Peace ! Peace ! disturb him not
After life's fitful fever he sleeps well.
- Shakespeare
[वृत्त वसन्ततिलका]
कां सभ्य शोक जन हो करितां अकालीं ?
प्रत्यक्ष हानि तुमची किति काय झाली ?
मेला मयूर, ऊरलाच परी पिसारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! १
मागे पुसे कुणि, “अहो, कविता नटी का ?”
“दुर्वृत्त साहजिक ही !” करि आन टीका.
सोसावया अजि नकोच दुरुक्ति - मारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! २
आशाज्वरें विकल तप्त पडे, झुरे तो,
स्वप्नांत काव्य करुणोत्कट तें स्फुरे तों;
भिन्ती नसूनि जग त्या विहगास कारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ३
टाकी कशावर तनू, कवि काय खाऊ ?
काव्यात्मजीवित कसें असहाय जाऊ ?
हे प्रश्न कां करिल काव्यसुधा पिणारा ?
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ४
गेला जरी न चरकांतुनि ऊक्षुदण्ड,
वाहेल केवि रस गोड तरी ऊदण्ड ?
घ्या शर्करा धवल, भाव हिचा विचारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचार ! ५
काव्याहुनी खचित जीवित होय थोर,
पाही मजाच परि दैव कठोर घोर.
काव्यास थाम्बुनि तरी जग देऊ थारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ६
प्रीत्यर्थ तो तडफडे, झगडे जनांशी,
प्रक्षुब्ध होय भवसागर सर्वनाशी;
आता असेल दिसला तळ वा किनारा -
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ७
हो आज शान्त कवि मारुनि आर्त हाका,
प्रेमप्रकोप मरणोत्तर हाय हा कां ?
कां तत्स्मृतीवर अता स्तुतिचा निखारा !
गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ८
ता. १४ ऑक्टोबर १९३१