मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
निव्वळ भ्रांती

निव्वळ भ्रांती

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- काय लिहून तरी करायचे आहे ? लिहिले, लागेल तितके
लिहिले, काय त्याचा उपयोग ?
- हं: उपयोग ? ते वाचून रडायचा !
- काय तर ! आणि पुन: आहे काय त्याच्यात ? मला नाही
वाटत कोणाला काही आवडत असेलसे. खंडीभर प्रश्नचिन्हे,
उदगारचिन्हे आणि डॅशेस् ! फार झाले तर आग, भडका,
हायहाय आणि हुईहुई !
- खरेच ! मलासुध्दा असेच वाटते की, काय आहे त्याच्यात ?
पण मी तरी काय करु ! वेड्यासारखा अतिशय गोंधळून
जाऊन मीच जिथे तिथे डॅशेस् घेत बसलो आहे, तर
उद्गारचिन्हाशिवाय आणि हाय हाय आणि हुईहुई शिवाय
दुसरे माझ्या लिहिण्यात तरी काय असणार आहे ?
- तू रडू नकोस ! पण मला आपले वाटते की, लिहून लिहून
तरी काय मिळणार आहे ?
- कीर्ती ? पण छे ! ती कुठली मला मिळायला !
- कीर्ती ? हं: काय त्या कीर्तीत आहे, मला काही समजत
नाही ! निव्वळ भ्रांती आहे झाले !
- ती मिळायची नाही मला ठाऊक आहे. पण मला की नाही
रहावतच नाही. धावतो आहे झाले !
- अजून तरी तिचा नाद सोड. माझे ऐक.
- नको माझे असे वरचेवर हातपाय मोडूस !
- बाबारे, तिच्यापायी आपले जीवित आणि हा संसार
दिवसेंदिवस उजाडच होत चालला आहे !
- हरहर ! नको या यातना !
- मरेपर्यंत ती तुला काही मिळायची नाही. आणि मेल्यावर
तरी काय ? फार झाले तर एखाद्या मोठ्या वर्तमानपत्रात ती
म्हणेल की, " कळविण्यास अत्यंत दु:ख वाटते की, मराठी
वाचकांच्या पूर्ण परिचयात असलेले कविवर्य - "
- हं: !
- " दिवाकर यांस.... रोजी....ने देवाज्ञा झाली ! हे मोठे
प्रतिभाशाली, स्वतंत्र आणि जोरदार विचारांचे कवी होते.
यांचा पाश्चिमात्य काव्यनाटकांचा व्यासंग फार जबर होता."
झाले संपले !
- हं: हं: हं: !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP