मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४६॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४६॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
श्रीमत्परमहंस । 'आनंदाश्रमस्वामी' हें नाम सुरस । ऐकतां होय परम संतोष । तल्लीन होत मन आपुलें ॥१॥
आणि 'गुरुमहाराजकी जय'। ऐमें कर्णीं पडतां, चिन्मय - । स्वरूपीं जावया उशीर न होय । इतुकी महिमा तव नामा ॥२॥
श्री मदानंदाश्रमराया । अज्ञ बालकासी ने तव पायां । कवण देईल तुजवांचूनियां । मुक्ति बापा मजलागीं ॥३॥
मन करोनि निर्विकल्पीं स्थिर । जीवन्मुक्ति साधिली थोर । तुजला कैसें म्हणावें नर । देवचि अससी निश्र्चयें ॥४॥
तपोबल असे दृढतर । म्हणोनि तुझें वाक्य साचार । असत्य न होय निर्धार। सत्यचि होय ते पाहीं ॥५॥
परम रसाळ तुझी वाणी । ऐकतां मन हें उल्हासोनी । निजानंदीं समरस पावे झणीं । काय नवलाई ही देवा ॥६॥
रहिवासी तूं हृदयीं असतां । कैंचेही भय नाहीं सर्वथा । श्रीसद्गुरु माझा असतां । काय उणीवता आम्हांसी ॥७॥
मधुर अन्न जवळीं असतां । कासया क्षुधेची करावी चिंता । तैसा तूं मम सद्गुरु ताता । असतां कासया हिंडावें ॥८॥
हंबरतां वत्स धेनु धांवे । तैसा भक्तां पावसी तूं स्वभावें । किती सद्गुण बा वर्णावे । मेदिनी ही न पुरेल ॥९॥
सकल चिंता तुजला भजतां । निवारिसी कृपेनें ताता । मोक्षचि झणीं देसी हाता । यावरी आणिक शब्दचि ना ॥१०॥
आमुचा संग तुज न वाधे । तुझा संग आम्हां साधे । कैसें तें देवा सांगतों लक्ष दे । माझ्या बोवड्या बोलासी ॥११॥
नंदन मी तव अज्ञ बाळ । तुझे भक्त अमित प्रेमळ । परी मजकडे येईं अमळ । माझे बोल ऐकाया ॥१२॥
दारा - धन - सुत सर्व पसारा । यांतचि काल घालविला सारा । म्हणोनि तुज विसरलों गुरुवरा । भक्तवत्सला करुणाघना ॥१३॥
श्रवण करितां तुझें वचन । होय तेव्हां क्षणेंच स्मरण । कीं मी आलों कोठूनि कोण । कळे सहजचि तव कृपें ॥१४॥
मज मी कोण ऐसें कळतां । मी - तूंपणाचा भेद ताता । नुरे अणुमात्र निश्र्चयें सर्वथा । ऐसी मूर्ति तव देवा ॥१५॥
स्वार्थ नसतां किंचित । बोधिसी जनां प्रेमानें निश्चित । केवळ जगाच्या कल्याणार्थ । अवतार जाण तव देवा ॥१६॥
मी माझें जाउनी अवघें । ब्रह्मचि अससी तूं बा निजांगें । ऐसिया देवा तुझिया संगें । पावती जन निजरूपा ॥१७॥
गुरुंराया आणिक काय सांगूं । करितां क्षणभरी तुझा संगु । साध्य होय परमार्थ चांगु । नाहीं संशय यामाजीं ॥१८॥
रुसलास जरी तूं आमुच्यावरी । ब्रह्मानंदचि त्यामाझारीं । ऐसा सत्संग विचित्र भारी । सांगाया नकळे मजलागीं ॥१९॥
मत्सर नसे तुझ्या पोटीं । नसे अणुमात्र वक्र दृष्टी । जे जे शब्द बोलसी ओठीं । आनंदचि असे त्यांमाजीं ॥२०॥
हा बरवा हा वाईट ऐसा । भेद नाहीं तुजला सहसा । म्हणोनि तुझिया सहवासा । करितां होय आत्मज्ञान ॥२१॥
राग द्वेष नासुनी सारे । केवल निजानंदचि उरे । मग काय उणीवता बा रे । आम्हां निजभक्तांसी पां ॥२२॥
जरी ऐसी संगती मिळे । तरीत्र भक्तिभाव फळे । तेणेंच समाधान पावलें । जगीं सर्व आजवरी ॥२३॥
कीर्तनीं गावया तव गुण-महिमा । कवणही न मिळे द्यावया उपमा । तूंचि जगीं सर्वत्र आम्हां । व्यापुनी दिससी बा पाहीं ॥२४॥
जरी पाहूं गेलों अन्य । तूंचि भरला अससी पूर्ण । मग कैंची उपमा देऊन । करूं गुणगान तव बापा ॥२५॥
यज्ञ-यागादि जप-तप-हवन । केलें जरी रात्रंदिन । तरी तव पद नमिल्यावांचोन । न होय ज्ञान कवणाही ॥२६॥
एवं तुझ्या संगेंकरोनी । सकलाभीष्टें पावती या जनीं । ठेवितां विश्वास तव चरणीं । निजात्मज्ञान होय खरें ॥२७॥
दुर्जनसंग करितां देवा । हृदयीं सांठवे पापांचा ठेवा । आणि बाधे आमुच्या जीवा । संग तो अनिवार बा पाहीं ॥२८॥
येती त्यांचे दुर्गुण अंगीं । मग फजिती होय जगीं । संसारामाजीं पोटाची खळगी । भराया अवघड होय त्यांसी ॥२९॥
ऐशियां कैंचा परमार्थ-लाभ । म्हणोनि देवा तुझाचि सुलभ । सत्संग लाभतां सहजचि कोंब । फुटे हृदयीं परमार्थाचा ॥३०॥
ऐसी तुझी मूर्ति सुंदर । तूं अससी निःसंग साचार । तेवीं तुजला न बाधे निर्धार । संग कवणही बा देवा ॥३१॥
दुर्जनसंगें तुज न येती दुर्गुण । अथवा सज्जनसंगें सद्गुण । नलगे घेणें तुजलागोन । गुण अवगुण बा पाहीं ॥३२॥
निर्गुण अससी तूं गुरुराया । दुर्गुण बाधती कैसे तव पाया । अथवा सद्गुण तुज घ्यावया । काय कारण सांग प्रभो ॥३३॥
तुझ्या अंगीं सद्गुण संपूर्ण । औषधासही न सांपडे दुर्गुण । तेव्हां आणिक कोणते सद्गुण । घ्यावे कोठोन तूं देवा ॥३४॥
अमृताचा घडा पूर्ण । तेथें कटुत्व ये कोठोन । तैसी देवा तुझी जाण । मूर्ति सद्गुणखाणीची ही ॥३५॥
तेथे कैंचे दुर्गुण उठती । आणिक कासया सद्गुणप्राप्ति । कवणाकडोनि घ्यावी ती । काय उणीवता तुज म्हणुनी ॥३६॥
कीं तुजला दुर्गुण जनांचे । न बाधती कधींही साचे । आणि तव सद्गुण न वचे । दुर्जनसंगें निर्धारी ॥३७॥
लोखंडाची ऐरण कठिण । तीवरी सोनार काय करिती आपण । सोनें - चांदी इत्यादि आणोन । ठोकिती बहुत नित्य पहा ॥३८॥
परी त्या चांदी-सोन्याचा गुण । न लिंपे त्या ऐरणीलागुन । जैसी तैसीच ती ऐरण । राहे स्वच्छ ठायींच ॥३९॥
तैसी देवा तुझी मूर्ति । कयणाचेही दुर्गुण तुज न यती । आणि तुझे सद्गुण निश्चितीं । तुज सोडोनि जाती ना ॥४०॥
जरी भक्त तुझे सद्गुण । घेती तरी तुझे उणें न होय त्यांतून । की तूं असतां परिपूर्ण । उणें होईल कैसेनि ॥४१॥
सूर्यप्रकाशें व्यवहार सकल । करितां तत्प्रकाश उणा होईल । ऐसी भीति करणा वाटेल । हें तंव सहसा न घडेचि ॥४२॥
तैसा तूं माझा दयाळ । तव स्वरूपाचा प्रकाश सोज्वळ । सद्गुण हेचि प्रकाशती प्रेमळ । त्यावरी भक्तजन वर्तती ॥४३॥
तव सद्गुणांच्या आश्रयेंकरोनी । भक्तांचे जिणें चाले ये जनीं । तेणेंचि होती ब्रह्मज्ञानी । निश्र्चयें ताता गुरुनाथा ॥४४॥
म्हणोनि आतां 'आत्मनिवेदन' । नवम भक्ति दे तूं जाण । नाहीं विदित 'मी हा कोण'। जाहलों गुंग संमारीं ॥४५॥
म्हणोनि केली प्रार्थना सदया । नवम आश्रमा आपुल्या ठायां । नवविधा भक्ति मागुनियां । चरणीं ठेवितों मस्तक हें ॥४६॥
तरी आतां कृपा करोनि । मोक्ष देईं मजलागोनि। सत्वरी ये बा धांवोनी । करीं माझें समाधान ॥४७॥
तूंचि आतां देउनी स्फूर्ति । करवीं झणींच ग्रंथसमाप्ति । तुजवांचोनि मी मंदमति । काय करितों ग्रंथ खरा ॥४८॥
सकल जनांची पुरविसी हौस । ऐसा तूं मम जगन्निवास । मजवरीच कां बा उदास । होसी देवा कृपाघना ॥४९॥
तुझे गुण गाण्यापुरती । देईं मज विचार - स्फूर्ति । त्याविण नको मज जगतीं । अन्य विचार - चतुराई ॥५०॥
जरी देवा मी भक्तिहीन । तरी तुजलागीं सर्व समान । म्हणोनि आतां मजलागोन । न धिक्कारीं दयाळुवा ॥५१॥
तुजवांचोनि कवण करील । चरित्र - वर्णन देवा सकल । वृथाचि अहंता धरोनि तळमळ । करितों रात्रंदिन पाहीं ॥५२॥
माता असतां मुलांसी कैंची । पाकचिंता लागेल साची । कोण हरील क्षुधा आमुची। ऐसें भय मुलांसी नसे ॥५३॥
तैसी तूं गुरुमाउली असतां । व्यर्थचि घेउनी माथीं अहंता । करितों दिवस - रजनीं चिंता । केव्हां कार्य होईल हें ॥५४॥
हाचि माझा अपराध थोर । तव चरणांसी विसरलों साचार । तरी आतां तूं करुणाकर । क्षमा करीं या निजबाळा ॥५५॥
असो आतां श्रोते हो सज्जन । या या झडकरी सकलही धांवोन । आनंदाश्रम सद्गुरु दयाघन । निजभक्तांस्तव अवतरती ॥५६॥
ऐका त्यांचें चरित्र सत्य । असे प्रेमळ रसभरित । तत्काळ मन तल्लीन होत । काय सांगूं नवलाई ॥५७॥
शिराली या ग्रामीं एक । 'रामचंद्र' या नामें देख । 'हरिदास' हें उपनाम सुरेख । शोभे त्या ब्राह्मणासी ॥५८॥
परम सात्त्विक चतुर भाविक । सद्गुणांची खाणीच तो देख । यावरी काय सांगूं आणिक । वर्णन त्याचें तुम्हांसी ॥५९॥
पांडुरंगाश्रम सद्गुरुनाथ । यांचा शिष्य असे तो निश्र्चित । गुरुभक्ती अंगीं अमित । असे त्या हरिदास ब्राह्मणा ॥६०॥
रात्रंदिन मठामाझारीं । जाउनी परमादरें सेवा करी । श्रीस्वामींची मूर्ति धरी । प्रेमपूर्वक निजमानसीं ॥६१॥
सद्गुरुवचनीं दृढ विश्वास । आत्मज्ञान झालें त्यास । ऐसा तो रामचंद्र हरिदास । पुण्यपुरुष निश्चयेंसीं ॥६२॥
त्याचें मुख्य आराध्य दैवत । भगवान श्रीकृष्ण देवकीसुत । यासी भजे तो दिवसरात । निष्काम मनें प्रेमानें ॥६३॥
करी जन्माष्टमीचें व्रत । दृढभावें भजन करीतसे शांत । कृष्णमय होय चित्त । नाहीं संशय यामाजीं ॥६४॥
जरी झाला आजारी आपण । तरीही नेम न सोडी पूर्ण । हातुनी घडेल तितुकें करोन । प्रेम संपादी श्रीहरीचें ॥६५॥
हातानें करी श्रीकृष्णमेवा । पायानें प्रदक्षिणा घाली देवा । अंतरीं धरोनि दृढभावा । वदे नाम वाचेनें ॥६६॥
शब्द - स्पर्शादि पंच विषय । यामाजीं प्रभु वसुदेवतनय । हाचि भरला ऐसा निश्र्चय । असे मानसीं त्याच्या पैं ॥६७॥
मुलें लागती त्याच्या पाठीं । कीं आम्हां सांग कथा गोमटी । तेव्हां प्रेमानें सांगतसे ओठीं । कथा सुंदर श्रीहरीच्या ॥६८॥
कथा सांगूं लागतां सविस्तर । अंतरीं लोटे प्रेमाचा पूर । अश्रुधारा वाहती थोर । नयनांतुनी त्याच्या, सात्त्विक ॥६९॥
तामस - राजस - सात्त्विक । तीन प्रकारें नयनाश्रु देख । वाहती लागुनी अंतरीं रुखरुख । परिसा कवण ते आतां ॥७०॥
घडतां चूक आपुल्याकडोन । होतसे जेव्हां अपमान । तेव्हां अश्रु लोटती नयनांतून । हे 'तामस' अश्रु जाणावे ॥७१॥
संसारीं नाना संकटें येतां । अथवा आप्त - मोह नावरे चित्ता । तये समयीं अश्नु ढाळितां । 'राजस' बोलूं त्यांलागीं ॥७२॥
देव गुरु यांच्या चरणीं । भक्ति - प्रेम अतिशय जडोनी । आठवितां त्यांचे सद्गुण निजमनीं । नयनीं वर्षती प्रेमाश्रु ॥७३॥
अथवा अन्याचें बघोनि दुःख । कळवळे अंतःकरण अधिक । सात्त्विक प्रेमें नयन सुरेख भरोनि येती तात्काळ ॥७४॥
आणिक संसारी नानापरी । परोपकारास्तव निर्धारीं । अन्यांचे सुख बघुनी सत्वरीं । अश्रु येती नेत्रांतुनी ॥७५॥
हेही अश्रु म्हणती 'सात्त्विक' । दोष नाहीं परी एक । भेद त्यांतही असे सुरेख । सांगूं आतां अवधारा ॥७६॥
देव सद्गुरु यांच्या मूर्ति । हृदयीं प्रगटतां सात्त्विक वृत्ति । उचंबळोनि प्रेम चित्तीं । नावरे भक्तांच्या अणुमात्र ॥७७॥
तैसियासी अश्रु जे येती । ते शुद्ध सात्त्विक असती । अभिमानाचें कल्मष ना चित्तीं । परम शांत शुद्धचि तो ॥७८॥
जरी दिसती संसारी आपणा । अन्याच्या सुखदुःखीं सात्त्विक भावना । तरी अभिमानरूप कुसळ जाणा । असे त्यामाजीं सत्य पहा ॥७९॥
विचार करितां समजे आपणां । संसारांतील सार्‍या कल्पना । अभिमानासहित असती जाणा । लय पावती त्या पाहीं ॥८०॥
म्हणोनि जरी झाले सात्विक अश्रु । त्यांतही अभिमान असे थोरू । परी परमार्थीं वळेल तो नरू । सत्संग लाभतां निर्धारें ॥८१॥
ज्याची असे दृढतर भक्ती । देव - सद्गुरु-चरणावरुती । त्यासी सात्त्विक भाव प्रगटती । अश्रु लोटती नयनांतुनी ॥८२॥
तेचि शुद्ध सात्त्विक भाव । अभिमानाचें नसे नांव । त्यांतील अश्रूंत केवळ देव । दिसे त्या भक्तालागीं पैं ॥८३॥
म्हणोनि ते अश्रु शुद्ध । सात्त्विक असती हें सहज सिद्ध । म्हणोनि बोलिलों वरी भेद । सात्त्विक अश्रूंत दोन पहा ॥८४॥
असो रामचंद्र हरिदास भक्त । कथा सांगतां तल्लीन होत । घळघळां अश्रु नेत्रीं वाहत । मग मुलें आनंदें नाचती पैं ॥८५॥
वाटे मुलांसी कां हा रडत । म्हणती मानसीं करूं गंमत । म्हणोनि जाती दुडदुडां धांवत । कथा ऐकाया आनंदें ॥८६॥
आणि म्हणती सांग बा आणिक । कथा गोड आम्हांसी एक । तेव्हां सांगू लागती सुरेख । कथा प्रेमळ हरिदास ॥८७॥
आणि पुनरपि सद्गदित । होउनी अंतरीं प्रेमभरित । नेत्रांतुनी अश्रु वाहत । होय तल्लीन त्यासरशीं ॥८८॥
कृष्णरूपचि दिसे जगत । मुलें हीं तेव्हां होती तटस्थ । काय झालें यासी म्हणत । आनंदोनि निजमानसीं ॥८९॥
ऐसी त्याची भक्ति अपार । निष्काम शुद्ध असे थोर । करीतसे प्रेमपुरःसर । हरिकथा सुंदर निर्लोभें ॥९०॥
करितां हरिकथा होय तन्मय । 'हरि होउनी हरिगुण गाय' । वर्णन कराया मजला न होय । सद्गुण त्याचे सकलही ॥९१॥
असो ऐसा भक्त देखोनी । वैकुंठवासी श्रीकृष्ण निजमनीं । म्हणतसे आतां अवतार अवनीं । घ्यावा जगाच्या कल्याणा ॥९२॥
रामचंद्र हरिदास हाचि । माझा भक्त निष्काम खचितचि । म्हणोनि अवतार घ्यावा ह्याचि । भक्ताच्या उदरीं निश्र्चयेंसीं ॥९३॥
याची भार्या सीताबाई । महापतिव्रता सद्गुणी असे ही । आणि माझी भक्ति पाहीं । करी निष्काम निर्लोभें ॥९४॥
म्हणोनि मी यांच्या उदरीं । अवतरतां कार्य होय झडकरी । संन्यास घ्यावया निर्धारीं । अनुकूल होतील मजलागीं ॥९५॥
जे असती खरे भक्त । त्यांची विचारशक्ति अद्भुत । त्याग कराया होती समर्थ । नाहीं संशय यामाजीं ॥९६॥
परोपकारास्तव निर्धारीं । श्री हरिदास आणि त्याची अंतुरी । पुत्रमोह मारूनि दुरी । अर्पिती मजलागीं स्वामींस ॥९७॥  
तेवींच ऐशियांच्या सदनीं । घ्यावा अवतार लगबगें जावोनी । आणि जनांसी लावावें भजनीं । प्रेम देवोनि सकलांसी ॥९८॥
संगें नेतां लक्ष्मीसी आपण । जितुकें व्हावें तितुकें जाण । नच होय जगाचें कल्याण । म्हणोनि संन्यास घ्यावा पैं ॥९९॥
आणि चित्रापुर - सारस्वत - । मठामाजींच रहावें खचित । त्यांसी क्षुधा लागली बहुत । गुरुप्रेमाची ये समयीं ॥१००॥
करावें त्यांचे समाधान । प्रेम देउनी घ्यावें आपण । त्यांचे निःसीम प्रेम जाण । तेव्हां तरतील निजभक्त ॥१०१॥
ऐशी आली कल्पना चित्तीं । श्रीविष्णूच्या जाणा निश्चितीं । म्हणोनि आतां अवतार जगतीं । घेत चित्रापुर - ग्रामीं ॥१०२॥
पुढील अध्यायीं हेंचि कथन । अवतरतील रुक्मिणीरमण । हरिदास रामचंद्र यांचें सदन । जाईल ब्रह्मानंदें भरोनि ॥१०३॥
आमुचे श्रीसद्गुरु स्वामी । 'आनंदाश्रम' म्हणतों ज्यां आम्ही । विचार करितां अंतर्यामीं । कळेल अवतार विष्णूचा हा ॥१०४॥
तेवींच बदविलें मजकडोनी । विष्णूचा अवतारचि हा म्हणोनी । न धरावा संशय निजमनीं । श्रोते हो तुम्हीं अणुमात्र ॥१०५॥
खचितचि मी अज्ञ पामर । काय वर्णन करवेल थोर । गुरुइच्छेपरी होत समग्र । तेणेंचि वदविलें हें सारें ॥१०६॥
चांगुलें असे जें या ग्रंथांत । तोचि वदवीतसे हो निश्र्चित । ज्या चुका दिसतील यांत । त्या माझ्या अहंकारवृत्तीच्या ॥१०७॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें षट्चत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०८॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां होय मोह हा दूर । षट्चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१०९॥ अध्याय ४६॥
ओव्या १०९॥
ॐ तत्सत्- श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति षट्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP