तुलाच कमीपणा
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- आला ! पुन्हा तोच विचार आला !
- अलिकडे... तो असा दोनचार वेळा येऊन गेला ! हं, चल लाव, आधी हुसकून लाव त्याला ! थारा म्हणून देऊ नकोस... ! नाहीतर...
- नाहीतर !... अरेरे ! हे सगळे पैसा !... दारिद्र्यापायी बरे !
- खरे आहे ! पण... किती किळसवाणा आणि भयंकर विचार हा !
- अन् अशा मध्यरात्री... तो तुझ्या डोसक्याचे ओचकारे काढतो आहे, हे जर कोणाच्या लक्षात आले...
- तर सगळीकडे छीः ! थूः ! नको ! नको !!...
- पैशाकरता....
- चूप ! कोणी ऐकेल
- ख्रिस्ती होण्याचा विचार ! अन् तो माझ्या डोक्यात - ?
- ऐक !... पैसा म्हणतो आहे, ‘ हं हं कसा आता बंगला आहे ’
- खरे आहे बाबा !... माझ्यासारख्याच्या डोक्यात जर हा विचार वारंवार येतो, तर दुष्काळात ‘ अन्न ! अन्न ! ’ म्हणून तडफडणारे प्राणी घासभर अन्नासाठी जर ख्रिस्ती झाले - तर काय बरे आम्ही... अरे हतभागी दुर्दैवी प्राण्यांनो... क्षमा करा ! तुमची जर कधी मी थट्टा केली असेल, तुम्हाला नावे ठेवली असतील तर बाबांनो ! - मला क्षमा करा ! अन् परमेश्वरा ! - अरे येशू ख्रिस्ता ! ‘ पैशाकरता, अन्नाकरता ख्रिस्ती हो ! ’ असा तुलाच कमीपणा आणणारा विचार नको ! - अतःपर कोणाच्याही मनात तू तरी येऊ दे नकोस !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP