ढोंगी जग
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- अरे, तो बराच आजारी आहे म्हणे रे ?
- हो, असे मघाशी ऐकले खरे.
- मग ?
- मग काय ?
- त्याच्या समाचाराला जायचे आहे का ?
- जाऊ दे ! कोण जात बसतो अन् येत बसतो.
- तसे नाही. तो अतिशय आजारी आहे, तेव्हा -
- असेल ! तो आजारी असो नाहीतर तिकडे काय वाटेल ते
होवो ! आपल्याला नाही जरुर !
- पण गेले तर बिघडते कोठे ? काही नुकसान तर नाही
होत ? झाला तर एखादे वेळी थोडाबहुत फायदाच होईल.
- आता काय आणखी फायदा व्हायचा आहे ? धडधडीत
त्याने इतका आपला अपमान केला, इतके नुकसान केले,
असे असून त्याच्या उंबर्यात पुन: पाऊल टाकायचे ?
- ते खरे ! पण लोकचाराकरिता जायला पाहिजे, नाही तर
वाईट दिसते ! त्याचा आपला जर बराच -
- मोठा चमत्कार आहे ! मनातून तो माणूस जवळ जवळ
मरावा असे वाटते ! इतका त्याच्याबद्दल संताप ! असे
असून म्हणे त्याच्या समाचाराला जावे !
- पण एकदा जाऊन येईनास. बाबारे, जगात वागायचे म्हणजे
ही सगळी संधाने संभाळावी लागतात. केव्हा कोठे कशाचा
फायदा होईल याचा नेम नसतो. तेव्हा आपले जा झाले.
- नको बोवा ! वीट आला या ढोंगी जगाचा ! नाही ! आपण
साफ जाणार नाही !
- तू ऐकत नाहीस हे चांगले नाही बरे !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP