सहज बोलणी
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- वा ! काय पण कारण सांगितले !
- का ? काय झाले ?
- म्हणे, माझा दोन दिवस उजवा कान ठणकत होता, म्हणून मी
तुमच्याकडे आलो नाही.
- हो मग, बरोबर आहे. यात बिघडले कोठे ?
- काय बरोबर काय आहे ? मला थापा देतोस ? राजश्री, न जाण्याचे
कारण दुसरेच आहे.
- मला सांग ना काय आहे ते - हं:
- असे हसण्यावारी नेऊ नकोस. परवा त्याच्या बायकोशी सहज बोलता
बोलता तुला काय पाप - वासना झाली रे ? बोल, बोल आता. लपवून
नको ठेवूस.
- हो झाली खरीच. आणि म्हणूनच मी त्याच्याकडे दोन दिवस गेलो
नाही. किंचित चळवळ करु लागलेली पापवासना जागच्याजागीच
नाहीशी व्हावी, म्हणूनच मी हे असे केले.
- हां आता कसे खरे कारण बाहेर पडले.
- अरे पण हेच खरे कारण त्याला काय सांगायचे ?
- शाबास ! त्याला जर हे सांगितले असते, तर त्याने पुन: दारात उभे
तरी राहू दिले असते ?
- नाही, ते नाही मी म्हणत रे.
- मग काय ?
- केलेस हे ठीकच केलेस. पण तुला आपली मजा सांगून ठेवतो की,
पुष्कळ वेळा बोलणी पाहिली तर अगदी साधी साधी असतात, पण
त्यांची विषारी मुळे इतकी खोल खोल गेलेली असतात की, त्यांचा
कधी आजन्मात पत्तासुध्दा लागायचा नाही !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP