चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१२॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय तृतीय परिज्ञानाश्रमा । वदनीं वदतां तुझिया नामा । येई चित्तासी धीर तो आम्हां । अधिकचि कार्या बा पाहीं ॥१॥
जरी नाहीं चित्तीं विवेक । तरी तुजला भजतां देख । येतो धांवत सत्वरी सन्मुख । सावध सावध म्हणोनि ॥२३॥
प्रेमें न्याहाळितां रूप । समाधान होय अमूप । ऐसा देवा तूं मायबाप । देईं सुमति मजलागीं ॥३॥
तुझी महिमा तूंचि वदवीं । लीला अपार परम लाघवी । नकळे मजला कैसी वर्णावी । स्वामिराया दयाळा ॥४॥
आतां तृतीय तूंचि देवा । 'स्मरण' भक्ति देउनी दावा । सच्चित्सुखमय निजपदठेवा । हेचि प्रार्थना तुज करितों ॥५॥
स्वामी तुझा हा तृतीय आश्रम । वर्णूं तुझें चरित्र उत्तम । साक्षात् शंकरचि असमी परम । उत्कृष्ट ज्ञानी तूं पाहीं ॥६॥
असो आतां ऐका सज्जन । मागील कथेचे अनुसंधान । गेले प्रमुख लोक कोल्लूरीं जाण । पाचारावया स्वामींसी ॥७॥
स्वामींच्या भेटीस सर्वही जात । प्रार्थना करूं लागले त्वरित । म्हणती स्वामी सद्गुरुनाथ । परिसा विनंति कृपाघना ॥८॥
शिरालीहुनी आलों आम्ही । गुरुवीण जाहलों कष्टी स्वामी । म्हणोनि यावें आमुच्या ग्रामीं । कृपा करोनि बा देवा ॥९॥
नगर-संस्थानींच्या रायें । केला हुकूम कीं लवलाहें । करा शिष्य नातरी सकल हें । होईल आमुच्या स्वाधीनचि ॥१०॥
जमीन - जुमला आदिकरुनी । जप्त करूनियां संस्थानीं । आम्ही नेऊं आतां, म्हणोनि । करा सद्गुरु झडकरी ॥११॥
यापरी सकलही वृत्तांत । सांगती कोल्लूरीं स्वामींप्रत । लिंग निर्दळण्या केला आघात । इत्यादि सकल निवेदिलें ॥१२॥
असो मग प्रार्थिती सकळ । देवा त्वांचि आतां कृपाळ । येउनी सारस्वतां दावावा निश्चल । मार्ग बरवा दयानिधे ॥१३॥
नसतां स्वामी कासया मठ । कवण निवारील जनांचें संकट । ऐसें म्हणोनि घातला स्पष्ट । प्रणिपात त्यांनीं चरणांवरी ॥१४॥
श्रीशंकराश्रम स्वामींचे । गादीवरी बैसण्या योग्यतेचे । आपणचि आहां साचे । म्हणोनि आलों ये ठायीं ॥१५॥
तरी देवा यावें गुरुनाथा । आमुच्यासवें ग्रामा आतां । करावा उद्धार जनांचा ताता । स्वामिराया तूंचि बा ॥१६॥
ऐसी करोनि प्रार्थना सकळ । लोळती चरणावरी प्रेमळ । कंठ दाटला नयनीं घळघळ । अश्रुधारा वाहती ॥१७॥
ऐकुनी स्वामींचें द्रवलें हृदय । देती तेव्हां तयांसी अभय । म्हणती असे श्रीप्रभुराय । कर्ता करविता तोचि पैं ॥१८॥
घालितां भार तयावरुती । तोचि रक्षितो करुनी प्रीति । नाहीं चिंता आणिक भीति । ऐशा जनांसी कदापि ॥१९॥
येऊं आतां तुमच्या सांगातीं । शंकराश्रम-सद्गुरुमूर्ति । यांच्या संनिधीं घडेल वस्ती । सहजचि पुण्यस्थानीं त्या ॥२०॥
ऐकतां सद्गुरुस्वामींचे भाषण । हरुष जाहला जनांलागुन । धाडिला मनुष्य न लागतां क्षण । शिरालीसी तेधवां ॥२१॥
पहा साधूंचें कैसें हृदय । किती कोमल तयांचे होय । जनांची स्थिति ही कष्टमय । ऐकुनी ओळले दयाळू ॥२२॥
बघुनी तयांसी आली करुणा । प्रेमाश्रु आले स्वामींच्या नयना । म्हणोनि झडकरी उठले जाणा । जावया चित्रापुर - ग्रामासी ॥२३॥
नातरी ते विरक्त संन्यासी । कासया मठ इत्यादि त्यांसी । परी रक्षावें संकटीं भक्तांसी । म्हणोनि निघाले ते पाहीं ॥२४॥
मग सजवुनी पालखी सुंदर । नाना वाद्यें आणुनी थोर । बैसवुनी पालखीमाजीं गुरुवर । मिरवीत नेती थाटानें ॥२५॥
इकडे चित्रापुर ग्रामांतरीं । धाडिला मनुष्य पोंचुनी सारी । वार्ता कळवितां सत्वरी । केली सिद्धता सकलांनीं ॥२६॥
सर्वही गेले सामोरे त्वरा । तारीबागिल नदीतीरा । भेटती जाऊनि स्वामीवरा । सन्मानोनि आणिलें पैं ॥२७॥
मग तयांसी विधिपूर्वक । बैसविलें गादीवरी देख । पाद्यपूजादि करुनी आणिक । करिती घोष मंत्रांचा ॥२८॥
घालिती गळां सुमनहार । करिती गुरुनामाचा गजर । सकलही जन वारंवार । नमस्कार बहुत घालिती ॥२९॥
नानापरी करोनि उत्सव । संतोषले जन हे सर्व । मठामाजीं येतां सद्गुरुदेव । आली शोभा म्हणती पैं ॥३०॥
करोनि नाना अलंकार । सजविली मूर्ति देवाची सुंदर । परी नसतां दीप थोर । काय शोभा येईल ती ॥३१॥
केलीं नाना पक्वान्नें रुचिकर । लवणावांचुनी होती निस्सार । तैसें मठासी नसतां गुरुवर । कैंची शोभा येईल ती ॥३२॥
असे धनाढ्य महाथोर । वाडा बांधिला परम सुंदर । परी नसतां पोटीं पुत्र । कैंची शोभा त्या सदना ॥३३॥
तैसें स्वामी नसतां मठासी । येईल शोभा सांगा कैसी । म्हणोनि आमुच्या सकल जनांसी । जाहला होता खेद बहु ॥३४॥
आतां येतां सद्गुरु मठासी । आनंद झाला सर्वांच्या मनानी । आली शोभा मठासी कैसी । म्हणती आम्हांसी न वर्णवे ॥३५॥
भुकेलियासी देखतां अन्न । कैसें उल्हासे त्याचें मन । तैसें स्वामींचे बघतां चरण । झाला सारस्वतां आनंद ॥३६॥
असो जाहला सर्व समारंभ । प्रगटला तो उमावल्लभ । भक्तांसी तो लाभला सुलभ । 'परिज्ञानाश्रम' या नामें ॥३७॥
मग चित्रापुर - ग्रामींच्या जनांनीं । मठासी स्वामी केले म्हणोनि । कळविली वार्ता नगर - संस्थानीं । तेथील अधिपतियालागीं ॥३८॥
त्यासी वाटलें समाधान । जो केला हुकूम जप्तीचा जाण । घेतला माघार रायें आपण । मनःपूर्वक त्या काळीं ॥३९॥
तेव्हां जाहला आनंद थोर । सारस्वत ब्राह्मणां समग्र । मग राहिले सुखानें ते नर । आठवुनी चित्तीं गुरुमूर्ती ॥४०॥
असो आतां तृतीय आश्रम । स्वामी सद्गुरु परिज्ञानाश्रम । साक्षात् शंकरचि चित्रापुर - ग्राम । येथें येउनी राहिला ॥४१॥
परम विरक्त ब्रह्मज्ञानी । आत्मरूपचि पाहे त्रिभुवनीं । महातपस्वी योगी असुनी । बहुत सद्गुणी ते पाहीं ॥४२॥
क्षमा शांति दया अनुदिनीं । राहिल्या अंगीं वास करोनि । काय सांगूं रसाळ वाणी । करिती बोध जनांसी पैं ॥४३॥
मठाच्या आधिपत्यामाजीं विशेष । लक्ष न घालिती ते निमिष । योगाभ्यासामाजीं खास । असती निमग्र सर्वदा ॥४४॥
जे येती मुमुक्षु जवळी । तयांसी तेव्हां वेळोवेळीं । परमार्थविचार समूळीं । कथिती विवरुनी प्रेमानें ॥४५॥
कधीं कधीं जाउनी कोल्लूर - ग्रामीं । राहती एकांतवासीं स्वामी । कीर्ति तयांची बहुतचि नामी । वर्णाया अशक्त मी पाहीं ॥४६॥
तरी गुरुकृपें कथा कांहीं । मजला विदित त्या मी पाहीं । करितों निवेदन आतां, सर्वही । कर्ता करविता गुरुराज ॥४७॥
असो आतां ऐका प्रेमळ । एकेकाळीं सद्गुरु दयाळ । परिज्ञानाश्रम भक्तवत्सल । निघाले परिवारासमवेत ॥४८॥
जावया गोकर्णीं भंडिकेरीं । जातां मध्ये कुंभापुरीं । 'कुमठा' म्हणती त्या ग्रामांतरीं । राहिले तेव्हां श्रीस्वामी ॥४९॥
तेथें एक सावकार । त्याची भार्या परम चतुर । शांत सगुणी पतिव्रता थोर । झाला विषमज्वर तिजलागीं ॥५०॥
झाला ज्वर अतिशय तिजला । शुद्धीच नाहीं त्या साध्वीला । श्वासोच्छ्वास इतुकाचि राहिला । बघुनी घाबरला सावकार ॥५१॥
आठवुनी गुण तियेचे स्वमनीं । रडूं लागला स्फुंदस्फुंदोनी । आतांचि जाईल प्राण ये क्षणीं । म्हणोनि दुःखित जाहला ॥५२॥
केले बहुपरी उपचार सकल । परी ते होती सकलही निष्फल । प्राणोत्क्रमण - समय आला जवळ । त्या साध्वीचा ते वेळीं ॥५३॥
तितुकियामाजीं एक सारस्वत । तेथेंचि पातला अवचित । काहीं कारणानिमित्त । सावकारापाशीं तो पाहीं ॥५४॥
बघुनी तियेची स्थिति भयंकर । म्हणे सारस्वत आमुचे गुरुवर । परिज्ञानाश्रम स्वामी थोर । ब्रह्मज्ञानी असती ते ॥५५॥
आले येथें ग्रामामाजीं । दोन दिवस जाहले सहजीं । अकरा तासांवरी आजी । जाती गोकर्णीं ते पाहीं ॥५६॥
करूनि प्रार्थना तयांजवळी । मस्तक ठेवीं चरणकमळीं । त्यांच्या कृपाप्रसादें ये वेळीं । बरी होईल तव पत्नी ॥५७॥
इतुके शब्द पडतां कानीं । तो सावकार लगबगें धांवुनी । गेला परिज्ञानाश्रमस्वामींच्या स्थानीं । घातलें दंडवत त्या समयीं ॥५८॥
म्हणे सद्गुरो दयाळा आतां । काय करूं माझ्या भार्येला ताता । तुजवांचोनि ना कोणी सोडविता । खचितचि जाणा निर्धारें ॥५९॥
केले नाना उपचार थोर । आणिले वैद्य चतुर अपार । परी वृद्धीच पावला विषमज्वर । म्हणोनि आलों चरणीं या ॥६०॥
चार घटिका वेळ नच जाय । ऐनी तियेची स्थिति होय । आतां कवण करावा उपाय । न समजे तो मजलागीं ॥६१॥
तिचे गुण परम उत्कृष्ट । परासी तिळभरी न दे कष्ट । म्हणोनि मजला वाटतें वाईट । गुण आठवुनी दयाळा ॥६२॥
म्हणोनि देवा आलों शरण । कृपा करावी मजवरी जाण । रडूं लागला ऐसें म्हणोनि । स्कंदस्फुंदोन तेधवां ॥६३॥
यावरी बोले सद्गुरुराज । कृपा करील तुजवरी सहज । भवानीशंकर तोचि समज । नाहीं भय तुज 'स्मर' त्यासी ॥६४॥
हा संसार नव्हे शाश्वत । ऐसें समजुनी ठेवावें चित्त । श्रीप्रभुरायाच्या चरणीं सतत । तोचि रक्षक सकलांसी ॥६५॥
ऐसें म्हणोनि फलमंत्राक्षता । देउनी सांगती धीर धरीं चित्ता । ऐसें प्रेमळ वचन ऐकतां । आला धीर सावकारा ॥६६॥
केला नवस निजमानसीं । आरोग्य होतां आपुल्या कांतेसी । आणितों भेटीसी सद्गुरूपाशीं । ऐसें म्हणोनि गेला तो ॥६७॥
मग जाउनी आपल्या सदनीं । घातल्या मंत्राक्षता कांतेच्या वदनीं । तेव्हां झाला चमत्कार काय तो झणीं । सांगतों इकडे चित्त द्यावें ॥६८॥
हळू हळू येऊं लागला घाम । शुद्धीवर येउनी म्हणे राम । सांगू लागली "मजला परम । सुंदर संन्यासी भेटले कीं ॥६९॥
येउनी माझ्या मस्तकावरी । ठेवुनी हस्त म्हणाले तूं बरी । होशील आतां क्षणेंचि झडकरी" । ऐसें स्वप्न देखियलें ॥७०॥
ऐकुनी स्वप्नाचा समाचार । विस्मित जाहला सावकार । म्हणे खचितचि ते गुरुवर । नव्हती मनुष्य सर्वथा ॥७१॥
मग निवेदिला सकल वृत्तांत । आपुल्या निजकांतेप्रत । ऐकतां तोषली ती बहुत । म्हणे भेटवा मजलागीं ॥७२॥
यावरी बोले सावकार । धीर धरीं तुजला ज्वर । गेलियावरी तेथें सत्वर । घेउनी जातों मी पाहीं ॥७३॥
ऐसें बोलुनी तो लगबगें । संनिधींपाशीं जावया लागे । झाला तो वृत्तांत सकलही सांगे । श्रीसद्गुरु-संनिधानीं ॥७४॥
मग करोनि नमस्कार । मूर्ति पाहे वारंवार । कंठ दाटुनी नयनीं पूर आला भडभडोनि प्रेमानें ॥७५॥
यावरी बोलती दयाघन । धरितां विश्वास दृढतर पूर्ण। मग तो कृपाळू करी निवारण । निजभक्तांचे सांकडे ॥७६॥
म्हणोनि एक सदृढ भाव । धरीं निजमानसीं सदैव । ऐसें करितां तो गुरुदेव । राहे पाठीसी सर्वदा ॥७७॥
इतुकें सांगुनी स्वामी पाहीं । निघाले गोकर्णीं लवलाहीं । इकडे सावकार जाय आपुल्या गृहीं । धरोनि हृदयीं गुरुमूर्ति ॥७८॥
मग तयाच्या पत्नीचा ज्वर । गुरुकृपेनें गेला सत्वर । तेव्हां लोटतां दिवस चार । गेला सावकार गोकर्णीं ॥७९॥
भेटला पुनरपि सद्गुरुचरणीं । पाद्यपूजा आदिकरूनी । मग आला ग्रामालागुनी । कुंभापुरीं सत्वर ॥८०॥
असो आतां सद्गुरुनाथ । गेले शिराळीग्रामाप्रत । इकडे सावकार पत्नीसहित । निघाला जावया चित्रापुरा ॥८१॥
कांहीं दिन लोटल्यावरी । जाउनी शिराली - ग्रामांतरीं । भेटला स्वामींसी सत्वरी । घेउनी कांतेसी तेधवां ॥८२॥
बघतां ती आनंदली स्वमनीं । कीं मीं पाहिले जे स्वप्नीं । तेचि संन्यासी महामुनी । असती स्वामी हे पाहीं ॥८३॥
ऐसें ती सांगे निज भ्रतारा । तेव्हां अधिकचि वाटे हा खरा । साक्षात् ईश्वरचि नव्हे दुसरा । उभयतांसी त्या समयीं ॥८४॥
मग राहुनी तेथे कांहीं दिन । गेलीं आपुल्या स्थानालागुन । आठवीत स्वामींचे सद्गुण । राहिलीं सुखानें स्वस्थानीं ॥८५॥
पुढील अध्यायीं रसभरित । कथा करावी श्रवण त्वरित । ऐकतां होय प्रेमळ चित्त । सद्गुरुस्वामींची गुणकीर्ति ॥८६॥
ऐकुनी करावें त्यापरी आपण । धरावे मानसीं त्यांचे सद्गुण । अर्थात् करावें तैसेंचि वर्तन । आठवुनी गुण सद्गुरूचे ॥८७॥
तरी तो सद्गुरु घाली पार । तोचि रक्षी वारंवार । परी धरावा निश्चय थोर । गुरूचि आम्हांसि तारक ॥८८॥
सद्गुरूवांचोनि आत्मज्ञान । न होय कवणासी प्राप्त जाण । जरी तो साक्षात् ईश्वरचि पूर्ण । तरीही गुरुविण न होय ॥८९॥
श्रीराम तो वसिष्ठासी । जातां शरण परियेसीं । झालें आत्मज्ञान त्याजसी । हें विदित असे सकलां कीं ॥९०॥
सांदीपन या ऋषीलागीं । साक्षात् श्रीकृष्ण होउनी विरागी । शरण जाउनी तो वेगीं । ब्रह्मज्ञान पावला ॥९१॥
कलियुगामाजीं नामदेव । विठोबाचरणीं निस्सीम भाव । त्याची भक्ति परम अपूर्व । योग्यता त्याची कवणा न ये ॥९२॥
जेव्हां गेला तो गोरा कुंभार । यांच्या सदनीं संतांबरोबर । तेव्हां सांगे ज्ञानेश्वर । गोरयालागीं तें ऐका ॥९३॥
अरे गोरया तुवां येथ । आसनीं बैसविले घट समस्त । हिरवे भाजले कैंचे यांत । निवडुनी आम्हां सांगें बा ॥९४॥
तेव्हां तो थापटी घेउनी हातीं । मारी सकल संतांच्या माथीं । सारे वैसले स्वस्थ चित्तीं । मग येई नामयाकडे ॥९५॥
नामा उठे आईग करोन । गोरा म्हणे हें एक भाजन । हिरवेंचि असे अद्यापि जाण । न भाजे बरवें कच्चें पैं ॥९६॥
ऐकुनी सकल हांसती संत । अपमान पावुनी नामदेव त्वरित । गेला थेट पंढरी - ग्रामांत । विठोवा - संनिधीं दुःखानें ॥९७॥
तेव्हां विठ्ठलें बहुपरी तयासी । सांगितलें खचितचि बाळा तुजसी । करितां सद्गुरु तेव्हांचि तूं पावसी । आत्मज्ञान निर्धारें ॥९८॥
गुरूवांचोनि आत्मज्ञान । न होय बापा खचितचि जाण । म्हणोनि तुजला 'कच्चा' म्हणोन । हांसले संत ते पाहीं ॥९९॥
अससी तूं माझा खरा भक्त । गुरुवाक्यावीण होय तें व्यर्थ । म्यांही केला सद्गुरु समर्थ । प्रतिअवतारीं निर्धारें ॥१००॥
म्हणोनि आतां जाईं शरण । विसोबा खेचर याचे चरण । धरोनि घेईं उपदेश जाण । धांव झडकरी त्या ठायीं ॥१०१॥
असो मग तो जाउनी गुरुपदीं । उपदेश घेतला प्रेमानें आधीं । तेव्हांचि पोंचे निज - आनंदीं । प्रसिद्ध आहे हें जगतीं ॥१०२॥
एवं सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान । न होय म्हणुनी सोडुनी अभिमान । जानें आपण त्यालागींच शरण । तरीच होईल सार्थक पैं ॥१०३॥
नातरी जन्ममरणांच्या घोर । घिरट्या घाली वारंवार । यांत सुख नसे अणुमात्र । म्हणोनि जावें शरण तया ॥१०४॥
तोचि निवारी आपुलें संकट । उद्धरी प्रेमें आम्हांसी स्पष्ट । सुलभ युक्तीनें दाखवी वाट । परम उत्कृष्ट मोक्षाची ॥१०५॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ हे एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें द्वादश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०६॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां गुरुरूपचि होय साचार । द्वादशाध्याय रसाळ हा ॥१०७॥
॥अध्याय १२ ॥
ओव्या ॥१०७॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥
॥ इति द्वादशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 19, 2024
TOP