चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३४॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ।॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा श्रीगुरुराया । तव कृपेची पडतां छाया । तेव्हां काय उणीव तया । भक्तालागीं निश्र्चयेंसीं ॥१॥
ऐसी तूं सद्गुरु माउली । कीर्ति वर्णितां मूर्ति आपुली । निश्र्चयें न उरे मजहुनी वेगळी । काय देवा ही नवलाई ॥२॥
फिटोनि जाय सकल भ्रांती । अहंता ममता सर्वही पळती । मी - तूंपणाचा भाव हा निश्चितीं । सर्वही जाय क्षणमात्रें ॥३॥
सारें जग हें तुजवांचोनि । न दिसे अन्य बा मजलागोनि । ऐसी तुझी महिमा म्हणोनि । झालों धन्य मी जगीं बापा ॥४॥
तुझ्या कृपेवांचूनि इतुकी । स्थिति न बाणे कवणासी निकी । कैसी ती आतां सांगतों मी कीं । देवा गुरुराया तुजलागीं ॥५॥
सकलही विदित असे तुजला । मी काय सांगूं देवा दयाळा । परी प्रेम नावरे मजला । म्हणोनि बडबड करितों बा ॥६॥
बालकाच्या सकलही खेळा । माता पाहे आपुल्या डोळां । परी वृत्तांत सांगे आपुला । बाळ बोबड्या बोलानें ॥७॥
तैसें देवा मी अज्ञ बालक । सांगतों प्रेमें तुजला देख । मातेपरी तूं ऐकसी चोख । प्रेमकटाक्षें बघोनियां ॥८॥
पहा कैसी तुझी महिमा । पात्र होतां तुझिया प्रेमा । आत्मज्ञान होय आम्हां । क्षण न लागतां हो पाहीं ॥९॥
प्रपंचामाजीं आप्त बहुत । त्यांची जनांसी सहजचि प्रीत । परी कवणाही ज्ञान प्राप्त । न होय आप्तांकडोनियां ॥१०॥
होय दुःख अमित । आप्तसंगेंकरोनि सतत । तुझ्या संगें न होय खचित । दुःख अणुमात्र दयाघना ॥११॥
तुझी मूर्ति धरितां सतत । आत्मज्ञान होय त्वरित । म्हणोनि तुझा महिमा अद्भुत । नाहीं संशय यामाजीं ॥१२॥
माता पिता भगिनी पत्नी । भ्रतार पुत्र कन्या निशिदिनीं । जरी आम्ही धरितों स्वमनीं । तरीही सुख ना अणुमात्र ॥१३॥
परी देवा तुज आठवुनी । घडीभरी मूर्ति धरितां स्वमनीं । अति आनंद होय तो गगनीं । न समावे निश्चयेंसीं ॥१४॥
वृत्ति होऊनि तल्लीन सारी । मी - तूंपणा न उरे अणुभरी । ऐसी तुझी मूर्ति साजिरी । वर्णाया अशक्त मी पाहीं ॥१५॥
जो असे खरा भक्त । त्यासीच होय ज्ञान प्राप्त । तल्लीन होय सतत । तुझ्या पदीं बा देवा ॥१६॥
मी एक अज्ञ पामर । न कळे सारासार विचार । तुझें प्रेम अणुमात्र । न शिवे बा मजलागीं ॥१७॥
असो आतां श्रोते सज्जन । मागील अध्यायीं कथिलें जाण । हासगणी - कुळकर्णी यालागोन । उद्धरिलें स्वामी - कृपाघनें ॥१८॥
ऐका सावध आणिक कथा । श्रीपांडुरंगाश्रम स्वामींच्या आतां । अद्भुत महिमा ऐकतां । पाप निवारण होय पां ॥१९॥
मंगळूर या ग्रामामाजीं । श्रीपांडुरंगाश्रम - गुरुजी । प्रतिवर्षीं जाती सहजीं । समाधि दर्शनालागीं पैं ॥२०॥
ग्रामासंनिध येतांक्षणीं । सामोरे जाती जन त्या स्थानीं । पालखीमाजीं बैसवुनी । आणिती मिरवीत प्रेमानें ॥२१॥
तेव्हां तेथील सारे जन । घरोघरीं दिवे लावोन । बांधिती तोरणें गोमटीं जाण । देती नारळ आरती पैं ॥२२॥
तेथें राहती वैष्णव जन । तेही स्वामींसी भजती जाण । दीप लावुनी आरती भजन । करिती सदनासमीप ते ॥२३॥
ऐसें करिती प्रतिवर्षीं । आमुचे स्वामी आलिया दिवशीं । घरोघरीं दिवे लावुनी परियेसीं । ओवाळिती आरती प्रेमानें ॥२४॥
ऐसें असतां तेथील एक । सावकार वैष्णव जातीचा देख । तोचि मुख्य त्यांतील भजक । पुढारी सकळ कार्याचा ॥२५॥
तयालागीं एकचि पुत्र । सद्गुणी असुनी आचरण पवित्र । पडला अंथरुणीं न उघडे नेत्र । विषमज्वर आलासे त्या ॥२६॥
नाना उपचार करोनि बघती । परी ते निष्फल सारे होती । आप्तजन सकळही रडती । जगेना पुत्र म्हणोनियां ॥२७॥
सुटे अंगीं घाम बहुत । शुद्धिच नाहीं तयाप्रत । वैद्यही म्हणती न वांचे निश्चित । पडला हाहाःकार त्या समयीं ॥२८॥
तेव्हां तेचि दिनीं स्वामी । आले पांडुरंगाश्रम त्या ग्रामीं । आतां ऐका श्रोते हो तुम्ही । पुढील वृत्तांत सारा पैं ॥२९॥
प्रतिवर्षीं सावकार । स्वामी येतां गृहासमोर । दिवे तोरणें इत्यादि शृंगार । करीत परम भक्तीनें ॥३०॥
येणें करितां सकलही वैष्णव । करिती आपणही दीपादि सर्व । ये वर्षीं सावकाराचा भक्तिभाव । गेला सारा पुत्रावरी ॥३१॥
पुत्र पडला निचेष्टित । तेव्हां काय आठवे त्याप्रत । दिवे न लाविले कुणींही तेथ । व्यापिलें अंतर दुःखानळें ॥३२॥
मग कैंचा गुरुदेव । आठवे बापुड्यालागीं सर्व । आतां ऐका पुढील अपूर्व । कथा तुम्ही भाविक हो ॥३३॥
इकडे स्वामींची पालखी देख । मिरवित आणिली भक्तांनीं सुरेख । घरोघरीं दीप लाविले सन्मुख । देती न आरती नारळ पैं ॥३४॥
तेव्हां सावकाराच्या गृहाजवळी । दिवे न लाविले म्हणोनि त्या स्थळीं । कासया जाऊं आम्ही ये वेळीं । ऐसा विचार केला जनीं ॥३५॥
म्हणोनि दुज्या द्वारें जावया । निघाले जन हें पाहोनियां । सद्गुरुस्वामी म्हणती कासया । वैष्णव - गल्ली सोडियली ॥३६॥
तेव्हां म्हणती भक्तजन । दिवे न लाविले तेथें म्हणोन । कासया वृथाचि जावें आपण । अनेक वाटा असती पैं ॥३७॥
तेव्हां म्हणती सद्गुरु दयाळ । कां न लाविले दिवे ये वेळ । बघूं आपण जाऊनि सकळ । काय कारण हें सारें ॥३८॥
काहींतरी असावा आघात । म्हणोनि दिवे न लाविले तेथ । नातरी न सोडिती सत्कर्म निश्चित । झडकरी जाऊं तेथेंचि ॥३९॥
पहा कैसी सद्गुरु - माउली । भक्तांवरी कृपेनें ओळली । चित्तवृत्ति बहुतचि द्रवली । जाऊं म्हणती त्या स्थानीं ॥४०॥
सकलही विदित तयांलागून । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । परी न दाविती जनांसी जाण । अंतर - हेतु हो पाहीं ॥४१॥
येर जनांसी कैसें वाटे । कीं तेथें दिवे न लाविले नेटें । कासया जावें तया वाटे । वृथाचि आपण या विचारें ॥४२॥
परी सद्गुरु - स्वामींलागीं । चिंता होऊनि म्हणती वेगीं । जाऊं आपण त्याचि मार्गीं । काय कारण बघूं सारें ॥४३॥
इतुकें कासया त्यांसी सांगें । सकलही भार वाहती अंगें । याती कूळ कांहीं न बघे । प्रेमभाव बघती पैं ॥४४॥
असो इकडे सावकार । वायें ऐकतां महाथोर । म्हणे मानसीं काय बा मी खर । विसरलों देवा तुजलागीं ॥४५॥
प्रतिवर्षीं दीपोत्सव करूनि । सुंदर मूर्ति पाहिली नयनीं । आतां पडिलों मी दिनरजनीं । सुतचिंतेच्या जाळ्यांतरीं ॥४६॥
म्हणोनि न बांधिलें तोरण । ठेविले नाहीं दिवे उजळोन । भूल पडली मजलागोन । अपराध थोर केला पैं ॥४७॥
ऐसें बोलुनी उठला लगबगें । नारळ केळीं आरती संगें । घेऊनि आरती धांवूं लागे । तोंवरी पालखी आली पैं ॥४८॥
येतां आपुल्या गृहासंनिध । भेटला जाऊनि म्हणे मी अंध । तेव्हां बोलती स्वामी प्रसिद्ध । काय विशेष आजि पैं ॥४९॥
तेव्हां बोले सावकार । असे माझा आजारी पुत्र । आजिचा दिन न जाय साचार । ऐसें वाटे मजलागीं ॥५०॥
म्हणोनि देवा आम्हांलागीं । दिवे उजळाया आमुच्या मार्गीं । भानचि राहिलें नाहीं अंगीं । थोर अपराध झाला पैं ॥५१॥
यावरी बोलती सद्गुरुराज । इतुकेंचि पुरे आम्हां आज । पुढील वर्षीं उत्सव सहज । कराल पुत्रासहितचि ॥५२॥
यावरी बोले सावकार । आपुल्या कृपेंचि जगावा पुत्र । नातरी त्यासी बघतां साचार । आजिचा दिवस नच जाये ॥५३॥
देवा दयाळा तूंचि रक्षावें । आणिक उपाय न देखें बरवे । ऐसें बोलुनी दृढभावें । वंदिले चरण स्वामींचे ॥५४॥
यावरी बोलती भक्तवत्सल । भवानीशंकर तोचि हरील । संकट सारें तुझें सकल । म्हणोनि प्रसाद दिधला पैं ॥५५॥
मग तो इसम करी काय । चरण प्रक्षाळुनी तीर्थ घेय । नमुनी सद्भावें धांवत जाय । गृहासी आपुल्या तात्काळ ॥५६॥
मुखीं घातलें चरणतीर्थ । प्रसाद गंध लाविलें अंगाप्रत । पहा चमत्कार अद्भुत । ऐका प्रेमळ श्रोते हो ॥५७॥
सद्गुरुकृपा झालियावरी । कैंचें दुःख उरेल भूवरी । तीर्थ घालितां मुखामाझारीं । गिळिलें सारें क्षणमात्रं ॥५८॥
थेंबही उदक न जाय पोटीं । परी चरणतीर्थ घालितां ओठीं । पसरूनि मुख उठाउठीं । गिळिलें तत्काळ क्षणमात्रें ॥५९॥
तेव्हां बघती सकलही जन । आश्चर्यें म्हणती अहो हे कोण । साक्षात् कृष्णचि कीं अवतरले जाण । ऐसें परस्पर बोलती ॥६०॥
असो मग तो सावकार - सुत । हळू हळू शुद्धीवरी येत । तीन तासां-माजींच होत । बोल बोलता तो जाणा ॥६१॥
तेव्हां त्याचीं मातापिता । बघती अंग त्याचें तत्त्वतां । ज्वर नाहीं म्हणोनि चित्ता । जाहला हर्ष सकलांसी ॥६२॥
असो मग म्हणे तो सुत । मज क्षुधा लागली बहुत । देईं कांहीं आई गे निश्चित । पोटासी ग्रास मजलागीं ॥६३॥
तेव्हां ऐकोनि पुत्राचें वचन । दिधलें दूध तयालागुन । निद्रा लागली न लागतां क्षण । सुखंड त्यासी ते समयीं ॥६४॥
तीन दिवस नव्हती शुद्धि । गुरुप्रसादें सकलही व्याधि । गेली हरोनि म्हणोनि पदोपदीं । आठविती सद्गुरुस्वामींसी ॥६५॥
पहांट होतांक्षणीं जाण । गेला सावकार घ्यावया दर्शन । श्रीपांडुरंगाश्रम सघन । यांच्या संनिधीं हो पाहीं ॥६६॥
आणिक करी त्यांचे स्तवन । म्हणे स्वामी तूं कृपाघन । तव कृपेनें पुत्र जाण । जगला निश्चयें सत्य पहा ॥६७॥
प्रयत्न केले नानाविध । निष्फल होती ते सबंध । तुझा देतां तीर्थ प्रसाद । वांचला मम बाळ देवा ॥६८॥
आजवरी मी भजलों तुजला । परी तूं देवचि असे न कळे मजला । 'सारस्वत-स्वामी' इतुकेंचि आपुला । समजोनि राहिलों खचित मी ॥६९॥
आतां कळलें मजलागुनी । श्रीकृष्णचि अवतरलासी अवनीं । किती वानूं तुझी करणी । अगाध बापा कळेना ॥७०॥
मी असें अज्ञ पामर । तूंचि रक्षीं निज किंकर । शरण आलों देवा सत्वर । तारी तारीं गुरुराया ॥७१॥
काय करूं आतां उपाय । तोडावयासि दुस्तर भवभय । तूंचि सांगें देउनी अभय । ठेवितों माथा तव चरणीं ॥७२॥
ऐसें म्हणोनि ठेविला माथा । श्रीस्वामींच्या चरणावरुता । अनुताप बहुत झाला चित्ता । सावकाराच्या त्या समयीं ॥७३॥
कंठ जाहला सद्गदित । रोमांच उठती अंगाप्रत । नेत्रांतुनी होई अश्रुपात । केला अभिषेक चरणांवरी ॥७४॥
पुढें न बोलवे एकही शब्द । उभा राहिला होऊनि स्तब्ध । चित्तीं भरला प्रेमानंद । ओठ कांपती थरथर ते ॥७५॥
तेव्हां बोलती सद्गुरुराज । अणुमात्र भय नाहीं तुज । मनुष्य - जन्म असतां सहज । काय उणीवता असे बा ॥७६॥
देवावरी घालितां भार । तोचि करील त्यांतुनी पार । ऐसा धरीं दृढ निर्धार । निरंतर तूं बापा ॥७७॥
न कळे जरी ज्ञानाज्ञान । न घडे अणुमात्र चिंतन । तरी धरितां त्याचे चरण । करी तो उद्धार निश्र्चयेंसीं ॥७८॥
आणिक साधन न लगे कांहीं । चिंतीत असावें तयासी हृदयीं । तनुमन इत्यादि सर्वही । करावें अर्पण प्रेमें त्या ॥७९॥
न सोडीं तूं प्रपंच जाण । नको राहूं गुरुगृहीं जाऊन । संसार - धंदा करीत असतां चरण । हृदयीं धरीं तयाचे ॥८०॥
इतुकें करितां तुजलागोन । होय निश्र्चयें आत्मज्ञान । त्याहुनी श्रेष्ठ आणिक साधन । नसे अन्य जगतीं बा ॥८१॥
ऐकुनी म्हणतसे सावकार । देव आम्हां न दिसे साचार । गुरुचि ब्रह्मा-विष्णु-महेश्वर । ऐसें कथिलें शास्त्रांतरीं ॥८२॥
तोचि असे परब्रह्म । तेणेंचि नं दावावा मार्ग सुगम । अन्य नर जरी झाला उत्तम । तरीही तो असमर्थ ॥८३॥
सद्गुरु केवळ पूर्ण ब्रह्म । नाहीं त्यासी रूप नाम । आनंदाची मूर्ति परम । द्वैत नसे त्या ठायीं ॥८४॥
ऐशी मूर्ति ध्यातां स्वमनीं । ध्याता होय ब्रह्मचि झणीं । ऐसें आम्हीं ऐकिलें कर्णीं । शास्त्रें संतांकडूनही ॥८५॥
सद्गुरु म्हणजे देव खास । प्रकाशस्वरूप म्हणती त्यास । स्वानंदाची मूर्ति सुरस । प्राकृत - सुखदुःखरहित तो ॥८६॥
ऐशियासंनिध जातां आपण । क्षण न लागतां निरसे अज्ञान । अणुमात्र नुरे भेदभान । ऐसें म्हणे तो सावकार ॥८७॥
येथें येईल सहज प्रश्न । गुरूसी भेटती बहुत जन । उपदेश घेती त्यांकडोन । परी कां न फिटे अज्ञान तें ॥८८॥
तरी सांगतों त्याची खूण । कीं सद्गुरूकडे राहिलों आपण । तरी नव्हे तें खरें दर्शन । न होय उपयोग त्याचा पैं ॥८९॥
नाहीं झाला उपदेश - ग्रहण । वरीवरी केलें सर्वही जाण । दृढतर गुरुभक्तीवीण । निष्फळ सारें तु तें होय ॥९०॥
जेव्हां होईल खरें दर्शन । तेव्हांचि होय अज्ञाननिरसन । कैसें तें सांगूं वचन । एकाग्र चित्तें ऐकावें ॥९१॥
सद्गुरुचरणीं मनुष्यभाव । नसावा पहा सर्वथैव । सद्गुरु हा असे देव । ऐसा निश्वय धरावा ॥९२॥
सद्गुरुवीण न अन्य शास्त्र । तोचि धर्म - सिंधु पवित्र । त्याची आज्ञा नुल्लंघे अणुमात्र । अति प्रेमानें गुरुभक्त ॥९३॥
ऐसें होतां खरें दर्शन । वृत्तिशून्य होय मन । तेव्हां होय अज्ञान - निरसन । क्षण न लागतां हो जाणा ॥९४॥
जोंवरी असे मनुष्यभाव । तोंवरी न दिसे त्यासी देव । देव देखणे याचें नांव । खरें दर्शन श्रीगुरूचें ॥९५॥
जेव्हां श्रीसद्गुरुराणा । देवचि दिसे आपणा । अज्ञान निरसुनी पावे ज्ञाना । निजानंद प्रगटे तैं ॥९६॥
असो बहुत कासया बोलणें । धरितां चरण समाधान बाणे । त्यावीण आणिक नाहींत साधनें । करावी पालन गुरु - आज्ञा ॥९७॥
गुरु आज्ञाचि मुख्य जनांसी । तेणेंचि समाधान होय त्यांसी । अन्य साधन नाहीं परियेसीं । सत्य सत्य त्रिवाचा ॥९८॥
असो सावकार परम भक्त । झाला सद्गुरूचा यथार्थ । पूजूनियां सद्गुरूप्रत । चरणतीर्थ घेऊन गेला ॥९९॥
तीर्थप्रसाद ना त्या पुत्रासी । दिला इतरही मंडळीसी । आनंद झाला सर्वांसी । गुरुमहिमा ऐकूनियां ॥१००॥
त्यानंतर तो त्याचा सुत । होऊनियां ज्वरमुक्त । स्वामींचे दर्शन घ्यावया मठाप्रत । गेला संगें पितयाच्या ॥१०१॥
जाउनी बोले देवा तुझिया । कृपेनें वांचलों गुरुराया । तुज मनुष्य म्हणे जो सखया । गहन नरक होय त्यासी ॥१०२॥
पूर्व सुकृत उदया आलें । म्हणोनि हे चरण लाभले । इतुके दिवस नाहीं कळलें । तूं देवचि ऐसें आम्हांतें ॥१०३॥
ऐसें हर्षोद्गारें स्तवुनी । प्रेमभरें पाहे नयनीं । स्वामी तूंचि समर्थ एक अवनीं । म्हणोनि घातलें दंडवत ॥१०४॥
तेव्हां बोलती सद्गुरुनाथ । तुमचा भाव असे बळकट । तोचि फळला तुम्हांप्रत । आमुचें काय यामाजीं ॥१०५॥
पहा श्रोते हो आतां सकळ । स्वामींचे हृदय कैसें निर्मल । 'मी कर्ता' ऐसा भाव समूळ । गेला निमोनि तयांचा ॥१०६॥
नाहीं अभिमान त्यांच्यापाशीं । अणुभरीही निश्र्चयेंसीं । सारें ब्रह्मत्रि दिसे तयांसी । कैंचा येईल अभिमान ॥१०७॥
जेथें असे दुजेपणा । तेथेंचि वसे अभिमान जाणा । आपुला आपणचि एकटा, तयांना । कैंचा स्फुरेल अभिमान ॥१०८॥
नसे ज्यांसी उंच नीच । सारें ब्रह्मचि जयां साच । तयां कैंचा अभिमान, तुम्हीच । सांगा श्रोते सज्जन हो ॥१०९॥
जेथें कांहीं असे द्वैत । तेथें अभिमान उठे अमित । सारें ब्रह्मचि ज्ञानियांप्रत । तेथें येई द्वैत कोठोनि ॥११०॥
द्वैत नाहीं तेथे कैंचा । अभिमान उठे सांगा साचा । ऐसा सद्गुरुनाथ आमुचा । किती वानूं त्यालागीं ॥१११॥
आणिक ऐका त्यांचें महिमान । पुढील अध्यायीं करूं वर्णन । त्यांचे वाक्यचि अमृत जाण । तेणेंचि तरती जन पाहीं ॥११२॥
हेचि कथा अद्भुत । पुढील अध्यायीं सांगूं त्वरित । आतां संपूर्ण करूं येथ । सावकार - कथा हो पाहीं ॥११३॥
मग उभय जनक - कुमर । राहती सुखानें स्मरूनि गुरुवर । जरी जातीचे वैष्णववीर । तरीही भजती स्वामींतें ॥११४॥
ऐसे आमुचे स्वामी गुरुवर । श्रीपांडुरंगाश्रम थोर । महिमा असे त्यांचा अपार । वर्णूं शकेंना अज्ञ मी ॥११५॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें चतुस्त्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥११६॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । चतुस्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥११७॥
अध्याय ३४ ॥
ओंव्या ११७ ॥
ॐ तत्सत् - श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2024
TOP