
न्याहाळित हें तडीस लागो माझें जीर्ण जहाज. ८

प्रथम लेखन ता. २ फेब्रुवारी १९१३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP