माधव जूलियन - चन्दाराणी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[ओवी]
कोठे ती चन्दाराणी
राजस रूपखाणी,
गातात गोड गाणीं
कवि जिचीं ! १
श्यामल पटावरी
हिर्यांचा सडा पडे,
ट्पोरे त्यांत खडे
गुरु शुक्र. २
असोत तेजोगिरि
परन्तु चन्देपुढे
पडती ते बापुढे
मोलहीन. ३
साण्डतें तिचें तेज.
सुधेची होऊ वृष्टि,
रञ्जवी स्वप्रसृष्टि
चन्दाराणी. ४
ती का ही चन्दाराणी
फिकट दीनवाणी ?
जीवाचें होऊ पाणी
दिसतां ही. ५
ढगाची पाण्ढुरक्या
फाटली दिसे चिन्धी,
नभ:श्री लेऊ बिन्दी
ही का भाळीं ? ६
पेठेंत दिनभर
सुवर्णव्यवहार;
ढुङकून पाहणार
कोण हिला ? ७
सौभाग्यच्युत होतां
कोठून ती प्रतिष्ठा ?
अश्रूंनी माझी निष्ठा
हीस न्हाणी. ८
बोले तों चन्दाराणी
‘गाशी तू योग - गाणीं,
अजाण परी प्राणी
दिसशी तू. ९
अशोकवनामध्ये
लङकेचीं वैभवें तीं
जीवाला शान्ति देती
किमपि न. १०
त्याहून गोदातटीं
शीणल्या कष्टें देहीं
रुचती वल्कलेंही
सौभाग्याचीं. ११
हृदयीं ऊक ज्योति
भ्रमण दुज्याभोती;
आपत्ति हीच मोठी
दैव आणी. १२
आमुची चन्दाराणी
म्हणून गातां गाणीं;
स्वार्थच बघे वाणी
तुमची ही. १३
भ्रमतां अन्तराळीं
निस्तेज होतें तेव्हा
असतें माझ्या देवा -
जवळ मी. १४
चुकून कधी काळीं
मित्राशी तोण्डभेट
होतां तो काळ थेट
अशुभ का ? १५
कणव नका करूं !
नादांत फिरतें मी
विलीन मित्रप्रेमीं
चन्दाराणी. १६
५ ऑगस्ट १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP