तोंडपूजा - छे, व्यवहार
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- पण हे करायचे कसे ?
- काय वाटेल ते म्हण. मला तर दुसरा आता काही उपाय
सुचत नाही.
- त्याचे लिहिणे तर आपल्याला मुळीच आवडत नाही, असे
असून त्याच्या तोंडावर म्हणायचे ? की आपले लिहिणे
मला फार - अतिशय आवडते म्हणून ?
- हो ! असेच करायला हवे.
- छे बोवा ! मनात एक आणि बाहेर एक असे वागणे म्हणजे
कसेसेच वाटते.
- आता काय सांगावे ! अरे नेहमीच सरळपणा ठेवून चालत
नाही.
- ते खरे पण आपले काम साधून घेण्याकरता दुसर्याची
फ्लॅटरी - वरवर स्तुती करणे म्हणजे - छे ! ते नाहीच
उपयोगी ! आपले काम काय असेल ते सरळ सांगावे
म्हणजे झाले !
- पहा बोवा, मला नाही वाटत बरे पुन: काम तर झालेच
पाहिजे मग ?
- मग काय ? तू आपले माझे ऐक.
- बरे तर.
- काय रे, तुला असे का वाटते की मलासुध्दा हे करणे
आवडते, म्हणून ?
- नाही. तसे नाही मी म्हणत.
- खरोखर मनात एक आणि बाहेर एक, असे दुहेरी वागण्याचा
अगदी किळस येतो ! पण नाइलाज आहे. आम्हाला चटच
लागलेली. जाणूनबुजून आम्ही एकमेकांची स्तुती करतो.
आणि स्वत: करवूनही घेतो ! खरा व्यवहार म्हणतात तो
हा !
- हं: आणि सरळ वागणारा व्यवहारशून्य !
- हो, मग तसेच आहे ! बरे ते जाऊ दे. मग काय उद्याचे
ठरले ना ?
- हो -
- अशी त्याची स्तुती करतोस की यंव !
- नाही, ते मी करतो, पण -
- ह्य: ! आता कसला आला आहे पण ! फार भित्रा बोवा तू
खरेच !
- राह्यले ! उद्या तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळे करतो मग तर
झाले !
- हां. आता ठीक.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP