चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२९॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकृष्णाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरु निर्विकारा । कैसा ओलांडूं या भवसमुद्रा । तूंचि सांग बा यतींद्रा । निजबाळालागीं पैं ॥१॥
जगामाजीं कांहीं एक । सत्य न दिसे मजला देख । जरी विषय आले सन्मुख । सेवावे ऐसें न वाटे ॥२॥
परी जें सत्यस्वरूप असे । त्याचें ज्ञान मजला नसे । कीं भरलें अंतरीं विकल्प - पिसें । तेव्हां कैसें समजेल ॥३॥
जोंवरी असे विकल्प थोर । तोंवरी अज्ञान निरसेना साचार । मग कैंचा आत्मविचार । दृढ होय सांग बापा ॥४॥
म्हणोनि देवा कृपा करुनी । सोडवीं विकल्प - जाळ्यामधुनी । हेचि प्रार्थना असे तव चरणीं । प्रभो देवा कृपाघना ॥५॥
तुझी लीला परम अद्भुत । न समजे ती कवणाप्रत । करावयासी विकल्पघात । उशीर कैंचा तुजलागीं ॥६॥
तुझ्या सत्तेवांचुनी जगीं । कोणती क्रिया होय ती वेगीं । जरी झाला असे तो त्यागी । काय उपयोग त्याचा हो ॥७॥
तुजला विसरुनी नाना प्रयत्न । जरी केले न सोडितां क्षण । तरी निष्फल होती ते जाण । सद्गुरुराया दयाळा ॥८॥
जरी सोडिले विषय सारे । गोड न वाटती अणुमात्र खरे । परी देवा तुजला जो विसरे । काय उपयोग त्याचा पैं ॥९॥
तूंचि एक सत्यस्वरूप । असोनि आमुच्या बहुत समीप । त्यागुनी जातों धुंडाया खूप । जिकडे तिकडे हो पाहीं ॥१०॥
एवं तुझ्या प्रेमावांचुनी । काय उपयोग विषय त्यागुनी । ऐसें रहावें कासया धरणीं । धिक् धिक् जिणें हें आमुचें ॥११॥
सकलविद्यापारंगत । दिनरजनीं बडबडे वेदान्त । परी सद्गुरुप्रेमावांचुनी व्यर्थ । काय करावा तो घेवोनी ॥१२॥
त्यांत आणिक अधिकचि बापा । अभिमान वाटुनी घालितों खेपा । जन्म-मरणाचा मार्ग सोपा । लक्षचौऱ्यांशीं योनींचा ॥१३॥
म्हणोनि सद्गुरुभक्ति श्रेष्ठ । तेणें अभिमान होय नष्ट । सांपडे सत्स्वरूपाची वाट । तत्काळचि हो पाहीं ॥१४॥
म्हणोनि देवा करुणासागरा । तुझ्या प्रेमाचा देईं आसरा । तेव्हांचि येईल चित्तासि थारा । म्हणोनि मागतों प्रेम तुझें ॥१५॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । पांडुरंगाश्रमा निमित्त करोन । रथोत्सव केला सद्गुरूंनीं ॥१६॥
ऐसी ती सद्गुरुमाउली । मत्सर नाहीं कवणाजवळी । निंदा केली जरी कोणीं आपुली । त्यावरीही ना द्वेष ॥१७॥
यावरी एक सांगूं आतां । परम सुंदर सुरस कथा । इकडेचि लावा आपुल्या चित्ता । तुम्ही सज्जन श्रोते हो ॥१८॥
कार्तिक शुद्ध पौर्णिमेसी । वनभोजन असे त्या दिवशीं । चित्रापुर - मठाची पालखी परियेसीं । जाई दुरवरी मिरवीत ॥१९॥
वनभोजनासाठीं पाहीं । पालखी लांबवरी नेती सर्वही । रात्र होई तोंवरी राही । पालखी सुंदर त्या स्थानीं ॥२०॥
मग दीपोत्सवासहित तेथूनि । पालखी येत बाजारांतूनि । दुकानदार आरती आणि । नारळ केळीं अर्पिती ॥२१॥
मग घेऊन देवाचा प्रसाद । गृहासी जाती पावुनी आनंद । ऐसी चाल असे प्रसिद्ध । दुकानदार यांची हो ॥२२॥
एके वर्षीं श्रीकृष्णाश्रम । यांच्या कालीं पालखी उत्तम । सजवुनी नेली ओलांडुनी ग्राम । भवानीशंकर देवाची ॥२३॥
त्या दिवशीं वनभोजन । वर्षापरी रात्र करोन । पालखी आणिली मिरवीत जाण । ग्रामामाजी ती पाहीं ॥२४॥
परी तेथील दुकानदार। आपसामाजी करिती विचार । कीं आज आन्ही करूं निर्धार । न लावूं दीप बाजारी ॥२५॥
नये देऊं नारळ केळीं । आणि आरतीही नको या वेळीं । न देतांचि गृहाजवळी । जाऊं झडकरी आम्ही हो ॥२६॥
इतुकें बोलुनी ते दुकानदार । जाती आपुल्या गृहामाझार । इतुका कासया द्वेष साचार । त्यांना, ऐका श्रोते हो ॥२७॥
कांहीएक कारणास्तव । क्षोभले होते मठावरी सर्व । म्हणोनि धरुनी अंतरीं सर्व । गेले पळोनि आधींच ॥२८॥
ग्रामांतुनी पालखी आली । जनांच्या आरत्या नारळ केळीं । घेउनी येत बाजाराजवळी । परी तेथें अंधार ॥२९॥
कवाडें सारी बंद करोनी । कुलुपें लाविलीं सर्व दुकानीं । मग कैंचे दीप त्या स्थानीं । कोण लाविती प्रेमानें ॥३०॥
ऐसें देखुनी पालखी घेऊन । पुढें गेले सर्वही जन । मठामाजीं पोहोंचतां जाण । कथिली वार्ता स्वामींसी ॥३१॥
कीं तेथे बाजारामाजीं । दिवेचि न लाविले आजी । ऐसें ऐकतां बोलती गुरुजी । कृष्णाश्रमश्रीस्वामी ॥३२॥
भवानीशंकर देवालागीं । जितुका प्रकाश पाहिजे या जगीं । तितुका तोचि उजळुनी वेगीं । घेतो आपणचि पाहीं पां ॥३३॥
ऐसे शब्द श्रीस्वामींनीं । उच्चारितां मुखांतुनी । तत्क्षणीं लागला बाजारासी अग्नि । कळलें व्यापाऱ्यांलागीं पैं ॥३४॥
तोंच उठले सकल जन । भ्याले त्यांचें अंतःकरण । श्रीस्वामींचा क्षोभ समजोन । गेले सत्वर मठांत ॥३५॥
स्वामींसी प्रार्थना करिती ते नर । म्हणती देवा अज्ञ पामर । नकळे सारासार विचार । मूर्ख आम्ही निश्र्चयेंसीं ॥३६॥
मठाच्या जनांवरी आला क्रोध । परी तो दाविला देवासंनिध । ऐसा आमुचा थोर अपराध । क्षमा करावी गुरुराया ॥३७॥
ऐकुनी ऐसें करुणावचन । स्वामी सद्गुरु चैतन्यघन । द्रवले त्यांचे अंतःकरण । कोमल जाण तें पाहीं ॥३८॥
झणींच पाठविले मठाचे ब्राह्मण । विस्तव विझवावयासी तेथून । आज्ञेपरी जाउनी ते जन । विझविते झाले विस्तव तो ॥३९॥
त्याउपरी बोलती सद्गुरु - । स्वामी ते करुणासागरु । म्हणती तुमचा नाहीं थोरु । अपराध बापा खचितचि ॥४०॥
जैसें असे ज्याचे प्रारब्ध । त्यापरी बुद्धि होय बहुविध । परमेश्वर असे तो शुद्ध । नाहीं त्यासी क्षोभ कधीं ॥४१॥
न करी तो कुणाचें अकल्याण । सदा सर्वदा असे प्रसन्न । नाहीं त्यासी मानावमान । भिऊं नका हो तुम्ही ॥४२॥
ऐसें ऐकतां सद्गुरुवचन । व्यापाऱ्यांचे संतोषलें मन । करोनि चरणीं साष्टांग वंदन । भाकिली करुणा तयांनीं ॥४३॥
मग विस्तव विझवोनि । आले जन मठीं परतोनि । आनंदले दुकानदार स्वमनीं । कळली महिमा स्वामींची ॥४४॥
पहा कैसी सद्गुरुमाय । जरी आला अपमान - समय । तरीही न क्षोभे त्यांवरी सदय । नाहीं मत्सर त्यांसी पैं ॥४५॥
तरी कासया लागला अग्नि । स्वामींच्या एका वाक्यावरुनी । पुसाल तरी सांगतों झणीं । ऐका सावध श्रोते हो ॥४६॥
नाहीं दिधला स्वामींनीं शाप । अणुमात्र आला नाहीं कोप । भरला प्रकाश देवासमीप । भक्तिभावेंचि बोलिले ॥४७॥
कीं भवानीशंकर देवालागीं । जितुका प्रकाश पाहिजे या जगीं । तितुका तोचि उजळुनी वेगीं । घेतो आपणचि पाहीं पां ॥४८॥
तरी ऐका याचा भावार्थ । कीं भवानीशंकर असे समर्थ । आपुल्या प्रकाशेंचि यथार्थ । उजळील दीप तो पाहीं ॥४९॥
त्याच्या प्रकाशेंचि हें जग । चाले सर्व व्यवहार, काय मग । त्यासी द्यावा कोणीं सांग । प्रकाश दीप उजळोनि ॥५०॥
सूर्य देई जनांसी प्रकाश । त्यापुढें अंधार न राहे खास । तैसा शंकर स्वयंप्रकाश । त्यासी कोणीं प्रकाशावें ॥५१॥
दीप - सूर्य - जग सकलही । त्याच्याच प्रकाशें भासे पाहीं । ऐशा त्यासी कवणही नाहीं । प्रकाशदाता त्रिभुवनीं ॥५२॥
ऐसे हे प्रेमाचे उद्गार । स्वामि - मुखांतुनी आले सत्वर । असे प्रेमळ कोमल अंतर । नाहीं अणुमात्र कोपले ते ॥५३॥
परी आपुल्या भक्तांचा महिमा । वाढवावया शंकर - उमा । यांनींच दाविलें पराक्रमा । परी हानी न केली कवणाची ॥५४॥
दुकानदार निश्चयें पाहीं । देवगुरूवरी क्षोभले नाहीं । मठाच्या लोकांचा अपराध कांहीं । हुडकुनी क्षोभले होते ते ॥५५॥
जेव्हां कळला तेथील पराक्रम । अहंकारासी ठोकला रामराम । तेव्हांपासुनी धरोनि नेम । भजती मठासी ते जन ॥५६॥
अद्यापवरी भक्तिप्रसार । सारिखा त्यांचा चालिला परिकर । एवं आमुच्या मठासी ते नर । दुकानदार भजती पैं ॥५७॥
असो यापरी सद्गुरुस्वामी । क्षमा शांति धरुनी अंतर्यामीं । देह झिजविती नेहमीं । निजभक्तांच्या कार्यासी ॥५८॥
ऐसें करितां करितां सहज । झाले वृद्ध सद्गुरुराज । संपलें त्यांचे अवतार-काज । म्हणोनि बोलविती शिष्यासी ॥५९॥
म्हणती बाळा पांडुरंगा । जाण तूं नश्वर साऱ्या जगा । तेवीं येथील सर्वही भोगा । कैसें सत्यत्व असेल बा ६०॥
सर्व तुजला असे विदित । आम्हीं सांगावें नाहीं लागत । तूं अससी साक्षात् दत्त । नाहीं संशय यामाजीं ॥६१॥
परी सांगतों जग - हितार्थ । धरीं आपुल्या चित्तीं सतत । स्वधर्म - प्रसार करीं तूं बहुत । जननिंदेसी पाहूं नको ॥६२॥
सारें जग हें ब्रह्मरूप । ऐसें धरावें मनीं अमूप । जें जें दिसे भासे समीप । तें तें नश्वर समजावें ॥६३॥
केवळ एकचि ब्रह्म आपण । अंतरीं धरावा विचार पूर्ण । परी न करावें शास्त्रबाह्य आचरण । एक म्हणोनि कदापिही ॥६४॥
एक म्हणोनि स्वधर्म सोडुनी । परधर्म न करावा कोणी । विधिनिषेध सर्वही समजुनी । करावा व्यवहार तो पाहीं ॥६५॥
पहा अलंकार असती बहुत । परी एकचि सुवर्ण त्यांत । तैसा भाव धरावा मनांत । कीं हें जग ब्रह्मरूप ॥६६॥
परी त्या सुवर्णाचे आभरण । अंगावरी करितां धारण । तेथें भेदचि धरावा, कारण । काय तें सांगूं आतांचि ॥६७॥
सारें सुवर्णचि म्हणोनि । जेथे घालावें तेथे सोडूनि । अन्य स्थळीं घालितां कोणी । म्हणतील त्यासी वेडा हा ॥६८॥
गळां घाली हार कंठी । अंगुळीं घालितसे अंगुठी । कर्णीं भिकबाळी गोमटी । ऐसेंच करी तो पाहीं ॥६९॥
पुरुष न बाली बांगड्या बुगड्या । स्त्रिया न घेती भिकबाळ्या जाड्या । ऐसें करितां म्हणतील वेड्या । काय सोंग हें म्हणोनियां ॥७०॥
म्हणोनि जे दागिने जेथ । आणि ज्यांनीं घालावे निश्र्चित । तैसेंचि करिती जन यथार्थ । परी अंतरी असे सुवर्णभाव ॥७१॥
संदुकामाजीं ठेवितां आपण । सुवर्णचि ऐसा भाव धरोन । ठेवितों एवं करितों रक्षण । सुवर्णाचे निर्धारें ॥७२॥
अलंकारापरी आपण । स्वधर्माचा राखावा मान । जैसें करावें तैसेंच वर्तन । ठेवावें व्यवहारी सर्वांनीं ॥७३॥
दागिने जैसे पृथक् पृथक् । तैसा व्यवहार करावा चोख । मनामाजीं सुवर्ण एक । तैसें परब्रह्म बघावें ॥७४॥
ठेवावा भाव सुवर्णाचा । तैसा अंतरीं भाव ब्रह्माचा । आणिक एक चमत्कार साचा । सांगतों ऐक बाळा तूं ॥७५॥
अंगावर घालितां अलंकार । तेव्हांही सुवर्णचि भासे साचार । सुवर्णासी न विसंबे निरंतर । असे निश्चय त्याचा पैं ॥७६॥
तैसें येथें स्वधर्म थोर । व्यवहार करितांही निरंतर । ब्रह्मभाव न विसरें साचार । सारें ब्रह्मचि तूं पाहीं ॥७७॥
देहभाव मोडुनी एक । ब्रह्मभाव निश्र्चयात्मक । धरोनि स्वधर्मापरी देख । वर्तावें आपण प्रेमानें ॥७८॥
त्यापरीच जनासी जाण । करोनि द्यावें स्वधर्मज्ञान । तेव्हां समजेल परमार्थ सघन । सहजचि त्यांसी त्या समयीं ॥७९॥
असो आतां सारा स्वधर्म । शिकवुनी जनांसी आणिक नेम । घालुनी द्यावा त्यांसी उत्तम । न धरीं भीड त्यांपाशीं ॥८०॥
असो यापरी श्रीकृष्णाश्रम । स्वामी आमुचे परम उत्तम । अधिष्ठानासहित सांगुनी स्वधर्म । निघाले जावया निजधामा ॥८१॥
त्यांनीं जितुका केला बोध । तितुका सांगाया मी मतिमंद । अणुमात्र कथिला त्यांतचि आनंद । मानावा आपण श्रोते हो ॥८२॥
पहा आतां सूर्यासमीप । काय करावा लहान दीप । परी रात्रीं तोचि खूप । होय उपयोग तयाचा ॥८३॥
तैसें येथे सद्गुरुस्वामी । नसती जरी आमुच्या ग्रामीं । तरी त्याचा उपयोग आम्हीं । करूनि घेतां येईल ॥८४॥
जेव्हां होईल स्वामींची भेट । तेव्हां आपण ऐकूनि नीट । त्यांचा बोध न्यावा थेट । अंतःकरणामाजीं पैं ॥८५॥
असो सतराशें पंचायशीं शक । रुधिरोद्गारी संवत्सर सुरेख । मार्गशीर्ष अष्टमीसी देख । झाले कृष्णाश्रम मुक्त पहा ॥८६॥
मग करोनि विधिपूर्वक । समाधि दिधली मठीं सुरेख । उत्तराभिमुख समाधि सकळिक । तेथील दुसरी हीच असे ॥८७॥
असो ऐशी सद्गुरुमाउली । जगाच्या कल्याणा अवनीं आली । तितुकें करोनि पावली । अंतर्धान ती पाहीं ॥८८॥
पहां करोनि जनाचा उद्धार । संपविला आपुला अवतार । ऐशी मूर्ति प्रेमळ सुखकर । तिचिया चरणीं नमन असो ॥८९॥
श्रीकृष्णाश्रम सप्तम आश्रम । झालें अवतारकार्य सुगम । दाविला जनांसि मार्ग उत्तम । सुलभ करोनि सकळांसी ॥९०॥
यापरी करोनि प्रेमानें यांनीं । शके सतराशें एकसष्टापासुनी । पंचायशींवरी जगीं राहोनी । स्वधर्मराज्य चालविलें ॥११॥
पुढील अध्यायीं अष्टम आश्रम । पांडुरंगाश्रमस्वामी परम । सद्गुणी माउली चालवील स्वधर्म - । राज्य सारस्वतवृंदाचें ॥९२॥
त्यांची कथा परम रसाळ । ऐकतां तल्लीन होतील प्रेमळ । महिमा वर्णूं न शके हा बाळ । अज्ञ पामर निश्र्चयेंसीं ॥९३॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें एकोनत्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥९४॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां निमती दोष समग्र । एकोनत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१५॥
अध्याय २९॥
ओव्या ९५ ॥
ॐ तत्सत् श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥६॥
इति एकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2024
TOP