चित्रापुरगुरुपरंपरा - सारस्वतांचें मूळ
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ॐ तत्सत्॥
॥श्रीसद्गुरवे नमः॥
सारस्वत ऋषी वसती । सरस्वतीतीरीं निश्चितीं ।
श्री परशुरामें तयांप्रती । आणिलें पाचारुनी जगत्काजा ॥१॥
निःक्षत्रिय मेदिनी केली । सकलही विप्रां दान दिधली ।
रहावयासी ना राखिली । आपणा भार्गवें तिलमात्र ॥२॥
परी विप्र ना तोषले । म्हणती आणिक द्यावीं स्थळें ।
आशाळभूत विप्रीं संत्रस्त केलें । भार्गवा त्रास जाहला ॥३॥
म्हणोनि सकळही द्विजांसी देवोनी । सागर हटविला झणीं ।
स्वयें निर्मिलें स्थान दक्षिणीं । सह्यगिरीचे सन्निध ॥४॥
तेथे अरण्य असे अपार । न वसती सुबुद्ध विप्र ।
अनार्य जाती अतिक्रूर । ऐसे जीव वर्तती ॥५॥
तयांचा व्हावा उद्धार । म्हणोनि परशुरामें केला आचार ।
आणिले विप्र थोर थोर । ऋषिवंशज त्या प्रांतीं ॥६॥
तयांसी देवोनि अधिकार । दक्षिणदेशीं वाढविला आचार ।
धर्ममार्ग वाढविला अपार । वेदाधारेंकरोनी ॥७॥
त्या बहुगोत्री विप्रांमाजी । सारस्वतही आले त्या काजीं ।
काश्मीर प्रांतांतुनी हो जी । आणिलें देवें तयांसी ॥८॥
कांहीं काळ धर्ममार्ग चालिला । पुढें अवकळा आली धर्माला ।
परधर्मियांचा घाला । आला तये दक्षिणेंत ॥९॥
तैं सकलही विप्र भयभीत झाले । आसुरी संपत्तीनें त्रासिले ।
अभिचार-योगें जन ग्रासिले । विप्रां आघात करिताती ॥१०॥
जीव, धर्म रक्षायाकारण । गेले आन आन ग्रामांतून ।
सांडोनियां साच नामें आन । आन ग्राम नामें, घेती ॥११॥
पुढें जाहले स्थिर स्थावर । तैं सारस्वतीं जाहले दोन शाखाप्रकार ।
एक गौड एक सारस्वत विप्र । मठ दोन जाहले ॥१२॥
गौडांमाजीं शहाण्णव कुळें । त्यांहीं या दुजियांस हीन लेखिलें ।
म्हणती सारस्वतां दाखवा भले । स्वामी आचार्य कोण तुम्हां ॥१३॥
तुम्ही म्हणतां वेदाधिकारी ज्ञाती । सारस्वत आपणां निश्चिती ।
वेदाधारें चालाया इथे प्रांतीं । कवणें तुम्हां कथियेलें ॥१४॥
कवण तुमचे मठाधिपती । कवण तुम्हां आचार्य असती ।
झणीं दावा आम्हांप्रती । नातरी शूद्रासम मानितों ॥१५॥
भय उपजलें सारस्वत द्विजांसी । म्हणती कोपला शंभु आपणांसी ।
भवानीशंकरा गती कैसी । सारस्वत ज्ञातीची ॥१६॥
तूं कर्पूरगौर शिव थोर । तूंचि मातापिता केवळ ।
काय अपराध घडिला अघोर । म्हणोनि ऐसा कोप केला ॥१७॥
कां बा कोपलासी देवाधिदेवा । तुजवीण कवण आधार बरवा ।
उमापती धांवें देवाधिदेवा । अंत आतां न पाहीं ॥१८॥
तूंचि संकटें निवारोनी । पुनरपि आम्हां मार्ग दावुनी ।
सारस्वतां स्वधर्माचार जनीं । पुनरपि लाचीं थे वेळां ॥१९॥
सकळ अपराध क्षमा करावे । लेकुरां आम्हांसी रक्षावें ।
धांवोनियां झणीं यावें । काशीनिवासी विश्वेशा ॥२०॥
सारस्वत विप्र थोर । कर्म-ज्ञान भक्ती अपार ।
निष्ठावंत आचार फार । तयांनीं अनुष्ठान मांडिलें ॥२१॥
म्हणती आम्हां कवण स्वामी । कवण आचार्य स्वधर्मीं ।
मृडानीवरा सत्य दावीं स्वामी । नातरी प्राण सांडूं हो ॥२२॥
अनुष्ठान अनशनपूर्वक । कांहीं काळ चालविलें देख ।
पाहोनि ज्ञानी विप्रांचा भाव एक। गौरीहर कळवळला ॥२३॥
आपुल्या बाळांचा आर्तस्वर । कानीं पडतांचि थोर ।
सकळही विसरोनि निजकर्मावार । माता धांवे त्यासाठीं ॥२४॥
तेवीं सारस्वतज्ञातिबाळक । कळवळले अनन्य एक ।
तें पाहोनि अंबेसहित देख । हिमतनयापति द्रवलासे ॥२५॥
सांडोनि कैलासींचे स्थान । सांडोनि नंदी वाहन ।
भक्तांसाठीं होवोनि सगुण । मुनिरूपें पातला ॥२६॥
परमहंस परिव्राजकाचार्य । आपणचि स्वयें जाहला भक्कप्रिय ।
आणि सांगे सारस्वतज्ञातिवर्य । आपण असें म्हणोनी ॥२७॥
द्वारकापीठावरोनि पाठविले । परिज्ञानाश्रम-स्वामी पहिले ।
साक्षात् शंकर, भक्तांसाठीं खेळे । भक्तभाव पाहोनी ॥२८॥
द्वारका-काशी पीठ एक । काशीमाजीं मठ सुरेख ।
काशीपीठीं द्वारकेहूनि देख । आले आश्रम यति ते ॥२९॥
मूळ-आधम द्वारकापीठ। कांहीं कारणें काशीमठ ।
दों ठायीं अधिकार वर्तत । ऐसा प्रकार जाणावा ॥३०॥
जरी वाराणसीहूनि आले । तरी द्वारकापीठस्थ मूळांतले ।
त्याकारणे कथियेलें । द्वारकेहूनि आले कीं ॥३१॥
धाडिलें द्वारकेहूनि । संरक्षाया ज्ञातीलागोनी ।
स्वयें आली जगजननी । भवानी दुर्गा आपण ॥३२॥
गजानन ऋद्धिसिद्धींसहित । सवें पातला निश्चित ।
अधिकारियांसवें येत । सकळही सेवक सहजचि ॥३३॥
तैसा शक्तीसहित उमारमण । आला सारस्वतांलागोन ।
प्रकटोनि सांगे आचार्य आपण । असें सारस्वतांचा ॥३४॥
आद्य श्रीमत् जगद्गुरु आचार्य । ज्यांनीं चारी धामीं केलें कार्य ।
चारी पीठांवरी, गुरुवर्य । स्थापिती शिष्यांलागोनी ॥३५॥
तयांतील सारस्वतांकारण । द्वारकापीठस्थ आम्ही जाण ।
आलों आतां करावया स्थापन । मठ येथे ज्ञातीस्तव ॥३६॥
म्हणती घ्यावी शंका फेडोनी । आम्ही आलों त्याच कारणीं ।
करा वादविवाद जनीं । जें जें वसे मानसीं ॥३७॥
म्हणोनि वेद उच्चार । ऋक्, साम, यजु थोर ।
सकळही शास्त्रविचार । श्रुतिसंमत स्मृतीही ॥३८॥
अष्टादश पुराणांसहित । उपनिषदें, ब्राह्मणग्रंथ ।
सकळही या हो शंकानिरसनार्थ । शंकरें आपणा पाठविलें ॥३९॥
न करावा छळ सारस्वतांचा । तो धर्म नाहीं कामाचा ।
सकळ जनहो विचार स्राचा । करा आत्महितार्थ ॥४०॥
नका जाऊं भ्रमोनी । नका उन्मत्त होऊं जनीं ।
नका गर्वैं व्यर्थ फुगोनी । घातक न व्हावें निजहिता ॥४१॥
आम्ही सारस्वतांचे आचार्य । नाम आमुचें परिज्ञानाश्रम गुरुवर्य ।
वेदमार्ग - आचार दावावया, अभय । द्यावया आलों ज्ञातीसी ॥४२॥
गोकर्णीं स्थापिलें सारस्वत पीठ । द्विज केले सकळ संतुष्ट ।
म्हणे आतां न करावे कष्ट । आलों भक्ति जाणोनी ॥४३॥
आमुचे आज्ञेनुसार । करावा सकळ ज्ञातीनें आचार ।
वेदाज्ञेनुसार वर्णाश्रम थोर । धर्म आपुला सेवावा ॥४४॥
गोकर्णी पीठ प्रथम स्थापिलें । उमेसहित शिवा पूजिलें ।
भक्तजन मार्गीं लाविले । परिज्ञानाश्रम गुरुवर्ये ॥४५॥
प्रथम समाधि गोकर्णांत । जेथ महाबळेश्वर नित्य ।
सागर समीप असे वसत । भवानी-शक्तीसहित तो ॥४६॥
तेथोनि दुजे शंकराधम । चित्रापुरीं (श्रीवल्लीं) घेती समाधि परम ।
आणि अवतारकार्यक्रम । तेथें आपुले संपविती ॥४७॥
तेथेंचि द्वितीय परिज्ञानाश्रम । वास करिती उत्तम ।
शंकराधम स्वामींस धर्म । वाढवावया घेतलें ॥४८॥
चित्रापुरीं श्रीवल्लीसी । आचार्यपीठ निर्मिलें स्वयेंसीं ।
विप्रां आनंद अपारेंसीं । जन सकळ संतोषला ॥४९॥
तेव्हां कळले गौडांसी । वैष्णव स्मार्त जनांसी ।
सारस्वतांची परंपरा कैशी । कवण आचार्य तयांचे ॥५०॥
कवण ऋषी, कवण गोत्रींचे जन । सकळही आलें फळोन ।
सांडोनि दुरभिमान पूर्ण । लीन जाहले त्यांपायीं ॥५१॥
सकळ द्विजांसी पारणें करविलें । अभय देवोनि रक्षिलें ।
माहात्म्य भक्तांचे दाविलें । कलीमाजीं खलजनां ॥५२॥
मग सकळही उमजले अंतरांत । न करिती अवहेलना तेथ ।
साक्षात् उमारमण येथ । कैसा आला न उमजे ॥५३॥
परी जयांनीं छळ केला । तयांवरीही न कोपला ।
तयांसीही देता जाहला । अभय देव-स्वामी वरू ॥५४॥
तयांतीही ज्ञान कथिले । म्हणे आपुले आचार करा भले ।
आपल्या आश्रमधर्माधारें । आचार्य आज्ञें वर्तावें ॥५५॥
न करावा द्रोह द्वेष । तुम्हां आम्हां एकचि ईश ।
सकलान्तरा वसे परेश । तोचि एक सेवावा ॥५६॥
तयांसीही गौरविलें । सारस्वतांसी रक्षिलें ।
आचार्य परंपरापीठा केलें । स्थापन तयांकारणें ॥५७॥
मांडिली उपासना थोर । करावया जगदुद्धार ।
नाना रीती श्रीगुरुवर । लीला दाविती जनांसी ॥५८॥
यापरी श्रीमत् परिज्ञानाश्रम । पूर्ण करोनि अवतारकाम ।
शिष्य घेवोनि द्वितीय शंकराश्रम । आपुलें कार्य संपविती ॥५९॥
तेथोनि पुढती आश्रम जाहले । तें इतिहासीं विदित केलें ।
घ्यावें जाणोनियां भलें । जयां चाड मानसीं ॥६०॥
आजि त्याच पीठावरी । श्री आनंदाश्रम खरोखरी ।
ज्ञातीस्तव देह झिजविती थोरी । काय त्यांची वर्णावी ॥६१॥
ब्रह्मचारी-तत्त्वज्ञ थोर । लाभले असती श्रीगुरुचर ।
श्रीमत् पांडुरंगाधम दत्तावतार । तयांनीं आश्रम दीधला ॥६२॥
आजही जयांचा असे भाव । वा न असे, न मानती देव ।
त्या सकळही सारस्वतज्ञातीस्तव । श्रीगुरु तपाचरण करिती ॥६३॥
सेवा सेवा हो सकळ जन । सांडोनि कुभावना-अज्ञान ।
श्रीमत् आनंदाश्रम स्वामीनाम । सर्वकाळ तें घ्यावें ॥६४॥
॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
वि. ग. जोशी
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2024
TOP