मी कोण ?
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- आपल्या बापाला आताशा तू फार भितोस. नुसते नाव
काढले तर इतका थरथर कापतोस ?
- भितो आणि थरथर कापतो इतकेच नाही, पण त्यांना
पाहिले, किंवा त्यांची नुसती आठवण झाली की, पुष्कळ
वेळा एकदम असे रडूच कोसळते !
- पहा आहे ! लागला पुन: रडायला. प्रभाकर ! असा एकांतात
तू लागले तितका रड. पण बाह्य जगात तरी असे करीत
जाऊ नकोस. कारण, मला अतिशय त्रास होतो. एकीकडे
तू रडायला लागतोस, तोच दुसरीकडे व्यवहारात फजिती
होऊ नये म्हणून, वरवर हसत हसत, तुझे रडणे थोपवून
धरता धरता माझ्या ह्रदयाला किती कळा लागतात म्हणून
सांगू ! डोके अगदी फुटायची वेळ येते !
- मला की नाही अतिशय यातना होतात ! मी तरी काय
करु ?
- ते खरे. पण इतके तुला आपल्या बापाबद्दल वाटायला, तू
असे त्याचे केले आहेस काय ?
- मी काय केले आहे !’ न - को !
- भारी बोवा तू रडका आहेस ! हे काय हे !
- त्यांच्या मोठमोठ्या सुंदर आशा ढासळून टाकल्या, त्यांचे
हातपाय मोडूनम त्यांच्या खर्या प्रभाकराचा मी खून केला !
- त्यांच्या प्रभाकराचा तू खून केलास ! मग तू कोण ?
- मी ? त्यांच्या जीवाचे रात्रंदिवस काळजीने ओरबाडे काढून,
त्याला भणभण भणभण भटकायला लावणारे, त्यांच्या
प्रभाकराचे थरथर कापणारे हे पिशाच्च !
- काय पिशाच्च !
- होय ! आपल्या बापाच्या, सर्व कुटुंबाच्या आशान् आशा
जाळून, त्यांची तोंडाला राख फासून, चोरासारखे लपतछपत
भीतभीत फिरणारे हे पिशाच्च आहे ! नको ! या यातना ! -
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP