चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४१॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्पांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरो भक्तवत्सला । करुणार्णवा परम कृपाळा । अवर्णनीय तुझी लीला । लिहाया मेदिनी न पुरे ही ॥१॥
कैसे वर्णावे तुझे सद्गुण । न कळे देवा मजला जाण । जरी या केला विचार पूर्ण । गुणातीत तूं अससी हो ॥२॥
पहा बघतां कैसें दिसे । दुर्गुण अंगीं एकही नसे । दुर्गुणावीण सद्गुण ऐसें । नाम कोठोनि ये देवा ॥३॥
अंधारावरुनी प्रकाश ऐसें । नाम येई त्या परियेसें । आणि प्रकाश जेथें असे । तेथें अंधार नच राहे ॥४॥
तेवीं सद्गुण जेथें वसे । तेथुनी दुर्गुण धांवतसे । दुर्गुण नसतां नाम कैसें । सद्गुण ऐसें येतें पैं ॥५॥
एवं जेथें असे द्वैत । तेथेंचि नाम अमुक हें देत । सारें एकचि असे जेथ । नामरूप तेथ कैंचें पैं ॥६॥
एवं देवा सद्गुण दुर्गुण । तुझ्या अंगीं नाहींत जाण । म्हणोनि गुणातीत तूं पूर्ण । मग कैंचे गुण वर्णावे ॥७॥
अहो देवा मजला कांहीं । कवन कराया बुद्धि नाहीं । वेडीवांकुडी सेवा म्हणुनी ही । अंगीकारीं गुरुराया ॥८॥
तूं करितां अंगीकार । अबद्ध कैसें होईल साचार । म्हणोनि सरसावलों धरोनि धीर । चरित्रारंभा मी पाहीं ॥९॥
असो आतां श्रोते हो सज्जन । परिसा चित्त स्थिर करोन । मी जरी असें मतिहीन । सांभाळून घ्यावें मज तुम्ही ॥१०॥
माझें चित्त असे चंचळ । म्हणोनि तुम्ही श्रोते सकळ । लक्ष देतां बरवें होईल । अर्थ सारा समजेल पैं ॥११॥
म्हणोनि घडीघडी 'सावधान'। म्हणतों तुम्हां श्रोत्यांलागून । परी या बालका क्षमा करोन । प्रेम धरावें श्रवणांत ॥१२॥
असो मागील अध्यायीं निरूपण । रक्षिला स्वामींनीं अल्लीशा यवन । पुढें आणिक ऐका हो सज्जन । यवनाची त्या सुरस कथा ॥१३॥
शिर्शी कोर्टामाजीं नाझर । झाला अल्लीशा, हा विस्तार । मागील अध्यायीं कथिला साचार । आतां ऐका पुढील कथा ॥१४॥
तो राहिला सुखानें तेथ । त्याचा गांवचि तो असे सत्य । मग काय उणीवता त्याप्रत । सद्गुरुकृपेनें सांगा हो ॥१५॥
तो श्रीस्वामींचे ध्यान । करी मानसीं रात्रंदिन । ऐसें असतां झालीं तीन । वर्षे तेथ येऊनियां ॥१६॥
अल्लीशा असे अति भोळा । 'श्र्वेत' म्हणतां दूध दिसे डोळां । ऐशिया कोण विचारी ते वेळां । फसविलें त्याजला कारकुनें ॥१७॥
तीन वर्षांमाजीं जाण । सरकारी पैसा गट्ट करोन । बैसला त्याचा कारकून । अल्लीशाचा हो पाहीं ॥१८॥
पैसा असे नाझरा - हातीं । म्हणोनि अल्लीशासी भीति । इंग्रजी न येतां त्याप्रति । फसविलें कारकुनें त्या समयीं ॥१९॥
तेव्हां कारवार - कोर्टाहूनि । न्यायाधीश आदिकरूनि । आले कराया तपासणी । शिर्शी - कोर्टामाजीं पैं ॥२०॥
त्यांनीं केला सारा तपास । तेव्हां कळलें न्यायाधीशास । पैसा गट्ट गट्ट केला बहुवस । आलें नाझरावरीचि पैं ॥२१॥
तेव्हां खटला करावा म्हणोनि । ठरविलें न्यायाधीशें झणीं । विदित नाहीं अल्लीशालागुनि । असे तो निश्र्चिंत गुरुकृपें ॥२२॥
परी कुमठेचा मित्र सारस्वत । मंगेशभट्ट आला होता तेथ । न्यायाधीशासंगें शिर्शींत । फिरतीवरी ते समयीं ॥२३॥
तो गेला अल्लीशापाशीं । म्हणे काय झालें तुजसी । खटला होईल तुजवरी परियेसीं । नोकरी जाईल बापा ही ॥२४॥
ऐसा कैसा तूं भोळा शंकर । कारकुनें तुज फसविलें साचार । नाहीं केला कांहीं विचार । आतां काय करिसील तूं ॥२५॥
त्यानें पैसा गिळिला जरी । तुजवरीच तो येई निर्धारीं । तुजवरी असे जबाबदारी । असे कठिण काळ पहा ॥२६॥
आतां तुजला तुरुंगवास । घडेल वाटे मजला खास । पुढें काय गति ती देवास । विदित जाण बा पाहीं ॥२७॥
यावरी अल्लीशा हांसोन गदगदां । म्हणे कां तुम्हां नाहीं धंदा । श्रीस्वामींच्या धरितां पदा । कैंचें भय बा मजलागीं ॥२८॥
त्यांच्या वचनीं माझा विश्वास । तेचि रक्षिती मजला खास । त्यांनीं दिधले आशीर्वाद बहुवस । मग कां भ्यावें मीं पाहीं ॥२९॥
श्रीपांडुरंगाश्रमस्वामी । माझ्या पाठीशीं असती नेहमीं । ऐसा निश्र्चय मनीं धरिला मीं । तेचि मजला रक्षिती ॥३०॥
त्यांचा आशीर्वादचि पाहीं । माझ्या कार्यासि शोभा देई । तेणेंच निश्र्चयें जागा मज ही । प्राप्त झाली विदित तुला ॥३१॥
त्यांच्या आशीर्वादबळें जाण । कवणही अपराध जाईल झांकून । मग कैंचें भय मजलागोन । सांगें तूंचि बा पाहीं ॥३२॥
गुरुदेवापुढें मानव कोणी । खटला कैसा करितील धरणीं । विसरलासि कां तूं मागील करणी । श्रीस्वामींची तुमच्या पैं ॥३३॥
मी ना भीत कधींकाळीं । तोचि मजला प्रेमें सांभाळी । तयासन्मुख न ये जवळी । कळिकाळही न निश्चयेंसीं ॥३४॥
न्यायाधीशानें लिहितां ठराव । लेखणीवरी बैसोनि गुरुदेव । खटल्याचा विचार मोडील सर्वं । ऐसा निश्चय माझा पैं ॥३५॥
तपासावया येती म्हणोनि । आधींच श्रीस्वामींलागूनि । विनंतिपत्र मीं धाडिलें झणीं । काय तें सांगतों ऐक जरा ॥३६॥
श्रीमत्पांडुरंगाश्रमस्वामी । यांच्या चरणारविंदीं करितों मी । साष्टांग नमन अंतर्यामीं । धरोनि मूर्ति आपुली ती ॥३७॥
येतील वरिष्ठ तपासावया । कवणही विघ्न न यावें त्या समया । इतुकी कृपा करावी गुरुराया । चरणीं तुझ्या मस्तक हें ॥३८॥
यापरी करोनि प्रार्थना बहुविध । सेवा करविली आला प्रसाद । स्वामीमठाकडुनी प्रसिद्ध । मग कैंचें भय मजला ॥३९॥
ते कनवाळू स्वामिराय । माझें अनिष्ट करतील काय । रक्षितील ऐसा निश्चय । असे मजला दृढतर तो ॥४०॥
इतुकें बोलुनी अल्लीशा भक्त । राहिला ठेवूनि शांत चित्त । श्रीस्वामींचे नामस्मरण सतत । चालवी प्रेमानें तो पाहीं ॥४१॥
न करी चिंता कांहीं एक । प्रफुल्लित दिसे त्याचें मुख । तेव्हां चमत्कार काय तो सुरेख । झाला ऐका श्रोते हो ॥४२॥
दुसर्या दिवशीं करितां तपास । काय लिही तो न्यायाधीश । खटला टाकिला एका दिशेस । केलें हितचि त्याचें हो ॥४३॥ र्या
बदली केली होन्नावरासी । तेव्हां अधिकचि अल्लीशासी । आनंद झाला त्याचे मानसीं । काय कारण सांगूं तें ॥४४॥
होन्नावरासि जातां आपण । वारंवार स्वामींचें दर्शन । घेऊं चित्रापुरीं जाऊन । नजीक होय तो गांव ॥४५॥
म्हणोनि अल्लीशालागोनि । परम आनंद झाला मनीं । मग तो गेला होन्नावरा तेथूनि । हुकुमापरी तेधवां ॥४६॥
असो मग तो वारंवार । जाय चित्रापुरा धरूनि निर्धार । श्रीपांडुरंगाश्रम - गुरुवर । यांचें दर्शन घे प्रेमें ॥४७॥
मग कांहीं वर्षे लोटतां । पेन्शन घेऊनि राहिला तत्त्वतां । श्रीगुरुचरणां न विसरतां । स्मरण करीत सतत पहा ॥४८॥
मरे तोंवरी केलें स्मरण । अंतकाळीं ध्याइला कृपाघन । दीर्घ स्वरें आरंभिलें स्तवन । श्रीस्वामींचे प्रेमानें ॥४९॥
म्हणे सद्गुरुमाउली कृपांगे । तुजवीण सारे विषय वाउगे । न येती कवणाच्याही संगें । तूंचि पोंचविसी मोक्षातें ॥५०॥
तुझें प्रेम हेंचि एक । येई सांगातीं निश्चयात्मक । तेणेंच शां आमुचा उद्धार देख । होय देवा कृपाघना ॥५१॥
तूंचि आमुची जननी जनक । तुजहुनी मज ना जगतीं आणिक । तूंचि पावलास निश्चयात्मक । कुमठाग्रामीं संकटीं ॥५२॥
देवा काय तुझी महिमा । अवर्णनीय नाहीं त्या सीमा । अभक्तांसिही लाविसी प्रेमा । करिमी निजभक्त तत्काळ त्या ॥५३॥
मी कोण कुठील जातीचा यवन । ऐशिया लागलें तुझें ध्यान । जडलें प्रेम अद्भुत कोठून । तुझीच करणी ही सारी ॥५४॥
अहा देवा ऐसें प्रेम । जडतां कैंचा उरेल भवभ्रम । पाप सारें होऊनि भस्म । चित्त शुद्ध होय खरें ॥५५॥
ऐसा तूं बा माझा देव । तुजला सारखे रंक राव । किती वर्णावें सद्गुणवैभव । बोलूं न शकें मी बापा ॥५६॥
झाले तुझे उपकार अमित । कैसा उतराई होऊं यांत । कवणही उतराई नाहीं होत । मी तरी अज्ञ यवन पहा ॥५७॥
अमो देवा अंतीं तुजला । स्मरूनि देह हा तुज अर्पिला । देईं ठाव चरणीं मजला । दीनदयाळा प्रभुराया ॥५८॥
ऐशियापरी करूनि प्रार्थना । देह अर्पिला श्रीसद्गुरूंना । एवं सोडिलें आपुल्या प्राणा । त्या अल्लीशा यवनानें ॥५९॥
पहा कैसी सद्गुरुमहिमा । जरी आला यवनजन्मा । गुरुकृपेंचि स्तविलें नामा । श्रीस्वामींच्या प्रेमभरें ॥६०॥
इतुकें प्रेम लागाया कारण । सद्गुरुमहिमाचि ती जाण । त्याहूनि कांहीं नाहीं आन । नसे संशय यामाजीं ॥६१॥
ना दाविती कलाकौशल्य । नाहीं घातली जनांसि भुरळ । परी बघतांचि मूर्ति प्रेमळ । उपजे प्रेम अंतरीं ॥६२॥
ऐसें व्हावया काय कारण । सांगूं आतां त्याची खूण । परिसा भाविक श्रोते सज्जन । चित्त देऊनि प्रेमानें ॥ ६३ ॥
ब्रह्मज्ञानिया सकल जन । राजा रंक ब्राह्मण यवन । आपपर सारे समान । त्यामुळे उद्धरिलें अल्लीशासी ॥६४॥
सद्गुरुमूर्तिच असे तैशी । परम कनवाळू भेद ना मानसीं । तेचि आमुचे हितकतें निश्चयेंसीं । त्याहुनी त्रिजगतीं ना अन्य ॥६५॥
ऐशिया सद्गुरुदर्शनें आपुलें । पाप - ताप - दैन्य सगळें । जाणा खचितचि भस्म जाहलें । नाहीं संशय यामाजीं ॥६६॥
काय सांगू त्यांची महिमा । त्यांच्या कृपेस नाहीं सीमा । जातां सन्मुख त्यांच्या प्रेमा - । माजीं सांपडती निश्चयेंसीं ॥६७॥
लोहचुंबकासंनिध जैसें । ठेवितां लोखंड चळे आपैसें । सद्गुरुसंनिध जातां तैसें । ओढिती मन भाविकांचें ॥६८॥
लोखंडावीण वस्तु आन । ओढितां न ये चुंबकालागोन । तैसें सद्भक्ताविण अन्य जन । त्यांसि सद्गुरु काय करी ॥६९॥
ज्यासि असे जीवात्मबुद्धि । तोचि सद्गुरु देखतां आधीं । प्रेमें धांव त्यांच्या पदीं । चरण न सोडी कदापि ॥७०॥
देहात्मबुद्धि ज्याची असे । तो गुरुप्रेमांत विरत नसे । जरी संनिधींत राहतसे । सद्गुरु देवचि हें न जाणे ॥७१॥
जो असे प्रेमळ भक्त । सद्गुरु आपुल्या प्रेमानें त्याप्रत । ओढुनी नेती त्यासी त्वरित । निजस्वरूपीं निर्धारें ॥७२॥
आणि जे असती खरे संत । चुंबकापरी ओढिती भक्त । तारिती आपुल्या कृपेनें त्यांप्रत । क्षण न लागतां हो पाहीं ॥७३॥
त्यांच्या कृपेनें जरी यवन । तारला, तरी कां हो आपण । तरूं नये सांगा वचन । विचार करितां सहज कळे ॥७४॥
धरितां मनीं दृढ विश्वास । तरूं निश्र्चयें आम्ही खास । प्रेमें भजतां ते आम्हांस । उद्धरिती जाणा पहा हो ॥७५॥
जगाच्या कल्याणास्तवचि देह । झिजविती ते निःसंदेह । नाहीं देहावरी मोह । ममता तैशी अणुमात्र ॥७६॥
असो बहुत कासया बोलणें । नाहीं त्यांसी प्रपंच करणें । इतुके कष्ट कोणत्या कारणें । कां घेती भार भक्तांचा ॥७७॥
केवळ लोकोद्धारावांचुनी । कर्तव्य नाहीं तयांलागुनी । सार्या जगाचेचि धनी । असती गुरुराज ते पहा ॥७८॥
सारें जगचि त्यांचे होय । ते जगाचे असती हा निश्चय । माया ब्रह्मांडीं वसती सदय । रिता ठाव ना गुरुवीण ॥७९॥
ऐसी ती प्रेमळ सगुरुमूर्ति । सदा स्मरावी आपुल्या चित्तीं । मग कैंची आम्हां भीति । त्यांच्या कृपेनें पहा हो ॥८०॥
असो आतां कथिली ही कथा । जे ऐकती पठती त्यां भक्तां । स्वहिताचा मार्ग मिळेल अवचितां । न लागतां सायास अणुमात्र ॥८१॥
पुढील अध्यायीं कथा रसाळ । ऐकतां तोषतील भक्त प्रेमळ । लटिके नव्हती आमुचे बोल । परिमा निर्मल चित्तानें ॥८२॥
आनंदाश्रम परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें एकचत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८३॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां मोह होय तो दूर । एकचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥८४॥
अध्याय ४१ ॥
ओंब्या ८४॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति एकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2024
TOP