माधव जूलियन - मराठबाणा
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[वृत्त वागीश्वरी]
महासिन्धु याला असे पाठिराखा, तसे साहय सहयाचलाचे कडे,
खडे दुर्ग साल्हेर, फोण्डा, पराण्डा, अशेरी असे दक्ष चोहीकडे;
महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, परी लोहपाणीहि अङगात या;
नद्या न्हाणिती तापि, कृष्णा नि गोदा, भिमा, मान्जरा, वैनगङगा तया. १
महात्मा खरा जो स्वधर्माभिमानी परी धर्मवेडास थारा न दे,
समत्वें गुणग्राहकत्वेंच योजी स्वकीयांस जो राष्ट्रकार्यामधे,
सदा वन्द्य जो क्षात्रकर्मप्रणेता महाराष्ट्रसम्राट शिवाजी प्रभू
तया पूज्य ती पूज्य तत्सेवकाला न का सन्तमाता महाराष्ट्रभू ? २
जिचा ‘अमृतातेंहि जिङकील पैजा’ असा बोल ये प्रत्ययाचा निका,
पहा भिन्नजातीय पुष्पाकरांहीं दिसे गालिचा की हिची वाटिका,
मराठी अशी ज्ञानदेवी जयाची असे मायबोली मराठीच तो,
ह्र्दीं रक्त दे साक्ष तो बन्धु माझा, कुठेही असो औच्च वा नीच तो. ३
मराठीस अन्याय कोठेहि झाला, स्वदेशीं विदेशीं कुणीं गाञ्जिलें
मराठी कसा मी न सन्ताप माझा धडाडे जरी तीव्र दुक्खानिलें ?
मराठी जनांचेंच वर्चस्व राहो स्वत:च्या महाराष्ट्रदेशीं तरी -
प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करूं अन्य हे वन्द्य वागीश्वरी ? ४
ता. ३१ डिसेम्बर १९२५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP