मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४२॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४२॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा सद्गुरुराया । काय मूर्ति तुझी सदया । न मिळे कवणा तुजवांचुनियां । चित्ता थारा कदापिही ॥१॥
तूंचि एक जगीं मजला । जाऊं कुठे सांग ये वेळां । म्हणोनि घट्ट चरणकमलां । धरिलें देवा विश्वासें ॥२॥
घातला सकलही तुजवरी भार । तूंचि रक्षिसी अज्ञ पामर । ऐसा भरंवसा ठेवितों तुजवर । मग कैंचें भय मजलागीं ॥३॥
मी कासया मागावें तुजला । तूं जें करिसी तेंचि मजला । हितासी कारण होय वेल्हाळा । अहाहा काय वानूं तूंतें मी ॥४॥
नाना संकटें येवोत अपार । तैसेचि अनेक दुःखांचे डोंगर । अथवा सुखसागरीं बुडतां शीघ्र । दोन्हीमाजीं आनंदचि ॥५॥
तूं जें करिसी तेथें दुःख । नसे अणुमात्र आणि ना सुख । केवल आनंद एकचि देख । तूंचि भरलासि त्या ठायीं ॥६॥
नको यावरी मोक्ष तो मजला । जरी लक्षचौर्‍यांशींचा झोला । फिरविसी तरी चिंता कशाला । वहावी देवा मीं सांग ॥७॥
तुजवांचोनि रिता ठाव । नाहीं तूंचि भरला देव । स्वर्ग - मृत्यु - पाताळ सर्व । सार्‍या ब्रह्मांडीं भरलासी ॥८॥
तेव्हां घातलेंसि योनीं कवण्याही । अथवा ठेविलेंसि आपुल्या पायीं । किंवा दिलीस अधोगतिही । परमानंदचि तेथें हो ॥९॥
म्हणोनि सद्गुरुस्वामी देवा । जैसें ठेविसी या मम जीवा । त्यांतचि घेऊनि तुझ्या नांवा । आनंदें राहूं निश्र्चयेंसीं ॥१०॥
मन हें यापरी तूंचि करिसी । आहे तुझी महिमाच ऐसी । ती म्यां अज्ञें वर्णावी कैसी । न कळे देवा गुरुराया ॥११॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं कथानिरूपण । अल्लीशहा नाझर भक्त यवन । यासी रक्षिलें स्वामींनीं ॥१२॥
आणिक सांगूं कथा रसाळ । श्रीस्वामींची महिमा समूळ । परिसा तुम्ही भक्त प्रेमळ । श्रोते हो सज्जन सावधान ॥१३॥
आमुची माता पार्वतीबाई । मंगेशभट्ट पिता तो पाहीं । स्वामींच्या आशीर्वचनें अजूनिही । असती धारवाड - ग्रामांत ॥१४॥
त्यांची कथा सांगूं आतां । लावावें श्रोत्यांनीं आपुल्या चित्ता । पांडुरंगाश्रम यांची तत्त्वतां । महिमा थोर परिसा हो ॥१५॥
चित्रापुर - ग्रामानजिक । 'बिजूर' नामें खेडें एक । तेथे 'म्हाळप्पय्या' नामें देख । होता ब्राह्मण सारस्वत ॥१६॥
त्यासी असती तीन पुत्र । द्वितीय सुत रामचंद्र । याची कन्या झाली उपवर । नाम तियेचें 'राधा' पैं ॥१७॥
नऊ वरुषें भरलीं पूर्ण । लागली चिंता थोर जाण । बिजूर म्हाळप्पय्यालागुन । उजवावी इजला म्हणोनियां ॥१८॥
रामचंद्र परम विरक्त । संसारीं नाहीं त्याचें चित्त । पिता म्हाळप्पा प्रतिपाळी तिजयत । माता निवर्तली पूर्वींच ॥१९॥
म्हणोनि संरक्षीतसे तिजसी । आजोबा तिचा म्हाळप्पा परियेसीं । असो लागली चिंता त्यासी । राधेसी उजवावी म्हणोनि ॥२०॥
त्याची कन्या मंकीमाजीं । होता नामें अण्णय्यभटजी । त्यासी दिधली होती सहजीं । ती गेली होती परलोकीं ॥२१॥
परी जांवई अण्णय्यभटजी । होता अर्चक मंकीमाजीं । 'जनार्दन' देवातें तो पूजी । ग्रामस्थांच्या वतीनें ॥२२॥
त्याचा द्वितीय पुत्र मंगेश । 'फटभट्ट' म्हणती त्यास । एवं म्हाळप्पय्याचा नातू विशेष । कन्येचा पुत्र तो पाहीं ॥२३॥
तेव्हां तो विजूर म्हाळप्पय्या । गेला मंकीसी विचारावया । राधेसी मंगेशा द्यावया । आपुल्या नात्यामध्येंच कीं ॥२४॥
आणि म्हणे अण्णय्यभट्टासी । आमुची राधा मंगेशासी । द्यावी ऐशी माझ्या मानसीं । इच्छा असे बहुतचि ॥२५॥
यावरी जातक घेऊनि तियेचें । बघे अण्णय्यभट्ट स्वयें साचें । शांतपणें बोले वाचे । नाहीं बरवें जुळत हें ॥२६॥
लग्न होतां वर्षाआंत । पति मरोनि जाईल निश्चित । जातक बघतां ऐसें दिसत । 'हेड्‌तलें' आहे दोहींसी ॥२७॥
ऐसें असतां कैसें आपण । देऊं सांग तुजला वचन । ऐकूनि झालें म्लानवदन । म्हाळप्पाचें ते समयीं ॥२८॥
मग तो गेला चित्रापुरासी । हेतु धरोनि आपुल्या मानसीं । कीं आशीर्वाद घ्यावा येविषीं । श्रीस्वामींकडोनियां ॥२९॥
गेला लगबगें स्वामीमठासी । पांडुरंगाश्रमस्वामींपाशीं । भेट घ्यावया प्रेमासरशीं । धांवला थेट संनिधींत ॥३०॥
तेव्हां स्वामींनीं बघुनी यासी । म्हणती म्हाळप्पय्या कां आलासी । काय कारण सांगें आम्हांसी । ऐकतां आनंदे म्हाळप्पा ॥३१॥
तेव्हां म्हाळप्पा करोनि नमन । बोलता झाला मृदुवचन । पाणावले त्याचे नयन । प्रेमळ मन त्याचें पैं ॥३२॥
म्हणे देवा सद्गुरुनाथा । आमुच्या बाळूच्या कन्येकरितां । वर बघाया गेलों ताता । मंकीमाजीं मी पाहीं ॥३३॥
मंकीग्रामीं अण्णय्यभट्ट । जामात आमुचा असे श्रेष्ठ । त्याचा द्वितीय पुत्र फटभट्ट । यासी द्यावयाकारणें ॥३४॥
परी अण्णय्यभटजी यांनीं । नाकारिलें जातक पाहुनी । अन्य स्थळ बघावें म्हणुनी । आलों पुसाया संनिधीतें ॥३५॥
आपल्या कृपेनें उत्तम वर । मिळावा ऐसा आशीर्वाद थोर । घ्यावयासी आलों सत्वर । चरणसंनिधीं बा देवा ॥३६॥
ऐसें ऐकतां त्याचें उत्तर । स्वामी सद्गुरु परम चतुर । धाडिती मनुष्य मंकीमाझार । अण्णय्यभट्टासी बोलवाया ॥३७॥
स्वामींची आज्ञा ऐकोन । उठला यावया न लागतां क्षण । पावला त्वरित मठालागून । चित्रापुर - ग्रामासी ॥३८॥
येऊनि तत्काळ घेतली भेटी । पाहिली नयनीं मूर्ति गोमटी । आनंद न समाये पोटीं । बोलाया ओठीं येईना ॥३९॥
कंठ जाहला सद्गदित । नयनीं अश्रुधारा वाहत । अंगीं रोमांच उठत । दर्शन घेतांचि स्वामींचें ॥४०॥
घातला साष्टांग प्रणिपात । हृदयीं उचंबळे प्रेम बहुत । झाला तल्लीन आनंदांत । सद्गुरुप्रेम नावरे ॥४१॥
मग उठोनि कर जोडोनि । उभा राहिला नम्र होऊनि । तेव्हां बोलती स्वामी हांसूनि । प्रेमळ वचनें त्यालागीं ॥४२॥
म्हणती अण्णय्या हा तव । सासरा आलासे कशास्तव । हें तुज विदित असेल कीं सर्व । वऱ्हाडी व्हावें तूं म्हणोनि ॥४३॥
कासया नसे तुझी कबूली । सांग बा आम्हां ये वेळीं । काय कारण तुज या स्थळीं । नको ऐसें वाटाया ॥४४॥
तेव्हां बोले भटजी अण्णय्या । कवणही कारण नसे या ठाया । एकचि प्रतिबंध असे लग्ना या । जातकदोष थोर बहु ॥४५॥
लग्न झालिया र्षाआंत । पतीसी मरण असे येथ । म्हणोनि माझे मन हें भीत । त्यावीण अन्य ठीक असे ॥४६॥
तेव्हां बोलती श्रीगुरुराय । होय तूं आतां मानसीं निर्भय । दोष निरसन करील तो सदय । भवानीशंकर कृपाळू ॥४७॥
भिऊं नको तूं आतां सर्वथा । तोचि रक्षील निश्चयें तव सुता । अखंड सौभाग्य पावे दुहिता । याच्या बाळूची हो जाण ॥४८॥
चला तुम्ही आतां जावोनि । स्नान करोनि दोघेही या झणीं । स्वामींचें वचन ऐकतांक्षणीं । गेले नमूनि स्नानासी ॥४९॥
स्नान करूनि आले मठासी । बोलाविलें स्वामींनीं देवापाशीं । भवानीशंकर संनिधीसी । करिती प्रार्थना कृपाघना ॥५०॥
बोलती स्वामी कर जोडुनी । भवानीशंकरा पिनाकपाणी । कथितों आतां यांची कहाणी । तुज सर्वसाक्षी सर्वज्ञा ॥५१॥
तुजला सांगावें नलगे कांहीं । देवा विदितचि तुज सर्वही । परी सांगू लडिवाळपणे पाहीं । सारा वृत्तांत तुजलागीं ॥५२॥
अण्णय्याच्या पुत्रालागुन । म्हाळप्पय्याची नात देऊन । लग्न करावें म्हणोन । असे मानसीं याच्या बा ॥५३॥
परी जातकदोष थोर । तोचि एक प्रतिबंध साचार । म्हणोनि देवा तूं करुणाकर । करीं रक्षण यांचे बा ॥५४॥
संकष्टें सारी निरसोनि । संरक्षावें वधूवरांलागूनि । पाटीराखा तूंचि म्हणोनि । भार घालतों तुजवरी ॥५५॥
तुझ्यावांचूनि अन्य ना कवण । दोपेही तुझे भक्त जाण । अखंड सौभाग्य देईं पूर्ण । त्या मुलीसी लवलाहीं ॥५६॥
ऐसी प्रार्थना केली बहुविध । आणि दिधला दोघांसी प्रसाद । दोघांसीही झाला आनंद । सद्गुरु - आज्ञा म्हणोनियां ॥५७॥
म्हाळप्पय्या अण्णय्यभटजी । दोघेही म्हणती श्रीसद्गुरुजी । आपुला आशीर्वाद आजि । लाभतां कैंचें भय आम्हां ॥५॥
ऐसें बोलुनी घातलें दंडवत । प्रेमाश्रु आले नयनांत । बोलती दोघे आपसांत । गुरुवाक्यचि श्रेष्ठ असे ॥५९॥
होईल सत्य त्यांचें वचन । यांत अणुमात्र ना अनुमान । आनां ठरवूं मुहूर्त आपण । मठांतचि तत्काळ ॥६०॥
इतुकें बोलूनि ठरविला मुहूर्त । गेळे आपापुल्या ग्रामाप्रत । म्हाळप्पय्या वेगें लागत । लग्नसिद्धतेलागीं पैं ॥६१॥
मग राधा - मंगेश यांचा । विवाह झाला विधियुक्त साचा । सद्गुरुस्वामींची वाचा । असत्य न होय कदापिही ॥६२॥
अद्यापिही असे तें दंपत्य । आमुची माता पिता हें सत्य । ऐसें मी बोलें त्यांचे अपत्य । आशीर्वादें स्वामींच्या ॥६३॥
मातेलागीं झालीं वरुषें । साठीवरी पांच परियेसें । अद्यापि सौभाग्यावरीच असे । सद्गुरु-आशीर्वचनेंचि ॥६४॥
पहा कैसें स्वामींचें वचन । असत्य न होय कदापि जाण । म्हणोनि त्यांचें चुकलें मरण । ना अनुमान यामाजीं ॥६५॥
जातक बघतां पतिमरणाचा । निश्र्चय दिधला अण्णय्यास साचा । आशीर्वादें श्रीस्वामींच्या । चुकलें मरण मंगेशाचें ॥६६॥
अद्यापिही जातक दोघांचें । ज्योतिष्यालागीं दावितां साचें । आश्र्चर्यानें बोलती वाचे । कैसें केलें हैं लग्न ॥६७॥
म्हणती मंगेशभट्ट यासी । नवल हैं कैसा तूं वांचलासी । न जुळे जातक, मरण तुजसी । लग्न केल्या वरुषींच ॥६८॥
हें जातक बघतां कवणही । न करील विवाह निश्चयें पाहीं । ऐसें असतां पत्नी तुम्हीं ही । कैसी केली नवल हें ॥६९॥
असो सद्गुरुस्वामींची कृपा । यांत नाहीं संशय पहा पां । ऐसे हे चरण धरितां खेपा । चुकती जन्म-मरणांच्या ॥७०॥
जरी संसारीं त्यांचें वचन । बोलिलें तें सत्य होय जाण । तरी परमार्थीं बोलतां कां न । होय तें सत्य सांगा हो ॥७१॥
त्यांचा अवतार काय कारण । कीं सत्पथ दावा यालागुन । ऐशियाचे आम्हीं चरण । नच दवडावे कदापिही ॥७२॥
कोण इतुकें बोधिती उत्तम । नाहीं त्यांसी क्रोधकाम । सारे षड्रिपु पळाले धूम । ठोकुनी प्रतापें तयांच्या ॥७३॥
ऐसी ही मूर्ति परम सुंदर । काय वानूं त्यांचें चरित्र । असनी निश्चयें परम पवित्र । नाहीं अणुमात्र अवगुण पैं ॥७४॥
साक्षात् अवतरे दत्तात्रेय । यांत अणुभरी नसे संशय । यावरी आणिक कथा रमणीय । सांगूं आतां सविस्तर ॥७५॥
मंगळूर या ग्रामीं एक । सारस्वत आमुचा देख । होता प्रपंचीं भोगित सुख । परी स्वामींची निंदा करीत बहु ॥७६॥
स्वामी येतां मंगळुरामी । स्वप्नींही बघेना जाउनी त्यांसी । कां जावें म्हणे मानसीं । त्यासी भेटाया निष्कारण ॥७७॥
त्यासी आम्हां काय भेद । आमच्याहूनि तो मतिमंद । म्हणोनिच लागला त्यासी छंद । स्वधर्म देव याचाचि ॥७८॥
काय जनांसी पडली भूल । स्वामी मठ यांचेंचि खूळ । काय त्यासी लागला गूळ । मूर्ख जन हे असती सारे ॥७९॥
उगीच मठाचा स्वामी करोनि । अंधश्रद्धेनें ठेविला जनांनीं । नाचती स्वामी देव म्हणोनि । काय देवत्व त्यासी असे ॥८०॥
ऐसे नानापरी दोष । देत मानसीं रात्रंदिवस । परी स्वामी न मोडिती त्यास । ओढिती प्रेमबळेंकरोनि ॥८१॥
पहा कैसें पूर्व सुकृत । उदया आलें अकस्मात । ऐका आतां पुढें त्याप्रत । कैमें ओढिलें स्वामींनीं ॥८२॥
त्यासी निंदा करतां करतां । वाटलें एकेकाळीं चित्ता । की स्वामींच्या मठामाजीं आतां । जावें एकदां बघावया ॥८३॥
काय करिती कसे राहती । काय महत्त्व स्वामींप्रती । कासया उगीच जन हे भुलती । हें बघावें जाऊनियां ॥८४॥
ऐसा विचार करोनि मानसीं । गेला निघोनि चित्रापुरासी । उतरला एका मित्रापाशीं । वळकटी सामान घेऊनियां ॥८५॥
मग स्नान - भोजनादि उरकुनी । गेला स्वामी - मठालागुनी । विचारीतसे भटजींस जाउनी । स्वामी कुठें असती हो ॥८६॥
म्हणे स्वामींचें मजला दर्शन । व्हावें ऐसी इच्छा धरोन । आलों होतों येथें धांवून । खचितचि मी जाणा हो ॥८७॥
तरी आतां स्वामी मजप्रती । कधीं काय सांगा भेटती । मिळतील काय ये वेळीं निश्र्चितीं । ऐसें म्हणोनि राहिला ॥८८॥
यावरी भटजी बोले शांत । सद्गुरुस्वामी असती आंत । बैसले भिक्षेलागीं तेथ । बाहेर आलिया होय दर्शन ॥८९॥
यावरी तो मंगळूर - गृहस्थ । बैसला बहुविध विचार करीत । बघावें आतां सारें येथ । स्वामी कैसे असती हे ॥९०॥
असो इकडे भटजीबुवा । भिक्षा होतां सांगे गुरुदेवा । मंगळूर - गांवींचा गृहस्थ नवा । आला भेटाया या स्थानीं ॥९१॥
यावरी स्वामी न बोलतां कांहीं । चालले आपुल्या विश्रांति - गृहीं । अंतर्ज्ञानी जाणती सर्वही । हृदय सकल जनांचें ॥९२॥
हा इसम परीक्षा घ्यावया । आला ऐसें मनीं जाणूनियां । बळेंच गेले विश्रांतिठाया । माडीवरी ते पाहीं ॥९३॥
तेव्हां हा बघावयास वेगें । गेला तयांच्या पाठीमागें । स्वामी जिना चढतां लगबगें । येरूही चढूं लागला ॥९४॥
उपरी जातां मागें वळोनि । बघती स्वामिराय ते झणीं । तेव्हां देखिली त्रिमूर्ति नयनीं । या गृहस्थें सुंदर ती ॥९५॥
देऊनि दत्तदर्शन त्यासी । गेले स्वामी आपुल्या स्थानासी । बैसले जाऊनि स्वस्थचित्तेंसीं । स्वानंदीं निमग्न होऊनियां ॥९६॥
तेव्हां मंगळूर ग्रामींचा गृहस्थ । थरथरां कांपे बघूनि अद्भुत । नयनीं अश्रुधारा वाहत । झाला भयभीत हृदयीं तो ॥९७॥
 दो पायर्‍या चढतांक्षणीं । देखिली मूर्ति दत्ताची नयनीं । पुढें न जातां धांवला तो झणीं । भटजीकडे तेधवां ॥९८॥
स्फुंदस्फुंदोनि रडे गृहस्थ । म्हणे अपराध झाला बहुत । भेट करवा स्वामींची मजप्रत । करावा उपकार इतुका हो ॥९९॥
मी असें खचितचि पापी । यांत संशय नसे हो किमपि । स्वामींची मूर्ति परम प्रतापी । हें न कळलें मजलागीं ॥१००॥
मीं केली निंदा बहुत । हें कळलें त्यांसी निश्चित । म्हणोनि दर्शन न देतां त्वरित । गेले माडीवरीच पहा ॥१०१॥
आणिक दाविलें दत्तस्वरूप । झाला असेल मजवरी कोप । हृदय कळवळे माझें खूप । आतां निश्चयें हो जाणा ॥१०२॥
आतां कळलें देवचि ते ऐसें । याउपरी निंदा न करीन मानसें । दर्शन करवा तुम्ही साहसें । पडतों पायां तुमच्या मी ॥१०३॥
इतुकें बोलुनी धरिले चरण । वेदमूर्ति भटजींचे जाण । द्रवलें भटजींचे अंतःकरण । म्हणती भिऊं नको सर्वथा ॥१०४॥
इतुकें बोलुनी स्वामीसंनिधीं । गेले भटजी धांवूनि आधीं । केली प्रार्थना परमावधी । म्हणे स्वामिन् करुणाळा ॥१०५॥
तो गृहस्थ हळहळे भारी । नानाविध प्रार्थना तो करी । द्यावें दर्शन त्याजला सत्वरी । कृपा करोनि गुरुराया ॥१०६॥
ऐकतां भटजीचें वचन । कळवळलें स्वामींचे अंतःकरण । पाचारीं आतांच त्यासी जाऊन । देतों दर्शन ये समयीं ॥१०७॥
मग गेले भटजी शीघ्र । म्हणे आज्ञा झाली साचार । दर्शन द्यावया बैसले गुरुवर । येईं सत्वर माडीवरी ॥१०८॥
तेव्हां आनंदें घेऊनि नारळ । गेला धांवूनि दर्शना ते वेळ । साष्टांग प्रणिपात घातला प्रेमळ । अंतःकरणें तेणें हो ॥१०९॥
आणि म्हणे प्रभो दयाळा । अपराध माझा थोर जाहला । क्षमा करावी या निजबाळा । स्वामिराजा दयानिधे ॥११०॥
नानापरी केली निंदा । देव तूं ऐसें या मतिमंदा । न कळतां ऐशा या पदा । नमन ना केलें केव्हांही ॥१११॥
ऐसा मी खळ निर्दय । पाहिले नाहीं आपुले पाय । परी झाला पुण्योदय । दाविलें स्वरूप दत्ताचें ॥११२॥
जातां माडीवरी आपण । पाहिलीं निश्चयें मुखें तीन । सहा हात दत्त दयाघन । याचें दर्शन मज झालें ॥११३॥
कळलें आतां आपण कोण । साक्षात् दत्तात्रेयचि म्हणून । तेवींच दाविलीं मुखें तीन । दत्तात्रेय होऊनियां ॥११४॥
तूं देवा क्षमाशील । म्हणोनि मजला घेतलें जवळ । तुझे उपकार कवण विसरेल । तुजला मनुष्य कोण म्हणे ॥११५॥
इतुकें कोमल अंतःकरण । किती वानूं देवा तुझे सद्गुण । शक्ति नसे कराया वर्णन । वाणीसी माझ्या अज्ञपणें ॥११६॥
जरी म्यां केला अपराध थोर । तरी दर्शन दिधलें तूं साचार । अहा देवा करुणासागर । मज अज्ञासी उद्धरिलें ॥११७॥
देवाहुनी सद्गुरु श्रेष्ठ । ऐसी भक्त सांगती गोष्ट । इतुकें बोलतां कांपती ओठ । थरथर त्याचे पहा हो ॥११८॥
नेत्रीं वाहती अश्रुधारा । रोमांच उभे राहती शरीरा । पुनरपि करी नमस्कारा । प्रेमपूर्वक ते समयीं ॥११९॥
आणि बोले सद्गुरुराजा । तूंचि देव अससी माझा । जगीं अन्य नसे दुजा । रक्षक आम्हां बालकांसी ॥१२०॥
देव न करी इतुकें प्रेम । जो करी त्याची भक्ति उत्तम । त्यासीच रक्षी पुरुषोत्तम । अन्यांसी करी ताडन पैं ॥१२१॥
रामानें मारिलें रावणासी । कंस वधिला श्रीकृष्णें परियेसीं । सद्गुरुराया शत्रु ना तुजसी । निंदक वंदक सम सारे ॥१२२॥
निंदकांवरी न करिसी द्वेष । दया उपजे त्यांची बहुवस । परी संनिधीं न जातां त्यांस । कैसा उद्धरिसी तूं बापा ॥१२३॥
निंदामिसें जरी घे दर्शन । तरी तूं त्यासी करिसी पावन । घ्यावें आतां उदाहरण । माझेंचि जाणा हो देवा ॥१२४॥
मी आलों होतों कासया । घडलें काय सद्गुरुराया । कृपा ही तुझी सदया । निंदकांवरी निश्र्चयेंसीं ॥१२५॥
असो आतां देवा दयाळा । काय करावें मी ये वेळां । कोण गति सांगा मजला । या खळासी आतां हो ॥१२६॥
इतुकें बोलुनी केलें नमन । पाणावले त्याचे नयन । तेव्हां बोलती कृपाधन । कळवळोनि प्रेमानें ॥१२७॥
अरे बाळा तुजलागोन । नाहीं भय कवणही जाण । तळमळलें तुझे अंतःकरण । झालें निरसन पापाचें ॥१२८॥
पुनः न करीं ऐसी निंदा । कवणही संतसाधूंच्या पदा । चित्तीं नाम धरीं सदा । होईल कल्याण निर्धारें ॥१२९॥
नामस्मरणें सारें पाप । निरसन होईल आपोआप । नाममहिमा असे अमूप । काय सांगूं तुजलागीं ॥१३०॥
नामें तरला वाल्या कोळी । उलटें जरी वदला भूतळीं । नामेंचि सेतू बांधिला जळीं । एवं अनेक तरले पैं ॥१३१॥
नामें होय पापनाश । तेणें चित्त शुद्ध होय खास । ऐसें तें नाम परम सुरस । काय सांगू नवलाई ॥१३२॥
यावरी बोले तो गृहस्थ । मम मन हें विषयीं रत । तेव्हां कैंचें नाम येत । माझ्या मनीं दयाघना ॥ १३३ ॥
जरी मी मुखानें वदलों नाम । मन हें करी अन्यचि काम । तेव्हां देवा कैसें बा मम । पाप नासे हो पाहीं ॥१३४॥
यावरी बोलती स्वामिराज । सांगतों बापा तुजला सहज कवणही सर्वया भय ना तुज । भवानीशंकर समर्थ असे ॥१३५॥
न कळतां पद अग्नीवरी । पडलें पहा चुकुनी जरी । तरी दाह होय तो निर्धारीं । अग्नीचा धर्मचि हा जाण ॥१३६॥
तद्वत् करितां नामस्मरण । पाप सारें होय दहन । जरी त्यावरी नाहीं मन । तरीही जळनी पापें तीं ॥१३७॥
अग्नीचा गुणचि जाळण्याचा । नाममहिमा तैसाचि साचा । पाप नाश करी, म्हणोनि वाचा । नामस्मरणी तूं लावीं सदा ॥१३८॥
तेणें होऊनि चित्त शुद्ध । पावसी निजात्मज्ञान प्रसिद्ध । जाऊनि सारा तुझा खेद । होईल कल्याण ईशकृपें ॥१३९॥
इतुकें बोलतां सद्गुरुराय । तेणें धरिले स्वामींचे पाय म्हणे सद्गुरो तूं मम माय । न सोडीं कधींही चरण तुझे ॥१४०॥
असो पुढें जो निंदक गृहस्थ । झाला क्षणेंचि परमभक्त । कैसी महिमा परम अद्भुत । पांडुरंगाश्रम - गुरूंची ॥१४१॥
पहा कैसे करुणासागर । ओळले कैसे त्या गृहस्थावर । निंदक वंदक सकल नर । सारे समान गुरुराया ॥१४२॥
असो आणिक सांगू पुढती । महिमा अद्भुत कैसी काय ती । वर्णूं सद्गुण परम प्रीतीं । पुढील अध्यायीं पहा हो ॥१४३॥
आनंदाश्रम परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें द्विचत्वारिंश - । अध्याय गुरुदासें संपविला ॥१४४॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । द्विचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१४५॥
अध्याय ४२॥
ओंव्या १४५॥
ॐ तत्सत्-श्रीमद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP