शिष्य :- ज्ञानसमाधि व हठयोगसमाधि यांत अंतर काय ?
स्वामी :- या दोहोंत हेंच अंतर आहे कीं हठयोगसमाधि आयस ( लोखंडी ) सुवर्णासारखी आहे व ज्ञानसमाधि मूल ( निसर्गसिद्ध ) सुवर्णासारखी आहे. लोखंडी सोनें याचा अर्थ किमयेनें लोखंडाचें जें कृत्रिम तर्हेनें बनवितात तें सोनें. असलें सोनें कालांतरानें पुन: लोखंड या मूलस्थितीला येतें, असा लोकप्रवाद आहे. यास आधार - वृद्धशिक्षेंत - योगे: समाहितसमाहितता मताय:स्वर्णोपमा त्वनुपमा प्रथमा मता य: । तत्राक्षम:य परमां परमात्मदत्तात्रेयाश्रयाद् गतिमियात् सततानुरक्त: ।
भावार्थ : - योगसमाधीपेक्षां ज्ञानसमाधि श्रेष्ठ असून ती ध्यानानें प्राप्त होते; म्हणून ध्यानाचा अभ्यास केल्यानें स्वरूपस्थिति प्राप्त होते. यास उदाहरण - आयस सुवर्ण व मूल सुवर्ण यांचा दृष्टांत वर दिलाच आहे. मूल सुवर्ण कधीहि बदलत नाहीं, परंतु आयस सुवर्ण कालांतरानें मूळ जातीवर जातें.
शिष्य :- ध्यानयोग सिद्ध झाल्याची खूण काय ?
स्वामी :- याची खूण आत्मसाक्षात्कार. स्वरूप - स्थिति प्राप्त होणेंच.
शिष्य :- ध्यानयोग धरल्यावर किती कालांत हें साध्य आहे ?
स्वामी :- याला अमुक अशी कालमर्यादा नाहीं. हें त्या साधकाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. शास्त्रवचन असें सांगतें कीं, मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय: । दुर्लभं त्रयमेवैतद् देवानुग्रहहेतुकम् ॥ ( वि. चू. )
भावार्थ :- वेदांतसाक्षात्काराला कालमर्यादा नाहीं. परंतु गुरुप्रसादानें व ईश्वरानुग्रहानें मात्र तो लवकर होणें शक्य आहे. यास दृष्टांत एकाद्यानें जसें स्वत:जवळील धन स्वेच्छेनें दुसर्यास दान देऊन त्यास सधन करून टाकावें तसें हें आहे. मनुष्यत्व व मुमुक्षुत्व हें असें कालाधीन आहे.
शिष्य :- बरे तें असो. पण साधकानें तरी दिवसांतून किती वेळ हें साधन करावें ?
स्वामी :- यास कालाचें अमुक एक प्रमाण नाहीं. सर्वच काळ हें करीत राहिलें पाहिजे. नुसतें ठराविक काम करून वेठ मारण्यानें व शपथेंतून सुटण्यानें हें जमणार नाहीं. ज्याला खरोखरीच ही अवस्था प्राप्त करून घेणें असेल त्यानें ‘ आसुप्तेरामृते: कालं नयेद् वेदान्तचिन्तया । ’ ( जीवन्मुक्ति ) रोज निजेपर्यंत व जीवांत जीव असेपर्यंत हें वेदांतचिंतन केलेंच पाहिजे, म्हणजेच तो वेदान्तसाक्षात्कार होतो.
शिष्य :- नुसत्या ईश्वरीप्रसादानें वा देवानुग्रहानें मुमुक्षुत्व येतेंच अशी खात्री आहे काय ? किंवा त्यालाहि पुनरपि कालाची जोड लागलेच ?
स्वामी :- मनुष्यत्व व मुमुक्षत्व हीं ईश्वरीप्रसादानेंच होतात. तथापि इतकें सर्व एकामागोमाग प्राप्त होऊन देवानुग्रह झाला तरी आत्मसाक्षात्काराचा कालहि यावाच लागतो. कारण या गोष्टीला कालाची अनुकूलता असावी लागते. अथवा दुसर्या भाषेंत बोलायचें तर या कामाला कालाचा प्रतिबिंब निघावा लागतो. उदाहरणार्थ - गर्भाधान झालें तरी मूल अव्यंग परिपूर्ण बनण्यास जी कालाची नवमासाची अवधि ती निसर्गनियमाप्रमाणें मिळालीच पाहिजे. सर्व योनिसंभवास हें अत्यंत आवश्यक कालबंधन आहेच. मनुष्यप्राणीहि योनिसंभव आहेच. अयोनिसंभव अवतारिक महात्म्यांची गोष्ट वेगळी.
शिष्य :- कालाच्या प्रतिबंधास कारणीभूत कोण ?
स्वामी :- कालाच्या प्रतिबंधास प्रारब्ध हेंच कारणीभूत आहे.
शिष्य :- मग हा कालाचा बांध निघण्यास उपाय ?
स्वामी :- यास उपाय अभ्यास व पूर्वसंचितभोग व क्रियमाण न करणें.
शिष्य :- याशिवाय प्रारब्धनाशास आणखी एकदा उपाय जोडीला आहे काय ?
स्वामी :- आहे, उपाय आहे, व तो म्हणजे ईश्वरीप्रसाद व सद्गुरु अनुग्रह. या दोहोंनीं व त्याच्या जोडीला अभ्यासानें तें प्रारब्ध नष्ट होऊं शकतें.
शिष्य :- सद्गुरु अनुग्रह व ईश्वरीप्रसाद कशानें होईल ?
स्वामी :- गुरुपाद्सेवेनें होईल. मात्र ती सेवाहि तशीच एकनिष्ठपणें व अनन्यभावानें झाली पाहिजे.
शिष्य :- गुरुसेवेनें तरी त्यांचा अनुग्रह व प्रसाद आपले मनाप्रमाणें लवकर होऊं शकेल काय ?
स्वामी :- त्याची खात्री नाहीं. हें सर्वस्वीं त्यांच्या अधीन आहे. त्यांनीं मनांत आणलें तर तें ताबडतोब होऊं शकेल. पण तें त्यांच्या मनांत येणें न येणें हे केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहील.
शिष्य :- यास आणखी कांहीं उपाय ?
स्वामी :- यास उपाय एकच. तो हा कीं, शिष्यानें आपल्या नि:सीम सेवेनें सद्गुरूंचें मन आपल्याकडे वेधून घेतलें पाहिजे. तान्ह्या मुलास जशी कडकडून भूक लागली असतां टाहो फोडून तें कळवळून रडूं लागतें व असें होतांच त्या तान्हुल्याची माता मग कितीहि कामांत गर्क असो, तें सर्व काम टाकून आधीं त्या आपल्या बालकास स्तनपान करून त्याची भूक शमविते तसेंच हुबेहूब येथें आहे. मूल जोंवर हंसत खेळत आहे व आपल्याच नादांत आहे, त्यास मातेची जरूरी नाही, तोंपर्यंत ती तरी त्यास कशास मुद्दाम उचलून घेईल व पाजील ? म्हणून मुमुक्षूला कडकडीत वैराग्याची भूक लागल्याशिवाय त्या सद्गुरुमाऊलीचें चित्त त्याचेकडे वळणारहि नाहीं व त्यास ज्ञानामृत पाजून त्याची ज्ञानभूक भागविणार नाहीं. यांत काय तें समजून घ्यावें. याचा अर्थ गुरूचें चित्त वेधण्याचा सर्व बोजा शिष्यावरच पडतो. गुरु कृपा करीत नाहीं म्हणून त्यांचेवर रुसून जाणार्या शिष्याचा जो तोटा करीत नाहीं म्हणून त्यांचेवर रुसून जाणार्या शिष्याचा जो तोटा होतो त्याचें कारण त्यांच्या ठिकाणीं गुरुभक्तीचा अभाव असतो हेंच होय. मघाशीं दिलेल्या शिशुमातेच्या उदाहरणावरून हें नीटपणें कळलेंच असेल.
शिष्य :- होय, मला आतां अगदीं बरोबर रीतीनें कळलें. आम्ही आपली फिर्याद नेल्याशिवाय राजानें तरी आमचेबद्दल चौकशी कां करावी ? तसेंच येथेंहि दिसतें. बरें तें असो. आतां माझें असें म्हणणें आहे कीं, कोणत्याहि उपायानें कां होईना जर स्वकर्मानुष्ठानानें अथवा दैववशात् ज्ञान प्राप्त झाल्यास तेवढ्यानें भागेल काय ?
स्वामी :- नाहीं, तेवढ्यानें मुळींच भागणार नाहीं. तसें असतें तर शुक्राचार्य हे जन्मत: ज्ञानीच होते, पण तेवढ्यानें त्यांचें भागलें नाहीं.
शिष्य :- तर मग त्यांना काय अधिक करावें लागलें ?
स्वामी :- त्यांना अभ्यास करावा लागला.
शिष्य :- कसला अभ्यास व तो कशासाठी ?
स्वामी :- योगाचा अभ्यास व तो स्थितप्रज्ञतेसाठीं. ज्ञान झालें तरी त्याचा स्वत:वर अंमल होण्यास म्हणजे तें ज्ञान निरंतर अंगीं बाणण्यास हा अभ्यस बराच कालपर्यंत केला पाहिजे. इतका कीं, कोणत्याहि अवस्थेत आपणास एकच हा निदिध्यास लागला पाहिजे. स्थितप्रज्ञता म्हणतात ती यालाच. ‘ मुक्तिस्तस्य ज्ञानात् तच्चाभ्यासात् स च स्थिरे देहे । ’ ( र. हृ. १०, १० )
शिष्य :- श्रीशुक्राचार्यांनीं हा अभ्यास कसा केला व त्यांना कोणता गुरु हा अभ्यास करविण्यास लाभला ?
स्वामी :- शुक्राचार्य जरी उपजत ज्ञानी होते व त्यांचा जन्म होतांच ते सर्व टाकून नग्न स्थितींत पळूं लागले तथापि तेवढ्यानें भागणार नाहीं हें जाणून त्यांचे वडील श्रीमहर्षि व्यास यांनीं त्या शुकाला ‘ अरे शुका, इकडे ये, तुला कांहीं उपदेश करावयाचा आहे ’ म्हणून हांक मारली. पण शुक वृत्तीवर नसल्यानें त्यास ऐकूंहि आलें नसावें व म्हणून ते निसूर पुढें चालूं लागले. शुकांची बापानें पुण: कळवळ्यानें हांक मारतांच शुकाचें जरी तिकडे लक्ष गेलें नाहीं तरी सर्वजगत्स्वरूपी झालेल्या शुकानें म्हणजे आजूबाजूच्या वृक्षलतादिकांनीं ‘ ओ, ओ ’ म्हणून व्यासांच्या हांकेस प्रत्युत्तरें दिलीं. शुक पुढें चाललाच होता. त्यानें परतूनसुद्धां मागें बघितलें नाहीं. हें पाहून श्रीव्यास इतकेंच मोठ्यानें ओरडून त्यास म्हणाले कीं, ‘ बरें तर, वत्सा, माझें न ऐकतां व मागें न फिरतां, पुढें जातोस तर जा, पण एक कर कीं, तूं जातांना विदेही जो जनक राजा त्यास एकवार भेटून जा, व त्यांचें तरी ऐक. ते तुला गुरु शोभण्यसारखे आहेत. तूं जरी जन्मत: ज्ञानी असलास तरी गुरुसेवेवांचून व त्यांच्या कृपेवांचून सर्व मोक्षमार्ग व्यर्थ आहे हें ध्यानांत असूं दे म्हणजे झालें । याप्रमाणें येथून पुढील कथाभाग महाभारतांत शुकजनक संवादरूपानें आहेच. पण त्याचें पर्यवसान पुढें असें झालें कीं, शुकाचार्यास गुरूपदेश घ्यावा लागून उपजत ज्ञान असतांहि दृढ अभ्यास करावा लागलाच. तोहि थोडा थोडका नसून बराच कालपर्यंत. यासाठीं त्यांनीं कडक तपश्चर्या आरंभून स्थितप्रज्ञता अंगी बाणण्यास १०००० वर्षें समाधींत घालविली.
शिष्य :- आपण मला जो हा सद्गुरुमहिमा सांगितलात तो उत्तम रीतीनें कळला, व केवळ ज्ञान असूनहि तें अभ्यासावांचून निरर्थक हेंहि कळलें. पण अभ्यास करण्यास गुरूची आवश्यकता कां ? त्यांचे आज्ञेवांचून तो होऊं शकत नाहीं कीं काय ? अशी माझी सरळ शंका आहे.
स्वामी :- गुरूची आवश्यकता आहेच. कां कीं, आपल्या मतें कोणतीहि गोष्ट कितीहि बरोबर असली तरी ती तज्ज्ञानें तपासल्याशिवाय खरी नव्हे. उदाहरणार्थ - एकाद्या चित्रकारानें कितीहि कसून एकाद्याचें चित्र रेखाटलें असलें तरी तें जोंपर्यंत् दुसर्यानें पाहून ओळखतां आलें नाहीं तोंपर्यंत व्यर्थ. क्वचित् असेंहि होतें, चित्रकार तें चित्र रेखीत असतां त्यांत अगदीं तन्मय झालेला असतो, व त्यामुळें आपण केलें तें सर्वस्वीं बरोबर आहे अशी त्याची समजूत असते. तथापि त्याचेप्रमाणें ही समजूत इतरांची होईल तेव्हां खरें. नाहींतर कावीळ झालेल्याला सर्व जग पिंगळें दिसत असतें म्हणून सर्व खरोखरीच तशा रंगाचें असतें काय ? नाहीं. हा केवळ त्या रोग्याचा पित्तदोष होय. तसेंच चित्रकाराचेंहि आहे. खुद्द चित्रकारहि आपली तन्मयता थोडा वेळ बाजून ठेवून आपलें चित्र कांहीं काल मह्द्यें सोडून व कांहीं जागा सोडून मागें जाऊन पुन: आपली कृति नव्या दृष्टीनें पाहूं लागतो, त्यावेळीं त्याल आपल्या राहिलेल्या पूर्व चुक्या पुन: दिसूं लागतात. एरव्हीं नाहीं. इतकेंहि करून त्याचें चित्र अगदीं निर्दोष होतेंच अशी त्याची खात्री नसते म्हणून तर त ओ पुन: आपणांस सोडून इतरांस तें दाखवीत असतो, त्याला स्वत:ला जरी आपलें चित्र चांगलें झालें आहे म्हणून मनांतून आनंद झालेला असतो, तरी जोंपर्यंत तज्ज्ञांनीं त्याची परीक्षा करून आपले अभिप्रायाचा शिक्का मारला नाहीं व तें चांगलें झालें असें म्हटलें नाहीं तोंपर्यंत व्यर्थच. पण एकदा कां त्यांच्या पसंतीस पडलें म्हणजे चित्रकाराचाहि आनंद दुणावतो व त्यालाहि आपली कृति निर्दोष झाल्याचा आनंद वाटतो. हा अनुभव एकवार खुद्द चित्रकारासच विचारून पहा. हीच थेट स्थिति सर्व गोष्ठींविषयींची आहे. नामदेवाला वाटलें कीं आपण पूर्ण भक्त तेव्हां आपण पोंचलों. पण जेव्हां सर्व संत मंडळीं एकत्र बसलेली पाहून गोरा कुंभारांनीं सर्वांच्या टपलीं आपल्या हातांतील गाडगें घडवावयाचें थापटणें थोपटलें व हीं मानवरूपी गाडगी कच्ची कीं पक्कीं परीक्षा केली तेव्हां त्यांस आढळलें कीं नाम्या कच्चा ! त्यांनी मग नामदेवास सांगितलें कीं ‘ बाबारे, तूं अजून कच्च आहेस, गुरु करून घे. त्यावांचून तुला सद्गतिहि नाहीं व सुटकाहि नाहीं. पुढें नामदेवांनीं गुरूकडून आपला कार्यभाग साधला. म्हणून लक्षांत ठेवावें कीं, आपलें ज्ञान सर्वांगपरिपूर्ण होण्यास व तें चोख आहे असें समजण्यास त्याची परीक्षा दुसर्याकडून करून घ्यावी लागते व तेव्हांच तें दृढ होतें असें समजावें. गुरूची आवश्यकता कां आहे हें यावरून कळलेंच असेल. व्यवहारांतहि हें सोनें किती नंबरी आहे हें पाहण्याकरितां आपण सरकारी छापाच्या माणसाकडे अथवा सराफाकडे आपलें सोनें त्याचा कस, हीन इत्यादि तपासण्याकरितां जात नाहीं काय ? तसेंच येथेंहि आहे. आपणास समजतें असें वाटत असलें व तें एक वेळ खरेंहि असलें तरी त्यावर जगताचा छाप हा बसलाच पाहिजे. नंतर तें सर्वतोपरी सिद्ध झालें असें जाणावें. याप्रमाणें ही गुरूची आवश्यकता असतेच असते. नुसत्या जगाला विचारलें अथवा त्याकडे पाहून आपण थोडीहि गोष्ट उचलली व ती शिकलों तरीहि जग हें आपलें गुरुच झालें. श्रीदत्तांनींहि चोवीस गुरु असेच केले. यावरून आपणाव्यतिरिक्त जग गुरुस्थानीं नव्हे असें कसें म्हणतां येईल ? आपण जगांत आहोंत तोंपर्यंत आपलें जगावांचून यत्किंचितहि चालणार नाहीं. म्हणून अशा प्रसंगी कोणी आपल्याला योग्य गुरु न मिळाला तर निदान जगद्गुरूस म्हणजे जगद्रूपी गुरूस शरण जाऊन आपला कार्यभाग साधावा. याचा अर्थ निदान जगापासून तरी ज्ञानाचे व अभ्यासाचे धडे घ्यावेत. जन्मत: मता गुरु, पुढें पिता गुरु, पुढें ज्ञानदाता गुरु, पुढें जगद्गुरु व शेवटीं परमात्मा गुरु याप्रमाणें एकसारखी पायरी पायरीनें गुरुपरंपरा आहेच. मिळून काय सर्वत्र गुरुमयच आहे. म्हणून गुरूची योग्यता जी साक्षात् परब्रह्माइतकी म्हणून खालील श्लोकांत सांगितली आहे ती यासाठींच. ‘ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥ या श्लोकांत सर्वच गुरु म्हणून सांगितलें आहे तें एवढ्याचकरितां. याप्रमाणें गुरूचें माहात्म्य आहे.
शिष्य :- मला हें गुरुमाहात्म्य पक्कें ठसलें. आतां मी असें विचारतों कीं, तो गुरु आहे तरी कसा अथवा असतो तरी कसा हें कळेल काय ?
स्वामी :- हो, आम्ही स्वत: आमच्या गुरुमहाराजांचे ठायीं जे गुण पाहिले आहेत ते तुम्हां सर्वांस ऐकून तरी माहीत असतीलच. नसल्यास त्यांचें एकवार श्रवण करा म्हणजे समजेल. अथवा याहिपेक्षां थोडक्यांत म्हणजे श्रीसद्गुरु श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य वासुदेवानन्दसरस्वती यांनीं केलेली ‘ श्रीगुरुस्तुति ’ च एकवार पठण करा म्हणजे झालें. त्यांत ९ श्लोकांत सर्व काहीं गुरूचे गुण आणलेले आहेत.