माधव जूलियन - मधुसुन्दरीस
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति परिलीना]
मोहीं मज कां आता पाडिशी कुमारी ?
टाक कुणा तरुणावर अरुण जादुगारी ! ध्रु०
खोल चरे हेंच दैवलिखित या कपाळीं,
आस जळुनि तीच राख जणु शिरीं ऊडाली,
क्षारोदक ऊन गळुनि करपली नव्हाळी,
मरु भूवर काय बाग करिल तो फुलारी ? १
जाऊं कुठे ? चाललोंच खात रात - वारा,
ताराद्युति दूर, कुठे जवळ नच निवारा,
क्षुधित जीव देहभार वाहतो बिचारा, -
कधि विरामसूचक ती व्हायची तुतारी ? २
हो असाच आजवरी कितिदा मज भास,
अन बघतां कवटाळुनि जाहलों निराश !
अदय भूत कां तें मम करी दुर्विलास ?
काय वञ्चनींच वसे प्रीतिची सुमारी ? ३
तू का क्षीराब्धिसुता ? येशि कुणिकडून ?
पथ चुकलिस का धुक्यांत तूहि सापडून ?
अन्तर्हित हो जा वा भेट कडकडून !
पुरे पुरे चेष्टा ही जरी चारु सारी ! ४
ता. १५ फेब्रुवारी १९२९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP